रोज मजकुरी पाच लग्नें खळदाळींत.
लग्न लक्षमणानें दुसरें केलें. पिलाजी लक्षमण खळदकर याची लेक केली. घरी कोण्हास न पुसतां चोरून जाऊन लग्न केलें असे. १
मातुश्री ताराबाई गडावरी गेली ह्मणून राजश्री सांगोलियांतून भाऊचा निरोप घेऊन सातारियास आले, गडावर जाऊन मातुश्रीची भेटी घेतली. बायका घेऊन खाले आले. एक दोनदां वरते गेले, खाले आले. एके दिवशीं राजश्रीस मातुश्रीनीं अटक केली. गडावरी ठेविलें. ऐसें वर्तमान आलें, मार्गेश्वर शुद्ध. ( पुढें करें )
वद्य २ द्वितिया मंगळवारीं चर्होलीहून कुच करून पेशवे चिखलीवर गेले. ते दिवशीं चिखलीचा शिंवार अगदीं टाकोटाक गेले. दंगा ! शिंवारांतील दाणे लुटिले, मोशीचा पुश्चमेचा शिंवार कांहीं लुटला. चिखली माई येथील शिवार लुटला गेला. वाटसरें व शिवारचीं माणसें बायका उलगडिल्या. शिंवारांत चिंधीचोळा केला. लूटच जाली. दुसरे रोजीं ताकीद केली. त्याजवर उमाबाई तळेगांवास गेली. बा। सटवोजी जाधव, नानाजी ढमढेरे, वगैरे नेले. त्याजबरोबर देवजी ताकपीर पेशवियांकड़े आले. दुसरे तिसरे रोजी उमाबाई व सौ। अंबिकाबाईहि पेशवियांकडे आलीं, पंचवीस लक्ष रु॥ द्यावयाचा करार केला आहे. १
पौष शुद्ध १ मंगळवारीं राजश्री भाऊ फौजेसमेत वडगाऊ शेरीवर आले. दुसरे रोजीं बुधवारी चिखलीस श्रीमंताजवळ गेले. दाभाडियांनी निम्मे गुजराथ द्यावयाचा करार केला. शुद्ध ७ सोमवारी उमाबाई अंबिकाबाई तळेगांवास गेलीं, सेनापतीचा करार करावयास. १
पौष शुद्ध ६ रविवारी चिखलीस श्रीमंतापाशीं सावनूरवालियाचें लिहिलें आलें कीं, नासरजगांनी फिरंगियावरी हल्ला केली. पठाण बराबर होते. ते हल्लेस उठेनात ह्मणून नवाब त्यांजवर रागे भरून त्याजवरीच उठला. त्याणीं हत्यार धरिलें. गोळ्या दिल्या, उरांत गोळी लागोन नासरजंग वारला. हिदायद मोहिद्देखान अटकेंतून बाहेर काढून, श्यादानें वाजवून, द्वाही फिरविली. अठरा रोज जाले. ह्मणून वर्तमान आलें. वकीलाचेंहि लिहिलें आलें असे.
पौष शुद्ध ८ मंगळवारी राजश्री माहादाजी अंबाजी पुरंधरे श्रीमंताशीं रुसोन, त्यांची आज्ञा घरीं रहावयाची घेऊन, ते व धोंडो मल्हार ऐसे दो प्रहरां पुणियास आले. सखारामपंत बोकीलहि बराबर
आले असेत. १
रोज मजकुरीं श्रीमंतांनीं नारो आप्पाजी व दिनकरपंत पुरंधरास चौकी पहारियाची चौकशी करावयास पाठविले असेत. १