श्री.
स्मरण. शके १६७२ प्रमोदीनामसंवछरे, जेष्ठ शुद्ध १ प्रतिपदा, शुक्रवार, छ० २९ जाखर, सुहूरसन इहिदे खमसैन मया व अलफ़. सन हजार ११६०
अवलसाल बिता।
छ० ४ रज़बु जेष्ठ शुद्ध पंचमी मंगळवार तिसरे प्रहरीं मातुश्री ताराबाईसाहेब शिवपुरीहून पुणियास आली. राजश्री बाबूजी नाईक यांच्या हवेलींत राहिली. राजश्री बाळाजी पंडित प्रधान सामोरे गेले होते. त्यांचे बंधु रघुनाथपंत दादा शिवपुरास गेले होते. मातुश्रीबराबर राजश्री भगवंतराऊ रामचंद्र अमात्य व राजश्री चिमणाजी नारायण सचिव आले. शिदोजी नरासिंगराऊ श्रीमंताबा। पुढें गेले होते. आईसाहेबांस पांच रु॥ नजर केली. सचिवासहि पांच रु॥ नजर केली. दुसरे रोजीं गोविंदराऊ देशमुख यांणी भेटी घेतली. सदरहूप्रों। नजर केली असे. १
शुद्ध अष्टमी शुक्रवारीं शिदो उद्धव, पेशवियाचे पागेचे दिवाण, तळेगांवीं आपले घरीं वारले, दोन घटका रात्रीं. १
पेशवियांनीं अंबीळ वोहळ वरता मोडून रमणियांतून पुढें वोढियास मेळविला. कावा चालत असे !
पेशवियांनीं बागांतल्या बंगलियांत गायत्रीपुरश्चरणास ब्राह्मण अनुष्ठानास लाविले आहेत. १