लेखांक १६४
श्री १६१९ चैत्र वद्य १२
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक २३ ईश्वर संवत्सरे चैत्र बहुल द्वादशी गुरुवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजाराम छत्रपती याणी समस्त राजकार्यधुरधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्र पंडित अमात्य हुकमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसीजे भवानगिरी गोसावी हे बहुत थोर अनुष्ठानी याच्या मठी अतीत अभ्यागतास अन्नउदक पडते धर्म होतो ह्मणून स्वामीने धर्मार्थ मौजे इरमडे समत निंब पा। वाई हा गाव कुलबाब कुलकानू इनाम दिल्हा आहे तो त्याच्या स्वाधीन जाला याणी रयतीस कौलवोल देऊन गावीची कीर्द केली त्यास सरदेशमुखी व देशमुखी व सरदेशकुलकर्ण व बाजे वतने याचा उपद्रव लागला राजश्री परशराम त्र्यबक याणी सदरहू वतनीयाचा ऐवज दोनशे रुपये पावेतो घेतला ह्मणून हे वर्तमान गोसावीयास कळोन गोसावी बहुत दिलगीर जाले आणि स्वामीस विदित केले तरी तो गाव गोसावी यास कुलबाब कुलकानू इनाम दिल्हा असता सरदेशमुखी व वरकड वतने घ्यावयास गरज काय हे गोसावी महत लोक याचे सर्व प्रकारे समाधान रक्षिलीयाने राज्यास कल्याण आहे ऐसे जाणून स्वामीने सरदेशमुखी व देशमुखी व सरदेशकुलकर्ण व बाजे वतने कुल मना केले आहेती तरी तुह्मी सदरहू वतनदारास ताकीद करून मौजे इडमडे या गावास कोणाचा उपद्रव लागो न देणे परशरामपती जो उसूल वतनीयाचा घेतला असेल तो परतोन देववणे येविसी अनमान न करणे मागती याचा बोभाट न ये इनामाचा गाव गोसावी सुरक्षित अनभऊन राहेत ते करणे जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सूज्ञ असा