[४८३] श्री. १ सप्टेंबर १७५७.
पौ भाद्रपद शुध्द ८ बुधवार,
शके १६७८ धातानाम.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. फिरंगी भागानगरांत चार महालांत बळावले आहेत. नवाब सलाबतजंग फौज जमा करून भागानगरासमीप जाऊन पावले. परस्पर युध्दें फारशी होतात. नवाब आपली कुमक करावी ह्मणोन आह्मास लिहितात. फिरंगी आमची कुमक करावी ह्मणोन लिहितात. दुतर्फा हि मध्यस्त आह्मी फिरंगियांनी भागानगरास न जातां शहरचे दहा बारा कोसाचे अंतरांनीं जावें; नवाबांची जिनशी घ्यावी, ते त्यांणी न दिल्ही. नवाबांनी जलदी करून यांचे मागें फौज पाठविली ते न पाठवायची होती. ऐकून दोहीकडे अंतराय. तूर्त दोहीकडील पैगाम आह्माकडे कुमकेविशी आले आहेत. त्यास, शहरांत तिकडील वर्तमान काय ? एतद्विशीं आपला व खानाचा विचार कसा ? तो खानास पुसोन लिहिला पाहिजे. व नवल विशेष वर्तमान असलें असेल तेंहि ल्याहावें. सर्व खानास पुसोन विचार लिहिणें. हे विनंति.