[२७७] श्री. २६ जून १७३७
श्रीमत् तीर्थरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
सेवक संभाजी आंगरे सरखेल चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल तागाईत आषाढ शुध्द दशमी रविवार पावेतों स्वामीचे आशीर्वादें कुशल असो. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें. प्रविष्ट होऊन बहुत संतोष जाहला. आपण पत्रीं लेख केला कीं राजश्री छत्रपती स्वामीकडे पत्रें पाठविलीं आहेत. राजश्री विसाराम व भोजदळवी ऐसे हुजूर छत्रपतीकडे खामखा आपण नेतों ह्मणून लिहिलें. ऐशियास सर्व भरवंसा आपलाच आहे. आपण जे गोष्टी मनावरी धरितील ते नव्हे असी काय आहे ? प्रस्तुत येथून राजश्री त्रिंबकजी पवले व दामोदर रघुनाथ पाठविले आहेत. तरी या प्रसंगी स्वामींनीं राजश्री स्वामीजवळ जाऊन येथील मनसबेयाच्या चार गोष्टी सांगून, राजश्री विसाजीराम व राजश्री भोज दळवी वगैरे सरदार असे हुजूर नेऊन, मनसबा सुरू होऊन येई ते गोष्टी केली पाहिजे. सारांश अर्थ, या प्रसंगी भरंवसा स्वामींचा आहे. ज्याअर्थी कार्य होय आणि स्वामीचे पदरीं यश पडे ते गोष्टी कराव्या. स्वामी वडील आहेत. मखमलीचा दरकार आहे ह्मणून जाबकरी यानें जबानीं सांगितलें. पत्रीं कांहींच लिहिलें नाहीं. तरी मखमलीचें प्रयोजन असलें तरी किती पाहिजे तें लिहून पाठवावें. मागाहून पाठविली जाईल. बहुत लिहावें तरी स्वामी सर्वज्ञ आहेत. रा। छ ८ हे रबिलावल. कृपा असों दिली पाहिजे. हे विनंति.