Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७९] श्री. ६ डिसेंबर १७३७
श्रीमत् तीर्थरूप राजश्री परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल कृतानेक विज्ञापना तागाईत मार्गशीर्ष शुध्द एकादशी भौमवासर पावेतों आपले कृपेनें वर्तमान कुशल असें. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें, तें पावोन समाधान जाहलें. ऐसेंच सर्वदा पत्र पाठवून सांभाळ करणार आपण वडील आहात. वरकड कोण व कणगे व साकर व दारू पाठवावी ह्मणोन लिहिलें ऐशास जिनसांचा विषय आहे ऐसा विचार कांहीं नाहीं. जिन्नसही पाठविला जाईल. बहुत काय लिहिणें. लोभ असों दिला पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७८] श्री. २५ जुलै १७३७
श्रीमत् तीर्थरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल तागाईत श्रावण शुध्द दशमी इंदुवारपावेतों स्वामींच्या आशीर्वादेंकरून कुशल असें. विशेष. स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन समाधान जाहालें. राजश्री त्रिंबकजी पवळे व दामोदर रघुनाथ पाठविले आणि स्वामीस लिहिलें होतें कीं, येसमयीं जाऊन चार गोष्टी सांगाव्या; परंतु आपण लिहिलें कीं समाधीस बसावयास अवकाश थोडकाच राहिला, समाधीहून उठल्यानंतर प्रेत्न करून स्वामी आमच्या कार्यावर दृष्टी देऊन मन घालतील. विस्कलित प्रसंग जाहला आहे तो नीट होईल ह्मणून भरोसा धरिला होता. आमच्या कार्याची आपणास योग्यता दिसून येत नाहीं. बरें ! ऋणानुबंध प्रमाण आहे ! अद्याप तरी सर्व भरंवसा स्वामींचाच धरिला आहे. राजश्री स्वामींनी दर्शनास यावयाविशीं आज्ञा केली आहे. त्यास मुडेगडकरी यांनीं दगाबाजी करून राजश्री विसाजीपंत यांस ठेवून घेतले आहेत आणि मुलकांतही उपद्रव करितात. याजकरितां राजश्री स्वामीपाशीं आपण जाऊन ते गोष्टीचा बंद होऊन येई आणि राजश्री पंत मशारनिल्ले स्वामीसंनिध जात, तो अर्थ केला पाहिजे. येसमयीं स्वामींनी करून दाखवावेंच दाखवावें. आनंदी व राघू स्वामीपाशीं भांडोन आल्या आहेत. त्यांस गोटणेंमध्यें रहावया स्थल न द्यावें ह्मणून आज्ञा केली, तरी स्वामींची आज्ञा ते प्रमाण आहे. आल्या तरी स्वामीच्या स्वामीकडेस पाठवून देतों. खासे कागद व सुसी ताग्याविशीं लिहिलें, त्यास आह्मीं स्वामींच्या दर्शनास येतेसमयीं घेऊन येतों. सारांश, अर्थ :- राजश्री पंत स्वामीसंनिध न्यावें ह्मणजे आह्मीं दर्शनास येतों. दुसरा विचार किमपि नाहीं. स्वामी वडील आहेत. कळेल तसें करावें. रा। छ ८ रबिलाखर. बहुत काय लिहिणें कृपा केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७७] श्री. २६ जून १७३७
श्रीमत् तीर्थरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
सेवक संभाजी आंगरे सरखेल चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल तागाईत आषाढ शुध्द दशमी रविवार पावेतों स्वामीचे आशीर्वादें कुशल असो. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें. प्रविष्ट होऊन बहुत संतोष जाहला. आपण पत्रीं लेख केला कीं राजश्री छत्रपती स्वामीकडे पत्रें पाठविलीं आहेत. राजश्री विसाराम व भोजदळवी ऐसे हुजूर छत्रपतीकडे खामखा आपण नेतों ह्मणून लिहिलें. ऐशियास सर्व भरवंसा आपलाच आहे. आपण जे गोष्टी मनावरी धरितील ते नव्हे असी काय आहे ? प्रस्तुत येथून राजश्री त्रिंबकजी पवले व दामोदर रघुनाथ पाठविले आहेत. तरी या प्रसंगी स्वामींनीं राजश्री स्वामीजवळ जाऊन येथील मनसबेयाच्या चार गोष्टी सांगून, राजश्री विसाजीराम व राजश्री भोज दळवी वगैरे सरदार असे हुजूर नेऊन, मनसबा सुरू होऊन येई ते गोष्टी केली पाहिजे. सारांश अर्थ, या प्रसंगी भरंवसा स्वामींचा आहे. ज्याअर्थी कार्य होय आणि स्वामीचे पदरीं यश पडे ते गोष्टी कराव्या. स्वामी वडील आहेत. मखमलीचा दरकार आहे ह्मणून जाबकरी यानें जबानीं सांगितलें. पत्रीं कांहींच लिहिलें नाहीं. तरी मखमलीचें प्रयोजन असलें तरी किती पाहिजे तें लिहून पाठवावें. मागाहून पाठविली जाईल. बहुत लिहावें तरी स्वामी सर्वज्ञ आहेत. रा। छ ८ हे रबिलावल. कृपा असों दिली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७६] श्री. १३ मे १७३७.
श्रीमत् तीर्थरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरि येथील कुशल वैशाख बहुल दशमी गुरुवार पावेतों स्वामींच्या आशीर्वादें सुखरूप असे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन सधान वाटलें. ऐसेंच निरंतर आशीर्वादपत्र पाठवून संभाळ केला पाहिजे. यानंतर पूर्व बोलीचा संकेत लिहून आपणांकडील शब्दाचा परिहार केला, तरी उचितच. आपला आशीर्वाद मस्तकी आहे. योजिला कार्यभाग समयानुरूप होऊन येईल. ते गोष्टीचे अगाध काय आहे ? वरकड मजकूर गोठणें येथील मक्ता कमी न करावा ह्मणोन लिहिलें, तरी गांवचा आरातारा पाहून नेम ठरावणें तेंच होईल. पलंगाचें काम उंदिरानें जायां केलें आहे त्याविशीं लिहिलें. त्यास येथें मनास आणिता फिरंगी कोणीं वेतीचें काम जाणत नाहींत. कारीगर असता तरी पलंग दुरुस्त करवूनही जाता. अपत्यापासून सेवेसीं अंतर होणार नाहीं. विदित जाहलें पाहिजे. रा। छ २४ माहे मोहरम. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७५] श्री. २६ जानेवारी १७३६.
श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल दोनी कर जोडून दंडवत विनंति उपरि येथील कुशल तागाईत माघ शुध्द त्रयोदशी पावेतों स्वामींच्या आशीर्वादेंकरून सुखरूप असो. यानंतर स्वामींनी आज्ञापत्र पाठविलें. पावोन लेखनार्थ श्रवणें बहुत कांहीं संतोष जाहला. पत्रीं लिहिलें कीं राजश्री स्वामीदर्शनास येऊन वाडियास नेलें. रवाना केलें. मातुश्रीची भेटी घेऊन नम्रतेनें वर्तणूक करून पुन्हा स्वस्थानीं आलों. त्यास, आह्मीं दर्शनास यावें ह्मणून कितेक आज्ञापत्रीं आज्ञा केली. घाट चढोन यावें. तेथें आपण येऊन सरकारकून घेऊन येऊन सरंभे पुढें सामोरे येऊन राजदर्शन करून तीन दिवसांत रवाना करून देऊन. हा एक अर्थ. दुसरा विचार अंजनवेली गोंवळकोटास मुर्चेबंदी करावी, ह्मणजे पन्नास हजार रुपये, चारशें खंडी तांदूळ, बेगमी करून देऊन. या पत्राचें उत्तर सत्वर पाठवणें ह्मणून आज्ञा केली. आज्ञा ते प्रमाण. ऐशास रामदर्शन न घ्यावें, असें कांहीं आमचे मानस नाहीं. याचा विचार, आधीं राजश्री विसाजीराम यांस आह्मांकडेस पाठवून द्यावें. ते तेथें आले ह्मणजे आपणाकडेस पाठवून देऊन. पुन्हां आपण येथें यावें. आह्मांस घेऊन जाऊन राजदर्शन करून घ्यावें, हा एक विचार आहे. हें आपल्या विचारास न आलें तरी अंजनवेली, गोंवळकोटचे मोर्चेबंदीचा विचार आपण लिहिला तरी आह्मीं मान्य आहों. नख्ताची बेगमी व गल्ल्याची बेगमी आपण लिहिली त्याप्रमाणें तूर्त निमे करून घ्यावी, ह्मणजे गोंवलकोटीं मोर्चे बसवितों. लष्करची फौजही तुह्मांकडेस पांच सात हजार रवाना करून घ्यावी. फौज खाली उतरली व बेगमी सदरहूपैकीं निमें तूर्त जाहाली, ह्मणजे मोर्चेबंदी करितों. उपरांत निंमे बेगमी करावी, ऐसा विचार आहे. आह्मांस या साली पैदास्त कांहीं जाहली नाहीं व मुलूखही बैरान जाहाला. आपणांस समजावें ह्मणोन लिहिलें आहे. शिलारसाविसीं लिहिलें त्यावरून संग्रहीं नव्हता; परंतु थोडाबहुत पाठविला आहे. रा। छ १० सवाल. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो द्यावा हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७४] श्री. ८ डिसेंबर १७३६.
श्रीमत् सकल तीर्थास्पदीभूत परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति उपरि येथील कुशल पौष शुध्द पंचमी इंदुवासर पावेतों स्वामीचे कृपेनें जाणून स्वकीय लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. विशेष. धावडशीस पावल्यावरी आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन सविस्तर कळों आलें. स्वामींजवळून प्रसाद मागोन घेतला, त्याचा विचार लिहून पाठविला. तरी त्याच प्रसादानें स्वामीस कोठें सोडून, पुढें जें स्वामीजवळ अपूर्व असेल तें आमचे आह्मांस पाहिजे तेव्हां मागोन घेऊन. स्वामीचे जागां दुसरा अर्थ किमपी जाणत नाहीं. साकर थोडकी दिली ह्मणोन आज्ञा, तरी पुढें साकर आपणांस पाठवावयास अंतर होईल कीं काय ? आपण तिळमात्र स्वामीजवळ पडदा धरणार नाहीं. डाळिंबे पाठविलीं तीं पावलीं. बहुत काय लिहिणें कृपा वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७३] श्री.
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूप स्वामीचे सेवेसी :-
सेवक संभाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन दंडवत प्रमाण विनंति उपरी येथील कुशल मार्गशीर्ष बहुल दशमी सौम्यवासर पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून सुखरूप असों. विशेष. स्वामीनीं राजश्री चिमणाजीपंत यांजबरोबर आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थश्रवणें व मुखता स्वामीचीं आज्ञोत्तरें निवेदन केल्यावरून बहुत कांहीं समाधान वाटलें. सारांश आज्ञा कीं पूर्वीं कैलासवासी शिवाजी राजे यांच्या राज्यांत मौनीबावा व बावा याकुब ऐसे महापुरुष होते. त्यांचे कृपादृष्टीमुळें राज्याचें अभीष्ट होऊन छत्रपति दिग्विजयी होऊन महत्कार्ये करीत होते. तुह्मींही कोंकणचे राजेच आहां. तुमचेही राज्यांत कोणी महापुरुष असल्यानें व यज्ञादिक कर्मे जाहल्यानें तुमच्या राज्यास व उभयतांस कल्याण आणि अभिष्ट फत्ते होईल. वडिलांचे चित्तांत आपलें अदृष्ट थोर, कर्ते आपण, वडिलांचे पुण्यें आपलें चालेल, असें जाहलें. तरी आह्मीं येणेंकरून संतोषीच आहों. ह्मणोन कितेक विशदें आज्ञापिलें. तरी पूर्वीं श्रीमत् महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामीचे वेळेस उभयतां महापुरुष होते, त्यांचे कृपादृष्टीनें सर्व कल्याण होत होतें, हे गोष्टी तों यथार्थच आहे. तथापि महाराज अवतारी होते, वरदी होते. तेणेंकरून जे जे इच्छिले पदार्थ, ते ते सिध्दीस गेले. महाराष्ट्र नूतनच निर्माण करून स्वधर्मस्थापना केली ! त्याणीं साहसकर्मे सामान्य केलीं असें नाहीं ! त्यांची उपमा त्यांसच ! अन्यत्रांस बोलिली नाहीं ! प्रस्तुत कोकणपट्टीमध्यें आह्मांस राजाची उपमा दिली व महापुरुष कोणी असल्यानें व यज्ञादिक कर्मे जाहाल्यानें कल्याणावह ह्मणोन आज्ञा. तरी सांप्रतकालामध्यें स्वामीसारखें महापुरुष, तपस्वी, सर्वोपमायोग्य, तुलनेस दुसरें पात्र योजत नाहीं ! मुख्य गोष्टी वडिलांचा व स्वामीचा पूर्वजन्मार्जित ऋणानुबंध होता. तेणेंकरून इहलोकीं त्यांचे व आपलें बरेंच चालिलें. त्यांचे पुण्य व स्वामीचा आशीर्वाद आमचे मस्तकी पूर्ण असतां, कोणेक पदार्थ न्यून आहे ऐसें तों नाहीं. यज्ञ पांच करणार श्री समर्थ आहे ! तेथें एका कोटी यज्ञाची कथा काय ? ह्मणोन तरी स्वामीचें जें चित्तांवरी धरितील तें शेवटास जाईल. यदर्थीं संशय असेल तरी स्वामीनीं पत्रारूढ करावें. यज्ञसाहित्याचा अर्थ व समाप्तसमयीं सन्निध जाऊन प्रसाद उभयतांनीं घ्यावा, यज्ञाचा फलांश शत्रू पादाक्रांत होऊन तारवें हस्तगत होतील ह्मणोन लिहिलें. तरी साहित्य सर्व प्रकारें करून यज्ञसप्तीसमयीं खासा आह्मी जाऊन प्रसाद घेउन. त्यास अंतर होणें नाहीं. शत्रू पादाक्रांत स्वामीचे आशीर्वादें व वडिलांचे पुण्येंकरून होतील. तारवें हस्तगत होतील, ह्मणोन तररी नौकांची ताकीरात करीत होतों. तें वृत्त पेशजी स्वामीचे सेवेसी लिहिलेंच होतें. त्यावरी नौकांची तयारी करून स्वारीस नौका पाठविल्या होत्या. त्यांणी एक तावडा गांवीचा कची धरून आणिला, खाली होता. अल्प स्वल्प कांहीं सांपडलें. फिरोन गुराबा, गलबतें स्वारीस पाठविलीं असेत. फलदाता श्रीसमर्थ असे. डोरलें महाळुंगे याचा ऐवज अंताजी शिवदेव यांणीं नेला. त्याचे मुबदलेयाचा अर्थ स्वामींनी आज्ञापिला. तरी येविशीचें उत्तर पेशजीच स्वामीस लिहून पाठविलें होतें, त्यावरून विदित जाहालेंच असेल. विदित होणें. वरकड प्रसाद दिला व वस्त्रें आह्मांस व घरांत पाठविलेप्रमाणें प्रविष्ट होऊन अंगीकार बहुत आदरेंकरून प्रासादिक वस्त्रें घेतलीं. सेवेसी श्रुत होणें. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
स्वामी ज्याप्रमाणें आज्ञा करतील त्याप्रमाणें आह्मीं वर्तणूक करूं. यासी अंतर करूं तरी श्रीकानोबा यांची व स्वामीचे पायांची, खाशाचे पायांची शपथ आहे. मानाजी आंगरे यांचे वाईट करणार नाहीं. सर्व दौलत त्यांचे स्वाधीन करीन आणि त्यांचे चालवीन. काडीइतकें अंतर करणार नाहीं. त्याचें वाईट करावें तरी दुसरा कोणी मजला भाऊबंद आहे कीं काय ? हें बावा ! आपण चित्तीं आणावें. त्यास तो जिवासाठीं भय धरील, कुलाबकर लोकांचें कांहीं वाईट करीन हें त्यांचे चित्तीं येईल, तरी तेही गोष्ट करणार नाहीं. सर्व अन्याय माफ करीन. चालवीत होतों त्याहीपेक्षां विशेष चालवीन. यासी अंतर असेल तरी आपले पायाची शपथ आहे. आजवरी आमचें चित्त निखालसपणावरी आहे. दुसरा अर्थ नाहीं. स्वामींनीं अगोदर न जावें. दसरा जालियावरी आह्मीं सुवर्णदुर्गीं येतों. तेथून स्वामीस कागद पाठवितों. तेथें स्वामीनीं येऊन भेटी घ्यावी. स्वामीस सर्व अर्थ निवेदन करू. मग स्वामींनीं पुढें कुलाबास जावें. आह्मीं मागाहून येऊन. आपण गेलियावरी तो स्वामीची गोष्ट ऐकेल. न ऐकेसा नाहीं. असें असोन न ऐके तरी स्वामीची इतराजी होऊन त्याचें बरें होणार नाहीं, ही आमची निशा आहे. स्वामी आमचे मस्तकीं आहेत तों आह्मीं कोणाचा हिसाब धरीत नाहीं. अगोदर आपणांस लिहीत आहें. आपण सुवर्णदुर्गीं भेटी घ्यावी. पूर्ण आशीर्वाद विजयदुर्गी दिला आहे तो खरा करून एक वेळ कुलाबासआपण आह्मीं जावें, वडिलाचे जागा जाऊन बसावें, ऐसा हेत आहे. तो पूर्ण करणार स्वामी समर्थ आहेत. हें पत्र लक्ष पत्रांचे जागा हें पत्र मानून, ये गोष्टीसाठी जागोजाग जेथें स्वामीची ममता आहे तेथें राजकारण लावून, स्वामीचे पदरीं यश पडे तो अर्थ आजीपासून साधना लाविला पाहिजे. आह्मीं लेकरांनीं वारंवार कोठपावेतों ल्याहावें ? हे गोष्ट आपण चित्तावरी न धरीत, आमची हेळणा करितील तरी खासे स्वर्गीं काय ह्मणतील तें ध्यानीं पाहून घ्यावें. आशीर्वादउत्तराचा मार्ग लक्षीत राहिलों. उत्तर पाठविलें पाहिजे. बहुत ल्याहावें तों स्वामी वडिल आहेत. कृपालोभ असों द्यावा हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७२] श्री.
श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल मस्तक ठेऊन दंडवत विनंति उपरि येथील कुशल ता। श्रावणवदि त्रयोदशी इंदुवार पावेतों स्वामीचे आशीर्वादें वर्तमान कुशल असें विशेष. स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें प्रविष्ट होवून संतोष जाला. पत्रीं आज्ञा केली कीं, समाधीहून उठलियावरी कुलाबास जावून रा। मानाजी आंगरे यांशी बोध करून पाहोन उत्तर आलीयावरी जाण्याचा विचार करूं, ह्मणोन स्वामींनी आज्ञापिलें. ऐशास कुलाबास जावें. मानाजीस देहावरी आणावा, आणि गौडी करून आमचें स्थान आमचे स्वाधीन करावें, हें सर्वाविशीं स्वामीस अगत्य आहे. श्रीनेंही आपणांस वरदान तैसेंच दिलें आहे ! केवळ स्वामीभार्गवाचा अवतार आहेत ! कोणी स्वामीस मनुष्यामध्यें गणना करील तो अर्थ आमचे चित्तीं नाहीं. आपण केवळ भार्गवस्वरूप ईश्वराचा अवतार आहेत. तेथे आपली गोष्ट कोण न ऐकेसा आहे ? वनीचें पांखरूं आहे तेंही आपले आशीर्वादें उभें राहून स्वामीचें वचन चालवील ! तेथें माणसाचा पाड काय आहे ? आह्मीं आपलीं लेकरें. खाशामागें वडील, मायबाप, गुरू, देव, धर्म, स्वामीचे पाय आहेत. आमची सर्व चिंता स्वामीस आहे. आमचे मस्तकी हात ठेऊन पूर्ण आशीर्वाद दिल्हा, तो आह्मीं त्याची शकूनगांठी घालून स्वामीचें वचन मस्तकीं धरलें आहे. थोर आहेत त्यांस कोठें धरावें ? वचनास धरावें. पांडवांचा अभिमान श्रीकृष्णानें धरिला होता. त्यास नानाप्रकारें येवून संकटें ओढलीं तरी तीं तीं दूर करून, कौरवांस नतीजा पांडवाचे होतें देऊन, अस्थनापुरी स्थापना केली. परमेशरानें त्याचा अभिमान पूर्ण धरिला होता. त्याप्रो।। स्वामी आमचे मस्तकी श्रीकृष्णाप्रमाणें आह्मीं मानिलें आहे. आधीं थोरांनीं एकाचा अभिमान धरूं नये. धरिला तरी सिध्दीस न्यावा. आह्मीं आपलीं लेंकरें आहों. बरेंवाईट एखादे समयीं बोलिलों, चालिलों तरी वडिलांनी क्षमा करावी. रागरोष करूं नये. बहुतांनीं बहुतप्रकारें सांगितलें तें चित्तांत आणूं नये. रागरोष करूं नये. हे थोर शिष्ट आहेत त्यांचें बिरुद आहे. स्वामींनीं आजीपर्यंत तपश्चर्या केली आहे, त्या सामर्थें त्यांचे जेथून जेथून यत्न होईल तो स्वामींनीं करून एक वेळ कुलाबा जागा स्वामींनी आह्मांस नेऊन त्यांची आमची गोडी करून द्यावी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७१] श्री. २० जानेवारी १७३६.
श्रीमत् सकल तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति उपरि येथील कुशल माघ बहुल चतुर्थी भौमवासर पावेतों स्वामीचे आशीर्वादें जाणून स्वकीय कुशल लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. विशेष आपण कृपा करून पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन सविस्तर कळों आलें. कितेक रागेजानें लिहिलें, ऐशास आपण आह्मांस वडील आहात. आपणआह्माजवळ रागेजावें, आह्मी वडिलाजवळ रुसावें हें उचित आहे. पंधरा रुपये द्राक्ष व अखरोड आणावयाबद्दल पाठविले ते फिरोन पाठवावे तरी आपणास राग विशेष येईल, याबद्दल घेऊन ठेविले आहेत. पुढें मसकती तरांडी आल्यावरीं सदरहू जिन्नस आपणाकडे पाठवून देऊं. सध्या संग्रही जिन्नस होता तो रवाना केला आहे.
संतोषें करून घेऊन प्रविष्ट झाल्याचें उत्तर पाठविलें पाहिजे. बावा ! घडी घडी तुह्मी आह्मांस निष्ठुरवादें लिहितां हे काय ?
पूर्वीपासून हें घर तुमचें, ऐसें या भूमंडलांत विस्तारले आहे. आतां तुह्मीं कोपोन पूर्वील आशीर्वादास कलुशतां लावून घेणार आहां कीं काय ? आह्मास तुह्मावाचून कोण आहे ? हें तुह्मीं आपल्या चित्तांत आणीत नाहीं. बरें ! आह्मी लेहून होणें काय ? सारांश आपल्या बिरदास जतन करणें. गणेशाची मूर्ती या प्रांतीं मनास आणितां कारागीर नाहीं. असतां, तरी बावा ! तुमच्या कामास अंतर न होतें. सुवर्णदुर्गास लेहून पाठविलें आहे. जरी तेथें पाथरवटांनी केली तरी अवश्यमेव करवून पाठविली जाईल. अंतर होणार नाहीं. बहुत काय लिहिणें. कृपा वर्धमान केली पाहिजे. हे विज्ञापना.