[२७८] श्री. २५ जुलै १७३७
श्रीमत् तीर्थरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल तागाईत श्रावण शुध्द दशमी इंदुवारपावेतों स्वामींच्या आशीर्वादेंकरून कुशल असें. विशेष. स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन समाधान जाहालें. राजश्री त्रिंबकजी पवळे व दामोदर रघुनाथ पाठविले आणि स्वामीस लिहिलें होतें कीं, येसमयीं जाऊन चार गोष्टी सांगाव्या; परंतु आपण लिहिलें कीं समाधीस बसावयास अवकाश थोडकाच राहिला, समाधीहून उठल्यानंतर प्रेत्न करून स्वामी आमच्या कार्यावर दृष्टी देऊन मन घालतील. विस्कलित प्रसंग जाहला आहे तो नीट होईल ह्मणून भरोसा धरिला होता. आमच्या कार्याची आपणास योग्यता दिसून येत नाहीं. बरें ! ऋणानुबंध प्रमाण आहे ! अद्याप तरी सर्व भरंवसा स्वामींचाच धरिला आहे. राजश्री स्वामींनी दर्शनास यावयाविशीं आज्ञा केली आहे. त्यास मुडेगडकरी यांनीं दगाबाजी करून राजश्री विसाजीपंत यांस ठेवून घेतले आहेत आणि मुलकांतही उपद्रव करितात. याजकरितां राजश्री स्वामीपाशीं आपण जाऊन ते गोष्टीचा बंद होऊन येई आणि राजश्री पंत मशारनिल्ले स्वामीसंनिध जात, तो अर्थ केला पाहिजे. येसमयीं स्वामींनी करून दाखवावेंच दाखवावें. आनंदी व राघू स्वामीपाशीं भांडोन आल्या आहेत. त्यांस गोटणेंमध्यें रहावया स्थल न द्यावें ह्मणून आज्ञा केली, तरी स्वामींची आज्ञा ते प्रमाण आहे. आल्या तरी स्वामीच्या स्वामीकडेस पाठवून देतों. खासे कागद व सुसी ताग्याविशीं लिहिलें, त्यास आह्मीं स्वामींच्या दर्शनास येतेसमयीं घेऊन येतों. सारांश, अर्थ :- राजश्री पंत स्वामीसंनिध न्यावें ह्मणजे आह्मीं दर्शनास येतों. दुसरा विचार किमपि नाहीं. स्वामी वडील आहेत. कळेल तसें करावें. रा। छ ८ रबिलाखर. बहुत काय लिहिणें कृपा केली पाहिजे. हे विनंति.