[४७७] श्री. २८ एप्रिल १७५६.
पौ वैशाख वद्य ५ मंगळवार
शके १६७८ धातानाम
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान सा नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस आपलेकडून पत्र वर्तमान कळत नाहीं. तरी सदैव पत्रीं कुशल लिहित जावें. इकडील वर्तमान तरी; सावनुरांत मुरारराव घोरपडे व मुजफरखान व पठाण यांस कोंडिलें. इकडील मोर्चे गांवाजवळ गेले. गांव जेर केला. त्यास नवाब सलाबतजंग आमच्या मदतीस आले. यांच्या आमच्या भेटी झाल्यावर यांचा तोफखाना सुरू करूं. फडच्या लवकरच होईल. नवाब स्नेह घरोबा फारच धरितात. खासा आपण व तिघे भाऊ निखालसपणें आमच्या ढेऱ्यास एकाएकी येऊन ममतापूर्वक भाषण केलें. शहानवाजखान व मुसा बुसी हमेशा येत असतात. आपल्यास कळावें यास्तव लिहिलें असें. रा छ २७ रजब. सर्वांनी परस्परें इमानप्रमाण केलें आहे, त्याजमुळें सैदलष्करखानाचा विशेष पक्ष कोणी करीत नाहींत. आह्मी बोलावें तर प्रसंग नाहीं. आमचे कामास आले. हा उपकार. याप्रसंगी जें त्यांस विरुध्द तें बोलतांच नये. ऐसा अर्थ येथें आहे. खानास येथील सर्व वर्तमान सांगणें. दत्ताजी शिंदे याजकडील वर्तमान जरूर लिहिणे. हे विनंति.