[४७९] श्री. मे १७५६.
आशीर्वाद उपरि. आपण पत्र पाठविलें त्यावरून लेखनार्थ सर्व अवगत होऊन परम संतोष जाहाला. नवाब स्नेह घरोबा फार धरितात. खासा आपण व तिघे भाऊ निखालसपणें आमचे डेऱ्यास एकाएकी येऊन ममतापूर्वक भाषण करितात. व शहानवाजखान मुसा बूसी हमेशा येत असतात. सर्वांनी परस्परें इनामप्रमाण केलें आहेत, याजमुळें सैदलष्करखानाचा विशेष पक्ष कोणी करीत नाही. आह्मी कांही बोलावें तरी प्रसंग नाहीं. आमचे कार्यास आले हाच उपकार. या प्रसंगी जें त्यास विरुध्द तें बोलतांच नये. ऐसा अर्थ येथें आहे. खानास येथील वर्तमान सांगणें. ह्मणून विस्तारे लिहिलें तें कळलें. ऐशियास, खानास वर्तमान सांगणें. तेव्हां ते ह्मणाले कीं, आह्मी पहिल्यापासून त्यांचे आज्ञेप्रमाणें वर्तत गेलों; आह्मास भरोसा त्यांचेच आश्रयाचा होता; व पुढेंहि त्यांच्याच आश्रयाच्या भरोशियावर आह्मी येथें बसलों आहों; तेथील प्रसंग आपण समक्ष पाहिलाच आहे; वराडची सुबेदारी हि काढिली. पाश तोडीत चालले; या विचारांत आहेत; ऐशास, पुढें आह्मी कोणता विचार करावा हें चित्तांत विचारून लिहिलें पाहिजे की त्याप्रमाणें वर्तणूक केली जाईल. याप्रकारें बोलिले. त्यावरून लिहिलें असे. तरी ते आपले अंगीकृत पदरी बांधोन हा काळ पावेतों बसले होते. आतां जेव्हां असा प्रसंग तेव्हां संशय केला. विश्वास उठत चालला. समस्त मंडळी विस्कळीत जाली आहे. आपणास विदित. ऐशास, याचा विचार काय ? कोणता विचार करून रहावें ? हें त्यांस तुह्मी लिहिलियानें त्याप्रमाणें ते करितील. भरोसा आपलाच धरितात. याचें उत्तर पाठविले पाहिजे.