आजच्या सायबर जगात मराठीच्या समृद्ध साहित्य परंपरेचे प्रतिबिंब जास्तीत जास्त ठळकपणे दिसावे असे धोरण प्रतिष्ठानने गेली दहा वर्षांहून अधिक काळ सातत्याने जपले आहे. आजपर्यंत समग्र विठ्ठल रामजी शिंदे, समग्र धर्मानंद कोसंबी, केतकर ज्ञानकोशाचे सर्व २३ खंड, महाराष्ट्राचे कायम प्रेरणास्थान असणारे कै. यशवंतराव चव्हाण यांचे समग्र साहित्य आणि भाषणे वगैरेची संकेतस्थळे प्रतिष्ठानने लोकार्पित केली. त्या संकेतस्थळांना इंटरनेटच्या विश्वात चांगली लोकप्रियता आणि प्रतिष्ठा लाभली याचे समाधान वाटते.
इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे हे मराठी सांस्कृतिक जगतातले महापंडित. राजवाड्यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ हा विषय घेऊन संशोधनासाठी आपले उभे आयुष्य वेचले. त्यांनी संशोधनासाठी गोळा केलेल्या दुर्मिळ ऐतिहासिक व महाराष्ट्र विषयक महत्वाच्या सांस्कृतिक कागदपत्रांची संख्या पाच लाखांहून अधिक आहे. ह्या कागदपत्रांचे जतन व्हावे यासाठी त्यांचे डिजिटायझेशन करण्यासाठी धुळ्याची राजवाडे संशोधन मंदिराची मंडळी निधी गोळा करण्याचा प्रयत्न करीत प्रतिष्ठान कडे आली. राजवाडे यांच्या समग्र साहित्याच्या पुनर्मुद्रणाचे फार मोठे काम धुळेकरांनी केले आहे. राजवाड्यांच्या कागदपत्रांपैकी एक लाख कागदपत्रांचे डिजिटायझेशन करून ती दुर्मिळ कागदपत्रे अभ्यासकांसाठी इंटरनेटवर उपलब्ध करण्यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी प्रतिष्ठानने घेतली. दोन वर्षांपूर्वी ते काम पूर्ण झाले. त्यातूनच राजवाडे संशोधन मंदिराच्या मालकीचे vkrajwade.com संकेतस्थळ जन्माला आले हे सांगताना आनंद वाटतो.
आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान samagrarajwade.com संकेतस्थळाचे लोकार्पण करीत आहे. हा प्रकल्प इतिहासाचार्य राजवाडे यांचे समग्र साहित्य इंटरनेटवर युनिकोड स्वरूपात उपलब्ध करण्याचा आहे. राजवाड्यांचे समग्र साहित्य सुमारे १२,००० पानांचे आहे, आणि ते फक्त मराठीत आहे. ह्या पानांतील मजकूर अभ्यासक आणि संशोधकांसाठी ‘सर्च’ पद्धतीने उपलब्ध होणे हे मराठी भाषेच्या दृष्टीने आम्हाला महत्वाचे वाटले. ती काळाची गरजही आहे. राजवाडे संशोधन मंदिर संस्थेच्या vkrajwade.com ह्या वेब प्रकल्पात आज राजवाड्यांची १ लाख दुर्मिळ कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. पण त्यात कोणताही ‘सर्चेबल’ मजकूर नाही. ती उणीव आणि गरज प्रतिष्ठानचे samagrarajwade.com हे संकेतस्थळ भरून काढणार आहे.
राजवाड्यांनी केलेले संशोधन आणि लेखन विविध प्रकारचे आहे. ते केवळ इतिहासाशी संबंधित नाही. त्यांचे समकालीन ज्ञानकोशकार डॉ.केतकर यांनी त्या संदर्भात जे लिहिले आहे ते फार महत्वाचे आहे. डॉ. केतकर लिहितात, “ राजवाड्यांच्या अनेक कामगिऱ्यांपैकी सर्वांत अधिक मोठी कोणती हे ठरवून राजवाड्यांचे वर्णन करावयाचे झाले तर त्यास भाषाशास्त्रज्ञ म्हणावे लागेल, आणि त्यांची गणना अत्यंत मोठ्या वैय्याकरण्यात करावी लागेल. हेमचंद्र आणि वररूचि यांचे प्रयत्न राजवाड्यांच्या प्रयत्नांच्या दृष्टीने काहीच नाहीत. इतिहासाचार्य किंवा इतिहाससंशोधक हे नाव राजवाड्यांस देण्यात आपण त्यांच्या कार्याचे अज्ञान दाखवू. त्यांच्या बौद्धिक कार्याचे गुरूलघुत्व माझ्या मते १) भाषाशास्त्रज्ञ, २) वैय्याकरण, ३) शब्दसंग्राहक, ४) इतिहाससंशोधक या अनुक्रमाने आहे.”
samagrarajwade.com संकेतस्थळाचा पसारा सुमारे १२,००० पानांचा आहे याचा उल्लेख वर आला आहे. त्या बारा हजार पानांचा युनिकोड मजकूर मुद्रित शोधन करून उभारायचा हे काम अजस्त्र आहे. प्रतिष्ठानच्या सर्व संकेतस्थळांचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम आजपर्यंत ज्यांनी अतिशय यशस्वीपणे केले त्या ‘पुजासॉफ्ट’ च्या माधव शिरवळकर यांच्याकडेच ह्या संकेतस्थळाची जबाबदारी आम्ही सोपवली आहे. शिरवळकर आणि त्यांच्या ‘पुजासॉफ्ट’मधील सहकाऱ्यांनी प्रतिष्ठानसाठी आणखी एका चांगल्या मराठी संकेतस्थळाचे काम पूर्ण केले याचा मला आनंद वाटतो.
samagrarajwade.com चे लोकार्पण झाले असे मी आनंदाने जाहीर करीत आहे.
शरद पवार
अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.