[४७६] श्री. २७ एप्रिल १७५६.
पौ चैत्र वद्य १३ मंगळवार
शके १६७८ धातानाम.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान सा नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपलेकडून पत्र बहुत दिवस येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी निरंतर लिहित असिलें पाहिजे. इकडील वर्तमान तरी : घोरपडे व पठाण यांस सावनुरांत कोंडून जेर केले आहेत. नवाब सलाबतजंग आमच्या मदतीस येऊन पावले. यांच्या आमच्या भेटी जाहल्या. याउपर श्रीकृपेंकरून शत्रूचें पारपत्य सत्वरच होईल. मोंगलाई कारभार ! सुस्त अतिशय ! बहुनायकी आहे ! सर्व स्वामीचे आशीर्वादें उत्तमच होईल. मानवी दृष्टीनें तो विलंबावरच पडलें आहे. हे विनंति.