Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४८३] श्री. १ सप्टेंबर १७५७.
पौ भाद्रपद शुध्द ८ बुधवार,
शके १६७८ धातानाम.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. फिरंगी भागानगरांत चार महालांत बळावले आहेत. नवाब सलाबतजंग फौज जमा करून भागानगरासमीप जाऊन पावले. परस्पर युध्दें फारशी होतात. नवाब आपली कुमक करावी ह्मणोन आह्मास लिहितात. फिरंगी आमची कुमक करावी ह्मणोन लिहितात. दुतर्फा हि मध्यस्त आह्मी फिरंगियांनी भागानगरास न जातां शहरचे दहा बारा कोसाचे अंतरांनीं जावें; नवाबांची जिनशी घ्यावी, ते त्यांणी न दिल्ही. नवाबांनी जलदी करून यांचे मागें फौज पाठविली ते न पाठवायची होती. ऐकून दोहीकडे अंतराय. तूर्त दोहीकडील पैगाम आह्माकडे कुमकेविशी आले आहेत. त्यास, शहरांत तिकडील वर्तमान काय ? एतद्विशीं आपला व खानाचा विचार कसा ? तो खानास पुसोन लिहिला पाहिजे. व नवल विशेष वर्तमान असलें असेल तेंहि ल्याहावें. सर्व खानास पुसोन विचार लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४८२] श्री. २ जुलै १७५६.
पौ आषाढ ५
शके १६७८ धातानाम.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. सैदलष्करखान यांजकडील व राजश्री दत्ताजी शिंदे यांजकडील मजकूर लिहिला तो कळला. ऐशास, खानाचा व आमचा स्नेह पहिल्यापासून चालत आला आहे. त्यास दुसरा विचार आहे ऐसें नाहीं. एतद्विषयीं सर्व अर्थ आपल्यास लिहिलाच आहे. इकडील वर्तमान : तुंगभद्रा उतरोन मजल दरमजल कृष्णातीरास येऊन उतरले. एक दोन दिवस उंटाचा व हत्तीचा उतार होता. बहुतेक लष्कर उतरलें. त्याजवर पाणी फार आलें. ठोकरे व पेटारे घालून लष्कर उतरले. +++++ हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४८१] श्री. १८ मे १७५६.
पौ ज्येष्ठ शुध्द ५ शुक्रवार.
शके १६७८.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील वर्तमान ता छ१८ शाबान पर्यंत आपले आशीर्वादेकडून यथास्थित असे. येथील वर्तमान तर: मुरारराव, मुजफरखान यांणी व सावनूरवाले मेळवून विरुध्द केलें होतें. त्यांस उत्तम प्रकारें हमवार करून त्यांचे जिवा संकट त्यांस प्राप्त होऊन, हत्यारबंदसुध्दां मुरारराव, मुजफरखान यांस बाहेर काढले आणि सावनूरवाले यांजकडे खंडणी अकरा लाख रुपये करार केली; व निमे मुलूख घेतला. रुपये खंडणीचे न येत याजकरितां बंकापूर किल्ला सरकारांत गहाण घेतला; आणि तेथून कूच करून तुंगभद्रातीरी आलों. हरपनहळळी, चित्रदुर्गची मामलियत विल्हे लागली. बिदनूरचा गुंता उरकला. या उपरि कांही गुंता नाहीं. मोगल येथें आले. त्यास, मुसा बूसीचा यांचा बनाव न बने. याजकरितां सलाबतजंग यांणी निरोप दिल्हा. त्यांस मच्छली बंदरी पाठविले. येथून जावयाचे भय, यास्तव सरकारांतून त्यांस पांचशे राऊत पोहोचवावयास दिल्हे. पुढे त्यांणी सरकारांत चाकरीस यावें असें केलें. फिरंगी मर्द, सरंजाम चांगला, याजकरितां चाकर ठेविले. मल्हारबा लग्नाकरिता निरोप घेऊन गेले. कळावे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४८०] श्री. १० मे १७५६.
स्वामीजींचे सेवेसी साष्टांग नमस्कार विनंति उपरि. देवाजीपंत वकिलांचे पत्र छ १० शाबानीचें सोमवारी आलें कीं फिरंगियांस आज्ञा दिधली कीं आपले फुलचारीस जाणें. त्यास अति निकट करून काहाडलें. फिरंगी कूच करून मल्हारजी होळकरापाशीं उतरलें. मल्हारजी होळकर लग्नासाठी पंतप्रधानापासून रुखसत जाले. एक दोन दिवस राहून, फिरंगियांस चार पांच मजला पाववून मग मल्हार होळकर कूच करून लग्नासाठी देशास जातील. आपणास कळावें ह्मणाने आज्ञेप्रमाणें लिहिलें असे. आपणास अवकाश जालिया आज अथवा उद्या आपणहि यजमानाच्या भेटीस यावें. सविस्तर समक्ष विदित होईल. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४७९] श्री. मे १७५६.
आशीर्वाद उपरि. आपण पत्र पाठविलें त्यावरून लेखनार्थ सर्व अवगत होऊन परम संतोष जाहाला. नवाब स्नेह घरोबा फार धरितात. खासा आपण व तिघे भाऊ निखालसपणें आमचे डेऱ्यास एकाएकी येऊन ममतापूर्वक भाषण करितात. व शहानवाजखान मुसा बूसी हमेशा येत असतात. सर्वांनी परस्परें इनामप्रमाण केलें आहेत, याजमुळें सैदलष्करखानाचा विशेष पक्ष कोणी करीत नाही. आह्मी कांही बोलावें तरी प्रसंग नाहीं. आमचे कार्यास आले हाच उपकार. या प्रसंगी जें त्यास विरुध्द तें बोलतांच नये. ऐसा अर्थ येथें आहे. खानास येथील वर्तमान सांगणें. ह्मणून विस्तारे लिहिलें तें कळलें. ऐशियास, खानास वर्तमान सांगणें. तेव्हां ते ह्मणाले कीं, आह्मी पहिल्यापासून त्यांचे आज्ञेप्रमाणें वर्तत गेलों; आह्मास भरोसा त्यांचेच आश्रयाचा होता; व पुढेंहि त्यांच्याच आश्रयाच्या भरोशियावर आह्मी येथें बसलों आहों; तेथील प्रसंग आपण समक्ष पाहिलाच आहे; वराडची सुबेदारी हि काढिली. पाश तोडीत चालले; या विचारांत आहेत; ऐशास, पुढें आह्मी कोणता विचार करावा हें चित्तांत विचारून लिहिलें पाहिजे की त्याप्रमाणें वर्तणूक केली जाईल. याप्रकारें बोलिले. त्यावरून लिहिलें असे. तरी ते आपले अंगीकृत पदरी बांधोन हा काळ पावेतों बसले होते. आतां जेव्हां असा प्रसंग तेव्हां संशय केला. विश्वास उठत चालला. समस्त मंडळी विस्कळीत जाली आहे. आपणास विदित. ऐशास, याचा विचार काय ? कोणता विचार करून रहावें ? हें त्यांस तुह्मी लिहिलियानें त्याप्रमाणें ते करितील. भरोसा आपलाच धरितात. याचें उत्तर पाठविले पाहिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४७८] श्री. मे १७५६.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव सा नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. ऐसें नसावें. येथील वर्तमान तरी : मुरारराव, मुजफरखान, सावनूरकरांनी स्थळाश्रये करून जुंझ अविलंबिले. तेव्हा नवाबास आणणें जरूर जाहालें. तत्प्रसंगी शहानवाजखानाचा मनोदय रक्षणें प्राप्त जाहालें. नवाब एक दिवस फकीर होतो; नाही तर फिरंगियांस निरोप द्या; ह्मणून अत्याग्रह करून निरोप दिल्हा. बहुत योग्य सेवक होते. भावास कारागृहांतून एकाएकी सोडून, एकास वराडचा सुभा, एकास विजापूर अदवानीचा सुभा दिल्हा. आह्मीं विरुध्द दाखवावें तों आमच्या कार्यास आला. त्यांसी विरुध्द दाखविल्यास दुर्लौकिक होणार. सांप्रत बिदनूर प्रांती मुक्काम आहे. स्वामीचे आशीर्वादे त्रिवर्ग शत्रू अति क्षीण जाहाले. दहा लाखाचा मुलूख आला. दहा लाख रुपये करार केले आहेत. येणे कठिण आहे. सर्व कर्जाशी संबंध आहे. सर्व स्वामीचे आशीर्वादें उत्तम होईल. बिदनुराकडील गुंती उरकल्यावर माघारें फिरावेसें आहे. सकल पत्रार्थ खानास व बगाजीपंतास हि चित्तास आला तर सांगावा. छ साबान हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४७७] श्री. २८ एप्रिल १७५६.
पौ वैशाख वद्य ५ मंगळवार
शके १६७८ धातानाम
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान सा नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस आपलेकडून पत्र वर्तमान कळत नाहीं. तरी सदैव पत्रीं कुशल लिहित जावें. इकडील वर्तमान तरी; सावनुरांत मुरारराव घोरपडे व मुजफरखान व पठाण यांस कोंडिलें. इकडील मोर्चे गांवाजवळ गेले. गांव जेर केला. त्यास नवाब सलाबतजंग आमच्या मदतीस आले. यांच्या आमच्या भेटी झाल्यावर यांचा तोफखाना सुरू करूं. फडच्या लवकरच होईल. नवाब स्नेह घरोबा फारच धरितात. खासा आपण व तिघे भाऊ निखालसपणें आमच्या ढेऱ्यास एकाएकी येऊन ममतापूर्वक भाषण केलें. शहानवाजखान व मुसा बुसी हमेशा येत असतात. आपल्यास कळावें यास्तव लिहिलें असें. रा छ २७ रजब. सर्वांनी परस्परें इमानप्रमाण केलें आहे, त्याजमुळें सैदलष्करखानाचा विशेष पक्ष कोणी करीत नाहींत. आह्मी बोलावें तर प्रसंग नाहीं. आमचे कामास आले. हा उपकार. याप्रसंगी जें त्यांस विरुध्द तें बोलतांच नये. ऐसा अर्थ येथें आहे. खानास येथील सर्व वर्तमान सांगणें. दत्ताजी शिंदे याजकडील वर्तमान जरूर लिहिणे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४७६] श्री. २७ एप्रिल १७५६.
पौ चैत्र वद्य १३ मंगळवार
शके १६७८ धातानाम.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान सा नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपलेकडून पत्र बहुत दिवस येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी निरंतर लिहित असिलें पाहिजे. इकडील वर्तमान तरी : घोरपडे व पठाण यांस सावनुरांत कोंडून जेर केले आहेत. नवाब सलाबतजंग आमच्या मदतीस येऊन पावले. यांच्या आमच्या भेटी जाहल्या. याउपर श्रीकृपेंकरून शत्रूचें पारपत्य सत्वरच होईल. मोंगलाई कारभार ! सुस्त अतिशय ! बहुनायकी आहे ! सर्व स्वामीचे आशीर्वादें उत्तमच होईल. मानवी दृष्टीनें तो विलंबावरच पडलें आहे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४७५] श्री. २३ एप्रिल १७५६.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी जनार्दन बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता छ २२ रजबपर्यंत स्वामीचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. अलीकडे अशीर्वादपत्र येत नाहीं. तरी सदैव पत्रीं सांभाळ करीत जावा. श्रीमंतांचें पत्र लष्करांतून आपणास आलें तें पाठविलें आहे. त्यावरून सविस्तर कळों येईल. राजश्री तुळाजी आंगरे सरखेल यांच्या पारपत्यास फौज आरमार +++++ न ठेविले आहेत. विजेदुर्ग इंग्रजांकडे तुर्त आहे. लौकरीच सरकारांत येईल. हें वर्तमान आपणास कळावें ह्मणून लिहिलें असे. अवरंगाबादेकडील व मोंगलाकडील व हिंदुस्थानचें व मारवाडचें नवलविशेष वर्तमान कांहीं आलें असिलें तर लेहून पाठविलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४७४] श्री. ९ एप्रिल १७५६.
पौ ज्येष्ठ शुध्द ५ गुरुवार
शके १६७८ धातानाम.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
चरणरज शिवभट साठे शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि. आपलें पत्र व श्रीमंत मुधोजीबावाचें पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान अवगत जाहालें. त्याणें उपरोधेकरून कितेक प्रकारें लिहिलें. त्यास श्रीमंत कैलासवासी याणीं आपले मरणकालीं संधी बळावून आले. विद्यमान असतां बत्तीस लक्ष रुपये नेमणूक करून दिली. त्यांपैकीं सोळा लक्ष गतवर्षीं दिले. बाकी हाल सालांत द्यावे. त्यांस, ज्याच्या नेमणुका त्यांजला करून, उभयतां रुपये द्यावे. एक दिले. देऊं. नाहीं तरी रुपये मिळत नाहीं. आणि त्यांनीं लिहिलें कीं, श्रीमंत जानोजी बावा यांजकडेस ममता. त्यांस, आपण कोणाचीहि ममता ठेवीत नाहीं. कैलासवासी यांचे आज्ञेप्रमाणें वर्तणूक करून, निरोप या उभयतांचा घेऊन, तीर्थयात्रा करावी, हे मनोदय असे. याहिवर ईश्वरसत्ता प्रमाण. बहुत काय लिहिणें. मित्ती वैशाख शुध्द १० हे विज्ञापना.