[४७४] श्री. ९ एप्रिल १७५६.
पौ ज्येष्ठ शुध्द ५ गुरुवार
शके १६७८ धातानाम.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
चरणरज शिवभट साठे शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि. आपलें पत्र व श्रीमंत मुधोजीबावाचें पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान अवगत जाहालें. त्याणें उपरोधेकरून कितेक प्रकारें लिहिलें. त्यास श्रीमंत कैलासवासी याणीं आपले मरणकालीं संधी बळावून आले. विद्यमान असतां बत्तीस लक्ष रुपये नेमणूक करून दिली. त्यांपैकीं सोळा लक्ष गतवर्षीं दिले. बाकी हाल सालांत द्यावे. त्यांस, ज्याच्या नेमणुका त्यांजला करून, उभयतां रुपये द्यावे. एक दिले. देऊं. नाहीं तरी रुपये मिळत नाहीं. आणि त्यांनीं लिहिलें कीं, श्रीमंत जानोजी बावा यांजकडेस ममता. त्यांस, आपण कोणाचीहि ममता ठेवीत नाहीं. कैलासवासी यांचे आज्ञेप्रमाणें वर्तणूक करून, निरोप या उभयतांचा घेऊन, तीर्थयात्रा करावी, हे मनोदय असे. याहिवर ईश्वरसत्ता प्रमाण. बहुत काय लिहिणें. मित्ती वैशाख शुध्द १० हे विज्ञापना.