Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ४२८

श्री १७१८ पौष वद्य १०


यादीः भगवंतराव बल्लाळ यासी कोंकणपटीच्या बंदोबस्तास सरकारांतून रवाना केलें होतें. त्यांणीं घाटाखालीं जाऊन किल्ले विश्रामगड व किल्ले घोसाळा व किल्ले बिरवाडी, प्रांत राजपुरी, या तिहीं किल्लेयाचा सरकारचे आज्ञेप्रमाणें बंदोबस्त करून असतां, लोकसुद्धां हुजूर येणेंविशीं आज्ञा जाहली. आज्ञेप्रमाणें हुजूर निघोन आलों. मागा रा। चिमाजी माणकर, मामले तळा, व बाबुराव पासलकर, तालुके अवचितगड, याणीं सरसुभाकडील लोक घेऊन किल्यास वेढे देऊन, रसद बंद केली. ते किल्ले बी तपशील.

१ किल्ले विश्रामगडास एक महिना वेढा दिल्हा, किल्लेकरी यांणीं दररोज लढाई दिल्ह्या. परंतु किल्ल्यावर बेगमी दाणा-गल्ला व दारूगोळा नाहीं. लोकांस पांच सात उपोशणें जाहालीं. तेव्हां, किल्ला मामलेदार याणीं हस्तगत करून, किल्यावरील लोक व सरकारचे लोक होते त्यांस कैदेंत ठेविलें; व रघोजी बालकवडे हवालदार नि।। पासलकर व रामाजी गोविंद कारखानीस हे सरकार लक्षांत होते; सबब मुलामाणसांसुद्धां कैद करून हवलदार व कारखानीस यास बेड्या घातल्या; व सर्व वस्तभाव गुराढोरांसुद्धां झाडून लुटून घेतलें. त्यास, हवालदार व कारखानीस मुलेंमाणसेंसुद्धां व लोकांची चीजवस्त ढोरगुरूदाणागल्लासुद्धां त्यांचें हवालीं करून, सर्वांस मोकळीं करून, हुजूर रवाना करून देणेंविसी सनद मामलेदार यास.

१ किल्ले घोसाळा व बिरवाडी दोही किल्ले यांचा पूर्ववत् सरकारआज्ञेप्रमाणें बंदोबस्त असतां, हाली मामलेदार याणीं किल्यास वेढा देऊन, रसद बंद करून, लढाई करितात, व किल्लेकरी यांचीं घरें कबिलेसुद्धां कोंकणपट्टींत होतीं तीं जप्त केलीं. त्यास, मामलेदार याणीं किल्लेकरी यांसी कटकट करू नये, वेढा उठवावा, व जप्तीची मोकळीक करावी. पुढें हुजूरून आज्ञा होईल त्या प्रे।। वर्तणुक करावी. किल्लेकरी यांचे वाटेस येकंदर जाऊं नये. व तालुके-मजकूर पौ वसूल मामलेदार याणीं घेऊं नये. किल्लेकरी यांणीं वसूल घेऊन सिहिबंदीखर्चाचा व किल्लेयाचा बंदोबस्त करावा. व नारो गोविंद हुजूर हशम हे लोकांसुद्धां नामजादीस किल्ले बिरवाडी येथें पेशजी गेले आहेत, त्यांचेहि वाटेस न जाणें. ह्मणोन मामलेदार याचे नांवें सनद.

१ घर व मुलेंमाणसें कोंकणांत किल्ले रामगड, तालुके विजयेदुर्ग, येथें आहे. त्यास, तालुकेमजकूरचे मामलेदार यांहीं घर जप्त करून चीचवस्तू सरकारांत घेतली, व मुलेंमाणसें कैदेंत ठेविलीं व जामीनहि घेतले. त्यास, भगवंतराव बल्लाळ हे हुजूर चाकरीस असतां, त्यांचें घर जप्त करून मुलेंमाणसें कैदेंत ठेवल्याचें कारण काय? तरी, त्यांच्या मुलामाणसाची मोकळीक करून जामीनपत्रें व वस्तभाव चीचवस्तू घेतली असेल ती सुतळीचा तोडा आदिकरून माघारा देऊन, त्यांचें चिरंजीवाचे कबज घेऊन हुजूर पाठवणें. याजविस गंगाधर गोविंद याचे नांवें सनद.
-------

(*सारांश पाहून पत्रें द्यावीं छ २३ रबज, सबा तिसैन.)

पत्रांक ४२७

श्री १७१८ पौष वद्य ९


पत्र दिलें,
यादी बापू शिंदे यासी सरकारचें पत्र जेः-

नबाब सिराजुद्दौला-मीरज्या–ग्यासबहादर याचे जाहागिरीविसी जगोबाबापूंनीं लिहिलें त्या अन्वयें तुह्मींही चालवावें. येविसी फिरोन बोभाट येऊं न द्यावा. ह्मणून पत्रें.
* सदरहू मान्यपत्र द्यावें. छ २२ रजब, सबा तिसैन.

पत्रांक २६

श्री १७१८ पौष वद्य ५


राजश्री लखबादादा स्वामीचे सेवेसीः-


सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित जावें विशेष. बरवासागरेवर वरात सरकारांतून सालमजकूर बा। राजेश्री भगवंतराव विठ्ठल मोदी यांची जाहली आहे. तिचा ऐवज पटऊन देणेंविसीं पेशजी पांचच्यार घरू पत्रांत लिहिलें असतां, हालीं तुह्मीं लिहिलें कीं, ऐवज कृष्णाजी अंबादास याचा ह्मणोन आह्मी घेऊन, नरवरचें किल्याकरितां दारूगोली आणविली होती, त्याजबा दिल्हे. त्यास, हें ठीक नाहीं. कृष्णाजी अंबादास याजकडून गुदस्ताच जप्ती जाहाली. सालमजकुरी वरात याची जाहाली. याजस्तव ताकीद करून ऐवज देवावा, ह्मणोन लिहिणेंत आलें. असें असोन घालमेल केली, हें ठीक न केलें.
त्यास, पत्र पावतांच वरातीबा। बयाणवसेरु।। गोवर्धनदास याचे दुकानीं जमा करून देवऊन पावती पाठऊन द्यावी. येविसि फिरोन लिहिणें न पडेसें करावें. रा। छ १८ रजब हे विनंति.

पत्रांक ४२५

श्री. १७१८ पौष वद्य १

( नकल )
नवाब-साहेब मेहेरबान दोस्ता आजमुल-उमदाबहादुर सलमु हुतालाः-

छ १० माहे रजबीं आपल्यासी बोलून बाणाजी व कृष्णाजी सेटे आले. त्याणीं आपला खुलासा त्रिवार वचनाचा सांगितला. तो ध्यानास आला. त्याजवर छ ११ माहे रजबीं राजश्री कल्याणराव राजेबहादुर याजबराबर कालचें बोलल्याप्रमाणें आपण रुका व जिन्नस पाठविला तो पावला. त्या अन्वयें आह्मीहि तुह्मांसी निखालस आहों, येविसी खातरजमा ठेवावी. दुतर्फा सरलता जाली, जें होणें तें आपले आमचे विच्यारें होईल. आपण राजश्री बालाजीपंत नानाविषय दोन गोष्टी लिहिल्या. त्यास नानानीं कारभारांत असावें अगर नसावें याचे गुणदोष पुरतपणें पाहून, तुह्मी आह्मी मिळोन ज्यांत श्रीमंतांचे दौलतीस चांगलें तैसें करूं. आपली आमची दोस्ती पूर्वीपासून आहे. आणि छ १ माहे जमादिलावल सन १२०६ फसलीमध्यें तहनामा जाला आहे त्याजवर आपण आह्मी कायेम आहोंतच. पुढें ज्यांत दोस्ती ज्यादा वाढेत जाये तैसें दुतर्फा वर्तणुकेंत येत असावें. रा। छ १४ रजब, सु।। सबातीसैन मया व अलफ.

जादा काय लिहिणें ? हे किताबत.

पत्रांक ४२४

श्रीरामप्रसन्न. १७१८ पौष शुद्ध १४

राजश्री रायाजी पाटील गोसावी यांसीः-
अखंडत-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्ने।। येशवंतराव व अमृतराव सिंदे

रामराम विनंति येथील कुशल ता। छ १३ रजब आपले कृपें करून मुकाम दिल्ली वर्तमान यथास्थित असे. विशेष. इकडील वर्तमानः----विलायत-वाली फौजबंदी करून, या प्रांतावर चढाई करून येतो, हें वर्तमान आज एक महिनापर्यंत आहे. परंतु, मुख्य आपले ठिकाणींहून निघाला नवता. दोन तीन दस्ते फौज पुढें येऊन लाहोरचे मुकामीं पडली होती. आणि प्रतिवर्षी याचप्रमाणें आवाई येत असती. याकरितां तहकीकात वर्तमान न दिसोन पक्केपणें लिहिणेंत न आलें. त्यास, आजच लखनौवाले यांची डांक विलाईतपर्यंत बसली आहे. त्यांतून एकबारीची लाल थैली आली. त्यांतील कलमी वर्तमान कीं:—छ २९ जमादिलाखरी शाहा फौजेनिशी लाहोरास दाखल जाहाला, एक लाख फौज समागमें आहे. पुढें दरकुच लौकरच येतो. हें वर्तमान प्रांतांत लोकांनी ऐकोन बहूत घाबरलें आहेत. दिल्ली वेगली करून, तमाम शहरें-जागे पळोन गेले. लखनऊसुद्धां गडबडली आहे. दिल्लींतीलही अमलाफैला पळावयाचा ईरादा करीत आहेत. परंतु हा काल तर आह्मी दीलदिलासा देऊन खातरजमा केली आहे. परंतु, लाहोराहून त्याणें कुच करून एक मजल पुढें आल्यानंतर शहरचे लोकांचा धीर काढणार नाहीं. ईश्वरें ही गोष्ट न करावी. कदाचित जाहल्यास लाहोर येथून कच्चे दोनशे कोस त्यास यावयास विलंब लागणार नाहीं. त्यांत हे हुजूर. संस्थानिक जागा. येथील भ्रम गेल्यास, हिंदुस्तानचा भ्रम राहणार नाहीं. धण्याचे पुण्येंकरून ही गोष्ट होणार नाहीं. परंतु, त्याची फौज मोठी. श्रीमंत यजमान दूर राहिले. राजश्री बापू यांसहि वर्तमान वरचेवर लिहीत असतों. त्यांची स्वारी या प्रांती असती तर चिंता नव्हती. आपणहि तेथून बहूत निकडीनें बापू यांसी लिहोन, स्वारी या प्रांतांत अविलंबें येवून इकडील बंदोबस्त होई तें जलद केलें पाहिजे. आह्मी किल्याचा व शहर-आदिकरून बंदोबस्तानें हजरत सहवर्तमान पातशाहाजादेसुद्धां खिजमतींत चौकस राहोन सरकारनक्ष होईल तेथवर करीत आहों. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. हे विनंति.

[ ५२ ]                                     श्री.                                                  १७००.

यादी चंदीच्या मुकामाहून धर्मादाय व इनामती व इसाफती व नूतन वतनें कारकीर्द महाराज राजश्री छत्रपति साहेबानी दिलीं होती त्याचा विचार मनास आणितां राज्याचा बंदोबस्त न होता ऐश्या सनदा येऊन दाखल जाहाल्या तेसमयीं श्रीमन्महाराज मातुश्री तारा आईसाहेब व सर्व राजमंडळ मिळोन निर्णय केला. येणेप्रमाणें, बितपशील सु।। इहिदे अलफ.

ज्यांणी शंभर लारीची सनद घेतली असेल, त्याप्रमाणें  निमेप्रमाणें द्यावे. कलम १.
फरमान पातशाहाकडे प्रात असतां फरमान दिलें नाहींत. कलम १.
सनदा आणिल्या त्याचा प्रकार. ज्यास प्रांतांत फरमान भोगवटियासी दाखवूं लागले तेव्हां दरखोरी करितां फरमानाचा निवाडा येणें प्रमाणें-
 महाल 

१ खारापाटण महाल.             
१ संवदळ महाल                                          
१ राजापूर महाल.                                      
१ लांझे महाल.                                         
१ संगमेश्वर महाल                                       
१ साळसी महाल.                                        
                                                                            

येकूण महाल सहा. या महालांतील अंमल अदिलशाहा पातशाहा याचा उठून गेला ते समयीं इकडील लोक तिकडेस चाकरीस होते. ते समयीं आपले घरास यावयास लागले. तैनाता पावल्या नाहींत.  त्यावेळेस एकंदर लोकांनी आदिवशहास अर्ज केला कीं, आह्मी आपल्या प्रांतास जातो, आह्मांस पैका पावला नाहीं. पुढे आह्मीं काय करावें ? आपलीं ठाणीं उठोन आलीं त्या प्रांतीं साहेबाचा नक्षा राहे ऐसें द्यावें. तेव्हा ज्यास जे गोष्टींचे अगत्य त्याप्रमाणें फरमान मागितलें त्याप्रमाणे दिलें. फरमानाचा कर हातास येणेचा. मुनसीस सांगावे कीं, फरमान अमुक कार्यास पाहिजे त्याप्रमाणे मुनसीनें अर्जबेगास सांगावें कीं, फलाणा गृहस्थ फलाण्या कार्यास फरमान मागतो. अर्जबेगाने आदिलशहा पाछाहास अर्ज करावा कीं, अमुक जमादार आपले घरी जात आहे, पैका पावला नाहीं, आणि साहेबाचीं ठाणीं प्रांतांतील उठोन आलीं, पैका न दिलें याकरिता अफाट शिरपाव मागतात, साहेबीं द्यावें, ह्मणजे प्रांतांत साहेबाचा नक्षा राहील. हें जाणून सर्वांस मागितलेंप्रमाणें फरमान देविलें. फरमानाचा चक लहान कार्य असल्यास येणेप्रमाणें. सिरस्ता-
मुनसी अर्जबेग नगर
२    २    ५.

पत्रांक ४२३

श्री २ १७१८ पौष शुद्ध १४


श्रीमंत राजश्री बाबासाहेब साहेबाचे शेवेसीः-

* शार आहों. परंतु शाहाची फौज बहुत. त्याच्या मुकाबल्याप्रमाणें इकडीलहि फौजेचा जमाव असता, तरी चिंता काय होती ? तूर्तकाळीं सरकारच्या फौजेचा भरणा इकडे थोडा. राजश्री बापू येथून पंधरा मजलावर कालपीस आहेत. वरचेवर पत्रें त्यांजला लिहितच असतों. परंतु लवकर येऊन उपराळा करतील तो सुदिन आहे. तेथूनहि बापूस आज्ञापत्रें बहुत जलदीनें लिहून, अतिसत्वर बापू फौजेसह वर्तमान इकडे येऊन पोचत, ऐसा अर्थ केला पाहिजे. हें वर्तमान एक महिना येथें कमबेस येतें. नित्य आह्मी लस्करांत लिहितच होतों. परंतु लाहोरास आलेशिवाय सत्य-मिथ्या समजेल. कारण कीं, लाहोरा पलीकडील मुलुक त्यांचा व अटक उतरलेसिवाय इकडील इरादा समजत नाहीं. परंतु नित्य कच्चें वर्तमान लस्करांत लिहितच होतों. आतां इस्वरें याप्रमाणें प्रसंग मांडला आहे. तर धण्यांनीं सत्वर उपराळा केला पाहिजे. आह्मी तर लाखाचे पेचांत आलों आहों. ईश्वर पार पाडील. चिंता नाहीं. सर्व पुण्य धण्याचें. कागदपत्री लवकर उपराळा केला पाहिजे. या समयास तहसील मुलकांतील बंद होऊन पंधरा दिवस जाले. एक पैसा येत नाहीं. पातशाचा खर्च व सिबंदीसुद्धां साठसत्तर हजार रुपयांचा दरमाहा आहे. हें हिंदुस्थान ! क्षणाक्षणाची हवा घेतात ! कर्ज सुखें एक रुपया कोणी देत नाहीं. या समयास उपराळा केला पाहिजे. बहुत काय लिहिणें ? कृपा निरंतर असे दिली पाहिजे. येथील उत्तरें पातशाचीं वगैरे जीं सला करणें तीं, येथून लस्करांत लिहिलें आहे, त्याचें उत्तर येईल त्याप्रमाणें करूं. आपणहि आज्ञा करणें ती करावी व कांहीं लाख पन्नास हजार रुपयेचा ऐवज पा। ह्मणजे पाताशाचा खर्च चालेल, नाहींतर, येकतर फौजेचे निकड, दुसरे, हुजूरचा खर्च न पावला तर कठीण. न जाणो, निदान असाच प्रसंग पडला, आण पातशायास येथुन काढूं ह्मटलें. लाखो रुपये खर्च पाठवायाची तजवीज करून उत्तर पत्र पावतांच पाठवायास आज्ञा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.

पत्रांक ४२२

श्री १७१८ पौष शुद्ध १३


श्रीमंत माहाराजाधिराज महाराज आलीजाह दवलतरावजी सिंदे बहादुर साहेबजी योग्यः--


माहाराज-चेतसिंह-बहादुरकै आसिर्वाद. माहाराजकी कुशलक्षेम सदां भली चाहिये. माहाराजके कृपातें इहाकें समाचार भले है. अपरंच. मकरसंक्रातके
तिल शरकरायुक्त इरसाल कीये हैं, सो कृपा करकें कबूल फर्माइयेगा और हमेंशा कृपापत्र भेजके याद फर्माया कीजिये. जादा सुभ, मीति पौष शुद्ध १३ संवत १८५३ * बहुत का लिखैं आशीर्वाद.

पत्रांक ४२१

श्री. १७१८ पौष शुद्ध ६


यशवंतराव यांसि पत्र सरकारचे जे:-


आह्मीं हजरत पातशाहा व मुरशतजादे-आफाम यांसि अर्जदास्त व अर्जी हाजीजी याचे मार्फतीनें पाठविली. त्याजकरितां तुम्हांस वाईट लागलें. व दुसरी अर्जी श्रीमत् बाजीराव-साहेब-बहाद्दर व बाळाजी जनार्दन फडणीस यांजविसी शुके आणवावयाविसी पा। होती. त्यास, मुनशीजी यांसि लिहूं न देतां, तुम्ही मोहर होऊं देत नाहीं, याचा अर्थ काय ? तुम्ही व मानसिंग किलेदार मिळोन वारंवार हजरत पातशाहापासी अर्ज करितां जे, हाजीजीचे मार्फतीनें हुजूर अर्जदास्त न यावी, व हुजूरचा जाबसालहि न करावा, शुके दर-जबाब अर्जीचे आह्मींच पाठवून देत जाऊं. तुह्मी पातशाहासी बोलणें बोलतां, तें काय समजून, हें पुरतें समजावें. सरकारांतून मर्जीस येईल त्याचे हातून काम घ्यावयाचें. व हजरत पातशाहाहि मुख्तियार आहेत. त्यांचे मर्जीस येईल त्याचे हातें काम-काज घेतील. कैलासवासी माहाराजहि हाजीजीचे हातें दाहा वर्षे काम काज घेत आले. तुह्मीं यांत मन घालूं नये. ज्या प्रो पातशा आशा करितील त्या प्रो मुनसी शुके लिहून हाजीजीचे बंधू तेथे आहेत त्याचे हवाली करीत जावें, तुह्मांस काम-काज सांगितलें आहे तितकें करून राहावें. हजरत यांसी व आह्मांसी राज्याचे जाबसाल हरएक होतात त्यांत तुमचें कारण नाहीं. या प्रो निक्षून पत्र द्यावें.

* यशवंतराव शिंदे यास पत्र कीं श्रीमंत बाजीराव-साहेब पंतप्रधान व राजश्री बाळाजी जनार्दन फडनवीस यांचे नावें शुके आणविले होते व अर्जी हुजूर केली होती, त्यास बहुत ध्यानास आणतां कळलें कीं, तुह्मी अर्जीच हुजूर पोहचविली नाहीं व शुकेहि पाठविले नाहीत. त्यापक्षीं शुके कसे येणार ? हें ठीक न केलें. येथें काम नेटाचें आणि तुमची तो नवी ज्याजबदारी. यामुळें मोठ्या कार्यास विलंब पडला. तरी, याउपरीं पत्रदर्शन हुजूर अर्जी देऊन, शुके तयार करऊन, पाठवून देणें. हाली येथें हाजीजी आहेत. त्यांचे मार्फत अर्जी जात आहे. शुके त्या अन्वयें येत आहेत याची तक्रार तुम्हीं न करावी. आणखी कोण्हीकडिल काम आल्यास चौकशी करणें नीट आहे. याचे मार्फतच्या कामास उजूर पडूं न देणें. हमेशचा शिरस्ता आहे. याचे मार्फत अर्जी जाईल. शुका यावयास विलंब न करणें म्हणोन पत्र पाठवावें. छ ५ रजब, सबा तिसैन.

पत्रांक ४२०

श्री १७१८ मार्गशीर्ष वद्य ३०


साहेबाचे शेवेसी आज्ञाधारक लक्ष्मण अनंत कृतानेक विज्ञापना विनंती ता। छ २९ जमादिलाखर मुक्काम श्रीगंगातीर येथें महाराजाचे कृपावलोकनेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. साहेबी आज्ञापत्रें पाठविली, त्यांत आज्ञा जेः-खातरजमेनें कोणेविसींचा आंदेशा न करितां येऊनं कामकाज पूर्ववतप्रमाणें करीत जाणें. त्यावरून आह्मीं सैन्यांत जाणेची सिद्धता करून सेवेसी विनंतिपत्रें दोनतीन पाठविलीं आहेत. प्रविष्ट जाहली असल्यास सेवकाकडील अभिप्राय ध्यानी आला असेल. राजश्री जगन्नाथराम याणीं च्यार सरदार आह्मांस न्हेणेंविसी पाठवणें विचारिलें, त्यास, आह्मांस चौघां सरदारांसी प्रयोजन काय ? आण-खातरजमा कशास पाहिजे ? येक गोष्टीची खातरजमा पाहिजे. मजकडील कोणी कांहीं सांगेल आगर लिहितील तर त्याची छाण धण्यांनी करावी. छाण केल्याअंती दुसरेयाचे सांगणे करार पडलें, तर मग आमचे धण्यांनी पारपत्य करावे; क्षणाचा उजूर करूं नये. आणि छाण न करितां तुफान, ऐसें धण्याचे ध्यानीं आल्यास सेवक निर्मल होईल. येदथींचें मात्र पक्कें वचन साहेबाचें घ्यावें. कारण गरीबीची आबरू सेवकाची आहे. विनाइलजाम कोणाच्या सांगितल्यावर जाहाला आबरूस खत्रा न व्हावा, इतकाच संकल्प. ह्मणोन अर्ज करून वचन घ्यावें ह्मणोन, चिरंजीव देवबा यासी लिहून पाठविलें. तीं पत्रें पोहचून चिरंजीवाकडोन साहेबाचे श्रवणीं सेवकाची विनंति आली कीं नाहीं कळेना. ऐसें असोन, सेवकाकडील हरामखोरी कोणाच्या सांगितल्यावरून धण्याचे ध्यानीं आली ? ह्मणोन ऐकितों कीं हा जाऊन नवाबाच्या अमलांत बसोन आगरेच्या किल्ल्याची मजबुदी केली आहे. हरामखोरीवर प्रवर्तेल ऐसें चितीं आलें. त्यासी नवाबाच्या मुलकांत सैन्यांतून येणेंचा परियाय येक आबरूकरितां, तो मजकूर सविस्तर दोन तीन विनंतिपत्रीं पेशजी लिहिला आहे. पत्रें सेवकाचीं पोंहचल्यास ध्यानीं आलाच असेल. आग-याचे किल्ल्याची मजबुदी नवीन आज ती कशाकरितां करावी ? आगरेची जप्ती करणेंविसी सडे फौजेंतींल सरदारांस लिहून आलें असेल. त्यावरून गुलाबराव कदम आगरेस सरदारांनीं खाना केले, परंतु, सरकारचें आज्ञापत्र सेवकाचे नावें नाहीं. तेव्हां विनाआज्ञापत्र किल्ला स्वाधीन करून ? वा उद्यां धण्यानीं विचारिलें की कोणाचे आज्ञेवरून किल्ला दिल्हा ? तर उत्तर द्यावयास जागा नाहीं. लहान गढी असली त्याच्या तीन परवानग्याचा उजूर करावा लागतो. हा आगरेचा किल्ला. बिना सरकार आज्ञापत्रासिवाइ किल्ला कैसा द्यावा. जाणोन, राजश्री विश्राम अनंत यांणीं साहेबास विनंतिपत्र लिहून घरूजोडी कैलासवासी माहाराज यांचे संकेताप्रमाणें रवाना केली आहे. पत्रें पोंहचून उत्तर आलें ह्मणजे किल्ला स्वाधीन करून, कबज घेऊन, चरणापासीं यावें. ऐसें साहेबाच्या, चरणीं लक्ष असतां, गैरवाका सेवकाकडील सरकारांत ध्यानी येतो. तस्मात ग्रहदशा ऐसी जाणोन लटिके आळ येतात. येक मजबुती आगरेच्या किल्यांत इस्मालबेग हरामखोर याची केली. कारण सेवकाचे तगीरीचें वर्तमान महशूर जाहलें. तेव्हां शिबंदीचे लोक वगैरे आपापले ठिकाणीं दिलगीर होऊन, बंदोबस्त प्रसंगी कमी पडोन, हरामखोर निघोन गेल्यास, जाहला हरामखोरी माथां येईल, त्याकाळीं प्राण द्यावा लागेल. यास्तव आगरेत वरचेवर हरामखोराचा बंदोबस्त पहिल्यापेक्षां अधिक जपून राखणेंविसीं लिहीत गेलों. किल्याविसी सरकारी आज्ञापत्रें येऊन किल्ला देणेंत उजूर करतो, तर मग धण्यानीं सेवकाची हरामखोरी ध्यानीं आणावयाची होती. ऐसे प्रकार लटिके धण्यास कोणी सांगू लागेल, तेव्हां सेवकाचा परिणाम काय ? त्यांस सेवकाची विनंति हेच कीं, येक वेळ चरणापासीं बोलाऊन घ्यावें, मजकडे कोण काय इलजाम सांगतील त्याचे जाबसाल मी सर्व पुरऊन देईन, इलजाम येकहि अंगीं लागल्यास ते क्षणीं पारपत्य करावें. आण साहेबाचे कृपेनें मी येकनिष्ठपणें वर्तणूक प्रतरणा न करतां केली असलेस तिलप्राय इलजाम लागणार नाहीं. त्याकाळीं धण्याची निशा जाहल्याअंतीं मग धणी कृपाळू होऊन जे सेवा सांगतील त्या सेवेंत हाजर आहे. प्रथमपासोन संकल्प, धणीकामावर ह्या शरीराचें सार्थक व्हावें, ऐसा आहे. धण्याचे प्रतापें माझा संकल्प सिद्धीस जाईल. तूर्त ग्रहदशेनें येकनिष्ठता ठेऊन लहान-मोठ्या चाक-या धण्याच्या केल्या असतां, साहेबाच्या चरणाचा वियोग होऊन अरण्यवास घडला आहे. त्यासी आमची निष्ठा धण्याचे चरणीं असल्यास, धणी कृपाळू होऊन चरणाची भेट होईल. वरकड राजश्री पाटील विनंति करितील. कृपा करून उत्तराची अज्ञा जाहली पाहिजे. सेवक पदरींचा जाणोन, सांभाळ करणार धणी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ती.