Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४४८] श्री. २४ डिसेंबर १७५४.
पौ पौष वद्य १ सोमवार
शके १६७६. छ १५ र॥
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पांहिजे. विशेष. आपलें पत्र प्रविष्ट जाहलें. आमचे उदासीनतेचा अर्थ व त्यांचे समाधान करावयाचा विचार लिहिला तो अक्षरशहा अवगत जाहला. आह्मांसही खानाचें पत्र, मक्केस जातों, दस्तक व साहित्यही लागेल तें द्यावें, ह्मणून आलें. ऐशास खान दीर्घदर्शी, खेरीज यासारखें मनुष्य या जिल्ह्यांतून उदासीनतेनें गेल्या आमचें नुकसान व नवाबाचें बहुतच नुकसान. ऐसें शहाणे लोक मानतील. इतकें उदास त्यानें व्हावें हें योग्य नाहीं. विवेकेंकरून नवाबाजवळच रहावें. त्याजविशीं नवाबास आह्मी कधींही सांगायास अंतर करणार नाहीं. व आह्मी सांगितल्यावर नवाबही त्याचें महत्त्व रक्षूनच चालवितील. कदाचित् हा विचार मनास नये तर दिल्लीस जावें. तेथें मातबर शेवा करावी. हाही प्रकार चित्तास नये तर आह्मांजवळ रहावें. हेहीं दौलत स्नेह्याचे मार्गें त्यांचीच आहे. असें कोणतें संकट पडलें कीं, सर्व सांगतात तें न ऐकतां मक्केस जावें ? दोनी पक्षांतून एखादे पक्षाचा बळवोत्तर पाहून, त्याचा अवलंब करून, रहावें, उदास न व्हावें, हा उत्तम पक्ष आहे. तुह्मी त्यांस समजावून सांगून जितकें होईल तितकें करावें. करूं तर नवाबाचा सर्वाधिकार, नाहीं तर कांहींच न करूं, असें ह्मटल्यास कसें कार्यास येईल ? ते खावंद, हे सेवक खावंदाचे व सेवकाचे अढीनें आजपर्यंत कोणाचेंही चाललें कीं काय ? याचा विचार खान पुर्ते जाणतात. तो आपले ध्यानांत आणून, ज्यांत आपलें स्वरूप राहे, नवाबाची चाकरी घडे तें करावें, योग्य आहे. आह्मीही यांचे स्वरूपास अंतर पडे असें कदापि करणार नाहीं. तुह्मीही समजावून सांगोन, ज्यांत त्यांची मर्जी हमवार राहे तें करणें योग्य. सामोपचारें व आपलेकडूनही खानाचें बरें तें करावयास अंतर मागें केलें नाहीं, पुढें करणें नाहीं. परंतु तुटे तों त्यांनींही तोडूं नये. त्यांनीं तोडून गेलियास, शहानवाजखान सूखच मानितील. यास्तव यांनीं तुटे तों न वोढावें, हें अति उत्तम. असें असतां, नच मनास येई तर, सर्व प्रकारें जाहाजाचें साहित्य करूं. मुंबईस साहित्य करून देऊं. इंग्रेजाजवळून साहित्य करून देऊं. जो पक्ष ते अवलंबतील त्याचें सर्व प्रकारें साहित्य करूं. परंतु त्यांनीं न जावें, समजून रहावें, हेंच उत्तम आहे. छ ९ रबिलावल. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४४७] श्री. ९ नोव्हेंबर १७५४.
पौ कार्तिक वद्य १० शनवार
शके १६७६.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. मनसुरअल्लीखान मृत्यु पावलियाचा मजकूर लिहिला तो कळला. अत:परही तिकडील नवल विशेष वर्तमान येईल तें वरच्यावरी लिहीत जावें. प्रस्तुत अवरंगाबादेंत उमदे अमीर राहतात, त्याचा विचार काय ? व नवाबाबरोबर अमीर आहेत, ते कोणे मनसुबियांत आहेत ? तें लिहीत जावें. आपण जरूर यावें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४४६] श्री. ३ आक्टोबर १७५४.
पौ मार्गशीर्ष शुध्द १ शुक्रे शके १६७६
भावनामसंवत्सरे. ब॥ मुजरद काशीद
जाब ब॥ मुडा काशीद मार्गशीर्ष शुध्द २
शनवार.
तीर्थस्वरूप राजश्री वासुदेव दीक्षित दादा याप्रति :-
अपत्यें बाळकृष्ण दीक्षित सा नमस्कार विनंति येथील क्षेम ता कार्तिक शुध्द गुरुवारपो श्री जाणून स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. यानंतर श्रीमंत राजश्री रघुनाथपंत दादा यांची भेट घेऊन घरास सुखरूप आपले आशीर्वादें आलों तें वर्तमान पूर्वी लिहिलेंच आहे, त्यावरून कळों येईल. विशेष. रो विश्वनाथ वैद्य यांणी वरात शिवभटावरी बंगाल्याचे ऐवजी रो रघोजी भोसले याची घेतली होती व विश्वनाथभटांनी पत्र तुह्मांस लिहिलें होतें त्यावरून शिवभटास आह्मी बंगाल्यास लेहून रु॥ आणविले. शिवभटांनी रु॥ १३९०० काशीचे दसमासिये चलनी सावकाराचे घरी हुंडी पाठविली. त्यांस म॥ आमची देणें ह्मणून लिहिलें आणि सावकारास शिवभटांनी लिहिलें कीं, विश्वनाथभटापासून वरात व कबज घेऊन रु॥ मा बालकृष्ण यांचे देणें. त्यास वरातहि आह्मांजवळ आली नाहीं व कबजही दिल्हें नाहीं. त्यास त्याचा गुमास्ता गदाधर कुसरे येथें होता. त्यानें खर्चास रुपयांऐवजी ३५० घेतले, कबज लेहून दिल्ही, आणि विश्वनाथ वैद्याकडे गेले. विश्वनाथभटांनी आह्मांस लिहिले कीं, अवरंगाबादेचा ब॥ चा भाव असेल तर रु॥ अवरंगाबादेस उतरणें. त्यावरून हें पत्र वडिलांस लिहिलें आहे. रु॥ आठचे रु॥ १३५५० आमचें पत्र वडिलांचे नावें घेऊन येईल व वरात व कबज र॥ विश्वनाथभट वैद्याचे व बापूजीपंत याचे हातीचें पत्र सावकाराचे घरी अनामत ठेविली आहेत. वरात, कबज व पत्रें ऐशी घेऊन आठेचे रु॥ त्र्याहात्तर हजार साडेपांचशें घ्यावे. याचा ऐवज वडिलांस पाठवून देतों. विश्वनाथभटास पत्र तुमचे नांवे लि॥ आहे. तेथें म॥ हा आहे :- काशींत पांचा साता सावकारांची दिवाळी निघालीं, तुमचे वरातकबज आह्मांपाशी नाही. मग सावकाराचे गळी पडोन भाव ६॥। अवरंगाबादेचा करून तीर्थस्वरूप र॥ वासुदेव दीक्षित दादा यांजकडे रु॥ पाठविले. तुह्मी कबज, वरात व बापूजीपंतांचे हातीचें पत्र गदाधरभट कुसरें याने लिहून नेले आहे तें, ऐसे घेऊन रु॥ घ्यावे. अनमान न करावा. हरिदास कृपारामाबाबत रु. ३४००० चवतीस हजार आठचे हुंडी पूर्वी पाठविली आहे. ते व काशीदास वेणीदास हजारिया रु॥ ६००० आठचे पाठविले. ये॥ चाळीस हजार रुपयांच्या हुंड्या पाठविल्या आहेत. त्या हुंड्या सकारून रु॥ घेणें. रु॥ घेतलियाचा जाब पाठवून देणें. हरिदास कृपारामाचें दुकान ठहरलें. परंतु रु॥ आपले घ्यावे, अनमान न करावा. जासूद कोण्हे दिवशीं पावले तो लिहिणें. विश्वनाथभट वैद्य, याची कबज रु॥ १३९०० ची घेणें. रु॥ देणें. बहुत काय लिहिणें. हे नमस्कार. काशीदास रु॥ ५ पांच देणें. पत्री लिहिलें पाहिजे. येक दिवस काशीद ठेवून लागलाच जाब पाठविणें. तुह्मांस अगोदर कळलें पाहिजे ह्मणोन लिहिलें असे. भाव करूं तो लिहून पाठवूं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४४४] श्रीवाडेश्वर समर्थ. २४ सप्टेंबर १७५४.
पो आश्विन शुध्द १५ मंगळवार
शके १६७६ भावनामसंवत्सरे.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक भिकाजी मराठे कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल आश्विन शुध्द ८ सोमवार पावेतों जाणोन स्वकीय लिहून संतोषवीत असिलें पाहिजे. विशेष. स्वामीचे शरीरास सावकाश नवतें, ह्यामुळें भारी चिंता लागली होती. वेदमूर्ति राजश्री नारायण जोशी आले. आश्विन शुध्द १ रविवारी येथें आले. त्यांनी आरोग्याचें वृत्त सांगितलें तेव्हा परम संतोष जाला. राजश्री रामाजीपंत यांची भेटी मात्र श्रीमंतांची केली. पातशहास पहावयाची आज्ञा केली आहे. जालियावर सेवेसी वृत्त लिहून पाठवितों. आह्मी श्रीमंतांची भेटी घेतली. गुदस्ताचीं खतें आपल्यापाशीं आहेत. त्याचें व्याज द॥ १५ सरकारांतून घ्यावे लागतें. पाठवून द्याल तर हिशोब करून घेऊं. जर विचारास येईल कीं न घ्यावें तर कांही चिंता नाहीं. तैसा जाब लिहून पाठवावा. दरबारचा विचार यथास्थित आहे. खोल पार जाला आहे. जालें वर्तमान सविस्तर मागाहून लिहून पाठवितों. प्रां येदलाबारचेविषयी वेदमूर्ति राजश्री हरी दीक्षित श्रीमंतांस हटकिलें. त्यांनी उत्तर दिल्हें कीं, चिरंजीव राजश्री रघुनाथपंत दादाचें अद्यापि आलें नाहीं. जाब आलियावर जें कर्तव्य तें केलें जाईल. राजश्री वासुदेव जोशी मुरुडकर यांचे शरीरास असाध्य व्यथा आहे. ईश्वर कृपा करील तर पुनर्जन्म होईल. धर्मही दाहा वीस सहस्त्र केला. गजदानही केलें. कळावें. ह्मणोन विनंति लिहिली आहे. चिरंजीव राजश्री सखाराम नाईक यांचा व चिरंजीवाचा परामर्ष व दुकाणाचा सर्वस्वें स्वामी करीतच आहेत. मीं ल्याहावेसें काय? कृपालोभ कीजे. हे विनंति. १०००००.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४४३] श्रीलक्ष्मीकांत. ३१ जुलै १७५४.
पो आश्विन शुध्द पंचमी
शके १६७६.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव बाबा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. राजश्री त्रिंबकजी भोसले राजे यांजकडील ऐवजाची हुंडी बंगालियाहून वेदमूर्ति राजश्री शिवभट साठे यांणी रुपये ४०००० चाळिस हजारांची तुमचे जोगची पाठविली आहे. त्यास आपण आठशें रुपये जमा केले आहेत ह्मणोन मशारनिलेनी विदित केलें. ऐशियास सदरहू ऐवज कर्जाचा आहे, तरी सुलाखी रोकडे रुपये देविले पाहिजेत. रा छ ११ माहे शाबान. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४४२] श्रीलक्ष्मीकांत. ६ जुलै १७५४.
पौ आषाढ वद्य १४ गुरुवार
शके १६७६.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव बाबा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. वेदमूर्ति राजश्री शिवभट साठे यांणी बंगालियाहून दोन लक्ष रुपयांच्या हुंड्या तुमच्या जोगच्या पाठविल्या आहेत. त्याऐवजी वेदमूर्ति राजश्री रघुनाथभट्ट पटवर्धन यांजपासून येथें लक्ष रुपये नगद घेऊन, हुंड्या यांचे स्वाधीन करून आपणांकडे पेशजी रवाना केल्या आहेत. ऐशियास हुंडीप्रमाणें यांसी ऐवज पावत नाहीं, ह्मणोन भटजी आह्मांस शब्द लावितात. यांजकरितां स्वामीस हें पत्र लिहिलें असे. तरी तुह्मांकडील जोगच्या हुंड्या आहेत, त्याप्रमाणें हुंड्याचे मित्तीचा ऐवज यांचा जमाखर्च करून देविला पाहिजे. भटजीनें आपले ऐवजी उदाराम कमलनयन यासी पंचवीस हजार रुपये देविले आहेत. ते हुंड्यांच्या मित्तीप्रमाणें त्याचा ऐवज रोकड सुलाखी देविला पाहिजे. सदरहू ऐवज पावता करावा. बट्टा व सकराईविशीं ऐवजास हरकत जाली न पाहिजे. रा छ १४ माहे रमजान. सेवेस श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४४१] श्री. २ जुलै १७५४.
पौ आषाढ शु. १२ मंगळवार
शके १६७६, छ. १० माहे रमजान बरोबर नारो बाबाजी.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. यानंतर आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. दिल्लीकडील पातशहाचें वगैरे कितेक वर्तमान लिहिलें तें कळलें. याउपरिही नवलविशेष लिहीत जावें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४४०] श्री. १ जुलै १७५४.
पौ आषाढ वद्य १४ गुरुवार
शके १६७६.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव बाबा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति. उपरि बंगाल्याचे दोन लक्ष रुपयांच्या हुंड्या तुमच्या जोगच्या आल्या होत्या. त्या आह्मीं येथें सराफास देऊन नगद रुपये घेतले. ऐशियास मुदतीस हुंड्या सकारल्या असतील तेच मित्तीस आपले कबज सावकारास देऊन हुंड्याचे ऐवजी राजश्री येसाजी नाईक गडकरी यांस दहा हजार रुपये देविले पाहिजे. हुंड्या यांणी ज्या सावकारास विकल्या असतील त्यास सुलाखी नगद रुपये देविले पाहिजे. याची बोली रोकडीची आहे. तरी हुंडीप्रमाणें रुपये सुलाखी रोकडे दिल्हे पाहिजे. रा छ ९ माहे रमजान. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४३९] श्री. २९ जून १७५४.
पौ आषाढ वद्य ९ शनवार
शके १६७६
छ २२ रमजान.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव बाबा दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. स्वामीनीं पत्र पाठविलें ते प्रविष्ट होऊन सविस्तर अर्थ निवेदन जाहाला. वेदमूर्ति राजश्री शिवभट साठे यांनी बंगालियाहून आपल्या जोगाच्या दोन लक्ष रुपयांच्या हुंडया पाठविल्या आहेत. त्याचा ऐवज नागपुरी चलनी देऊन, सरकारची लाखास कसर पांच हजार रुपये राहातात ते जमा करून ठेवणें, ह्मणोन शिवभटांनी लेहून पाठविलें आहे. त्यास आपण सराफास ऐवज देविला. ते हुंड्यांप्रमाणें रुपये मागतात ह्मणोन लिहिलें, ऐशियास लवकर अवगत जाहालें. ऐशियास येथील सावकाराचा ऐवज आह्मी नक्त घेतला आहे आणि त्यास ऐवज आपणांकडे देविला आहे, येविशीं पूर्वीच पत्रें व हुंड्या पाठविल्या आहेत. तरी हुंड्यांप्रमाणें आज येथील सावकाराचा ज्याचा त्यास पावता केला पाहिजे. रा छ ७ माहे रमजान. हुंड्यांची मुदत होऊन गेली. ज्या मित्तीस हुंड्या सकारिल्या त्याच मुदतीस रुपये आपले कबज देऊन सराफास देविले पाहिजेत. यांचा संवदा रोकड्या रुपयांचाच केला आहे. हिंदुस्थानाकडील वर्तमान लिहिलें त्यास आपण लिहिलें, त्याप्रमाणेंच येथेंही वर्तमान आलें आहे. निरंतर स्वामीनीं आशीर्वादपत्र पाठवून लोभ करीत असावें. छ मजकूर. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४३८] श्री. २७ जून १७५४.
पौ आषाढ शु. १३ मंगळवार
श १६७६ छ १० माहे रमजान.
बा नारो बाबाजी.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराऊ प्रधान कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. येथील वर्तमान ता आषाढ शुध्द सप्तमीसह अष्टमीपर्यंत यथास्थित असे. विशेष. चिरंजीव राजश्री दादास जरूरी पत्र लेहून, लाखोटा करून पाठविला आहे. हा अजूरदार कशीद करून, त्याजबरोबर ताबडतोब रवाना करून, उत्तर आणवून लौकर पाठवून देणें. जरूर कामाचा असे. हे विनंति.