शुद्ध १० मंदवार विजयादशमी.
शुद्ध १२ सोमवारी मातुश्री ताराबाईसाहेब कुच करून गेली. महादेवास जाणें ह्मणून गेली.
शुद्ध १५ गुरुवार भाऊचीं पत्रें आलीं कीं, यमाजीपंत दुसरियासच येऊन भेटले. दादोबा प्रतिनिधीस पाठवा. त्याजवरून तेच रोजीं नारो आप्पाजीस पुरंधरास पाठविले. तेच रोजी संध्याकाळीं दादोबा गडावरून उतरले. माचीस शामरायाच्या घरास आले. यमाजीपंतानी ठाणीं दिल्हीं असेत.
कार्तिक शुद्ध १ मंदवार छ०. २९ जिल्कादीं राजश्री श्रीपतराऊ बापूजी याजवळील पेशवियाचा शिक्का मुतालकीचा शाहूराजियाच्या नांवचा होता तो राजारामी केला. एकबोटियाचे कावडीचे कागद त्यांजवर करावयास एक दोन रोज निकड करून करविला. रोजमजकुरीं शिके चालते जाले. राजे गतवर्षी वारले. परंतु शिक्का आजवरी तैसाच होता. १
रोजमजकुरीं दाभाडियाकडील यादो महादेव शिष्टाईस गुजराथीच्या आले होते. त्याजला पेशवियानीं साफ जाब दिल्हा कीं, आह्मास अंमलच करणें. त्याजदेखतां गुजराथेच्या महालास कुमावीसदार करून, रसदा घेऊन, प्रतिपदेस वस्त्रें दिल्हीं. यादोपंत उठोन गेले. वस्त्रें देत होते, घेतलीं नाहींत. १
कार्तिक शुद्ध ७ शुक्रवारी वानवडीवर मुहूर्तेकरून गेले. तेथून सासवड, जेजुरी, मोरगांव, कुरकुंब करून, राजेवाडीवरून थेवरास येऊन, तेथून वद्य ५ भोमवारी संगमाखाले पाडळपोईजवळ येऊन, डेरे देऊन राहिले. १
शुद्ध १० सोमवारी सकाळीच ताराबाई नाती व नातसुना घेऊन, सातारियावरी गेली, ह्मणून खबर आली आहे.
दौलतराऊ व भवानबा देशमुख बाळाजी बाजीराऊ पेशवे यांजकडे चाकरीस राहिले.
कार्तिक वद्य ४ सह ६ भीमवारीं प्रातःकाळीं बाबूराऊ मल्हार बरवे यास पुणियांत देवआज्ञा जाली असे. बायको पांचवी लाहाण रांडली असे ! उपाय काय ? १
वद्य ११ भोमवारीं पेशवे चर्होलीच्या मुक्कामास आले.
मार्गेश्वर शुद्ध ४ बुधवारी, उमाबाई दाभाडी आळंदीस आली. पेशवियांची भेट घेतली. १
शुद्ध ४ बुधवारी कृष्णाजी गणेश देशपांड़े यांच्या दुसर्या लेकास नागो रघुनाथ वैद्य यांची दुसरी लेक दिल्ही. नव घटका दिवसा लग्नें कागलीं. १