पत्रांक ४२१
श्री. १७१८ पौष शुद्ध ६
यशवंतराव यांसि पत्र सरकारचे जे:-
आह्मीं हजरत पातशाहा व मुरशतजादे-आफाम यांसि अर्जदास्त व अर्जी हाजीजी याचे मार्फतीनें पाठविली. त्याजकरितां तुम्हांस वाईट लागलें. व दुसरी अर्जी श्रीमत् बाजीराव-साहेब-बहाद्दर व बाळाजी जनार्दन फडणीस यांजविसी शुके आणवावयाविसी पा। होती. त्यास, मुनशीजी यांसि लिहूं न देतां, तुम्ही मोहर होऊं देत नाहीं, याचा अर्थ काय ? तुम्ही व मानसिंग किलेदार मिळोन वारंवार हजरत पातशाहापासी अर्ज करितां जे, हाजीजीचे मार्फतीनें हुजूर अर्जदास्त न यावी, व हुजूरचा जाबसालहि न करावा, शुके दर-जबाब अर्जीचे आह्मींच पाठवून देत जाऊं. तुह्मी पातशाहासी बोलणें बोलतां, तें काय समजून, हें पुरतें समजावें. सरकारांतून मर्जीस येईल त्याचे हातून काम घ्यावयाचें. व हजरत पातशाहाहि मुख्तियार आहेत. त्यांचे मर्जीस येईल त्याचे हातें काम-काज घेतील. कैलासवासी माहाराजहि हाजीजीचे हातें दाहा वर्षे काम काज घेत आले. तुह्मीं यांत मन घालूं नये. ज्या प्रो पातशा आशा करितील त्या प्रो मुनसी शुके लिहून हाजीजीचे बंधू तेथे आहेत त्याचे हवाली करीत जावें, तुह्मांस काम-काज सांगितलें आहे तितकें करून राहावें. हजरत यांसी व आह्मांसी राज्याचे जाबसाल हरएक होतात त्यांत तुमचें कारण नाहीं. या प्रो निक्षून पत्र द्यावें.
* यशवंतराव शिंदे यास पत्र कीं श्रीमंत बाजीराव-साहेब पंतप्रधान व राजश्री बाळाजी जनार्दन फडनवीस यांचे नावें शुके आणविले होते व अर्जी हुजूर केली होती, त्यास बहुत ध्यानास आणतां कळलें कीं, तुह्मी अर्जीच हुजूर पोहचविली नाहीं व शुकेहि पाठविले नाहीत. त्यापक्षीं शुके कसे येणार ? हें ठीक न केलें. येथें काम नेटाचें आणि तुमची तो नवी ज्याजबदारी. यामुळें मोठ्या कार्यास विलंब पडला. तरी, याउपरीं पत्रदर्शन हुजूर अर्जी देऊन, शुके तयार करऊन, पाठवून देणें. हाली येथें हाजीजी आहेत. त्यांचे मार्फत अर्जी जात आहे. शुके त्या अन्वयें येत आहेत याची तक्रार तुम्हीं न करावी. आणखी कोण्हीकडिल काम आल्यास चौकशी करणें नीट आहे. याचे मार्फतच्या कामास उजूर पडूं न देणें. हमेशचा शिरस्ता आहे. याचे मार्फत अर्जी जाईल. शुका यावयास विलंब न करणें म्हणोन पत्र पाठवावें. छ ५ रजब, सबा तिसैन.