Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[४७३]                                                                    श्रीशंकर.                                                         १७ मार्च १७५६.

पौ चैत्र शुध्द १
शके १६७८ धातानाम.

विनंति. दुसरें पत्र लष्करचें आलें फाल्गुन शुध्द १५ भोमवारचें. तेथें राजकी वर्तमान तर : श्रीमंतांनीं हल्ला करून तीन टेकडयावर मोर्चे होते ते उठवून दोन तीनशे माणसें ठार कापिलीं, व दोन तीनशें जखमी झालीं. आठा तोफा, जेजाला वगैरे, बंदुखा वगैरे, कुल घेऊन तेथें मोर्चे आपले कायम करून ठेविले. दुसरें दिवशीं पहाटे हल्ला करोन जावें तों रात्रीं मुरारजी व मुजफरजंग व पठाण यांनीं बाहेरील मोर्चे उठवून, सावनुरांत जाऊन, कुल मोर्चेबंदी केली. दुसरे दिवशीं श्रीमंतांनीं हल्ला करून, बाहेरील मोर्चे उठवून, आपले मोर्चे सावनुरा भोवते बसविले. आणि दुसरे दिवशीं खंदकावर मोर्चे भिडले. आणि तीन दिवस तोफांचा मार श्रीमंतांनीं केला, तो श्रीहरि जाणे, त्याजमुळें कुल जेर झाले. आंत रयत फार. ब्राह्मणांचीं घरें दीड हजार. उदमी मातबर फार. आणि कुल पठाणाचे कबिले. शिवाय बाहेरील रयत आणि फौज. त्याजमुळें अनर्थ फारच झाला, आणि नाशही बहुतच झाला. तो पत्रीं काय ल्याहावा ? त्यास, हालीं रदबदलीस प्रारंभ जाला आहे. त्यास, तह ठहरल्यावर वर्तमान लिहून पाठवूं, परंतु आतां फार दिवस लागणार नाहींत. दो चो दिवसांत फडच्या होईल. नबाब सलाबतजंग यांचीं पत्रें आलीं होतीं. त्यास, येथून साठ कोसांवर आहेत. त्यांस पुत्र झाला* यास्तव राहिले होते. त्यास, हालीं येतील. तहनंतर काय मनसुबा होईल तो लिहून पाठवूं. येणेंप्रमाणें चिरंजीव कृष्णाजीचीं पत्रें आलीं होतीं. स्वामीस बातमी कळावीबद्दल पत्रांची नक्कल लिहिली असे. हे विज्ञापना.

[४७२]                                                                     श्री.                                                          १७ मार्च १७५६.

पौ चैत्र शुध्द १
शके १६७८ धातानाम.

चरणरज भगवंत भैरव सा नमस्कार विनंति. लष्करचें पत्र फाल्गुन शुध्द १२ चें आलें. तेथें राजकी वर्तमान कीं दोन महिने मोर्चे देऊन झाले. तह कांहीं न ठहरे. आणि नवाब आलियावर तह ठहरला तर यशाचे विभागी ते होतात. ऐसें जाणून श्रीमंतांनीं फाल्गुण शुध्द ११ शुक्रवारीं हल्ला केला. तेव्हां मुजफरखान वगैरे यांच्या तीन चक्क्या होत्या त्या जागा जाऊन त्या टेकडया तिन्ही हस्तगत केल्या. चारशें गाडदी ठार मारिले आणि तीन चारशे जखमी वगैरे धरून आणिले. तोफा आठ व जेजाला बंदुखा मोर्चावर जें साहित्य होतें तें कुल हस्तगत झालें. तेथें आपले मोर्चे कायम केले. त्यांनींही शर्त केली. आपणाकडील शेंसवाशें घोडें पडलें, व शेपन्नास माणूस ठार झालें, दोन तीनशें जखमी जालें. लढाई मोठी झाली. तेव्हां मोर्चे त्यांचे उठवून आपले कायम केले. याजउपरि त्यांसहि पराक्रम कळला. त्यास नवाबही जवळच आले. त्यास, हालीं तह लवकरच ठहरेल. आह्मीं श्रीमंतांचे समागमें होतों. सर्व कवतुक दृष्टीनें पाहिलें. कितीक वर्तमान भेटी नंतर कळेल. मऱ्हाटे माणूस गाडदी आपणाकडील फार जाया जालें. मातबर माणसापैकीं नागोराम भागवत यांस गोळी तोंडास लागली. परंतु जखम हलकी आहे. रा बळवंत गणपत, राजश्री बाबा फडणीस यांचे शालक, यांसी गोळी बरगडीस लागली, ते कापून काहाडली. परंतु ईश्वरें कृपा केली. चिंता नाहीं, रा रत्नाकरपंत वकील यांचे चिरंजीव माणीकराव यांस गोळा लागून ठार जाले. वरकड सर्व कुशल आहेत. हालीं फडच्या लवकर होईल, तेव्हां मागून सविस्तर वर्तमान लिहून पाठवूं. आमचे येणें श्रीमंतांचे समागमें होईल, अलीकडे होत नाहीं. हे विज्ञापना.

[४७१]                                                                     श्री.                                                            ५ मार्च १७५६.

पौ वैशाख शुध्द ११ सोमवार
शके १६४८.

तीर्थस्वरूप राजश्री दादा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें बाळकृष्ण दीक्षित कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लिहिलें पाहिजे. यानंतर बंदल काशीद याजबरोबरी चिरंजीव राजश्री गोविंद दीक्षितांनीं माघ वदि १० दशमीचें पत्र पाठविलें तें चैत्र शु॥ २ पावलें. वर्तमान कळलें. भावी होणार तें कधी न चुके. उभयता कजिया शांत होत नाहीं. ज्यांचीं मरणें आलीं ते मरतील, गाव लुटले जातील तेव्हांच यांचा त्यांचा सलूख होईल. येथें आह्मीं सांप्रतीं कुशल आहों. वडिलांची रात्रंदिवस चिंता वाटते ते श्री जाणें ! तरी वडिली बहुत खबरदार असावें. मी काय लिहूं ! वजीर फरुकाबादेस आले. बरोबरी हरिभक्त आहेत. पठाणहि आहेत. रोहिलेहि आहेत. रोहिले यांचा मुलूख रोहिले यांसी दिल्हा. साठी लाख रुपये करार केला. त्यांत पस्तीस हातास आले. रोहिले याची कन्या आपले पुत्रास नबाबानें केली. पठाण याचे तीस लाख रुपये ठराविलेत. फरूकाबादेस येऊन घ्यावे. मध्यस्तीस आहेत. पठाण त्यांचे सैन्याजवळी उतरता निमे पठाणाचा मुलूख हरिभक्तांस दिला, निमे पठाणास दिला. राजश्री आपाजी जिवाजी सिरखंडे समशाबाद महू पठाणाचा परगणा होता. तो परगणा पठाणाकडे वाटणीस गेला. इकडील हें वर्तमान. दुसरें : काशीची सनद नबाबवजीरानें दिली. एकशे चाळीस गाव व काशी जाली. अंमलदार गोपाळपंत गोविंदभट बरवे गराडेकर,-नासरजंग याचे वेळेस रा बाबूजी नाइकाकडे कर्ज, ते आपणास विदितच आहेत, त्यांचा पुत्र, राजश्री रघुनाथ बाजीराव यांचे मेव्हणे,-येताती. दोन हजार स्वार समागमे आइकतो. कळलें पाहिजे. रा लक्ष्मण शंकर तिरस्थळी करून प्रयागावरून आपले कालपीस गेले. त्याणीं उत्तर दिलें कीं, आमचे स्वाधीन ढाकुणी कर्तव्य आहे, तरी मृगसाल पंधरा दिवस अगोदरच पाठवणें. हें वर्तमान पूर्वीं वडिलांस लिहिलें आहे. चित्तास वडिलांचे येईल तैसें करावें. गृहस्थ एकवचनी शपथ केली, तुमचा रुपया खाणार नाहीं. याजवर वडिलांचे चित्तास येईल तें कीजे. जातेवेळेस पाचशे रुपये व दोन पितांबर स्त्रियांचे दिले. आह्मी त्यांसी नवदां रुपयांचीं वस्त्रें दिलीं. यावेगळे आह्मांस प्रथम दुशाला उंच व पागोटे, धोत्रजोडा, पैठणी उंच व चंदेरी ताफता दिला. गृहस्थ भला. जो दानधर्म कर्तव्य तो वडिलांचे वाडियांत बसोन दीड हजार रुपये वाटले. आह्मीं जीं नांवें लिहून दिलीं त्याप्रमाणें दिलें. राजश्री दामोदर महादेव हिंगणें यांणीं तुला केली होती. त्यांणीं जातेसमयीं तुळेतील पंधराशे रुपये ठेवून गेले ते वाटणें ह्मणून सांगितलें होतें. ते वाटले. काशींत धान्य महाग जालें. गहू मण १, 471 1 दाळ तुरीची 471 2 सर्व जिन्नस महाग जाला. इ० इ० इ० हे विनंति. मित्ती चैत्र शु॥ ५ सोमवार.



[४७०]                                                                  श्रीलक्ष्मीकांत.                                                     २५ फेब्रुवारी १७५६.

पौ फाल्गुन वद्य १२
शनवार शके १६७७ युवानाम.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेवबावा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक जानोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष. स्वामींनीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाहला. वेदमूर्ति राजश्री शिवभट साठे यांजकडील पत्र काशिदाबराबर पाठविलें तें प्रविष्ट होऊन त्याचें प्रत्योत्तर लेहून आपणाकडे पाठविलें आहे. तें सत्वर वेदमूर्तीकडे पावतें केलें पाहिजे. निरंतर स्वामींनीं आशीर्वादपत्रीं सेवकांचा परामृश करीत असावें. र॥छ २४ माहे जमादिलावल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

[४६९]                                                                        श्रीरघुवीर.                                                        ७ फेब्रुवारी १७५६.

पौ माघ वद्य १० बुधवार
शके १६७७ युवानाम संवत्सरे.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित यांसी :-
सेवक मुधोजी भोसले दंडवत विनंति येथील कुशल जाणून स्वकीय आनंदलेखनें चित्त प्रमोदाप्रत करीत असिलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाहाले, पत्रार्थी परामृश न केला, हें वडिलपणास उचित कीं काय ? ऐसें नसावें. निरंतर आशीर्वाद पत्रीं दर्शनाचा लाभ द्यावा. साहेब यांचा काल जालियानंतर दौलतेचा प्रकार जाहाला तो परस्परें आपणास श्रवण जालाच असेल. मासपक्षानंतर कुच दरकुच राजश्री पंत प्रधान यांच्या भेटीच्या उद्देशें पुण्यास आलों. इष्टालाभाचे बोलण्यांत घरकृत्यांत द्वैतार्थ पाहोन उभयपक्षीं समजाविशीसमान वाटे दौलतेचे करून उभयतांस द्यावे आणि समाधान करावें, हा निश्चय ठहराविला. इतुक्यांत कर्नाटक प्रांतीची मसलत उपस्थित होऊन पंडित मशारनिले निघाले. मजल दरमजल कृष्णातीरास आले. तों राजश्री मुरारराव घोरपडे व दक्षण प्रांतींचें ताम्र व किरात एकत्र होऊन बळ धरिलें. यांशीं झुंजावें हा इत्यर्थ करून तदन्वयेंच सांगोन पाठविल्या उपरांतिक चालोन जाणें जरूर जाहालें. मग मजल दरमजल बागडकोटचे किल्यास येऊन, मोर्चे लाऊन किल्ला हस्तगत केला. तेथून कुच दरकुच सावणूर बंकापुरानजीक आले. अमित्रांशीं गांठ घातली. किल्याचे आसऱ्यामुळें लवकर स्ववश न होय, यास्तव शह देऊन चौगीर्द फौजा उतरल्या आहेत. शत्रूचा उपमर्द जाहाला नाहीं तों कोणताहि प्रसंग होत नाहीं. यास्तव दिवसगती जाहाली. यामुळें आह्मा उभयतांसहि फौजेसहित राहणें लागलें. अशा प्रसंगांत वो राजश्री शिवभट साठे बंगालियाहून नागपुरास आले. तिकडील ऐवजाच्या हुंडया बारा लक्ष रुपयांच्या श्री वाराणशीचे साहुकारांच्या आणिल्या आहेत. सदर्हूपैकीं दोन लक्षांच्या हुंडया शहर औरंगाबादेच्या साहुकारियांत आल्या असेत. अगदीं रुपये राजश्री जानोजी भोसले यांकडे देणार. त्यास दौलतेतील रुपया ज्याप्रमाणें विभाग होतील तदनुसार यथा विभागें समान वाटणी द्यावी. एकासच प्राप्त होईल ऐसें नाहीं. ऐशियास, आपण वडील आहेत. तरी अगदी रुपये अमानत साहुकाऱ्यांत ठेवावे. भट मशारनिलेस उत्तम प्रकारें सांगावें. केवळ दुराग्रहासच प्रवर्ततील तरी, निम्मे रुपये त्यांकडे द्यावे, निमे आमचे वाटणीचे रुपये आपणासन्निध ठेवावे. शहरचे दोन लक्षांपैकी एक लक्ष त्यांकडे देऊन, एक लक्ष आह्माकडील राजश्री लक्ष्मण जिमणाजी ढकले यांचे पदरीं घालविले पाहिजेत. बाकी अगदीं निमेचा ऐवज आपणाजवळ असे द्यावा, येविशीं शिवभट यांसही पत्र लिहिलें असे. तथापि अतिशय करतील, लटकीं पत्रें आमचे नांवाचीं दाखवितील, तरी न मानितां रुपये अडथळोन पाडावे. पुढें जैसें निवडेल तैसा निकाल पडेल. तेथील साहुकारांसही पत्रें पाठविलीं असेत. सांप्रत तीर्थरूपाचे जागा आह्मास आपण वडील आहेत. सकळविशीं भरंवसा मानोन विनंति लिहिली आहे. ध्यानास आणोन पत्रान्वयाप्रमाणें योग घडविला पाहिजे. सर्व प्रकारें आपलें, ऐसें चित्तीं पूर्णत: समजावें. रा छ ६ माहे जमादिलावल. आपण वडिल जाणोन हें पत्र लिहिलें असे. सर्व प्रकारें भरंवसा असे. बहुत काय लिहिणें. हे विनंति. लेखनसीमा.

                                                             शाहूराज प्रसादेन रघुजी सुयशोधर: ॥
                                                          तत्सूनोस्तु मुधोनाम्नश्चैषा मुद्रा विराजते ॥भद्रं॥

[४६८]                                                                        श्री.                                                            १३ जानेवारी १७५६.

पौ पौष वद्य १३ गुरुवार
शके १६७७ युवानाम.

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
चरणरज शिवभट साठे साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता पौष शु॥ एकादशी जाणून स्वकीय लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें, वर्तमान कळों आलें. सवद्याविशीं लिहून पाठविलें. त्यास श्रीमंत राजश्री जाणोजीबावाची आमची भेट जालियावर तुह्माकडेस पाठवून देऊं. येथेंहि नागपुरामध्यें सवदा करावयासी उमेदवार आहेत. श्रीमंत राजश्री जाणोजी भोसले यांस कागद पाठविला आहे, हा मुजरद कासदा समागमें गलगलें येथें पाठवून जाब पाठवणें. बारा लक्ष रुपये तुह्माकडेसच पाठवून देऊं. यजमानाचें उत्तर आलियावर हुंडी पाठवूं. यजमानास पत्र लिहिलें असें. हे विज्ञापना.



[४६६]                                                                        श्री.                                                            

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. वराडच्या गांवाचे कमाविशीचा अर्थ लिहिला. तरी हे साल मख्तियाचेंच आहे. पेस्तर सालचें बोलणें तें पेस्तर सालीं बोलावें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.



[४६७]                                                                        श्री.                                                            १९ डिसेंबर १७५५.

पौ पौष शुध्द ११ सोमवार
शके १६७७ युवानाम.

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
चरणरज शिवभट साठे साष्टांग नमस्कार विनंति उपरि. त्या प्रांतींचे तपशीलवार वर्तमान राजकीय लिहिणें. आपण श्रीहून स्वार जालों तें छपारा नजीक रामटेक मार्गेश्वर शुध्द १५ गुरुवारीं पावलों. दो रोजांत नागपुरा नवमहाबाज याजकडील हालसालची मामलत विल्हे लाऊन, हस्ती व जवाहीर श्रीमंत जानोजी बावा व श्रीमंत त्रिवर्ग बंधू यांसहि घेऊन समागमें त्यांजकडील भला माणूस मातपुरुषीचीं वस्त्रें व बहुमान देवायास आला तोहि समागमें असे. यजमान या प्रांतीं आलिया त्यांसहि सत्वर विदा करून देऊं. आपणास श्रुत होय. हे विनंति.

[४६५]                                                                        श्री.                                                            २९ नोव्हेंबर १७५५.

पौ मार्गशीर्ष पौष शुध्द १
शुक्रवार शके १६७७.

वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव बावा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
चरणरज शिवभट साठे शिरसाष्टांग नमस्कार. कार्तिक वदि १० मुक्काम नजिक रेवा मुकुंदरास आलों. बंगालियाची मामलत करून हस्तीसमागमें व श्रीमंत जानोजीबावा व श्रीमंत मुधोजीबावा यांचे खलेते व जवाहीर घेऊन आलों. हुंडीही बारा लक्षांची आणिली. त्यापैकीं दोन लक्ष रुपये श्रीहून हुंडी करून घेतली. बाकी दहा लक्ष रुपयांची शर्तेची हुंडी घेऊन आलों. श्रीमंत कैलासवासी यांचें इमान-प्रमाण व कागदपत्र पूर्ववत् करून घ्यावें आणि रुपये द्यावे. त्या पूर्ववत्प्रमाणें सर्व गोष्टी होतील चिंता नाहीं. बहुत काय लिहिणें हे विनंति. मित्ती कार्तिक वदि १० हे विज्ञापना.

[४६४]                                                                        श्री.                                                            २० सप्टेंबर १७५५.

तीर्थस्वरूप राजश्री वासुदेव बावा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
अपत्य महादजी रघुनाथ पटवर्धन साष्टांग नमस्कार विनंति येथील वर्तमान ता कार्तिक शुध्द १५ मु पुणें वडिलांचे आशीर्वादेकरून सुखरूप असों विशेष. राजश्री हरि दीक्षित येथें नाहींत. ते श्रीमंतांचे लष्करांत गेले. लष्कर मोरेश्वरावरी आहे. पुढें सातारियासी जावयाची बोली आहे. पहावें. जातील कीं नाहीं कळेना. मल्हारजी होळकर याचे चित्तांत आहे कीं, सख्य करून द्यावें. या नंतर राजश्री जानोजी बावाचे वर्तमान तरी आजपावेतों प्रथम दिवसच आहे. बोलीचाली कांहीं नाहीं. दोघे भाऊ निराळे निराळे आहेत. पुढें पहावें, कसें होईल. राजश्री मोरेश्वर दीक्षित यांणीं जानोजी बावाची पोतदारी केली. वो हरि दीक्षितांनीं आह्मांकडील बोलीचाली श्रीमंत नानांजवळ पडली तरी रा नागोराम भागवत यांसीं सांगितलें आहे. त्यांनीं मान्य केलें आहे, आह्मांस घरास जावयाची आज्ञा श्रीमंतांनीं दिली; वस्त्रेंहि दिलीं. परंतु जानोजी भोसले याकडील व फत्तेसिंग भोसले यांकडील कामकाजाचा बंदोबस्त होणें आहे. यास्तव आठ चार दिवस राहिलों. हेही स्वार होऊन मोरेश्वरास जात आहेत. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.

[४६३]                                                                        श्री.                                                            २० सप्टेंबर १७५५.

वे. शा. सं. रा. रा. दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक बाबूराव बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता भाद्रपद शुध्द पौर्णिमा जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. रा. मल्हारराव होळकर खानदेश दरोबस्त जहागिरीच्या पातशाही सनदा आणिल्या आहेत. श्रीमंतांजवळ मामलेदार जाऊन मामलती करीत आहेत. नशिराबाद परगणा वगैरे महाल राजश्री वासुदेव जोशी यांणीं केला. कांहीं परगणे त्रिंबकराव विश्वनाथ यांणीं केले. कितेक जाऊन उभे राहिले आहेत. ह्यास्तव सेवेशी विनंतिपत्र लिहिलें आहे. आपण पडीप्रसंगीं आहेत. आह्मांसाठीं खानदेश प्रांतीं एखादा महाल शेंदुरणी, लोहारें वगैरे हरकुणी एक महाल, आह्मांसाठीं केला पाहिजे. आपणही आठ पंधरा दिवसां भेटीस येऊं. आज्ञा कराल तरी श्रीमंतांचीही भेट स्वामीच्या विचारें घेणेंच आली तरी घेऊं. परंतु, एक दुसरा आह्मांसाठीं अगत्यरूप करून घेतला पाहिजे. बनोन आलें लक्ष्य प्रकारें करावें. स्वामीचे नांवें करून आमचें ऊर्जित होईल. स्वामीचें नांव वगळूं. स्वामी ह्मणतील, सोयरे लोकांशीं कांहीं गोष्टी कामाची नाहीं, ऐसें चित्तामध्यें न आणावें. सेवाचाकरीचें नातें, त्याप्रमाणें चाकर लोक सेवा करितील. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.