[४७५] श्री. २३ एप्रिल १७५६.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी जनार्दन बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता छ २२ रजबपर्यंत स्वामीचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. अलीकडे अशीर्वादपत्र येत नाहीं. तरी सदैव पत्रीं सांभाळ करीत जावा. श्रीमंतांचें पत्र लष्करांतून आपणास आलें तें पाठविलें आहे. त्यावरून सविस्तर कळों येईल. राजश्री तुळाजी आंगरे सरखेल यांच्या पारपत्यास फौज आरमार +++++ न ठेविले आहेत. विजेदुर्ग इंग्रजांकडे तुर्त आहे. लौकरीच सरकारांत येईल. हें वर्तमान आपणास कळावें ह्मणून लिहिलें असे. अवरंगाबादेकडील व मोंगलाकडील व हिंदुस्थानचें व मारवाडचें नवलविशेष वर्तमान कांहीं आलें असिलें तर लेहून पाठविलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा केली पाहिजे. हे विनंति.