पौष वद्य ३० गोबिंद त्र्यंबक एकबोटे याची वडील सून, आफगांवकराची लेक, अफगांवी नगाकरितां सोनारांनीं जिवें मारिली. सोनाराचेथें झाडा घेतला. नग सांपडले. सोनार कबूल जाले. नग माघारे घेतले. दोघे सोनार तेथेंच जिवेंच मारिले. एक पुणियास धरून आणिला असे. १
माघ शुद्ध १४ मंगळवारीं कावभट ढेरे रात्रीं वारले. दिवस उगवून मंगळवार प्रातःकाळीं अग्न दिधला. १
नाना पेशवे दीक्षिताचेथें कायगांवास गेले. ते रोजीं मार्गी शिक्केकटार हरपली. सवेंच सांपडली, ऐसेंहि वर्तमान आलें. परंतु सांपडली नाहीं.
माघ वद्य ९ शुक्रवारी शामराऊबाबा व नारो आप्पाजी लश्करांतून पुणियास आले. १
वद्य १३ मंगळवारीं प्रातःकाळीं त्रिंबकराऊ विश्वनाथ पुणियास आले. येथील पारपत्य अवघें श्रीमंतांनी त्यास सांगितले आहे.
पेशवियांनी औरंगाबादेचा सुभा सैद लश्करखान याजपासून शहरास शह देऊन सत्रा लक्ष रु॥ खंडणी घेतली. आणि जफ्ती उठविली. जफ्तीचा वसूल आला ते आला. सत्राखेरीज. १
माघमाशीं वद्यपक्षी यमाजी शिवदेव पेशवियाबा। होते. त्यास कैद करून, कावनई किल्लियावरी पाठविले. शें दोनशें घोडे व दोन हत्ती होते ते पेशवियांनीं पागेस लाविले. सबब कीं, त्यांचे बंधू अंताजी शिवदेव दादोबा बराबर आईसाहेबाकडे सातारियावर गेले ह्मणून. १
हाडसर किल्ला मोंगलाकडील पेशवियानीं घेतला, माघ मासीं वद्यपक्षीं.
फाल्गुन शुद्ध ८ शुक्रवारीं एकबोटियाचा महजर जांबळी व सांगरुण येथील कुलकर्णाचा त्याजवर शिदोजी नरसिंगराऊ याचा शिक्का करून देऊन वस्त्रें देशमुखास दिल्हीं. उभयतांची साक्ष लिहिली असे. १