Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३२९] श्री. १७ जानेवारी १७३०.
तीर्थस्वरूप श्रीपरमहंस बावास्वामीचे सेवेसी :-
अपत्यें जयसिंग आंगरे सरखेल साष्टांग दंडवत् प्रणाम विनंति उपरी येथील क्षेम तागाईत माघ शुध्द दशमी मंदवासर पावेतों स्वामीचे आशीर्वादें सुखरूप असो. विशेष. स्वामीनें कल्याणप्रांतीहून रुपये पाठविले ते येथे जमा जाहाले :-
१२५ | पेशजी पेणेहून पाठविले. |
१०० | नवाड पैकी. |
२००० | नारो अनंत. |
२२२५ |
एकूण दोनहजार दोनशें पंचवीस रुपये जमा जाहाले असत. स्वामीचे सेवेसी याजकरितां लिहिले असे. सेवेसी श्रृत होय हे विज्ञाप्ति. + हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३२८] श्रीभार्गवराम. १ जुलै १७२९.
राजश्री चिमणाजी पंत दि॥ श्री स्वामी यांसी :-
प्रति संतुबाई मु॥ जंजिरें सुवर्णदुर्ग दंडवत उपरी येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन करीत जाणें. विशेष. श्रीमत् परमहंसबावा स्वामी जंजिरे मजकुरी आले होते, ते समयीं धावडशीस तुह्मांकडे जिन्नस रवाना करावयाची आज्ञा केली होती. त्याजप्रमाणे येथून, बराबर नारोबल्लाळ, सामान येणेप्रमाणें :-
सदरहूप्रमाणें सामान पा। असे. ते जामा पोंहचलि यानंतर पावलियाचें उत्तर याजबराबर लेहून पाठवणें. श्री बावास्वामी राजपुरीहून कुलाबां जावयास निघाले ते राजपुरीहून इतकें रोजांत कुलाबांत गेले असतील. वरकड अधिकोत्तर लिहिजेसें नाहीं. रा॥ छ २८ माहे सफर.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३२७] श्रीभार्गवराम. १ जुलै १७२९.
श्रीमत् भृगुनंदनस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति. चरणरज सौभाग्यादिसंपन्न संतुबाई कृतानेक विज्ञापना. विनंति येथील कुशल आषाढ वदि द्वितीया भौमवासर पावेतों स्वामीचे कृपादृष्टि करून यथास्थित असे. विशेष. स्वामीनें आशीर्वादपत्रें रसाळगडचे मुक्कामीहून व श्रीस्थळी पावलियावरी तेथून आज्ञापत्रें पाठविली तीं उत्तम समयीं प्रविष्ट होऊन दर्शनातुल्य संतोष जाहला. स्वामीनें आज्ञा केली त्याचें उत्तर व येथील वृत्त:
राजश्री खाशास शरीरीं सावकाश वाटत नव्हतें. वेथा बहुतच कठीण होती. परंतु श्रीकृपेने व स्वामीचे आशीर्वादेंकरून प्रस्तुत आरोग्य वाटों लागलें आहे. कुलाबाहून ब्राह्मण छ १० जिल्हेंजी गुरुवारी आला. बराबरी पत्रें आली. वेथेस उतार पडोन आरोग्यता होऊं लागली असें स्वामीस कळावें ह्मणून लि॥आहे. श्रुत होय. स्वामी धावडशीहून समाधीस श्रीस्थळास येणें जाहेलें हें वृत्त तर कुलाबास लिहून पाठविलें. आंबे यंदा उत्तम आह्मांकडे आले नाहीत. तुह्मांस केनिल आंबे उत्तम अगर गोवेयांचे आले असिले तर कांही आंबे अगर नासके आंबेयांच्या कोया रुजवणीस पाठवणें ह्मणून आज्ञा. ऐशास, येथें उत्तम आंबे यंदा आले नाहींत. असते तरी स्वामीस रवाना करावयासी अंतर न पडतें. श्रुत होय. श्रुत शेवेशी होय हे विज्ञापना. |
सुंब वजन ![]() करणें ह्मणून आज्ञा जाहाली. त्याजवरून दोन मण सुंब रवाना केला असे. सेखडे दागिने ४८. हेमगर्भ तोळे दोन पाठवणें ह्मणून कुलाबाहून आज्ञा जाहाली होती. तो हेमगर्भ पाठवून देणें ह्मणून आज्ञा जाहाली. त्यासी वे॥ गोपाल जोशी यांजवळून हेमगर्भ दोन तोळे घेऊन स्वामी कडेस रवाना करणें ह्मणून आज्ञा जाहाली. ऐशास, ते कुलाबास गेले ते तेथेंच आहेत. हेमगर्भ स्वामी कडेस रवाना जाहला नाहीं; ह्मणून कुलाबास लिहून पाठविलें होतें. हेमगर्भ येथें संग्रही नाहीं; असता तरी पाठवितों. श्रीची वस्त्रें आहेत त्यांसी जतन करणें ह्मणून आज्ञा जाहली. ऐशास, वस्त्रांची निगा करवीत असो. श्रुत होय. |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३२६] श्रीभार्गवराम. ६ एप्रिल १७२९.
श्रीमत्भृगुनंदनस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज सौभाग्यादिसंपन्न संतुबाई कृतानेक विज्ञापना विनंति उपरि येथील कुशल चैत्र वदि एकादशी रविवार पावेतों स्वामीचे कृपादृष्टिकरून यथास्थित असें. विशेष. कुलाबाहून गलबतें आलीं. त्यांजवरी स्वामीकडेस रवाना करवावयासी कागद लखोटा व जिन्नस आला.
येणेंप्रमाणे सुभानजी सोनकर याजबराबरी श्रीस्थळी र॥ केलें असें. हेमगर्भ दोनतोळे वे॥ गोपाळ जोशी अभ्यंकर यांजपासून घेऊन स्वामीकडेस रवाना करणें, ह्मणून आज्ञा जाहाली. ऐशास, गलबतें आलीं ती अगोदर गोपाळ जोशी पायमार्गे कुलाबास गेले. येथे असते ह्मणजे हेमगर्भ त्याजपासून ऊन रवाना करितों. गलबतें कुलाबास जातील त्याजवरी हेमगर्भ स्वामीकडेस रवाना जाहाला नाहीं, ह्मणून लिहून पाठवितों. तेथून आला ह्मणजे रवाना करूं. विशेष, पूर्वी स्वामीची आज्ञा कीं, धावडशीस धर्मशाळेस कांही वांसे इस्ताद पाहिजेत. कोइनेवर रवाना करणें ह्मणून आज्ञा जाहाली होती त्यावरून हुजूर कुलाबास लिहून पाठविलें तेथून उत्तर आलें नाहीं याकरितां स्वामीचे सेवेसी अंतर पडिलें. आह्मी आज्ञाधारक, आज्ञेप्र॥ वर्तणूक करावी, हे स्वामीस विदितच आहे. सेवेसी श्रुत होय. सदैव परामर्श करावयासी स्वामी समर्थ आहे. कृपा पूर्ण केली पाहिजे. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३२५] श्री. २४ मार्च १७२९.
श्रीमत्भृगुनंदनस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज बाकाजी नाईक महाडिक कृतानेक विज्ञापना विनंती येथील संतोष स्वामीचे कृपेनें चैत्र शुध्द षष्ठी इंदुवारपावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामीनें आशीर्वादपत्रें पाठविली ती प्रविष्ट होऊन लिहिलें वृत्त सविस्तर कळोन संतोष जाहला. वरकड येथून रवाना करावयाची आज्ञा जाहली आहे त्याप्रमाणें रवानगी केली आहे व मागाहून करूं त्याचें सविस्तर वृत्त श्रीमंत सौभाग्यादिप्रसन्न मातुश्री बाईसाहेबांचे पत्रीं लिहिलें आहे. त्यावरून सेवेसी निवेदन होईल. सेवक आज्ञाधारक आहे. आज्ञेप्रमाणें वर्तणुकींत अंतर होणार नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३२४] श्री. १ फेब्रुवारी १७२८.
अभयपत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री श्रीनिवास परशराम प्रतिनिधी त॥ मुकादमानीहाय, मौजे इरमोड ता कऱ्हाड, मौजे अनेवाडी ता कुडाळ, मौजे, धावडशी ता परळी, सु समान अशरीन मया व अलफ. दिल्हें अभयपत्र ऐसेजे :-
सालमजकुरीं सदर्हू गावांस उपसर्ग बहुत लागला. स्वारीपट्टी, टुमणी, घासदाणा याखेरीज अवांतर उपसर्ग लागला. यामुळें रयत तजावजा जाली आहे. तरी पुढें उपसर्ग न लागे तरी धीरभरवसा देऊन लावणी करूं ह्मणोन तुह्मी अर्ज केला. त्यावरून अभयपत्र सादर केलें असें. तरी तुह्मी कोणेविशी शंका न धरितां गावावरी राहून लावणी करणें. भय जाजती याउपरि होणार नाहीं. येविशीं अभय असे. छ १रजब. निदेश समक्ष. लेखनावधि.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३२३] श्रीभार्गवराम.
श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी.
अपत्यें मानाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेवून कृतानेक विज्ञापना तागाईत छ २५ माहे सफर पावेतों स्वामीचे कृपावलोकनें व आशीर्वादें करून अपत्यांचें वर्तमान संतोषरूप असे. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन आनंदातिशय जाहाला. कुसापा वाणी याचे रुपये तेरा लालमण परदेशी याजकडे कर्ज आहेत. त्यास लालमण रुपये देत नाहीं. याजकरितां कुसापा पाठविला आहे. तरी लालमण याजपासून खडाखडी रुपये घेऊन पाठविले पाहिजेत. ह्मणोन निकडीनें आज्ञा केली. त्याजवरून लालमण यास वरातदार लावून सदरहू रुपये वसूल घेऊन, कुसापास रवाना केला असे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३२२] श्री.
पुरवणी तीर्थस्वरूप बावा स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना ऐसीजे :- सुननीविशीं व पालकीचे दांडीविशीं व घाट बांधावयास संबळा दोन व दारू उपवार्षिकाप्रमाणें व सेंधेलोण दहा शेर असें जरूर अनुकूल पडेल त्याप्रमाणें पाठवावें, ह्मणून आज्ञा. आज्ञेप्रमाणें सुननी व सेधेंलोण पाठविलें आहे. बावा ! आपले आशीर्वादें उत्तम वस्त हस्तगत होऊन आल्यावर स्वामीचे ठायीं अर्पण करावयास अनमान कधीं होणार नाहीं. प्रस्तुत सुननी सिध्द होती ते पाठविली आहे. घाट बांधावयायोग्य संबळांचा प्रेत्न करविला आहे. मागाहून प्रविष्ट होतील. दारू तों प्रजन्यकालांत जाऊं निभावणार नाहीं. तूप तयार करविलें आहे. तेंही हंगामशीर सिध्द होईल. आपणांकडून माणसेंही येतील त्या समागमें तूप व संबळा रवाना करून. रुपये पांच बेगारी याचे पोस्तास पाठविले ते पावले. वरकड कितेक बुध्दीनीत विचाराची आज्ञा केली. तर, बावा !आपला आशीर्वाद आमच्या मस्तकी आहे. त्याचप्रभावें बंदोबस्त व सेवकलोकांपासून ज्याची त्याप्रमाणेंच सेवा घेऊन आज्ञेंत वर्तवीत असों. येविषयीं विस्तारें विज्ञप्ती करावी, तर त्यांसही परस्परें श्रवण होत असेल, व सविस्तर रखमाजी मुखवचनें सांगतां सेघेसीं निवेदन होईल. आह्मांस स्वामीचें पायांखेरीज दुसरी जोड व दैवत नाहीं. अंतरसाक्ष स्वामी आहेत. पालखीची दांडी उत्तमसी प्रस्तुत संग्रही नाहीं. हल्ली सुननी एक व सेंधेलोण दहा शेर पाठविलें आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३२१] श्री.
राजश्री जंगन्नाथपंत गोसावी यांसी :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित मानाजी आंगरे वजारत माब रामराम उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन वर्तमान कळलें. समाधीच्या साहित्यांविषयीं लिहिलें. ऐशास, यांजपेक्षां अधिकोत्तर जोड कोणती आहे ? तुह्मी लिहून पाठविले यानंतर अनुकूल करावें, नाहीं तरीं न करावें, ऐसें नाहीं. समाधीस्थित बावाचें चिंतन निरंतर आहे. तद्नुरूप निष्टेनुरूप भजनापेक्षां श्रेयस्कर मानीतच नाहीं. प्रस्तुतकाळी कितेक प्रसंग अनुकूल प्रतिकूळतेचा आहे, तो राहू पावणार नाहींच. त्याप्रमाणें समयीं पाठवावयाचेंही अंतर होणार नाहींच. प्रस्तुत अनुकूल पडिल्याप्रमाणें जिन्नस रवाना केला आहे. याददास्त अलाहिदा असे त्याप्रमाणें पावलियाचें उत्तर पाठवावें. दस्तकाचे ऐवजी पैकेयाचा पर्याय लिहिला. ऐशास, सलाबाजप्रमाणें दस्तकें पावत असतात त्याप्रमाणेंच पाठविलीं असेल. तरवारेचे अनुकूल तुह्मां योग्य जाहली, पाठविली जाईल. येणें दारांसमागमें क्षेम कुशल लिहीत जावें. रा. छ. १९ माहे रबिलावल. बहुत काय लिहिणें.
मोर्तबसूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३२०] श्री. २० मार्च १७५५.
यादास्त रवाना जिन्नस श्रीचे पुण्यतिथीस मुक्काम धावडसी सुरसन् खमस खमसेनमया व अलफ वजन खरें.
एकूण वजन खरें अठरा मण पाठविला असे. रा. छ. ६ जमादिलाकर. पौ. छ. ८. शाबान सन खमस.