शुद्ध १३ मंदवारीं बाबा वैद्य याणीं तेलियाचें घर घेतले. त्याचा शेटे महाजन याचा चकनामा करून घेतला व तेलियाचा कागद करून घेतला व तेलियास शेटे महाजन याणीं दुसरी जागा दिल्ही. त्याचा कागद करून दिल्हा. ऐसे तीन कागद. त्याजवर देशमुखाचा शिक्का करून दिल्हा असे. १
वद्य १ भोमवारीं सरलश्कर दर्याबाई सातारियाहून पुणियास आली. भाऊ स्वामी सामोरे जाऊन आणिली असेत. १
वद्य २ बुधवारी खबर आली कीं, खंडोजी गायकवाड याणें बडोदियाहून पायागडास भेद करून आषाढ वद्य १३ दोप्रहरा घेतला बाबूखान नि॥ जायाजी शिंदे, दि॥ पंतप्रधान, किल्लियावर हवलदार होता. त्याजला भेद ठावका नव्हता. वरते लोक गेलियावरी, वर्तमान कळलियावरी, हत्यार त्याणें धरिलें. मारला गेला. सदरहू खबर लबाड ! कोणें उठविली, कळेना ! बाष्कळ जाली असे. १
भाद्रपद मास.
वद्य ५ शुक्रवारी रेणकोपंतास पेशवियानीं वस्त्रें दिल्हीं. कडीं हातीं घातली. व हास्ती दिल्हा. बहुमान करून सेवेसी ठेविले. तेराशें राऊत ठेवावे.
वद्य ९ नवमी भोमवारी राजारामराजे महाराज पुणियास आले. लाल महालांत राहिले नाहींत. रविवाराचे दक्षणेस वेताळापाशीं डेरे पेशवियांनी दिल्हे, तेथें राहिले. भाद्रपद शुद्ध १ बुधवारी राजश्री व सदाशिवपंतभाऊ व सचिवपंत ऐसे स्वार होऊन सातारियास गेले असेत. १
भाद्रपद शुद्ध ६ रविवारी रात्रीं दाहावे घटकेस अवशीं राधाबाई एकबोटी वारली असेत. १
रामशेट पेठशाहापूरकर हाहि तेच रोजीं वारला असे. १
भा। वद्य १ बुधवारीं राजश्री बाळाजी बाजीराऊ यास चौथा पुत्र जाला. अडीच पावणेतीन प्रहर दिवस आला होता. राजे कुच करून गेलियावरी पुत्र जाला असे. १
भाद्रपद वद्य ११ मंदवारीं रा॥ दादोबा प्रतिनिधी पुरंधरावर कबिलासुद्धां अटकेस ठेविले असेत. १
नारो आप्पाजी पुरंधरास प्रतिनिधीच्या परामृषास पाठविले. शामराऊ दशमीसच गेले होते.