Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४९३] श्री. ६ सप्टेंबर १७५७.
पौ भाद्रपद वद्य १२ शनवार
शके १६७९.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति. आज अमदाबाद घेतल्याचें वर्तमान आलें. आपणास कळावें ह्मणून लिहिलें असे. तेथील वर्तमान व निजामअल्लीशी बसालतजंगाशीं कसें आहे हें वर्तमान ल्याहावें. छ २१ जिल्हेज. हे विनंति.
[४९४] श्री. ११ सप्टेंबर १७५७.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि. बसालतजंगांनीं जीवनरायाचे मारफातीनें पंचविसा लाखांची जागीर नगर आह्मास द्यावें, शहानवाजखानास दौलताबाद अंतूर करार करावें, चहू लक्षांची जागीर द्यावी, ऐसें कबूल केलें. परंतु निजामअल्लीस बोलावितात. वरकड मराठे मुजफरखान यास बोलावितात. याजवरून कांही कपटभाव, ऐसेंहि वाटतें. तर याचें यथार्थ वर्तमान दर्गाकुलीखानाचे मारफातीनें अथवा हरकोणीकडून लावून जरूर ल्याहावें. रामदासपंतांनीहि पहिलें सलूख दाखवून, फौजा मेळवून, मग बिघाड येकायेकी दगाबाजीनें केला. तेव्हां आपण आह्मांस तहकीक रामदास दगाबाजी करतो असें लिहिलें होतें. परंतु आह्मीं जानबाचे भरंवशीयावर गेलों. तैसा हा प्रकार वाटतो. तर जरूर तहकीक दरगाकूलीखानाकडून हरकोणीकडून आंतील वर्तमान जरूर लिहिणें. निजामअल्लीशी बसालतजंगाशीं कसे आहे तें जरूर ल्याहावें. छ २९ जिल्हेज. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४९२] श्री. २२ जून १७५७.
पौ भाद्रपद शुध्द ७
शके १६७९.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामी गोसावी यांसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें. विशेष - शहानवाजखानाविषयी लिहिलें तें कळलें. ऐशियास, सर्व प्रकारें त्यांचे अगत्य आहे त्यांनी दतबा येऊन पोहोंचत तों पंधरा दिवस लागतील तों दम धरावा. घाबरें होऊं नये. आह्मांस सर्व प्रकारें त्यांची अब्रू राखून आपलें काम कर्तव्य आहे. दरगाहकूलीखान यांचा तुमचा लगाम पहिल्यापासून आहे. तुह्मी त्यास समजावून सांगून शहानवाजखानाची समजाविशी नवाबांशी होय तें करणें. वरचेवर विशेष वर्तमान लिहीत जाणें. छ. २९ जिलकाद. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४९१] अलिफ. २२ जून १७५७.
पो छ ५ सवाल सन ११७० हिजरी,
आषाढ मास शके १६७९. असल पत्र मुद्दाम
काशीद अजुरदाराबरोबर पंतप्रधान यांजकडे
चार घटका दिवस रहातां पाठविलें.
ऐबादत व इजलाल दस्तगाह वासुदेव बावा दीक्षित मुष्फक मेहेरबान करम फरमाय मुखलेसान सलामत :-
दरीविला. आपलें कृपापत्र आलें तें पावलें. रावसाहेबाला मुनाकब बाळाजीपंत यांचा हेतू सविस्तर ध्यानीं आला. आज्ञा जाल्याप्रमाणें येथील सर्व अमीरउमराव यांची सला घेतली. शहानवाजकान वगैरे उमराव आपले आज्ञेबाहेर कोणी नाहीं. नवाब निजामअल्लीखा हे नवाब सलाबतजंग बहादूर यांचे मनांत विपर्यास आणून काय कमजवाद करतील, हा मात्र संशय आहे. तत्रापि त्यांचा विचार बहुतकरून आपले स्नेहांतील अमीरउमराव यांचे मर्जीबाहेर जात नाहीं. तरी आपले आज्ञेनुरूप त्यांस मामूल करणेंप्रकारें करीन. माझेविषयीं व शहानवाजखान व इतर सरदार यांजविषयीं बिलकुल संशय आणूं नये. खातरजमा असो द्यावी. मजविशीं आसाहेब मनोमय जाणीत असतील या सेवकानें अधिक ल्याहावेसें काय आहे ? आजपर्यंत मजवर अनेक वेळा कठिण प्रसंग आले. त्या त्या प्रसंगांतून आमेहेरबानानींच पार पाडिलें. ते उपकाराच्या कोटी जाहाल्या. त्या त्या देहापासून कधीहि फिटणार नाहींत. जास्त काय लिहूं ? आंगाच्या कातडयाच्या वाहाणा केल्या तरी उपकार फिटणार नाहीत. आपलेंच आशीर्वादें या सेवकाचे सर्व हेतू पूर्णतेस जातील. सारांश, आपण इकडील उमारावांविशीं मनांत बिलकुल संशय आणू नये. इतकियावर नवाब निजामअल्लीखा यांचा दुराग्रह पडून ते न ऐकतील तर त्याचें फळ त्यांस प्राप्त होईल. त्याबद्दल मजकडेस व आपल्याकडेस काय आहे ? नवाबसाहेबास योग्य विचार असेल तोच सांगावा हें आमचें कर्तव्य आहे. ज्यादा काय लिहूं ? प्यार असो दीजे. आपणास कळणेकरितां हें पत्र मराठी मुद्दाम खिजमतगाराबरोबर पाठविलें आहे. मेहेरबानी असावी. छ ४. सवाल. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४९०] श्रीनिवास. १७ जून १७५७.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री गोविंद दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक विद्यार्थी रामचंद्र कृष्ण स॥ नमस्कार विनंति उपरि अत्रीय कुशलभाव ज्येष्ठ धवल तृतीया भृगुवासर वास्तव्य कडें जाणून स्वानंदलेखन भावी आनंदवीत जावें. विशेष. वासर क्रमले. हस्ताक्षरलेखनें करून न तोषविलें एतन्निमित्त चित्त अस्वस्थ जाणून विनंति लेखन करिजेत कीं सदोदित आलिया वार्तिकासमवेत पत्री तोषवीत जावें. याउपरि अत्रत्य वर्तमान तों: श्रीमंत दादास्वामीची आज्ञापत्रें वरचेवर आली की नवाब बसालतजंगाकडून कोणी मातबर घेऊन येणें. याजकरितां नवाबाकडून राजश्री आनंदराऊ नरसिंह यांजला घेऊन श्रीमंताकडें जातो. त्यासी मातोश्रीचे दर्शनाचा व आपले भेटीचा हेत बहुत. पुण्यासी गेलियानंतर श्रीमंतांची आज्ञा जालिया शहरासी येतों. नाहींतर तीर्थरूप मातोश्रीस बोलावूं पाठवितों. याउपरि सनगें गुमानसिंगाबरोबर पाठविलीं ते गाडीत अगर हरतऱ्हेनें घरासी पावती आपण करितीलच. सलाबतजंग व निजामअल्लीखान एकत्र होऊन कलबुर्गियावर फौजेचा जमाव करून आहेत. मानस एक प्रकारचें दिसत आहे. सविस्तर पुणियाहून लिहीन. कृपा लोभ केला पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४८९] श्री. १ जून १७५७.
पौ. ज्येष्ठ वद्य १० शनवार
सन ११६६.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. अबदाली आपल्या देशास माघारा गेल्याचें वर्तमान लिहिलें तें कळलें. याउपरिही तिकडील वर्तमान येईल तें ल्याहावें. व दरगाहकुलीखान यांस शहरची कोतवाली व सुभेदारी होती. त्याजवर सैदलष्करखान यांजकडे सुभेदारी जाली. त्यास, ते वारले. दरगाहकुलीखान आपले ममतेंत आहेत. यांची अंगेजणी करून यांजकडे सुभेदारी होय तें करावें. उगेच साहित्यपत्र पाठविलें आणि न जालें तरी तिकडूनहि पेच आहे, ह्मणून विस्तारें लिहिलें तें कळलें. पुणियास दाखल सत्वरच होऊं. आपलीहि भेट यंदा जरूर जाहाली पाहिजे. छ १३ रमजान. बहुत काय लिहिणे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४८८] श्री. ८ मे १७५७.
पौ. ज्येष्ठ शुध्द ६ बुधवार
शके १६७९.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान सा नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. ऐसें नसावें. सर्वदा आपणाकडील कुशलार्थ लिहीत जावा. अबदाली दिल्लीस येऊन, तेथील वाताहत करून आगऱ्यास आला. मथुरा मारिली. बहुत जनांस पीडा केली. येविशींचें वर्तमान तेथें येतच असेल. तरी सविस्तर ल्याहावें. इकडील वर्तमान तर : श्रीरंगपट्टणचा मामला विल्हेस लावून शिऱ्यास आलों. पंधरा रोजांत तुंगभद्रा कृष्णा उतरून येतों. सर्व दाटी हिंदुस्थानचे मनसुबियावर आहे. जसजसा विचार प्राप्त होईल तसें करावें लागेल. आपण उत्तरेकडील व अवरंगाबाद वगैरे वर्तमान लिहीत जावें. सैदलष्करखानास सख्खा भाऊ आहे किंवा नाहीं ? लेक तो नाहींच. सर्व द्रव्य नवाबांनी जफ्त करविलें कीं काय ? आपण कांहींच वर्तमान लिहिलें नाहीं. निरंतर कृपापत्र येत नाहीं ऐसें नसावें. छ १९ साबान. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४८७] श्री. ८।३।१७५७.
पौ. चैत्र शुध्द ७ रविवार
शके १६७९ ईश्वरनाम संवत्सरे.
वेदमूति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी.
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति. आपले पत्र येत नाहीं ऐसे नसावें. दिल्लीकडील जलद वर्तमान येईल तें लिहीत जाणें. पुणियास गोविंद शिवराम यांस लिहिलियास ते प्रविष्ट करीत जातील. इकडील काम श्रीरंगपट्टणास तूर्त आहे. तेंहि आपले आशीर्वादें सिध्दीस जाईल. यंदा मोडशी होऊन फार माणसें मरतात. हें विघ्न आपले आशीर्वादें परिहारपूर्वक विशेष धन आरोग्य होईल. यांतून आपलें दर्शन तो आशीर्वाद द्यावा. छ १७ जमादिलाखर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४८६] श्री. २६ जानेवारी १७५७.
पौ. छ १ रजब सबाखमसैन.
चैत्र शुध्द ३ शके १६७९.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री रामाजी केशव कमाविसदार परगणे जैनाबाद गोसावी यांसी.
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु सबा खमसैन मया व अलफ. त्या प्रांती बंदोबस्तात रा कृष्णाजी विश्वनाथ पा आहेत ते बंदोबस्त करून देतील. तुह्मास शिबंदीचे नेमणुकेंत राऊत नेमून दिले आहेत. ते दूर केले असेत. न ठेवणें. राऊतांचा ऐवज मजुरा पडणार नाही व परगणे मजकुरी मजमदार फडणीस वगैरे कारकून देखील तुमचा मुशारा अखेर सालपावेतों ओढणें. हिशेब आलियावर आज्ञा करणें ते केली जाईल. जाणिजे. छ ५ जमादिलावल. आज्ञा प्रमाण. मुशाहिरा न देणें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४८५] श्री. २१ जानेवारी १७५७.
पौ माघ शुध्द २ शुक्रवार
शके १६७८.
स्वामीजीचे सेवेसी विज्ञापना जे :-
अजंठियास सरकारचे छकडे अखंड कोळसे आणावयास जात असतात. आतांहि छकडे कोळशियासी गेलेहेत. त्यास श्रीमंत रघुनाथराऊ इकडून गेले त्यांणी छकडा नेला. तेंथें दरगाहकुलीखानाचा नायब होता. त्याणें श्रीमंत मजकुरास खत लिहिलें की, छकडा नवाब रुकुनदौलाचे सरकारचा आहे. त्यांणी त्यास जाब लिहिला कीं, नवाबाची आमची दोस्ती आहे, यामुळें छकडा सोडून दिधला. ऐसें खत लिहिलें; परंतु छकडा न दिधला. ऐशियासी यजमानांनी आज्ञा केली की स्वामीजीस या गोष्टीची सूचना करणें की, आपण त्यास लिहीत कीं, श्रीमंतांशी व आपणांशी व नवाबाशी ऐसा स्नेह असतां याचा छकडा न्यावा आणि पत्री दिधला ऐसें ल्याहावें आणि न द्यावा, हे गोष्ट तुह्मापासून दूर आहे; छकडियाची मालियत काय ? जर मागते तर आह्मीं न देतों ऐसें नवतें; परंतु इष्टत्वांत ऐशा गोष्टी घडूं आलिया लौकिक खोटा होतो, हें आपणच विचारावें; ऐसें पत्र लिहून पाठवून जाब आणवावा. यांचे फिरंगी पळून येथें आले. त्यांचे पत्र येतांच आह्मीं बांधून त्यांपाशीं पाठविले. आमचा शिद्दी पळून त्यांचे तोफखानियांत गेला, त्यासाठी आह्मी लिहिलें. त्याचें उत्तरच न दिलें. आह्मी तो आपला शिद्दी धरून आणिला. या गोष्टी आपणच त्यांस ल्याहाव्या. बहुत काय लिहिणें. हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[४८४] श्री. १३ नोव्हेंबर १७५६.
पौ छ २२ माहे सफर
सन ११६६, कार्तिक वद्य ८ सोमवार.
पु॥ वेदमूर्ती राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरि. फिरंग्यांशी सलूख नवाबांनी पारपत्य नीट न होई यांसाठी केला. याजमुळें हैदरजंग चढी लागून मुजफरखानास घालवून दिल्हे. शोकतजंगाची दिवाणगिरी दूर करविली. पुढें शहानवाजखानास जरब देऊन दूर करून आपणच व्हावें ऐसा डौल दिसतो. त्यास, मुजफरखानास घालविणें, या गोष्टीस मात्र आमचें संमत होतें. वरकड गोष्टी आह्मांस संमत नाहींत. गु॥ शहानवाजखानांनी नवाबास आमचे कामास आणिले. असल्या पदार्थांत प्रमाणिक वजनदार तोच बरा आहे. हैदरजंग गुंडा आहे. त्यास बहुत वाढणें. फावल्यास पुढें येईल हि. फिसादीस अंतर करणार नाहीं. केलियास काय होणें ? फजितच श्रीकृपेनें आपल्या आशीर्वादें पावतील. परंतु मोठे पदायोग्य नव्हे. सांप्रत सैदलष्करखानास नवी जागीर दिल्ही. समाधान केलें. त्यास त्यांचे मतें शहानवाजखान असावे, किंवा हैदरजंग फिरंगीच सर्व व्हावें; याचा मनोभाव कोणीकडे कसा आहे हा शोध घेऊन लिहिणें. आमचें मत तों शहानवाजखान बरें. हैदरजंगांनी फिरगियांनी पूर्ववत् चाकरी करून असावें. मागें सैदलष्करखानास दबावून काढलें; आतां शहानवाजखानास काढलें. ह्मणजे मोंगल मंडळीचा वक्रच उडून गेला. दुसरें तो फिसादी मनुष्य आहे. एतद्विषयीं खानाचा भाव काय ? आह्मांस काय उपयोगी, हे खानास एकांती पुसून सविस्तर लिहिणें, सांप्रत नवाबाचा भाव कसा आहे ? शहानवाजखानाशी नवाबाचें अंतर पडिलें असेल तर इलाज नाहीं. तेथील आंतील वर्तमानें कशी आहेत ? सर्व विस्तारे जरूर खानास पुसून लिहिणें. छ १९ सफर हे विनंति.