Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३०७] श्री. ४ जानेवारी १७४२.
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य बावा स्वामीचे सेवेसी :-
सेवक तुळाजी आंगरे विज्ञापना येथील कुशल तागायत माघ शुध्द एकादशी गुरुवार पावेतों वर्तमान यथास्थित आहे. यानंतर, तीर्थरूप राजश्री संभाजी बावा दाजी यांस कैलासवास जाहाला. समागमें तिघी बाई व राखा चौघी व दासी सेवेसी तिघी एकून दहा असामी गेल्या. हें वृत्त आपणांस विदित जाहलेंच असेल. आह्मास दु:खार्णवीं घातलें. बरें ! होणार तें जालें ! याउपरी वडिलीं सेवकास आशीर्वाद देऊन अभिवृध्दी होणें तें करावें. वरकड चिरंजीव बया उपवर आहे. आह्मास तों हे गोष्टी जीवीं लागली आहे. यंदा हा प्रसंग उरकून घ्यावा. ऐशास वरविचारणा स्वामीविरहित होत नाहीं. आमची कायावाङ्मनें निश्चय वडिलांवर आहे. तरी वर उत्तम पाहोन योजावा. आह्मांजवळ कांही अधिकोत्तर द्यावें घ्यावें हा प्रसंग नाहीं. परंतु विवाह संपादून घ्यावा हें बहुत जरूर आहे. तरी आपण वराची विचारणा करून सत्वर आज्ञा करावी. त्याप्रमाणें वर्तणूक करून. श्रृत जालें पाहिजे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३०६] श्री. २१ जुलई १७३२.
सहस्त्रायु चिरंजीव संभूसिंग आंगरे मु॥ विजयदुर्ग यासी आज्ञा केली ऐसीजे :-
तुमचें त्याचें खालें लागलें. याजकरितां यंदां समाध कृष्णातीरीं घेतली होती. श्रीदयेनें, तुमच्या पुण्यें, उठोन धावडशीस आलों. शरीर बहुत कृश जालें आहे. वाचावें ऐसें नव्हतें. श्रीची इच्छा प्रमाण ! वार्षिक समाधिविसर्जन कानोजीपासून भार्गवक्षेत्री संतर्पण तुमचें हातें असे. यंदां तुच्या पुण्यानें, भार्गवक्षेत्री संतर्पण होत असतें त्यापेक्षां, विशेष येथें जालें. साताराहून पवार सरदार येऊन मठांतून पालखीत घालून आणिले. कळावें ह्मणोन लिहिलें असे. कानोजीमागें ह्मातारपणीं तुह्मीं आह्मास कार्यास याल ऐसा बहुत भरवसा धरिला होता. त्यास, श्रीचेठायीं तुह्मीं उत्तम वर्तणूक करीत नाहीं. बरें ! तुह्मी सुखी असलेत ह्मणजे सर्व पावलें. कृष्णंभट देसाई दुर्बळ आहे. अंत:प्रभू घाटयाचे कज्जामुळें बहुत कष्टी जाला आहे. हाल्लीं तो दुष्ट त्या प्रांतें गेला आहे. तुह्माकडेस गेला असला तर त्यास बरीशी नशेदच करणें. लबाड मनुष्यास जवळ केलीयास आपला भार वाढत नाहीं. कृष्णंभट याजवर दया करून, त्याचें हरएकविशी चालविल्यास संतोषी होऊं. तुह्मांस समाधिविसर्जनसमयींचा प्रसाद वस्त्र, कुसुंबी शेला अंगावरील पाठविला आहे. अंगीकार करणें. यंदां तरी तारवटी जिन्नस हातास आला तर पाठवावा. व पुढें कार्तिक मासी कोन, कारिंदे, कणगे, प्रांतांतील आज्ञा करून रवाना केली पाहिजे. हे आज्ञा पूर्वी पत्री तुह्मास लिहिली. तेथें तुह्मास लिहिलें होतें जे, तुमच्या हितावर आहे कोण आणि नाही कोण हें चित्तांत येऊं देणें. तिनी जखमा जर काढशील, तरच तूं कानोबाचा पुत्र खरा. चिरंजीव सखोबास कांहीं बोल नाहीं. तुमचेठायीं त्यांची माया विशेषच आहे. त्याचे मनांत तुमचे ठायीं विषमता नाहीं. जे तुमच्या वाईटावर असतील त्यांस पाहोन घेणें. जाणिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
त्यास गनीमाचें उडतें हत्यार भारी चालतां मूर्चा देऊन, भांडियाचा मार व बरखंदाजी व तिरंदाजी या मारानें आह्माकडील जमाव जागा सोडून उपराळियासी चालिलें. तों बाबूराव याजबरोबर जमाव वरचा होता त्याचें मतें मोड जाहाला. त्यामुळे त्यांहीं पळ काढिला. त्याप्रसंगी आह्मांकडीलही जमाव बहुतेक निघाला. त्याउपर बकाजीनाईक थोडे जमावांनीं उभे राहिले. तेथे युध्द बहुत तुंबळ जाहालें. ते जागाच गनीमाचे धारकरी आठ जण ठार केले. मग मोड होऊन गनीम मारून काढिला, तों आह्मांकडील जमाव होत चालला. शिद्दीसाद सारा गनीम हटी मारून काढून, किल्ल्यांत घालविला. तों श्रीपतराव श्रीस्थळी येऊन, आपले नजरेनें युध्द पाहिलें. त्याउपर जयगडींहून भांडें आलें व जमाव आला. गोवळकोटास मूर्चे देऊन जागा घ्यावा, तों राजश्री प्रतिनिधी यांही गोवळकोटास अनुसंधान लाविलें. बकाजी नाईक यांची व प्रतिनिधींच्या भेटी जाहल्या तो मजकूर प्रतिनिधींनें घातला कीं, गनीम सुलाखें करून घेतो, तुह्मांस भांडावयासी प्रयोजन नाहीं. त्याउपरी बकाजी नाईक याही बोली केली कीं, अंजनवेलीस तुह्मी जावें, तों जागा घ्या, गोवळकोट आह्मी घेतो. तें कबूल करीत ना. त्याकडील अनुसंधान चाललें. सिद्दीसादाची भेट जाहाली. त्यास, प्रतिनिधी बकाजी नाईक यांसी ह्मणत कीं, तुह्मी आह्मी गनीम घेऊं. जागा सचंतर हातीं देत नाहीं. त्यावरून पाहतां जागा आपण जेर करावा, मेहनत करून यशास पात्र ते होणार, आपणास प्राप्तांश नाहीं, हा प्रसंग जाहलियासी तेथें राहून काय कारण असे ? तशाहिमध्यें राहिल्यास, सुलाखें कार्य दिसगतीवर गेलें. आपणाकडील जमाव, हजार बाराशें माणोस जमाव जाहाला. त्यास पर्जन्याचे प्रसंगी सुवर्णदुर्गाहून सामान पुरवितां भारी दिसोन आलें. त्यावरून बकाजी नाईक यासी जमावानिशीं जंजिरा आणविलें. त्यामागें शिद्दीसादानें प्रतिनिधीकडील जमावांशी एक दोन युध्दें तुंबळच दिली. त्यांचे वस्तु कार्यसिध्दी होतां दिसत नाहीं. विना आमच्याकडील जमाव सामील असल्याखेरीज कार्य होत नाहीं. पुढें प्रसंग होईल त्याप्रमाणें वर्तणूक केली जाईल. सविस्तर वर्तमान विदित व्हावें ह्मणोन तपशिलें सेवेसी लिहिलें असे. कुलाबाहून कागद लाखोटे आले ते सेवेसी पाठविले आहेत. त्यांवरून कुलाबाकडील वृत्त विदित होईल. बहुत लिहिणें तर स्वामी सर्वज्ञ आहेत. लोभाची वृध्दि करावी. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३०५] श्री. २१ जुलै १७३२.
श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मथुराबाईनें चरणावर मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार दंडवत विनंति उपरि येथील कुशल त॥ श्रावण शुध्द दशमी गुरुवारपर्यंत स्वामीचे अशीर्वादेकरून यथास्थित असे. विशेष. बहुत दिवस आशीर्वादपत्र येऊन परामृष घेत नाहीं. तेणेंकरून चित्त सापेक्ष असे. तर सर्वदां पत्र पाठवून सांभाळ करणार आपण समर्थ आहेत. मागें आपण पत्र पाठविलें तेथें आज्ञा कीं, र॥ बकाजी नाईक याची रवानगी अंजनवेल गोवळकोटचे मसलतीस केली आहां; त्यास, हनमंताचा गौरव रघुनामें करून त्याचे हातें लंका घेतली, त्याप्रमाणें बकाजी नायकाचा गौरव करून, कैकांस देणें देऊन, दोनी स्थळें सत्वर घेतलीं तर बरें वाटत नाहीं तरी, हळूहळू खाली समाधीस येऊं. ह्मणोन आज्ञा केली. त्यास, याप्रमाणेंच आपला हेत होता कीं, दोनीं स्थळें स्वराज्यांत जाहलीं ह्मणजे स्वामीचें आगमन श्रीस्थळी होईल. ह्मणजे मोठीशी सुकीर्त होईल. यास्तव, राजश्री बकाजीनाईक याबराबर जमावाची बळकटी करून, सर्वांचें समाधान करून, रवानगी केली होती. त्यास, श्रीस्थळीं शत्रू येऊन, गल्ला घेऊन गेला. तेथें आह्मांकडील लोकांही बरीशी शर्थ करून गनीम मारून काढला. पुढील प्रसंग तरी, नश्रूड, दगेखोर, श्रीचें स्थळ टाकून पुढें गेलियासी जागियासी दगा करील, याकरितां संनिधचेच स्थळास पायबंद देऊन, स्थळ घ्यावें, ह्याअर्थें चिपळुणास बकाजी नाईक जमावानिशीं राहिले. आणि जयगडीं भांडी आणावयासीं विनोजी घाटगे शंभर माणसें देऊन रवाना केले. तों तिकडे राजश्री रघुनाथजीही बावाजी ह्मसके याजबराबर जमाव देऊन किल्ले विजयगडास मोर्चे दिल्हे. सा सात रोज किल्ला भांडला. त्यास, आशाढ शुध्द पंचमी भृगुवारीं स्थल हस्तगत केलें. पुढे तेथील जमाव व भांडी आणून, गोवळकोटावर मार देऊन, हस्तगत जाहालियावरी अंजनवेलचा मनसबा उभारावा ऐशी योजणूक केली असतां, जयगडीहून भांडें रवाना केलें तें माखजनास आलें. तों चिपळुणीं बकाजीनाईकाजवळ एकदोन युध्दें तुंबळ हबशियानें दिली. त्यानंतर चिपळूणचा जमाव फुटला आहे तों गांठावें ऐसा विचार करून, शिद्दी साद खुद्द आपण जमाव विजयगडचा सुटून आला. तो व अंजनवेल, गोवळकोट तिहीं जागांचा जमाव भारी करून आषाढ शुध्द सप्तमीस रविवारी प्रात:काळीं चालोन घेतलें. हजार दीड हजार जमाव त्याचा जाहाला. आह्मांकडील तीनशें माणोस होतें, व राजश्री बाबूराव आह्मांकडे सामील जाहाले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३०४] श्री. नोव्हेंबर १७४२.
पुरवणी श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंती. चिरंजीव बया उपवर जाहली आहे. वर योजावयाचा स्वामीस मागेंच विनंतिपत्र पाठविलें आहे त्यावरून विदित होईल. तरी बरा, चांगला, फारसा प्रबुध्द नाही, असल्या विचारांत योग्य, ऐसा वर पाहून आज्ञापत्र पाठविलें. वराची सर्व योजना स्वामीस करून कार्यसिध्दि करावी लागते. आमचा तों सर्व विचार, आपण वडील आहांत, आपणाचवर आहे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३०३] श्री. १८ डिसेंबर १७४९.
राजश्री जगंनाथ गोसावी यांसी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित तुळाजी आंगरे सरखेल राम राम उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें प्रविष्ट जाहले. लिहिला अर्थ कळों आला. तूर्त स्वारीची गडबड आहे, तरी तुह्मी लिहिल्याचे सविस्तर अर्थ मनास आणून मागाहून विचार करणें तो केला जाईल. आपले समाधान असों देणें. सरकारी कापड खरेदी करावयास पैठणास मादसेट पिलणकर रवाना केला होता. तेथून कापड आणून तुह्मांपाशी ठेविलें आहे. मादसेटीस सातारा कांहीं गुंता पडला आहे, याकरितां तुह्मांस लिहिलें आहे. तरी गोवेळदुर्गास सनद सादर आहे. पन्नास माणसे वेठे जातील त्यांजबरोबर दोघे तुह्मी माहीत घाटामाथापावेतों देऊन कापड वाजी न होतां सुरक्षित गोविंदगडास येई तें केलें पाहिजे. तुह्मी इकडील ममतेचे आहां याकरितां लिहिले आहे. तरी कापड येई तें करणें. येविसीं सविस्तर सांगता कळों येईल. बहुत काय लिहिणें. रा छ ८ माहे मोहरम. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३०२] श्री. २२ एप्रिल १७४९.
पो छ २० रजब
सु सन खमसैन
राजश्री जगंनाथपंत गोसावी यांसी :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित तुळाजी आंगरे सरखेल राम राम उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाहाला. ऐसेंच सर्वदा आपणांकडील कुशल वर्तमान लिहून संतोषवीत जाणें. मौजे माहळुंगे ता पावस येथील कोनगी आहेत तीं काढावयाविसीं पूर्णगडीं ताकीदपत्र पाहिजे. मध श्रीस्थळीं प्रविष्ट होईल ह्मणोन लिहिलें, तरी ताकीदपत्र दिलें आहे. कोनगीं काढून नेवणें. गल्ला गोपालदुर्गाचे खाडीपैकीं दहा खंडी गोठणेंयास पाठवावयाचा आहे. त्यास पत्र असावें ह्मणून लिहिलें, त्यावरून पत्र दिलें असे. धोंडजी याजबराबर पेढे दोन शेर पाठविले ते प्रविष्ट झाले पाहिजे. रा छ १५ जमादिलावल. बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे. लेखनसीमा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३०१] श्री. २४ सप्टंबर १७४८.
राजश्री जगंनाथ चिमणाजी गोसांवी यांसी.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित तुळाजी आंगरे सरखेल रामराम उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष तुह्मीं पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन लिहिला अर्थ साद्यंत अवगत जाहला. व श्रीमत् परमहंस समाधीस्त यांचे नांवचें पत्र पाठविलें. प्रविष्ट जाहलें. प्रसादिक तिवट पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. वरकड श्रीचे कामाचा तपशील लिहिला. अवगत जाहला. इमारतीचें काम सिध्दीस जाणें तें श्रीइच्छेनें जाईल. तांदळाचे दस्तकाविसी लिहिलें. त्यावरून तांदूळ जावयाचें दस्तक दिलें असे. जाणीजे र॥. छ ११ माहे सवाल. बहुत काय लिहिणें. लेखनसीमा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३००] श्री. १ जून १७४६
श्रीमत् तीर्थस्वरूप राजश्री परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्ये तुळाजी आंगरे कृतानेक विज्ञापना तागाईत ज्येष्ठ बहुल नवमी रविवासरपर्यंत वडिलांचे आशीर्वादें सुखरूप असों. विशेष. धोंड बराबरी पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन लेखनार्थश्रवणें अपूर्व भासले. कि निमित्य की, आपण नारोजी बराबरी आज्ञा केली, त्याप्रमाणे सर्व सिद्धता करून आठा रोजी उगाड पडली ह्मणजे रवानगी वडिलांचे सेवेसी करावी. याप्रमाणे नारोजीजवळ विज्ञापना लिहून व किरकोळ किमखाप, मखमल वगैरे जिन्नस देऊन त्याची रवानगी करीत असतां बेवकुबी करून निघाला. ते समयी सेवकाने कितेक सांगणें ते सांगत असतां अमर्यादा करून गेला. परंतु अपत्याने वडिलांकडे पहावें लागलें. त्या लहान माणसाने क्षुल्लक गोष्टी चटोरपणाच्या मनस्वी सांगोन, वडिलांचे चित्तांत विपर्यास आणून, आह्मास पत्रलेख वडिलांनी करून, दुरुक्ती नानाप्रकारच्या बकवादाच्या लिहून पाठवाव्या आणि शब्द ठेऊन विरुद्धतेस कारण करावें, हें बावा ! तुमचे थोरपणास व वडिलपणास उचित की काय? तथापि आह्माजवळ जे सेवेसी अंतर जरी पडिलें असतें तरी असो. लहान माणसांचें सांगणीवरून इतका क्रोधास आवेश आणून बरे वाईट उच्चार करून लौकिकास कारण करावें ? बावा ! आपण तो सर्वज्ञ, ईश्वरस्वरूपी असोन अपत्यांची अमर्यादा जाहाली किंवा मर्यादेनेच वर्तणूक करून गेले, याचा विचार तरी बरा विवेकें करून पाहावा होता. तो अर्थ एकीकडेच ठेऊन अविवेकच चित्तांत आणून विशदेकरून लिहीता व सांगोन पाठविता, तरी आमचा यत्न काय आहे ? आह्मास आपण वडील हे समजून एकनिष्ठपणे सेवेसी तत्पर राहोन वडिलांचे चरणाचें स्मरण त्रिकाल करून असो, ऐसी आमची कायावाङ्मनसा अंतरशुध्द निष्ठा एकचित्तेकरून असली तरी आपण वडिलपणें दुरुक्ती लिहितात, त्या कल्याणयुक्त होतील, हा दृढनिश्चय करून पत्रे येतात ती मस्तकी ठेऊन आहो. हा आपले चित्ताचा करार असल्यास दुरुक्तीची चिंता काय आहे ? कर्जाचा अर्थ लिहीला. तरी कर्ज, बावा ! तुमचे घ्यावे हे आह्मास काय कळे कीं आज पावेतो विपर्यास व विभक्त ऐसे आह्मी समजलो नव्हतो. सर्व दौलत मनसबा आहे हा बावाचेच आशिर्वादाचा आहे तेथे दुसरा विचार काय आहे ? कर्जाचा नियत लिहावा ऐसे काय आहे ? हे दौलत आहे, ही आपली जे असेल ते आपले होते येऊन घेऊन जावे ऐसा आमचा हेत व याप्रमाणे वर्तणूक करीत असतां विशादार्य मानीजेता. अतेव ऋणानुबंधास येईना, त्यास आमचा यत्न नाही ! बरे! याउपरि वडिलांनी विवेक करून अपत्यास शब्द ठेवावा ऐसे नाही. आणि बुध्दीवाद उपदेश करावा. आह्मास तो वडिलांचे पायांवांचून दुसरा अवलंब नाही. आपण वडील आहांत. जैसी आह्मांस आज्ञा करून वर्तवितील तैसी वर्तणूक करून सेवेसी तत्पर असो. वडिलांचे सेवेसी बहुत लिहावे, तरी आपण सर्वज्ञ आहात. कृपा लोभ असो दिल्हा पाहिजे. हे विज्ञापना. *हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२९९] श्री. ११ जानेवारी १७४५
श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति. सेवक तुळाजी आंगरे सरखेल कृतानेक दंडवत विनंति पौष वदि पंचमी भृगुवार पर्यंत स्वामींचे आशीर्वादें वर्तमान कुशल असे. विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन अक्षरश: स्वामींची वचनें श्रवण होऊन संतोष जाहला. वडिली निष्ठापूर्वक भक्तीनें स्वामीचा प्रसाद संपादून घेतला; आणि कितेक महत्कार्ये करून दिग्विजयी यशकीर्ति संपादिली; तदनुरूप निष्ठा धरिल्यास सर्व कार्ये मनोरथ संपूर्ण होतील; सध्या अंजनवेलीचा कार्यभाग सिद्धीस अविलंबेच जाईल. ह्मणून कितेक विस्तारें स्वामींनी आशीर्वादपत्रीं लेख केला. त्यावरून बहुत संतोष जाहला. ऐशास, वडिलीं निष्ठापूर्वक महानुभावाचे चरणी भक्तियोग संपादिला, त्याप्रमाणेंच महतांची सेवा करून, आशीर्वाद व कृपाप्रसाद मस्तकीं घेऊन, वडिलांनीं जोडिली यशकीर्तीची अभिवृद्धि करावी, हेंच मानस आहे. तदनुसार थोडी बहुत वर्तणूक होणें ते होत आहे. प्रस्तुत श्रीमत् महाराज स्वामींचे आज्ञेप्रमाणें अंजनवेलीचे मसलतेचा अंगेज करून शामळाचें स्थळ चौगीर्द वेढून जेर केलें आहे. सफलता होणें तें स्वामीचे कृपेंकरून लौकरच होईल. स्वामींनी कळसपाक, तिखट व शेला, तीळशर्करा प्रसाद पाठविला तो मस्तकीं ठेऊन आनंद जाहला. सदैव आशीर्वादपत्र पाठवून अपत्यांचा परामर्ष करीत असलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा असों दिली पाहिजे. हे विनंति.