[४७८] श्री. मे १७५६.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव सा नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. ऐसें नसावें. येथील वर्तमान तरी : मुरारराव, मुजफरखान, सावनूरकरांनी स्थळाश्रये करून जुंझ अविलंबिले. तेव्हा नवाबास आणणें जरूर जाहालें. तत्प्रसंगी शहानवाजखानाचा मनोदय रक्षणें प्राप्त जाहालें. नवाब एक दिवस फकीर होतो; नाही तर फिरंगियांस निरोप द्या; ह्मणून अत्याग्रह करून निरोप दिल्हा. बहुत योग्य सेवक होते. भावास कारागृहांतून एकाएकी सोडून, एकास वराडचा सुभा, एकास विजापूर अदवानीचा सुभा दिल्हा. आह्मीं विरुध्द दाखवावें तों आमच्या कार्यास आला. त्यांसी विरुध्द दाखविल्यास दुर्लौकिक होणार. सांप्रत बिदनूर प्रांती मुक्काम आहे. स्वामीचे आशीर्वादे त्रिवर्ग शत्रू अति क्षीण जाहाले. दहा लाखाचा मुलूख आला. दहा लाख रुपये करार केले आहेत. येणे कठिण आहे. सर्व कर्जाशी संबंध आहे. सर्व स्वामीचे आशीर्वादें उत्तम होईल. बिदनुराकडील गुंती उरकल्यावर माघारें फिरावेसें आहे. सकल पत्रार्थ खानास व बगाजीपंतास हि चित्तास आला तर सांगावा. छ साबान हे विनंति.