पत्रांक २६
श्री १७१८ पौष वद्य ५
राजश्री लखबादादा स्वामीचे सेवेसीः-
सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित जावें विशेष. बरवासागरेवर वरात सरकारांतून सालमजकूर बा। राजेश्री भगवंतराव विठ्ठल मोदी यांची जाहली आहे. तिचा ऐवज पटऊन देणेंविसीं पेशजी पांचच्यार घरू पत्रांत लिहिलें असतां, हालीं तुह्मीं लिहिलें कीं, ऐवज कृष्णाजी अंबादास याचा ह्मणोन आह्मी घेऊन, नरवरचें किल्याकरितां दारूगोली आणविली होती, त्याजबा दिल्हे. त्यास, हें ठीक नाहीं. कृष्णाजी अंबादास याजकडून गुदस्ताच जप्ती जाहाली. सालमजकुरी वरात याची जाहाली. याजस्तव ताकीद करून ऐवज देवावा, ह्मणोन लिहिणेंत आलें. असें असोन घालमेल केली, हें ठीक न केलें.
त्यास, पत्र पावतांच वरातीबा। बयाणवसेरु।। गोवर्धनदास याचे दुकानीं जमा करून देवऊन पावती पाठऊन द्यावी. येविसि फिरोन लिहिणें न पडेसें करावें. रा। छ १८ रजब हे विनंति.