पत्रांक ४२०
श्री १७१८ मार्गशीर्ष वद्य ३०
साहेबाचे शेवेसी आज्ञाधारक लक्ष्मण अनंत कृतानेक विज्ञापना विनंती ता। छ २९ जमादिलाखर मुक्काम श्रीगंगातीर येथें महाराजाचे कृपावलोकनेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. साहेबी आज्ञापत्रें पाठविली, त्यांत आज्ञा जेः-खातरजमेनें कोणेविसींचा आंदेशा न करितां येऊनं कामकाज पूर्ववतप्रमाणें करीत जाणें. त्यावरून आह्मीं सैन्यांत जाणेची सिद्धता करून सेवेसी विनंतिपत्रें दोनतीन पाठविलीं आहेत. प्रविष्ट जाहली असल्यास सेवकाकडील अभिप्राय ध्यानी आला असेल. राजश्री जगन्नाथराम याणीं च्यार सरदार आह्मांस न्हेणेंविसी पाठवणें विचारिलें, त्यास, आह्मांस चौघां सरदारांसी प्रयोजन काय ? आण-खातरजमा कशास पाहिजे ? येक गोष्टीची खातरजमा पाहिजे. मजकडील कोणी कांहीं सांगेल आगर लिहितील तर त्याची छाण धण्यांनी करावी. छाण केल्याअंती दुसरेयाचे सांगणे करार पडलें, तर मग आमचे धण्यांनी पारपत्य करावे; क्षणाचा उजूर करूं नये. आणि छाण न करितां तुफान, ऐसें धण्याचे ध्यानीं आल्यास सेवक निर्मल होईल. येदथींचें मात्र पक्कें वचन साहेबाचें घ्यावें. कारण गरीबीची आबरू सेवकाची आहे. विनाइलजाम कोणाच्या सांगितल्यावर जाहाला आबरूस खत्रा न व्हावा, इतकाच संकल्प. ह्मणोन अर्ज करून वचन घ्यावें ह्मणोन, चिरंजीव देवबा यासी लिहून पाठविलें. तीं पत्रें पोहचून चिरंजीवाकडोन साहेबाचे श्रवणीं सेवकाची विनंति आली कीं नाहीं कळेना. ऐसें असोन, सेवकाकडील हरामखोरी कोणाच्या सांगितल्यावरून धण्याचे ध्यानीं आली ? ह्मणोन ऐकितों कीं हा जाऊन नवाबाच्या अमलांत बसोन आगरेच्या किल्ल्याची मजबुदी केली आहे. हरामखोरीवर प्रवर्तेल ऐसें चितीं आलें. त्यासी नवाबाच्या मुलकांत सैन्यांतून येणेंचा परियाय येक आबरूकरितां, तो मजकूर सविस्तर दोन तीन विनंतिपत्रीं पेशजी लिहिला आहे. पत्रें सेवकाचीं पोंहचल्यास ध्यानीं आलाच असेल. आग-याचे किल्ल्याची मजबुदी नवीन आज ती कशाकरितां करावी ? आगरेची जप्ती करणेंविसी सडे फौजेंतींल सरदारांस लिहून आलें असेल. त्यावरून गुलाबराव कदम आगरेस सरदारांनीं खाना केले, परंतु, सरकारचें आज्ञापत्र सेवकाचे नावें नाहीं. तेव्हां विनाआज्ञापत्र किल्ला स्वाधीन करून ? वा उद्यां धण्यानीं विचारिलें की कोणाचे आज्ञेवरून किल्ला दिल्हा ? तर उत्तर द्यावयास जागा नाहीं. लहान गढी असली त्याच्या तीन परवानग्याचा उजूर करावा लागतो. हा आगरेचा किल्ला. बिना सरकार आज्ञापत्रासिवाइ किल्ला कैसा द्यावा. जाणोन, राजश्री विश्राम अनंत यांणीं साहेबास विनंतिपत्र लिहून घरूजोडी कैलासवासी माहाराज यांचे संकेताप्रमाणें रवाना केली आहे. पत्रें पोंहचून उत्तर आलें ह्मणजे किल्ला स्वाधीन करून, कबज घेऊन, चरणापासीं यावें. ऐसें साहेबाच्या, चरणीं लक्ष असतां, गैरवाका सेवकाकडील सरकारांत ध्यानी येतो. तस्मात ग्रहदशा ऐसी जाणोन लटिके आळ येतात. येक मजबुती आगरेच्या किल्यांत इस्मालबेग हरामखोर याची केली. कारण सेवकाचे तगीरीचें वर्तमान महशूर जाहलें. तेव्हां शिबंदीचे लोक वगैरे आपापले ठिकाणीं दिलगीर होऊन, बंदोबस्त प्रसंगी कमी पडोन, हरामखोर निघोन गेल्यास, जाहला हरामखोरी माथां येईल, त्याकाळीं प्राण द्यावा लागेल. यास्तव आगरेत वरचेवर हरामखोराचा बंदोबस्त पहिल्यापेक्षां अधिक जपून राखणेंविसीं लिहीत गेलों. किल्याविसी सरकारी आज्ञापत्रें येऊन किल्ला देणेंत उजूर करतो, तर मग धण्यानीं सेवकाची हरामखोरी ध्यानीं आणावयाची होती. ऐसे प्रकार लटिके धण्यास कोणी सांगू लागेल, तेव्हां सेवकाचा परिणाम काय ? त्यांस सेवकाची विनंति हेच कीं, येक वेळ चरणापासीं बोलाऊन घ्यावें, मजकडे कोण काय इलजाम सांगतील त्याचे जाबसाल मी सर्व पुरऊन देईन, इलजाम येकहि अंगीं लागल्यास ते क्षणीं पारपत्य करावें. आण साहेबाचे कृपेनें मी येकनिष्ठपणें वर्तणूक प्रतरणा न करतां केली असलेस तिलप्राय इलजाम लागणार नाहीं. त्याकाळीं धण्याची निशा जाहल्याअंतीं मग धणी कृपाळू होऊन जे सेवा सांगतील त्या सेवेंत हाजर आहे. प्रथमपासोन संकल्प, धणीकामावर ह्या शरीराचें सार्थक व्हावें, ऐसा आहे. धण्याचे प्रतापें माझा संकल्प सिद्धीस जाईल. तूर्त ग्रहदशेनें येकनिष्ठता ठेऊन लहान-मोठ्या चाक-या धण्याच्या केल्या असतां, साहेबाच्या चरणाचा वियोग होऊन अरण्यवास घडला आहे. त्यासी आमची निष्ठा धण्याचे चरणीं असल्यास, धणी कृपाळू होऊन चरणाची भेट होईल. वरकड राजश्री पाटील विनंति करितील. कृपा करून उत्तराची अज्ञा जाहली पाहिजे. सेवक पदरींचा जाणोन, सांभाळ करणार धणी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ती.