Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
पौष वद्य ३० गोबिंद त्र्यंबक एकबोटे याची वडील सून, आफगांवकराची लेक, अफगांवी नगाकरितां सोनारांनीं जिवें मारिली. सोनाराचेथें झाडा घेतला. नग सांपडले. सोनार कबूल जाले. नग माघारे घेतले. दोघे सोनार तेथेंच जिवेंच मारिले. एक पुणियास धरून आणिला असे. १
माघ शुद्ध १४ मंगळवारीं कावभट ढेरे रात्रीं वारले. दिवस उगवून मंगळवार प्रातःकाळीं अग्न दिधला. १
नाना पेशवे दीक्षिताचेथें कायगांवास गेले. ते रोजीं मार्गी शिक्केकटार हरपली. सवेंच सांपडली, ऐसेंहि वर्तमान आलें. परंतु सांपडली नाहीं.
माघ वद्य ९ शुक्रवारी शामराऊबाबा व नारो आप्पाजी लश्करांतून पुणियास आले. १
वद्य १३ मंगळवारीं प्रातःकाळीं त्रिंबकराऊ विश्वनाथ पुणियास आले. येथील पारपत्य अवघें श्रीमंतांनी त्यास सांगितले आहे.
पेशवियांनी औरंगाबादेचा सुभा सैद लश्करखान याजपासून शहरास शह देऊन सत्रा लक्ष रु॥ खंडणी घेतली. आणि जफ्ती उठविली. जफ्तीचा वसूल आला ते आला. सत्राखेरीज. १
माघमाशीं वद्यपक्षी यमाजी शिवदेव पेशवियाबा। होते. त्यास कैद करून, कावनई किल्लियावरी पाठविले. शें दोनशें घोडे व दोन हत्ती होते ते पेशवियांनीं पागेस लाविले. सबब कीं, त्यांचे बंधू अंताजी शिवदेव दादोबा बराबर आईसाहेबाकडे सातारियावर गेले ह्मणून. १
हाडसर किल्ला मोंगलाकडील पेशवियानीं घेतला, माघ मासीं वद्यपक्षीं.
फाल्गुन शुद्ध ८ शुक्रवारीं एकबोटियाचा महजर जांबळी व सांगरुण येथील कुलकर्णाचा त्याजवर शिदोजी नरसिंगराऊ याचा शिक्का करून देऊन वस्त्रें देशमुखास दिल्हीं. उभयतांची साक्ष लिहिली असे. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १६४
श्री १६१९ चैत्र वद्य १२
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २३ ईश्वर संवत्सरे चैत्र बहुल द्वादशी गुरुवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजाराम छत्रपती याणी समस्त राजकार्यधुरधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्र पंडित अमात्य हुकमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसीजे भवानगिरी गोसावी हे बहुत थोर अनुष्ठानी याच्या मठी अतीत अभ्यागतास अन्नउदक पडते धर्म होतो ह्मणून स्वामीने धर्मार्थ मौजे इरमडे समत निंब पा। वाई हा गाव कुलबाब कुलकानू इनाम दिल्हा आहे तो त्याच्या स्वाधीन जाला याणी रयतीस कौलवोल देऊन गावीची कीर्द केली त्यास सरदेशमुखी व देशमुखी व सरदेशकुलकर्ण व बाजे वतने याचा उपद्रव लागला राजश्री परशराम त्र्यबक याणी सदरहू वतनीयाचा ऐवज दोनशे रुपये पावेतो घेतला ह्मणून हे वर्तमान गोसावीयास कळोन गोसावी बहुत दिलगीर जाले आणि स्वामीस विदित केले तरी तो गाव गोसावी यास कुलबाब कुलकानू इनाम दिल्हा असता सरदेशमुखी व वरकड वतने घ्यावयास गरज काय हे गोसावी महत लोक याचे सर्व प्रकारे समाधान रक्षिलीयाने राज्यास कल्याण आहे ऐसे जाणून स्वामीने सरदेशमुखी व देशमुखी व सरदेशकुलकर्ण व बाजे वतने कुल मना केले आहेती तरी तुह्मी सदरहू वतनदारास ताकीद करून मौजे इडमडे या गावास कोणाचा उपद्रव लागो न देणे परशरामपती जो उसूल वतनीयाचा घेतला असेल तो परतोन देववणे येविसी अनमान न करणे मागती याचा बोभाट न ये इनामाचा गाव गोसावी सुरक्षित अनभऊन राहेत ते करणे जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सूज्ञ असा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
सिंहगडासहि बाळकृष्णपंतास जिवाजी गणेश याणीं चौकशीस पाठविलें असे. माहादोबाच्या दोहीं गडच्या सबनिश्या; येशवंतराऊ पुरंधरचे सबनिसीवरी; व माहादाजीपंत अवसरकर सिंहगडचे सबनिशीवर; ते बाबानीं आपल्यापाशीं बोलावलें कीं, आह्मी रुसोन आलों, पेशवियानीं गडास चौकशीस कारकून पाठविले, आमच्या सबनिश्या, ह्मणून तरी आपले मुतालीकच कां आणविले नाहीत ? ह्मणुन बोलाविलें. १
पौष वद्य ३ गुरुवारीं पेशवियाचें चिखलीचे मुक्कामीहून कुच होऊन खेडावर गेले. दुसरे रोजीं घोडनदीवरी गेले. बा। उमाबाई अंबिकाबाई, सेनाखासखेल, व सयाजी गायकवाड ऐसे आहेत. नारो आप्पाजी पौष वद्य १ मंगळवारी पुरंधरीहून पुणियास आले. गुरुवारीं लश्करांत गेले असेत.
पौष वद्य ६ रविवारी प्रहर रात्रीं अवशींचें राघोराम होनप देशपांडे वारले. त्यांची बायको आधें वारली. तिचे दहावे रोजी हेहि वारले असेत. १
रोजमजकुरी रविवार. सकाळच्या चार घटकानंतर सो। गोपिकाबाई पेशावियांची स्त्री लश्करास गेली. १
पौष वद्य १० सह ११ शुक्रवारी दुपारा सो। ठकू, लक्षुमणाची स्त्री, पुणियांत कुसाईच्या घरांत वारली. नवा पुत्र जाला आहे तो वांचला असे. १
वद्य १३ सोमवारी दोनप्रहर होऊन पंधरावे घटकेंत प्रसूतकाल होऊन पुत्र जाला. तेरावे रोजी नांव विठ्ठलराऊ ठेविलें असे. १
माघ शुद्ध १ गुरुवारीं सदाशिव दीक्षित पुणियांत वारले, दुपार टळलियावरी. १
रोजमजकुरी माणको बल्लाळ पराडकर, वडगांऊ, हांडे येथें पहाटे वारले.
शुद्ध दशमी शुक्रवारी तिसरे प्रहरी यादो माहादेव निरगुडे, सरकार दाभाडियाकडील, पुणियांत बाबूराऊ मजुमदार यांचेथें बारले असेत. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
रोज मजकुरी पाच लग्नें खळदाळींत.
लग्न लक्षमणानें दुसरें केलें. पिलाजी लक्षमण खळदकर याची लेक केली. घरी कोण्हास न पुसतां चोरून जाऊन लग्न केलें असे. १
मातुश्री ताराबाई गडावरी गेली ह्मणून राजश्री सांगोलियांतून भाऊचा निरोप घेऊन सातारियास आले, गडावर जाऊन मातुश्रीची भेटी घेतली. बायका घेऊन खाले आले. एक दोनदां वरते गेले, खाले आले. एके दिवशीं राजश्रीस मातुश्रीनीं अटक केली. गडावरी ठेविलें. ऐसें वर्तमान आलें, मार्गेश्वर शुद्ध. ( पुढें करें )
वद्य २ द्वितिया मंगळवारीं चर्होलीहून कुच करून पेशवे चिखलीवर गेले. ते दिवशीं चिखलीचा शिंवार अगदीं टाकोटाक गेले. दंगा ! शिंवारांतील दाणे लुटिले, मोशीचा पुश्चमेचा शिंवार कांहीं लुटला. चिखली माई येथील शिवार लुटला गेला. वाटसरें व शिवारचीं माणसें बायका उलगडिल्या. शिंवारांत चिंधीचोळा केला. लूटच जाली. दुसरे रोजीं ताकीद केली. त्याजवर उमाबाई तळेगांवास गेली. बा। सटवोजी जाधव, नानाजी ढमढेरे, वगैरे नेले. त्याजबरोबर देवजी ताकपीर पेशवियांकड़े आले. दुसरे तिसरे रोजी उमाबाई व सौ। अंबिकाबाईहि पेशवियांकडे आलीं, पंचवीस लक्ष रु॥ द्यावयाचा करार केला आहे. १
पौष शुद्ध १ मंगळवारीं राजश्री भाऊ फौजेसमेत वडगाऊ शेरीवर आले. दुसरे रोजीं बुधवारी चिखलीस श्रीमंताजवळ गेले. दाभाडियांनी निम्मे गुजराथ द्यावयाचा करार केला. शुद्ध ७ सोमवारी उमाबाई अंबिकाबाई तळेगांवास गेलीं, सेनापतीचा करार करावयास. १
पौष शुद्ध ६ रविवारी चिखलीस श्रीमंतापाशीं सावनूरवालियाचें लिहिलें आलें कीं, नासरजगांनी फिरंगियावरी हल्ला केली. पठाण बराबर होते. ते हल्लेस उठेनात ह्मणून नवाब त्यांजवर रागे भरून त्याजवरीच उठला. त्याणीं हत्यार धरिलें. गोळ्या दिल्या, उरांत गोळी लागोन नासरजंग वारला. हिदायद मोहिद्देखान अटकेंतून बाहेर काढून, श्यादानें वाजवून, द्वाही फिरविली. अठरा रोज जाले. ह्मणून वर्तमान आलें. वकीलाचेंहि लिहिलें आलें असे.
पौष शुद्ध ८ मंगळवारी राजश्री माहादाजी अंबाजी पुरंधरे श्रीमंताशीं रुसोन, त्यांची आज्ञा घरीं रहावयाची घेऊन, ते व धोंडो मल्हार ऐसे दो प्रहरां पुणियास आले. सखारामपंत बोकीलहि बराबर
आले असेत. १
रोज मजकुरीं श्रीमंतांनीं नारो आप्पाजी व दिनकरपंत पुरंधरास चौकी पहारियाची चौकशी करावयास पाठविले असेत. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शुद्ध १० मंदवार विजयादशमी.
शुद्ध १२ सोमवारी मातुश्री ताराबाईसाहेब कुच करून गेली. महादेवास जाणें ह्मणून गेली.
शुद्ध १५ गुरुवार भाऊचीं पत्रें आलीं कीं, यमाजीपंत दुसरियासच येऊन भेटले. दादोबा प्रतिनिधीस पाठवा. त्याजवरून तेच रोजीं नारो आप्पाजीस पुरंधरास पाठविले. तेच रोजी संध्याकाळीं दादोबा गडावरून उतरले. माचीस शामरायाच्या घरास आले. यमाजीपंतानी ठाणीं दिल्हीं असेत.
कार्तिक शुद्ध १ मंदवार छ०. २९ जिल्कादीं राजश्री श्रीपतराऊ बापूजी याजवळील पेशवियाचा शिक्का मुतालकीचा शाहूराजियाच्या नांवचा होता तो राजारामी केला. एकबोटियाचे कावडीचे कागद त्यांजवर करावयास एक दोन रोज निकड करून करविला. रोजमजकुरीं शिके चालते जाले. राजे गतवर्षी वारले. परंतु शिक्का आजवरी तैसाच होता. १
रोजमजकुरीं दाभाडियाकडील यादो महादेव शिष्टाईस गुजराथीच्या आले होते. त्याजला पेशवियानीं साफ जाब दिल्हा कीं, आह्मास अंमलच करणें. त्याजदेखतां गुजराथेच्या महालास कुमावीसदार करून, रसदा घेऊन, प्रतिपदेस वस्त्रें दिल्हीं. यादोपंत उठोन गेले. वस्त्रें देत होते, घेतलीं नाहींत. १
कार्तिक शुद्ध ७ शुक्रवारी वानवडीवर मुहूर्तेकरून गेले. तेथून सासवड, जेजुरी, मोरगांव, कुरकुंब करून, राजेवाडीवरून थेवरास येऊन, तेथून वद्य ५ भोमवारी संगमाखाले पाडळपोईजवळ येऊन, डेरे देऊन राहिले. १
शुद्ध १० सोमवारी सकाळीच ताराबाई नाती व नातसुना घेऊन, सातारियावरी गेली, ह्मणून खबर आली आहे.
दौलतराऊ व भवानबा देशमुख बाळाजी बाजीराऊ पेशवे यांजकडे चाकरीस राहिले.
कार्तिक वद्य ४ सह ६ भीमवारीं प्रातःकाळीं बाबूराऊ मल्हार बरवे यास पुणियांत देवआज्ञा जाली असे. बायको पांचवी लाहाण रांडली असे ! उपाय काय ? १
वद्य ११ भोमवारीं पेशवे चर्होलीच्या मुक्कामास आले.
मार्गेश्वर शुद्ध ४ बुधवारी, उमाबाई दाभाडी आळंदीस आली. पेशवियांची भेट घेतली. १
शुद्ध ४ बुधवारी कृष्णाजी गणेश देशपांड़े यांच्या दुसर्या लेकास नागो रघुनाथ वैद्य यांची दुसरी लेक दिल्ही. नव घटका दिवसा लग्नें कागलीं. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
आश्विन मसि.
शुद्ध १ गुरुवारीं शिवजी भोंसला कावडीकर याणें येऊन सांगितले की, आपण एकबोटियापासून चार हजार रु॥ तिवोत्र्याप्रा। वरसाचे मुदतीने खत देऊन घ्यावेसे केले. अडीच हजार घेतिले तों ऐकिलें कीं त्याणीं खरीदीखतच लागलेच लेहून ठेविलें, कुलकर्णियापासून. ह्मणून आजि त्याच्या घरास जाऊन, हें काय केलें, ह्मणून हटकिलें. तेव्हां ते कागद खरीदीखताचा वाचोन दाखवूं लागले. आपण ह्मटलें कीं म्या अटीचें खत लेहविलें, खरीदीखत लेहविलेंच नाहीं. ऐकिलेंच नाहीं. आतां मी काशियास ऐकूं ? ऐसें ह्मणून उठोन जाऊं लागलों. मग त्याणीं ढलाईत लावून, उभें करून, बसवून, वाचून दाखविलें. मग आपण ह्मटलें म्यां लेहविलें नाहीं. याउपरि अडीच हजार रुपये देतों. माझें खत माघारें द्या. त्याज कोण्ही ह्मणाले, कागद आह्मी पेशवियास खरीदखताचा दाखविला आहे, फिरवूंया. कोण्ही ह्मणाले पैकाच घेऊ. ऐशी बोली जाली. ह्मणोन सांगोन गेला. खरीदखत आपण लेहून दिल्हें नाहीं. गोहीदारास गोही घाला ह्मणून आपण सांगितलें नाहीं. ऐसें पष्ठ ह्मणत होता.
शुद्ध ३ मंदवार. छ १ जिल्काद.
शुद्ध ४ रविवारीं गिरमाजीपंत येऊन बहिरोबास देशमुखाचेथें घेऊन जाऊन काविडीचे शिवजी भोंसलियाचे निम्मे पाटीलकीचें खरीदखत केलें आहे. शिवजी हजीर नसतां देशमुखाचें दस्तक व शिक्का करून घेतला. बहिरोबानीं शिवजीचा उजूर ह्मटला. बाईनीं ह्मटलें, तो नसेना का, दस्तक शिक्का करून घ्या. त्याजवरून करून दिल्हा असे. १
पेशवियाचें वतनपत्रहि लेहून दाखवावयास आणिलें होतें. शिक्के होणें होतें. १
आश्विन शुद्ध ५ पेशवियांची पांचहि पत्रें शिक्कियानशीं करून, ह्मणून गिरमाजीपंतानी आह्मांस दाखविली असे. शिवजीची बोलीहि आह्मी त्यास सांगितली असे. १
शिवजी ह्मणतो, अडीचहजार मजला दिल्हे. पंधराशें दिल्हे नाहींत. गिरमाजीपंत ह्मणतात सव्वीशें दिल्हे.
आश्विन शुद्ध ५ सोमवारी गंगाधर कृष्ण याचा पुत्र भवानीदास याजला विशाळगडीहून आणून प्रतिनिधी राजारामाची दिल्ही. राजश्री सदोबाभाऊ याणीं देविली. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शुद्ध १३ मंदवारीं बाबा वैद्य याणीं तेलियाचें घर घेतले. त्याचा शेटे महाजन याचा चकनामा करून घेतला व तेलियाचा कागद करून घेतला व तेलियास शेटे महाजन याणीं दुसरी जागा दिल्ही. त्याचा कागद करून दिल्हा. ऐसे तीन कागद. त्याजवर देशमुखाचा शिक्का करून दिल्हा असे. १
वद्य १ भोमवारीं सरलश्कर दर्याबाई सातारियाहून पुणियास आली. भाऊ स्वामी सामोरे जाऊन आणिली असेत. १
वद्य २ बुधवारी खबर आली कीं, खंडोजी गायकवाड याणें बडोदियाहून पायागडास भेद करून आषाढ वद्य १३ दोप्रहरा घेतला बाबूखान नि॥ जायाजी शिंदे, दि॥ पंतप्रधान, किल्लियावर हवलदार होता. त्याजला भेद ठावका नव्हता. वरते लोक गेलियावरी, वर्तमान कळलियावरी, हत्यार त्याणें धरिलें. मारला गेला. सदरहू खबर लबाड ! कोणें उठविली, कळेना ! बाष्कळ जाली असे. १
भाद्रपद मास.
वद्य ५ शुक्रवारी रेणकोपंतास पेशवियानीं वस्त्रें दिल्हीं. कडीं हातीं घातली. व हास्ती दिल्हा. बहुमान करून सेवेसी ठेविले. तेराशें राऊत ठेवावे.
वद्य ९ नवमी भोमवारी राजारामराजे महाराज पुणियास आले. लाल महालांत राहिले नाहींत. रविवाराचे दक्षणेस वेताळापाशीं डेरे पेशवियांनी दिल्हे, तेथें राहिले. भाद्रपद शुद्ध १ बुधवारी राजश्री व सदाशिवपंतभाऊ व सचिवपंत ऐसे स्वार होऊन सातारियास गेले असेत. १
भाद्रपद शुद्ध ६ रविवारी रात्रीं दाहावे घटकेस अवशीं राधाबाई एकबोटी वारली असेत. १
रामशेट पेठशाहापूरकर हाहि तेच रोजीं वारला असे. १
भा। वद्य १ बुधवारीं राजश्री बाळाजी बाजीराऊ यास चौथा पुत्र जाला. अडीच पावणेतीन प्रहर दिवस आला होता. राजे कुच करून गेलियावरी पुत्र जाला असे. १
भाद्रपद वद्य ११ मंदवारीं रा॥ दादोबा प्रतिनिधी पुरंधरावर कबिलासुद्धां अटकेस ठेविले असेत. १
नारो आप्पाजी पुरंधरास प्रतिनिधीच्या परामृषास पाठविले. शामराऊ दशमीसच गेले होते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शुद्ध ४ मंगळवारीं भांबोडाची खंडणी त्रिंबकराऊ विश्वनाथ याणी केली. अताराकडे इनामगांव होते. त्याणें शंभर वसूल घेतला होता, तो वजा दिल्हा. सन ११५९ ची खंडणी केली. गांव दरोबस्त आपल्याकडे घेतला. अताराकडील मामला दूर केला. रामराजियाचा हातरोखा घेतला आहे ह्मणतात. त्याजवर सन ११५८, ५७५; सन १ १५९, ६३७॥; खंडणी केली. शंभर रु॥ मजुरा दिल्हे. कतबियांत तेरीख पंधरावी जमादिलाखर घातली असे.
आषाढ शुद्ध १३ सह १४ शुक्रवारी
सिंहगड सचिवाकडून पेशवियां- आपल्या मळ्याच्या दक्षणेस
कडे आला. सलुखें आला. राज- खंडोजी भोंडवियाने दिडाशी रुप-
श्रीनीं व ताराबाईनी सचिवास आज्ञा यांस पंधरा बिघे जमीन आपले
करून देविला असे. १ मिराशीपैकीं, आपल्या वाट्यापैकीं,
दिल्ही. ते आजि मोजून दिल्ही.
त्याणें व त्याचे बायकोनें मेजून
दिल्ली. पुत्रहि त्यांचा जवळ होता.
श्रावण शुद्ध ४ गुरुवारीं श्रीमंत बाळाजी बाजीराऊ यांणीं सोनियाचें तेहतिश्या तोळियांचे ब्रह्मांडदान द्यावयास करून दान दिल्हें. महा दान केलें. १
रोजमजकुरी खंडो रघुनाथ, गु॥ चौ। पुणें, यास देवआज्ञा जाली. अडचा प्रहरा सव्वादोन प्रहरा वारले. चांगले मरण आलें. पाहिले दिवशीं वागवाग होते. शीत जालें. दुसरे रोजी वारले असेत. १
श्रावण शुद्ध ८ सोमवारी रात रघोजी भोंसले श्रीमंताकडे आले. हे सामोरे जाऊन घेऊन आले असेत.
रोज मजकुरीं विश्वासरायाच्या लग्नाची वस्त्रें पुणेकरांस दिल्हीं असेत. बि॥ याद. ( पुढें कोरें )
श्रावण शुद्ध १२ शुक्रवारी मौजे घोरपडी ता। हवेली येथें गोविंद बल्लाळ बुंदेलखंडे याजला बाग करावयास श्रीमंतांनीं जमीन पंधरा बिघे पांच होत पांच मुठी या पांडानें देविली ती दिल्ही. हवलदार व जमीदार व पाटील एक होऊन दिल्ही, ता। बाबूराऊ त्याचा भाऊ. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
शुद्ध १३ गिरमाजी त्रिंबक एकबोटे यांणीं सांगरुण व जांबळी दोन्ही गांवची कुलकर्णे मल्हारपंत तट्टपासून घेतली. त्याचे कागद जिल्हेचे, सचीवाचे व खरीदखत शके १६७० तील आणून दाखविलें. मलारपंत मोझियास आणिले होते. खरीदखतावर उभयतां देशमुखांची साक्ष घालून घेतली. शेरणी एक हजार एक रुपया पत्रांत आहे. खरीदखतांत तेवीसेसाठ रु॥ आहेत. सा जणांची नविं लिहिली आहेत. सचिवांनीं नूतन इनामदस्ती बंद करून दिल्ही आहे. वोवळ, सांगरूण होन २ दोन, व जांबळी होन १ एक, एकूण ती होनांची जमीन दिल्ही असे. सनदेंत लिहिली आहे.
शुद्ध १५ शुक्रवारी चंद्रग्रहण. १
वद्य १ मंदवारीं एकबोटिंयांनी बाईपासून हायेकराच्या वाडियाचा कागद करून घेतला. ऐशी चर्चा आहे. बाबांनी सांगितलें. १
वद्य २ रविवारीं एकबोटियांनी कुलकर्णाच्या खरीदखतावर व कसबाच्या इनामशेत बिघे दाहा याच्या चकनामियावरी गोविंदरायाचा शिक्का करून घेतला असे.
एकबोटियानी हायेकराच्या जागियाचा बाईस रंगोपंताच्या हातें फसवून कागद लेहून घेतला. बाबाकडून दोनचार वोळी खाले लेहविल्या, आणा घालविल्या. सखूबाईस राजसबाईस ठावकें नाहीं. बाबास आयतेवेळेस नेलें. बाबानीं अनमान केला. बाईस दटावून लेहविलें असे. बाबानींच बहिरोबापाशीं सांगितलें कीं, मजपासून बळें लेहविलें. आणिक काय मजकूर लेहविला असेल कळेना. कागद रंगोपंताच्या हातचा आहे.
श्रीमंत बाळाजी बाजीराऊ प्रधान यांणीं वद्य ५ बुधवारीं बाहेर डेरे दिल्हे. वद्य ६ गुरुवारीं स्वार होऊन गेले. मल्हारजी होळकर व जायापा यांसी समजावयास गेले. बा। रघुनाथपंतदादा त्यांचे बंधू व
सखारामपंत बोकील गेले आहेत. १
जेष्ठ वद्य १२ मंगळवारीं श्रीमंत मलारबा व जायापा यांस घेऊन घरास तिसरे प्रहरीं आले. आपलाल्या घरांत राहिले. १
आषाढ शुद्ध २ रविवारी पुष्यार्क तिसरे प्रहरी मल्हारबा जायापांस श्रीमंतानीं वस्त्रें दिल्हीं. मोत्याचे चौकडे दिल्हे. बहुमान चांगला केला. बा। रामाजी अनंत फडनिशीकडील कारकून होते तेच दिल्हे
आहेत. १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
श्री.
स्मरण. शके १६७२ प्रमोदीनामसंवछरे, जेष्ठ शुद्ध १ प्रतिपदा, शुक्रवार, छ० २९ जाखर, सुहूरसन इहिदे खमसैन मया व अलफ़. सन हजार ११६०
अवलसाल बिता।
छ० ४ रज़बु जेष्ठ शुद्ध पंचमी मंगळवार तिसरे प्रहरीं मातुश्री ताराबाईसाहेब शिवपुरीहून पुणियास आली. राजश्री बाबूजी नाईक यांच्या हवेलींत राहिली. राजश्री बाळाजी पंडित प्रधान सामोरे गेले होते. त्यांचे बंधु रघुनाथपंत दादा शिवपुरास गेले होते. मातुश्रीबराबर राजश्री भगवंतराऊ रामचंद्र अमात्य व राजश्री चिमणाजी नारायण सचिव आले. शिदोजी नरासिंगराऊ श्रीमंताबा। पुढें गेले होते. आईसाहेबांस पांच रु॥ नजर केली. सचिवासहि पांच रु॥ नजर केली. दुसरे रोजीं गोविंदराऊ देशमुख यांणी भेटी घेतली. सदरहूप्रों। नजर केली असे. १
शुद्ध अष्टमी शुक्रवारीं शिदो उद्धव, पेशवियाचे पागेचे दिवाण, तळेगांवीं आपले घरीं वारले, दोन घटका रात्रीं. १
पेशवियांनीं अंबीळ वोहळ वरता मोडून रमणियांतून पुढें वोढियास मेळविला. कावा चालत असे !
पेशवियांनीं बागांतल्या बंगलियांत गायत्रीपुरश्चरणास ब्राह्मण अनुष्ठानास लाविले आहेत. १