[२७६] श्री. १३ मे १७३७.
श्रीमत् तीर्थरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरि येथील कुशल वैशाख बहुल दशमी गुरुवार पावेतों स्वामींच्या आशीर्वादें सुखरूप असे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन सधान वाटलें. ऐसेंच निरंतर आशीर्वादपत्र पाठवून संभाळ केला पाहिजे. यानंतर पूर्व बोलीचा संकेत लिहून आपणांकडील शब्दाचा परिहार केला, तरी उचितच. आपला आशीर्वाद मस्तकी आहे. योजिला कार्यभाग समयानुरूप होऊन येईल. ते गोष्टीचे अगाध काय आहे ? वरकड मजकूर गोठणें येथील मक्ता कमी न करावा ह्मणोन लिहिलें, तरी गांवचा आरातारा पाहून नेम ठरावणें तेंच होईल. पलंगाचें काम उंदिरानें जायां केलें आहे त्याविशीं लिहिलें. त्यास येथें मनास आणिता फिरंगी कोणीं वेतीचें काम जाणत नाहींत. कारीगर असता तरी पलंग दुरुस्त करवूनही जाता. अपत्यापासून सेवेसीं अंतर होणार नाहीं. विदित जाहलें पाहिजे. रा। छ २४ माहे मोहरम. हे विज्ञापना.