Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र - साने गुरुजी
जन्म, बालपण व शिक्षण
कै. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा जन्म शके १७८५ आषाढ शु॥ अष्टमीस झाला. त्यांच्या आईचे नांव यमुना. बालपणीं त्यांची वृत्ति कशी होती, ते काय खेळत, कसे वागत वगैरे माहिती आम्हांस नाही. त्यांचे प्राथमिक शिक्षण वडगांव येथें झालें. राजवाडे यांच्या पितामहानें स्वराज्याच्या पडत्या काळांत लोहगडची किल्लेदारी केली होती. तेव्हां याच बाजूस त्यांचे प्राथमिक शिक्षण झालें. त्यांचे वडील बालपणींच निवर्तले. यामुळे त्यांचे लहानपणी संगोपन शिक्षण वगैरे त्यांच्या चुलत्यांनी केलें. राजवाडे यांनी स्वत: 'कनिष्ठ, मध्यम व उच्च शाळांतील स्वानुभव' म्हणून ग्रंथ मालेमध्यें एक लेख पुष्कळ वर्षांपूर्वी लिहिला आहे. त्यावरुन त्यांच्या सर्व शिक्षणाची माहिती मिळते. आठ वर्षे वयाचे असतां त्यांनी धुळाक्षरे शिकण्यास आरंभ केला. त्यांनी हें मराठी शिक्षण ३ वर्षे घेतलें. येवढया काळांत त्यांनी कधी शाळेंत जाऊन तर कधीं घरी राहून सामान्य मराठी पुस्तक वाचण्याइतकें भाषाज्ञान व केरोपंती अंकगणितांतील वाटेल तो प्रश्न सोडविण्याची तयारी हे संपादन केले. या तीन वर्षांत भूगोल, इतिहास, व्याकरण, व्युत्पत्ति, भूमिति, काव्य यांची बिलकूल कल्पना त्यांस नव्हती; या गोष्टींचा त्यांच्या बालमनावर ठसा कांहीच उमटलेला नव्हता. या तीन वर्षांत ते शाळेंत सरासरीनें दीडवर्षे गेले असतील; बाकीचे सर्व दिवस धांगडधिंगा, मस्ती कुस्ती करण्यांत त्यांनी दवडिले. मारामा-या करण्यांत त्यांचा पहिला नंबर असे; विटीदांडूचा खेळ खेळण्यांत तर ते तरबेज. पोहण्यांतही चांगलेच प्रवीण झाले. एकही शिक्षक या बालवयांत नीट शिक्षण देणारा त्यांस मिळाला नाही. ते या आत्मचरित्रांत सांगतात 'पंतोजी आडमुठे, पोटभरु, इकडची पाटी तिकडे नेऊन टाकणा-यांपैकी होते.' यामुळें आठवडयांत फक्त दोन तीन दिवस घटका अर्धघटका अभ्यास करुनही पंतोजीची कृपा राजवाडे यांस संपादितां येई. ते म्हणतात “जर चांगला शिक्षक मला मिळता तर ३ वर्षांत मी बी.ए. इतकी तयारी केली असती” या गोष्टींत कोणास अतिशयोक्ति वाटेल, परंतु मला तसें कांहीएक वाटत नाही. मिलसारखे पंडित किती बालवयांत लॅटीनग्रीक भाषांचे पंडित झाले, ज्ञानेश्वरांसारखे किती बालवयांत भाष्यकारांस मागोवा पुसणारे झाले, ईश्वरचंद्र विद्यासागरांसारखे विशालधी १५। १६ वर्षे वयाचे असतांना कसे सर्व शास्त्रपारंगत झाले. हें पाहिलें म्हणजे राजवाडे यांच्या म्हणण्यांत मला अत्युक्तीचा अंश दिसत नाहीसा होतो.
मराठी ४ थी इयत्ता शिकल्यावर राजवाडे पुण्यास आले व इंग्रजी शिकू लागले. १८७६ मध्यें ते पुण्यास बाबा गोखले यांच्या इंग्रजी शाळेंत दाखल झालें. या शाळेत ३।४ शें मुलें होती. शाळा सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी १० वाजेपर्यंत असे. कारण शिक्षकांस दुपारी इतर व्यवसाय करण्यास मोकळीक असावी म्हणून ही योजना असे. शाळा अगदी गलिच्छ ठिकाणी असे. दमट व कोंडलेली अशी हवा असावयाची. मोकळी, खेळती हवा तेथे मिळावयाची नाही. पडक्या भिंती, गटारे, डांस, यांमुळे प्रसन्नता मुळी नसे; पायखानेही तेथें लागूनच; यामुळे दुर्गंधीचे माहेरघरच तेथें होतें. एकाच वर्गांत अनेक मुले असत. त्या मुलांची तयारी सर्वांची सारखीच नसे. कोणी जास्त शिकलेला, कोणी कमी; कोणी हॉवर्डचे पहिलें पुस्तक पढलेला, तर कोणी दुसरें वाचावयास शिकलेला. तरी सर्व एकाच वर्गांत. एकच मास्तर या निरनिराळया मुलांस नवीन धडे देई. राजवाडे म्हणतात 'माझ्या बरोबरीच्या मुलांच्या तुकडीच्या वाटयास ५।४ मिनिटें तासांतील यावयाचीं व त्या ५।४ मिनिटांतील अर्धे मिनिट माझ्या वांटयास
यावयाचें !'