पत्रांक ४२४
श्रीरामप्रसन्न. १७१८ पौष शुद्ध १४
राजश्री रायाजी पाटील गोसावी यांसीः-
अखंडत-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य स्ने।। येशवंतराव व अमृतराव सिंदे
रामराम विनंति येथील कुशल ता। छ १३ रजब आपले कृपें करून मुकाम दिल्ली वर्तमान यथास्थित असे. विशेष. इकडील वर्तमानः----विलायत-वाली फौजबंदी करून, या प्रांतावर चढाई करून येतो, हें वर्तमान आज एक महिनापर्यंत आहे. परंतु, मुख्य आपले ठिकाणींहून निघाला नवता. दोन तीन दस्ते फौज पुढें येऊन लाहोरचे मुकामीं पडली होती. आणि प्रतिवर्षी याचप्रमाणें आवाई येत असती. याकरितां तहकीकात वर्तमान न दिसोन पक्केपणें लिहिणेंत न आलें. त्यास, आजच लखनौवाले यांची डांक विलाईतपर्यंत बसली आहे. त्यांतून एकबारीची लाल थैली आली. त्यांतील कलमी वर्तमान कीं:—छ २९ जमादिलाखरी शाहा फौजेनिशी लाहोरास दाखल जाहाला, एक लाख फौज समागमें आहे. पुढें दरकुच लौकरच येतो. हें वर्तमान प्रांतांत लोकांनी ऐकोन बहूत घाबरलें आहेत. दिल्ली वेगली करून, तमाम शहरें-जागे पळोन गेले. लखनऊसुद्धां गडबडली आहे. दिल्लींतीलही अमलाफैला पळावयाचा ईरादा करीत आहेत. परंतु हा काल तर आह्मी दीलदिलासा देऊन खातरजमा केली आहे. परंतु, लाहोराहून त्याणें कुच करून एक मजल पुढें आल्यानंतर शहरचे लोकांचा धीर काढणार नाहीं. ईश्वरें ही गोष्ट न करावी. कदाचित जाहल्यास लाहोर येथून कच्चे दोनशे कोस त्यास यावयास विलंब लागणार नाहीं. त्यांत हे हुजूर. संस्थानिक जागा. येथील भ्रम गेल्यास, हिंदुस्तानचा भ्रम राहणार नाहीं. धण्याचे पुण्येंकरून ही गोष्ट होणार नाहीं. परंतु, त्याची फौज मोठी. श्रीमंत यजमान दूर राहिले. राजश्री बापू यांसहि वर्तमान वरचेवर लिहीत असतों. त्यांची स्वारी या प्रांती असती तर चिंता नव्हती. आपणहि तेथून बहूत निकडीनें बापू यांसी लिहोन, स्वारी या प्रांतांत अविलंबें येवून इकडील बंदोबस्त होई तें जलद केलें पाहिजे. आह्मी किल्याचा व शहर-आदिकरून बंदोबस्तानें हजरत सहवर्तमान पातशाहाजादेसुद्धां खिजमतींत चौकस राहोन सरकारनक्ष होईल तेथवर करीत आहों. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. हे विनंति.