शुद्ध १३ गिरमाजी त्रिंबक एकबोटे यांणीं सांगरुण व जांबळी दोन्ही गांवची कुलकर्णे मल्हारपंत तट्टपासून घेतली. त्याचे कागद जिल्हेचे, सचीवाचे व खरीदखत शके १६७० तील आणून दाखविलें. मलारपंत मोझियास आणिले होते. खरीदखतावर उभयतां देशमुखांची साक्ष घालून घेतली. शेरणी एक हजार एक रुपया पत्रांत आहे. खरीदखतांत तेवीसेसाठ रु॥ आहेत. सा जणांची नविं लिहिली आहेत. सचिवांनीं नूतन इनामदस्ती बंद करून दिल्ही आहे. वोवळ, सांगरूण होन २ दोन, व जांबळी होन १ एक, एकूण ती होनांची जमीन दिल्ही असे. सनदेंत लिहिली आहे.
शुद्ध १५ शुक्रवारी चंद्रग्रहण. १
वद्य १ मंदवारीं एकबोटिंयांनी बाईपासून हायेकराच्या वाडियाचा कागद करून घेतला. ऐशी चर्चा आहे. बाबांनी सांगितलें. १
वद्य २ रविवारीं एकबोटियांनी कुलकर्णाच्या खरीदखतावर व कसबाच्या इनामशेत बिघे दाहा याच्या चकनामियावरी गोविंदरायाचा शिक्का करून घेतला असे.
एकबोटियानी हायेकराच्या जागियाचा बाईस रंगोपंताच्या हातें फसवून कागद लेहून घेतला. बाबाकडून दोनचार वोळी खाले लेहविल्या, आणा घालविल्या. सखूबाईस राजसबाईस ठावकें नाहीं. बाबास आयतेवेळेस नेलें. बाबानीं अनमान केला. बाईस दटावून लेहविलें असे. बाबानींच बहिरोबापाशीं सांगितलें कीं, मजपासून बळें लेहविलें. आणिक काय मजकूर लेहविला असेल कळेना. कागद रंगोपंताच्या हातचा आहे.
श्रीमंत बाळाजी बाजीराऊ प्रधान यांणीं वद्य ५ बुधवारीं बाहेर डेरे दिल्हे. वद्य ६ गुरुवारीं स्वार होऊन गेले. मल्हारजी होळकर व जायापा यांसी समजावयास गेले. बा। रघुनाथपंतदादा त्यांचे बंधू व
सखारामपंत बोकील गेले आहेत. १
जेष्ठ वद्य १२ मंगळवारीं श्रीमंत मलारबा व जायापा यांस घेऊन घरास तिसरे प्रहरीं आले. आपलाल्या घरांत राहिले. १
आषाढ शुद्ध २ रविवारी पुष्यार्क तिसरे प्रहरी मल्हारबा जायापांस श्रीमंतानीं वस्त्रें दिल्हीं. मोत्याचे चौकडे दिल्हे. बहुमान चांगला केला. बा। रामाजी अनंत फडनिशीकडील कारकून होते तेच दिल्हे
आहेत. १