[२७३] श्री.
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूप स्वामीचे सेवेसी :-
सेवक संभाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन दंडवत प्रमाण विनंति उपरी येथील कुशल मार्गशीर्ष बहुल दशमी सौम्यवासर पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून सुखरूप असों. विशेष. स्वामीनीं राजश्री चिमणाजीपंत यांजबरोबर आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थश्रवणें व मुखता स्वामीचीं आज्ञोत्तरें निवेदन केल्यावरून बहुत कांहीं समाधान वाटलें. सारांश आज्ञा कीं पूर्वीं कैलासवासी शिवाजी राजे यांच्या राज्यांत मौनीबावा व बावा याकुब ऐसे महापुरुष होते. त्यांचे कृपादृष्टीमुळें राज्याचें अभीष्ट होऊन छत्रपति दिग्विजयी होऊन महत्कार्ये करीत होते. तुह्मींही कोंकणचे राजेच आहां. तुमचेही राज्यांत कोणी महापुरुष असल्यानें व यज्ञादिक कर्मे जाहल्यानें तुमच्या राज्यास व उभयतांस कल्याण आणि अभिष्ट फत्ते होईल. वडिलांचे चित्तांत आपलें अदृष्ट थोर, कर्ते आपण, वडिलांचे पुण्यें आपलें चालेल, असें जाहलें. तरी आह्मीं येणेंकरून संतोषीच आहों. ह्मणोन कितेक विशदें आज्ञापिलें. तरी पूर्वीं श्रीमत् महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामीचे वेळेस उभयतां महापुरुष होते, त्यांचे कृपादृष्टीनें सर्व कल्याण होत होतें, हे गोष्टी तों यथार्थच आहे. तथापि महाराज अवतारी होते, वरदी होते. तेणेंकरून जे जे इच्छिले पदार्थ, ते ते सिध्दीस गेले. महाराष्ट्र नूतनच निर्माण करून स्वधर्मस्थापना केली ! त्याणीं साहसकर्मे सामान्य केलीं असें नाहीं ! त्यांची उपमा त्यांसच ! अन्यत्रांस बोलिली नाहीं ! प्रस्तुत कोकणपट्टीमध्यें आह्मांस राजाची उपमा दिली व महापुरुष कोणी असल्यानें व यज्ञादिक कर्मे जाहाल्यानें कल्याणावह ह्मणोन आज्ञा. तरी सांप्रतकालामध्यें स्वामीसारखें महापुरुष, तपस्वी, सर्वोपमायोग्य, तुलनेस दुसरें पात्र योजत नाहीं ! मुख्य गोष्टी वडिलांचा व स्वामीचा पूर्वजन्मार्जित ऋणानुबंध होता. तेणेंकरून इहलोकीं त्यांचे व आपलें बरेंच चालिलें. त्यांचे पुण्य व स्वामीचा आशीर्वाद आमचे मस्तकी पूर्ण असतां, कोणेक पदार्थ न्यून आहे ऐसें तों नाहीं. यज्ञ पांच करणार श्री समर्थ आहे ! तेथें एका कोटी यज्ञाची कथा काय ? ह्मणोन तरी स्वामीचें जें चित्तांवरी धरितील तें शेवटास जाईल. यदर्थीं संशय असेल तरी स्वामीनीं पत्रारूढ करावें. यज्ञसाहित्याचा अर्थ व समाप्तसमयीं सन्निध जाऊन प्रसाद उभयतांनीं घ्यावा, यज्ञाचा फलांश शत्रू पादाक्रांत होऊन तारवें हस्तगत होतील ह्मणोन लिहिलें. तरी साहित्य सर्व प्रकारें करून यज्ञसप्तीसमयीं खासा आह्मी जाऊन प्रसाद घेउन. त्यास अंतर होणें नाहीं. शत्रू पादाक्रांत स्वामीचे आशीर्वादें व वडिलांचे पुण्येंकरून होतील. तारवें हस्तगत होतील, ह्मणोन तररी नौकांची ताकीरात करीत होतों. तें वृत्त पेशजी स्वामीचे सेवेसी लिहिलेंच होतें. त्यावरी नौकांची तयारी करून स्वारीस नौका पाठविल्या होत्या. त्यांणी एक तावडा गांवीचा कची धरून आणिला, खाली होता. अल्प स्वल्प कांहीं सांपडलें. फिरोन गुराबा, गलबतें स्वारीस पाठविलीं असेत. फलदाता श्रीसमर्थ असे. डोरलें महाळुंगे याचा ऐवज अंताजी शिवदेव यांणीं नेला. त्याचे मुबदलेयाचा अर्थ स्वामींनी आज्ञापिला. तरी येविशीचें उत्तर पेशजीच स्वामीस लिहून पाठविलें होतें, त्यावरून विदित जाहालेंच असेल. विदित होणें. वरकड प्रसाद दिला व वस्त्रें आह्मांस व घरांत पाठविलेप्रमाणें प्रविष्ट होऊन अंगीकार बहुत आदरेंकरून प्रासादिक वस्त्रें घेतलीं. सेवेसी श्रुत होणें. हे विज्ञापना.