Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२५८] श्री. १९ मे १७२९.
श्रीमत् तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी.
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल कृतानेक साष्टांग दंडवत. प्रा। विनंति येथील कुशल ज्येष्ठ शुध्द तृतीया इंदुवासरपर्यंत यथास्थित असे. विशेष. स्वामीनीं हडपियाविशी आज्ञा केली त्याजवरून हडपा पेटी पा। असे. घेऊन पावलियाचें उत्तर पाठविलें पाहिजे. कृपा असो दीजे. हे विनंति.
[२५९] श्री.
पुरवणी श्रीमत् सकल तीर्थस्वरूप परमहंसबावा वडिलाचे सेवेसी.
विनंति उपरी मौजें गोठणें त॥ राजापूर हा गांव श्रीस इनाम आहे. ते जागा खारट दर्या गेला आहे. ते बांधोन पिकास आणावें, या अर्थें कृष्णंभट देसाई तपे मजकूर यास बंदिस्तीविशीं आज्ञा करून वीस सालें बंदिस्तीच्या सालापासून माफ व पुढें धारेयाचा शिरस्ता करार करून दिल्हा आहे. त्याप्रमाणें आपणही कौल दिल्हा पाहिजे, ह्मणोन स्वामीनीं आज्ञा केली. ऐशास मौजें मजकूर स्वामीकडे दिल्हा असतां खारीच्याच बंदिस्तीचा कौल कशास पाहिजे ? जो स्वामींनीं कौल दिल्हा असेल त्या प्रों। खारीची बंदिस्त होऊन माहूर होईल. वरकड राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान यांच्या व नबाब निजामुन्मुलूक यांच्या भेटी जाहाल्याचा अर्थ आज्ञापिला व र॥ अंबाजीपंत यास पंडित म॥ निले पत्र आलें होतें तें पाहावयास पाठविलें. त्याजवरून साद्यंत कळलें. व लष्करांतून मुजरद जोडेकरी पत्रें घेऊन येथें आले होते. विदित झालें पाहिजे. कुडतीं सिध्द जाहली ते पाठविलीं आहे. प्रविष्ट जाहल्याचें उत्तर पाठवावयास स्वामी वडील आहेत. बहुत काय लिहूं ? कृपा असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२५६] श्री.
पुरवणी श्रीमत् सकल तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी.
विनंति राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांणी स्वामीकडे सकलाद र॥ करावयास दिल्ही ते हल्लीं पाठविली असे. प्रविष्ट जाहल्यानंतर पावल्याचें उत्तर राजश्री रायाचे नावें पाठविलें पाहिजे. बहुत काय लिहूं ? कृपा असो दीजे हे विनंति.
[२५७] श्री.
पुरवणी श्रीमत् सकलतीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी.
विनंति उपरी गोठणें येथील खाजणास आमचा कौल कशास पाहिजे ह्मणोन अलाहिदा पत्रीं लिहिलें आहे. याचा अर्थ स्वामीच्या चित्तांत एक प्रकार येईल. तरी वरकड जागा खाड्याच मोडून शेतें बांधतात, त्यास तीन सालें माफ पुढें इस्तावा याप्रमाणें शिरस्ता असतां स्वामीनीं वीस सालें माफ पुढें इस्तावा दर बिघा पांच मण व दाहिजा माफ याप्रमाणे कौल द्यावा ह्मणोन आज्ञापिलें; परंतु वस्तुता स्वामीनीं हा अर्थ पुर्ता चित्तांत आणिला नसेल. हा संशय निर्माण जाहाला, यास्तव स्वामीस लिहिलें असें. तरी याचें उत्तर पाठवावें ह्मणजे कौलही देऊन सध्यां शिरस्त्याशिवाय बेशिरस्ता चित्तांत आल्यावरून कौल दिल्हा नसे. बहुत काय लिहिणें? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२५५] श्री. १६ एप्रिल १७३५.
श्रीमत् सकलतीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी.
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल दंडवत विनंति येथील कुशल तागाईत वैशाख शुध्द पंचमी सौम्यवासरपर्यंत स्वामीचे आशीर्वादें सुखरूप जाणोन स्वकीय लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. विशेष स्वामीनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोषावाप्ती जाहाली. ऐसेंच आशीर्वादपत्रीं संतोषवीत गेलें पाहिजे. यानंतर स्वामीची आज्ञा घेऊन स्वार जाहालों ते मजल दरमजल शुध्द द्वितीयेस पुण्यास आलों. शितोळयाकडील सोइरीक नेमस्त केली आहे. तें लग्न उरकोन कुलाबां जावें. त्यास चिरंजीव राजश्री संभाजी आंगरे यांची नवरी वऱ्हाडेदेखील काळोसास आली. तें लग्न आधीं करावें लागतें. एदंनिमित्यें या लग्नाचा विचार राहाऊन कुलाबा जावयाचा विचार केला. परंतु राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांचे विचारें हें लग्न करून तें लग्न करावयास जावें. त्यावरून चिरंजीव राजश्री संभाजी आंगरे यासमागमें राजश्री रघुनाथ हरी यांस देऊन पुढें रवाना केलें. येथील लग्नाचा निश्चय नवमीस करून आज पंचमीस हळदीस मुहूर्त केला. स्वामीचे आशीर्वादें लग्नसिध्दी करून इंदुवारीं कुलाबा स्वार होऊन जाऊन सविस्तर स्वामीचे सेवेसी निवेदन व्हावें ह्मणोन लिहिलें असे. कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२५४] श्री. २९ जानेवारी १७३३.
श्रीमत्सकल तीर्थस्वरूप परमहंस बावा स्वामी वडिलांचे सेवेसी.
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरी येथील कुशल ता। माघ बहुल दशमी इंदुवासरपर्यंत स्वामीचे कृपेनें असे. विशेष. स्वामीनीं आशीर्वादपत्र पाठविलें ते प्रविष्ट होऊन सविस्तर कळों आलें. मौजे असोलें देवी तपें राजापूर येथील खोती व कुलकर्ण पुरात न कृष्णंभट देसाई तपें मजकूर यांचे असतां खोतीचा कजिया बिचारे आपापल्यांत करितात. परंतु पुरातन कृष्णंभटाचा गांव आहे व त्याप्रमाणें आपली पत्रेंही आहेत. त्याप्रमाणें करार करून याजकडे चालवावा, ह्मणोन आज्ञा केली. ऐशास मो। मजकूरचे खोत बिचारे प्रस्तुत खोती चालवीत आहेत. परंतु त्यांची त्यांजमध्यें वाटेयाचे मनसुफी लागली आहे ते अद्याप निवडली नाहीं, तों कृष्णंभटाची खोती ह्मणून स्वामीनीं लि॥ तरी कृष्णंभटाजवळ सनदापत्रें काय असतील ती घेऊन येथें आला ह्मणजे पंचाइतीवर मनसुफी टाकून ज्याची खोती खरी होईल त्यास पत्र करून देऊन कळलें पाहिजे. कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२५३] श्री. ११ जानेवारी १७३३.
श्रीमत्सकलतीर्थास्पदीभूत श्री परमहंसबावा स्वामी वडिलाचे सेवेसी :-
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरी येथील कुशल तागायत माघ शु॥ सप्तमी गुरुवासरपर्यंत स्वामीचें कृपेंकरून असे. विशेष. स्वामीनीं आशीर्वादपत्रें पाठविली ती प्रविष्ट होऊनी संतोषातिशय जाहाला. याच न्यायें निरंतर पत्रीं सांभाळ केला पाहिजे. यानंतर संक्रमणप्रमुख तिलशर्करा स्वामीचे सेवेसी पाठविले आहेत. प्रविष्ट जाहाल्याचें उत्तर पाठवावयास स्वामी वडील आहेत. वरकड स्वामीनीं आज्ञा केली, त्याचें उत्तर अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिलें आहे. त्याजवरून विदित होईल. बहुत काय लेहूं ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२५२] श्री. १९ डिसेंबर १७३२.
श्रीमत् तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल कृतानेक साष्टांग दंडवत = प्र॥ विनंति उपरि येथील कुशल श्री कृपाकटाक्षवीक्षणें वर्धिष्णु पौष शुध्द द्वितीया रविवासरपर्यंत यथास्थित असे विशेष. स्वामीनीं कृपा करून सदयत्वें पत्रिका प्रेषिली ते उत्तमसमयीं प्रविष्ट होऊन संतोषवाप्ती जाहाली. याच न्यायें सर्वदा आशीर्वादपत्र प्रेषण करून अपत्यांचा सांभाळ केला पाहिजे. यानंतर स्वामी आज्ञापत्रीं आज्ञा केली कीं राज्याच्या कार्याकरितां तूर्त येता येत नाहीं, व धावडशीचें तळें एक सिद्ध जाहालें, दुसरियास काम चालीस लाविलें आहे व तळयाचे कामास दोघे पाथरवट पाठवणें व दुलई पाठविली ते बाजीरायांनी मागितली त्यास दिली, दुसरी दुलई व सकलाद लाखी व रजई पिवळे दमासाची व नारायण तेल व आक्रोड, बदाम याजप्रमाणे पाठवून देणें ह्मणोन. ऐशास स्वामीचे भेटीस बहुत दिवस जाहाले. स्वामीचे पाय पाहावे, होईल ते सेवा करावी, तीर्थरूपांमागे सूक्तासूक्त वर्तणूक आजीपर्यंत करून आसमंताद्भागीक यांस नियमावरी ठेविले आहेत हेंही निवेदन करावें व पुढें कोणे स्थितीनें वर्तावें हे बुध्दि पुसावी, स्वामी आज्ञा करितील तेणेंप्रमाणें वर्तणूक करावी, या हेतूस्तव स्वामीच्या आगमनाचा योग घडावा ह्मणोन लिहिलें. त्याची आज्ञा या प्रकारीची जाली ! बरें ! आमचा उदित काल प्राप्त होईल तेव्हां स्वामीचे चित्तीं येईल. आह्मास दर्शनाचा लाभ घडेल. धावडशीचें तळें एक सिध्द जाहालें. तैसेंच दुसरेंही सिध्द होतच आहे ! सकलाद उंच मिळाली नाहीं. जें सिध्द होतें, ते सेवेसी पाठविली आहे. उपरी सुरतेहून आणविली आहे. आल्यावरी पाठवितों. रजई व दुलईची आज्ञा त्यावरून हरदू सनगें पाठविली असेत.
रजई पिवळी दमासाची अस्तर लाल ताफ्तेयांचे आंत कापूर घालून फीत हिरवें याप्रों। सिध्द करून पा। असे. |
दुलई किनखापी लाल अस्तर पिवळा ताका चिनाई फरेवान हिरवी याप्रों। सिध्द करून पा। असे. |
एकूण दोन दागिने पाठविले असेत. स्वामीनीं स्वीकार करून अंगीकार केल्याचें उत्तर पाठविलें पाहिजे. अक्रोड, बदाम संग्रही नाहीं. बदाम होते त्यापैकीं अदमण कार्यास येईल, न ये ह्मणोन थोडे पाठविले ते पावलेच असेल. कार्याचे असिले तरी आज्ञा करावी, आणिखी पाठऊन देतो. वरकड सुवर्णदुर्गाकडून पाठविला तो प्रविष्ट जालाच असेल. मजला स्वामीच्या पायाविना दुसरे दैवत आहे ऐसें नाहीं. स्वामी सर्वज्ञ आहेत. म्यां काय लिहावें ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२५१] श्री. १० मार्च १७३२.
श्रीमत् तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल. कृतानेक साष्टांग दंडवत प्र॥ विनंति उपरी येथील कुशल फाल्गुन वद्य दशमी भृगुवासर मुक्काम तळेगांव स्वामीचे आशीर्वादेकडून यथास्थित असे. विशेष. राजश्री छत्रपति स्वामींनी दर्शनास यावयाची आज्ञा केली, त्याजवरून फाल्गुन वद्य द्वितीयेस स्वार होऊन तळेगांवी आलों. पुढें मजल दरमजल पुणेयाचे मार्गे सातारियास जातां स्वामीचे दर्शनास येतों. कळलें पाहिजे. बहुत काय लिहूं ? कृपा वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२५०] श्री. ९ आक्टोबर १७३१.
श्रीमत् सकल तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामी वडिलाचे सेवेसी :-
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल कृतानेक साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरी येथील कुशल आश्विन बहुल पंचमी भृगुवासरपर्यंत स्वामीचे कृपाकटाक्षवीक्षणें वर्धिष्णु जाणून आशीर्वादपत्र पाठवून अपत्यांचा सांभाळ करावया अविस्मर असिले पाहिजे. विशेष आशीर्वादपत्र पाठविले तें प्रविष्ट होऊन सविस्तर अवगत जाहालें व आपले कृपेचा अर्थ राजश्री रघुनाथजी यांणी निवेदिला. तेसमयीं आनंदातिशय जाहला तो श्री जाणें. पत्री काय लेहूं ? सर्वप्रकारें स्वामी वडील आहेत. वरकड निराळा पुरवणींत लिहिलें आहे, त्यावरून अवगत होईल. बहुत काय लिहिणें ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२४९] श्री. २५ मे १७३१.
श्रीमत् सच्चिदानंदकंद भृगुनंदनस्वरूप पारावारपारीण यमनियमाद्ययोगसाधन श्रीसकलतीर्थास्पदीभूत बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल स॥ दंडवत विनंति अत्रत्य कुशल ज्येष्ठ शुध्द प्रतिपदा भोमवासरपर्यंत स्वामीचे कृपेंकरून असे. विशेष. स्वामीनीं आशीर्वादपत्र पाठविलें ते प्रविष्ट होऊन लेखनाभिप्राय अवगत जाहाला. मारत्याची सर्व पृथ्वी आहे ह्मणोन, व त्रिंबकराऊ दाभाडे निधन पावले, राजश्री सामादिक सहवर्तमान त्याचे समाधानास गेले, व रत्नागिरीचा अर्थ लि॥ तो कळला. ऐशास स्वामीनीं जो प्रकार लिहिला तो उचितच ! त्रिंबकराऊ निधन पावले हे गोष्टी भावी अर्थानुरूप जाहाली ! राजश्री तळेगांवांस येऊन मातुश्री उमाबाई यांस सातारियास बराबर नेली. राजश्री बाजीराऊ यांचा पिच्छा मोगलानें केला. हे लांबलांब मजला करून निघोन पुणेयास आले. राजदर्शनासही जातील. वरकड रत्नागिरीचा प्रसंग तरी श्रीपतराऊ यांचे हातीं जागा येत नाहीं. रत्नागीरकर येथें आले होते. त्याजपाशी ही बोली करणें ते केली आहे. स्वामीच्या आशीर्वादेंकरून ज्यासमयीं जो प्रसंग घडावयाचा तो घडेल. बहुत काय लिहिणें ? कृपा असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२४८] श्री. २२ डिसेंबर १७३०.
श्रीमत् तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्ये सेखोजी आंगरे सरखेल कृतानेक शिरसाष्टांग दंडवत प्र॥ विनंति उपरि येथील कुशल मार्गशीर्ष बहुल नवमी मंदवासरपर्यंत वडिलांचे आशीर्वादें यथास्थित असे. विशेष. स्वामीनीं आशीर्वादपत्र पाठविले तें उत्तम समयीं प्रविष्ट होऊन संतोषवाप्ती जाहाली. याच न्यायें सदैव आशीर्वादपत्र प्रेषण करून अपत्यांचा सांभाळ करीत असिलें पाहिजे. यानंतर, देवास वस्त्रें पाठविलीं तीं चेऊलीं कां पाठविली ? पाऊसांत कैशी टिकतील ? व पैदास्तीपैकीं जिन्नस आणखी पाठवणें, व अंगास लावावयास नारायण तेल पांच शेर व सातारियाकडील वर्तमान लेहून आज्ञा केली. ऐशास स्वामीकडेस वस्त्रें देवास पाठविलीं तेसमयीं संग्रही नव्हतीं. जीं समयीं अनुकूल जालीं ती पाठविली. हालीं पैदास्त तराडियावरीं जाहालीं त्यापैकीं श्रीस पाटाव पुरुषाचे ६ व फडक्या ६ एकूण दागिने बारा पाठविले असेत. व खारका ०।० व खजूर ०।० व गूळ व ऊद
व अगर
पांच शेर याजप्रमाणें जिन्नस पाठविला असे. चंदन शिलकेस नाहीं. आणविला असे. आलियावरी पाठवून देतों. नारायणतेल वजन शेर
एक शिसा स्वामीकारणें पाठविलें असे. सदरहूप्रमाणें प्रविष्ट जाल्याचें वृत्त पत्रीं लेहून पाठविलें पाहिजे. वरकड स्वामीचें आशीर्वादें याजपेक्षां पैदास्ती होईल. बहुत काय लिहूं ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति. नारायणतेल सिध्द होतें तें पाठविलें असे. मागाहून आणखी पाठवून देतों. कळलें पाहिजे. हे विनंति.