[२७५] श्री. २६ जानेवारी १७३६.
श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल दोनी कर जोडून दंडवत विनंति उपरि येथील कुशल तागाईत माघ शुध्द त्रयोदशी पावेतों स्वामींच्या आशीर्वादेंकरून सुखरूप असो. यानंतर स्वामींनी आज्ञापत्र पाठविलें. पावोन लेखनार्थ श्रवणें बहुत कांहीं संतोष जाहला. पत्रीं लिहिलें कीं राजश्री स्वामीदर्शनास येऊन वाडियास नेलें. रवाना केलें. मातुश्रीची भेटी घेऊन नम्रतेनें वर्तणूक करून पुन्हा स्वस्थानीं आलों. त्यास, आह्मीं दर्शनास यावें ह्मणून कितेक आज्ञापत्रीं आज्ञा केली. घाट चढोन यावें. तेथें आपण येऊन सरकारकून घेऊन येऊन सरंभे पुढें सामोरे येऊन राजदर्शन करून तीन दिवसांत रवाना करून देऊन. हा एक अर्थ. दुसरा विचार अंजनवेली गोंवळकोटास मुर्चेबंदी करावी, ह्मणजे पन्नास हजार रुपये, चारशें खंडी तांदूळ, बेगमी करून देऊन. या पत्राचें उत्तर सत्वर पाठवणें ह्मणून आज्ञा केली. आज्ञा ते प्रमाण. ऐशास रामदर्शन न घ्यावें, असें कांहीं आमचे मानस नाहीं. याचा विचार, आधीं राजश्री विसाजीराम यांस आह्मांकडेस पाठवून द्यावें. ते तेथें आले ह्मणजे आपणाकडेस पाठवून देऊन. पुन्हां आपण येथें यावें. आह्मांस घेऊन जाऊन राजदर्शन करून घ्यावें, हा एक विचार आहे. हें आपल्या विचारास न आलें तरी अंजनवेली, गोंवळकोटचे मोर्चेबंदीचा विचार आपण लिहिला तरी आह्मीं मान्य आहों. नख्ताची बेगमी व गल्ल्याची बेगमी आपण लिहिली त्याप्रमाणें तूर्त निमे करून घ्यावी, ह्मणजे गोंवलकोटीं मोर्चे बसवितों. लष्करची फौजही तुह्मांकडेस पांच सात हजार रवाना करून घ्यावी. फौज खाली उतरली व बेगमी सदरहूपैकीं निमें तूर्त जाहाली, ह्मणजे मोर्चेबंदी करितों. उपरांत निंमे बेगमी करावी, ऐसा विचार आहे. आह्मांस या साली पैदास्त कांहीं जाहली नाहीं व मुलूखही बैरान जाहाला. आपणांस समजावें ह्मणोन लिहिलें आहे. शिलारसाविसीं लिहिलें त्यावरून संग्रहीं नव्हता; परंतु थोडाबहुत पाठविला आहे. रा। छ १० सवाल. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो द्यावा हे विज्ञापना.