[४८१] श्री. १८ मे १७५६.
पौ ज्येष्ठ शुध्द ५ शुक्रवार.
शके १६७८.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील वर्तमान ता छ१८ शाबान पर्यंत आपले आशीर्वादेकडून यथास्थित असे. येथील वर्तमान तर: मुरारराव, मुजफरखान यांणी व सावनूरवाले मेळवून विरुध्द केलें होतें. त्यांस उत्तम प्रकारें हमवार करून त्यांचे जिवा संकट त्यांस प्राप्त होऊन, हत्यारबंदसुध्दां मुरारराव, मुजफरखान यांस बाहेर काढले आणि सावनूरवाले यांजकडे खंडणी अकरा लाख रुपये करार केली; व निमे मुलूख घेतला. रुपये खंडणीचे न येत याजकरितां बंकापूर किल्ला सरकारांत गहाण घेतला; आणि तेथून कूच करून तुंगभद्रातीरी आलों. हरपनहळळी, चित्रदुर्गची मामलियत विल्हे लागली. बिदनूरचा गुंता उरकला. या उपरि कांही गुंता नाहीं. मोगल येथें आले. त्यास, मुसा बूसीचा यांचा बनाव न बने. याजकरितां सलाबतजंग यांणी निरोप दिल्हा. त्यांस मच्छली बंदरी पाठविले. येथून जावयाचे भय, यास्तव सरकारांतून त्यांस पांचशे राऊत पोहोचवावयास दिल्हे. पुढे त्यांणी सरकारांत चाकरीस यावें असें केलें. फिरंगी मर्द, सरंजाम चांगला, याजकरितां चाकर ठेविले. मल्हारबा लग्नाकरिता निरोप घेऊन गेले. कळावे. हे विनंति.