[२७२] श्री.
श्रीमत् भार्गवस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल मस्तक ठेऊन दंडवत विनंति उपरि येथील कुशल ता। श्रावणवदि त्रयोदशी इंदुवार पावेतों स्वामीचे आशीर्वादें वर्तमान कुशल असें विशेष. स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें प्रविष्ट होवून संतोष जाला. पत्रीं आज्ञा केली कीं, समाधीहून उठलियावरी कुलाबास जावून रा। मानाजी आंगरे यांशी बोध करून पाहोन उत्तर आलीयावरी जाण्याचा विचार करूं, ह्मणोन स्वामींनी आज्ञापिलें. ऐशास कुलाबास जावें. मानाजीस देहावरी आणावा, आणि गौडी करून आमचें स्थान आमचे स्वाधीन करावें, हें सर्वाविशीं स्वामीस अगत्य आहे. श्रीनेंही आपणांस वरदान तैसेंच दिलें आहे ! केवळ स्वामीभार्गवाचा अवतार आहेत ! कोणी स्वामीस मनुष्यामध्यें गणना करील तो अर्थ आमचे चित्तीं नाहीं. आपण केवळ भार्गवस्वरूप ईश्वराचा अवतार आहेत. तेथे आपली गोष्ट कोण न ऐकेसा आहे ? वनीचें पांखरूं आहे तेंही आपले आशीर्वादें उभें राहून स्वामीचें वचन चालवील ! तेथें माणसाचा पाड काय आहे ? आह्मीं आपलीं लेकरें. खाशामागें वडील, मायबाप, गुरू, देव, धर्म, स्वामीचे पाय आहेत. आमची सर्व चिंता स्वामीस आहे. आमचे मस्तकी हात ठेऊन पूर्ण आशीर्वाद दिल्हा, तो आह्मीं त्याची शकूनगांठी घालून स्वामीचें वचन मस्तकीं धरलें आहे. थोर आहेत त्यांस कोठें धरावें ? वचनास धरावें. पांडवांचा अभिमान श्रीकृष्णानें धरिला होता. त्यास नानाप्रकारें येवून संकटें ओढलीं तरी तीं तीं दूर करून, कौरवांस नतीजा पांडवाचे होतें देऊन, अस्थनापुरी स्थापना केली. परमेशरानें त्याचा अभिमान पूर्ण धरिला होता. त्याप्रो।। स्वामी आमचे मस्तकी श्रीकृष्णाप्रमाणें आह्मीं मानिलें आहे. आधीं थोरांनीं एकाचा अभिमान धरूं नये. धरिला तरी सिध्दीस न्यावा. आह्मीं आपलीं लेंकरें आहों. बरेंवाईट एखादे समयीं बोलिलों, चालिलों तरी वडिलांनी क्षमा करावी. रागरोष करूं नये. बहुतांनीं बहुतप्रकारें सांगितलें तें चित्तांत आणूं नये. रागरोष करूं नये. हे थोर शिष्ट आहेत त्यांचें बिरुद आहे. स्वामींनीं आजीपर्यंत तपश्चर्या केली आहे, त्या सामर्थें त्यांचे जेथून जेथून यत्न होईल तो स्वामींनीं करून एक वेळ कुलाबा जागा स्वामींनी आह्मांस नेऊन त्यांची आमची गोडी करून द्यावी.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)