[२७४] श्री. ८ डिसेंबर १७३६.
श्रीमत् सकल तीर्थास्पदीभूत परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विनंति उपरि येथील कुशल पौष शुध्द पंचमी इंदुवासर पावेतों स्वामीचे कृपेनें जाणून स्वकीय लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. विशेष. धावडशीस पावल्यावरी आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन सविस्तर कळों आलें. स्वामींजवळून प्रसाद मागोन घेतला, त्याचा विचार लिहून पाठविला. तरी त्याच प्रसादानें स्वामीस कोठें सोडून, पुढें जें स्वामीजवळ अपूर्व असेल तें आमचे आह्मांस पाहिजे तेव्हां मागोन घेऊन. स्वामीचे जागां दुसरा अर्थ किमपी जाणत नाहीं. साकर थोडकी दिली ह्मणोन आज्ञा, तरी पुढें साकर आपणांस पाठवावयास अंतर होईल कीं काय ? आपण तिळमात्र स्वामीजवळ पडदा धरणार नाहीं. डाळिंबे पाठविलीं तीं पावलीं. बहुत काय लिहिणें कृपा वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.