Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४११ ]
श्री शके १६८२ फाल्गुन वद्य ६.
पैवस्तगी छ १२ रमजान बरोबर मिसरनी.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री पुरुषोत्तमपंत नाना स्वामीचे सेवेसीः--
पो। बालाजी जनार्दन सां॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ छ १९ साबान पावेतों मु॥ नजीक शिरोंज येथे असों. विशेष. प्रस्तुत तुह्माकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही. तर सविस्तर लिहित जावें. इकडील सर्व मजकूर राजश्री मिसरजी सांगतां कळेल. तीर्थरूप मातुश्रीची खबर अबदालीचे लस्करांत आहेत ह्मणून लागली आहे. त्याचे शोधास मीच तेथें जावें. परंतु मारतील याकरतां प्रतिमा मिसरजीसच पाठविले आहेत. आपण त्याचे लस्करांत गेले असले तर फारच उत्तम जाहालें. नसले गेले तर, तुह्मी व मिसरजींनी जाऊन शोध करावा. आह्मी द्रव्याचे संग्रही किती आहें तें तुह्मांस ठाऊकच आहे. तुह्मी ज्याप्रों। ग्रहस्तपण व भलेपणच मेळविलेंत, पैक्यावर नजर न दिल्हीत, त्याप्रों। आमचे वडिलांनी व आह्मीही भलेपणच मेळवीत गेलों. मोठ्या घरचा पोकळ वांसा, याप्रों। आब आहे. याजकरितां माझी शक्त पाहून जें द्यावयास पडेल तें देऊं करून, निदानीं सर्वस्व माझें देऊं करून, त्यांची मुक्तता होय हेंच करावें. तुह्मांस कळल्यावर तुह्मी सहसा अंतर नाहींच करणार. मातुश्री तेथें आहेत ह्मणून पत्रच नारो शंकर यांस गणेश वेदांत्याने लिहिलें होतें. त्याचा विस्तार सर्व मिसरजीजवळ सांगितला आहे. ते सांगतील. हें काम केल्याने कृतोपकार मजवर केलेसे होतील. कदाचित् आपले जाणें नच जाहाले, तर मिसरजी किंवा राधाकृष्ण यांस शाहावलीखानाकडे पाठवावें व ममतापुरःसर राजश्री बापूस वगैरे पत्रें ल्याहावीं. कदाचित् दुसरी कोणी बायको सांपडून माझे मातुश्रीचें नांव केलें असेल तर पाहावयास वोळखी
आपला अफ्तागिर्या पाठविला आहे. यास दाखविलियावर कळेल. हें काम जालियानें करोडों कामें केलींशीं होतील. मुक्त जालियावर जाती विशई शोध पुर्ता करावा. जर यथास्थितच प्रकार आहे तर देशास पाठ वावी. नाही तर, प्रयागास परभारेंच रवानगी करावी. रुपयाविषई चिंता न करावी. जर शुद्धच आहेत आणि त्यांचा आग्रह यात्रेसर जावयाचा असला, तरी त्यास पाठवावी. मनांत गोष्टी सोडविण्याच्या फारच येतात. त्या किती ल्याहाव्या ! परंतु, तुह्मी माझेविषई अंतरयामी साक्षी आहां. याजकरितां लिहिलें नाहीं. व मिसरजीच खासा या कामास्तवच गेले आहेत. इकडील मजकूर सर्व श्रीमंताचा व सरदाराचा वगैरे मिसरजीस पुर्ता कळला. ते तपसीलवार सांगतील, त्यावरून कळेल. आपण कदाचित् ह्मणतील की, मिसरजीस पाठविलें, तस्मात जवाहिरशिंग यांचे काम करावयाचें नाहीं, जों जों देशास आपण जातील तों तों डोळे फिरतील, व डिगचे करारास अंतर पडेल, असें आपले मनांत येईल. तर ती गोष्ट मजपासून कदापि घडणारच नाही, ही खातरजमा ईश्वरापाशीं आहे. श्रीमंताचे दर्शन होतांच मर्जी फार बिघडली आहे ती चांगली पाहून सर्व कराराप्रों। मजकूर बोलूनचालून लिहून पाठवीन. आपण शपतपूर्वक खातरजमा राखावी की, मीच त्याचा मिसरजी वकील, यांत संशय न आणावा. असें समजून दोन दिवस अधिक लागले तरी लाऊन पुर्ता शोध करावी. कदाचित् देवआज्ञाप्रति पावली असली तर त्याचाही पुर्ता शोध करावा व माझीच मातुश्री जे वेळ सांपडली असतील ते वेळे खूण दुराण्यास पुसावी. एकमाळ, सोन्याचे तारेत बतीस कांहीं अधिकउणीं मोत्यें, व रुद्राक्ष होते, हेंही पाहावें. सारांश, जो पुर्ता शोध लागेल तो करून लिहून पाठवावा. एक कागद पावेल न पावेल, याजकरतां दोन तीन लिहून पाठवावें, ह्मणजे पावेल. कदाचित् ब्राह्मण्यास चवली असली, तथापि सर्वस्व खर्च करून प्रयागास पाठऊन द्यावी. ह्मणजे पुत्रजन्माचें सार्थक ! कदाचित् आपले मनांत यईल की लोकविरुद्धासाठी इतके लिहिलें, तर तशी गोष्ट नाही. याचा साक्षी ईश्वर आहे. हें पत्र पुर्ते वाचून पाहावें. मागती मागती पाहत जावें, ह्मणजे स्मरण होत जाईल. सूज्ञाप्रत फार किती ल्याहावें ? बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असों दीजे. हे विनंति. पैक्याची निशा जेथें सांगाल तेथ करूं. हे विनंति. थोडाथोडाच चढवावें. हे विनंति * *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४१० ]
श्री शके १६८२ फाल्गुन शुद्ध १४.
पैवस्तगी
छ २५ माहे साबान.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री पुरुषोत्तमपंत नाना स्वामीचे सेवेसीः--
पो। बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ ११ साबान पावेतों मु॥ बुकीसराई येथें श्रीमंत सौ। पार्वतीबाईचे लष्करांत असो. विशेष. तुह्मी पत्र छ ६ साबीनचें पाठविलें तें छ ९ मिनहूस पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर राजश्री नानास व मला कळलें. पूर्वी पत्रें तुमचीं आली होती त्याचें प्रतिउत्तरें सुभेदार व गंगोबा व नाना व मी पाठविलीं. तीं पावलीच असतील. तुह्मास आण घालूनच लिहिलें असलें तर जरूर असल्यास त्याचें लष्करांत जावें. व नानांचेंही मानस असेंच होतें. परंतु सुभेदारांचे मतें आपणाजळ यावें, मग काय सांगून पाठविणें तर पाठवावें. यास्तव नानांनीही त्याप्रमाणेंच तुह्मास लिहिलें. तुह्मी पत्रें मला पाठविली ती नानाचे व माझे मतें श्रीमंताकडे पाठवावींशीं जाहालीं ह्मणून पाठवून दिली. व तुह्मीं श्रीमंतांस पत्र पाठविलें तें पाठविलें. तुह्मीं पत्रे राजश्री देवराव यांचे नांवें श्रीमंतास लिहित गेलेत. ते तर नाशकास गेले. यामुळें श्रीमंतांचें उत्तर तुह्मास न आले. पत्रच त्यास न पावलें असेल ह्मणून उत्तर न आले. आतां दोन वेळां पत्रे मी पाठविली आहेत त्यांचे उत्तर येईल, मग पाठवूं. काल छ ९ साबानीं श्रीमंत सौ। पार्वतीबाई यांनी कूच करून दरमजल श्रीमंताकडे चालली. आह्मी व राजश्री नाना समागमेंच आहों. रा। सुभेदार व बाबुजी नाईक, सदाशिव रामचंद्र वगैरे ग्वालेरीस राहिले. श्रीमंतांनी भेळशाहून कूच करून शिरोजेस आलिकडे आले. भेट सत्वरच होईल. राजश्री मिसरजी समागमेंच आहेत. श्रीमंतांचे दर्शन जालियावर जें होणें तें होईल. परंतु सुरजमल्लाकडे त्यांचे चित्त फार दिसोन आलें, व जें करणें तें सुभेदाराचे अनुमतें करतात, यास्तव कठिण दिसतें. भगवत् इच्छा प्रमाण ! तुह्मीं सौ। पार्वतीबाईस पत्र पाठविलें तें पावतें केलें. बहुत संतोषी जाहाली. दादासाहेब पाठीमागून येत आहेत, नर्मदेवर आले, अशी बातमी आहे. त्यांजबरोबरही फौज भारी आहे. सारांश श्रीमंताचे दर्शन जालियावर जसा रंग दृष्टीस पडेल तसें करूं. अनमान करणार नाही. ही खातरजमा असो द्यावी. मग भगवंत् कर्तृत्व कळत नाहीं ! तुमचें येणें जाहलें तर आधीं सुभेदारांचे लष्करांत येऊन, मग काय कर्तव्य ते त्यांचें मतें करावें. तेणेंकरून प्रांत चांगला लागेल. वरचेवर बातमी लिहीत जावें. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४०९ ]
श्री शके १६८२ फाल्गुन शुद्ध ४
पौ। छ १६ रमजान चैत्र वद्य ३ सह चतोर्थी बा। कासीद जोडी धनसिंग प्रीतिराज यांजबा। आली. अजुर्दार रामचंद्र सामरान यांजकडील कासीद ते प्रांतीचे.
श्रियासह चिरंजीव राजश्री सुभानबा यांस सटवोजी जाधवराव कृतानिक आशिर्वाद उपरि येथील कुशल ता। फाल्गुण शुद्ध ४ चतुर्थी मुकाम ग्वालियेर यथास्थित असे. विशेष. आह्माकडील वर्तमान तरीः पूर्वी तुह्मांस भरतपुराहून पत्र पाठविलें आहे. का। पाणिपतावरीं अबदालीसी व आपल्या फौजांसी मुकाबला अडीच तीन महिने पडला होता. पौश शुध अष्टमीस श्रीमंत राजश्री भाऊसाहेब यांणी आपल्या फौजांनिसी अबदालीवरी चालोन घेतले. बुनगे पाठीवरी घेऊन, पुढें तोफखाना देऊन, मजबुदीनें चालोन गेले. गिलज्या गनीम भारी आणि कटा. तथापि आपले फौजांनी बरीच शर्त केली. निदान आपल्या फौजांनी सिकस्त खादली. मोड जाला. ज्यास जिकडे सोय फावली त्या मार्गे तो निघाला. बहुत लोक आपले फौजाचे मारले गेले. ज्यास सोय फावली ते निघाले. आपले लस्करचे पन्नास हजार घोडे गिलज्यांनी व गांववाले गंवारांनी घेतली. ऐसी कधींही जाली नव्हती. अतैव, ईस्वरी क्षोभ, हें खरें. देशींही दुःश्चिन्हें जाली होतीं, तीं तुह्मास ठाउकींच होती. व इकडेही तारा थोर पडला. व भूमिकंप दोनदां जाला. त्याचा फलादेश जाला. श्रीमंत राजश्री भाऊसाहेब व जनकोजी सिंदे हेहि कुण्हीकडे गेले त्याचे कांहीं ठिकाण ( रा। विश्वासराव श्रीमंत राजश्री नानासाहेबाचे पुत्र ठार जाले गोळी लागोन ) नाहीं. त्यांची काय गत आहे नकळे. वरकड लोक पायउतारा, आंगावरी पांघरूण नाहीं ऐसे, विपत्तीनें आले. रा। नारो शंकर व बाळोजी पलांडे दिल्लींत होते. दोन चार हजार फौज होती. ते पुढील पुढें निघाली. मागोन राजश्री मल्हारजी होळकर आले. हे लडाईंतून अगोधरीच निघाले होते. यांजवळी प्रस्तुत आठ दाहा हजार फौज आहे. आमचीं घोडी अवघीं दिल्लीच्या वरले सुमारे राहिलीं. तेव्हां कठीण प्रसंग येऊन पडला ! मग डोल्या करून, रातबिरात करून, श्रीपांडुरंगाच्या प्रतापें व वडिलांच्या पुण्येंकरून कुंभेर भरतपुरास आलों. तेथें सुरजमल्ल जाट यानीं फार संगोपन केलें. पंधरावीस रोज येथें राहिलों. सुरजमल्ल यांणीं आह्माजवळी येऊन खबर घ्यावी. बहुतच त्याणी आदर केला कीं, मी तुमचे घरचा, तुमचा चाकर, हें राज्य तुमचें. ऐसें प्रकारें हात जोडून बोलावें ! ऐसें प्रकारचे थोर माणूस ! त्यांणीं आपले राउत व मातबर सरदार बराबर देऊन लस्करास ग्वालेरीस पोहचाविले. आमचे खासा पथकांतील अवघे पागा सिलेदार मिळोन ( १०० ) शंभरेक राउत आले. वरकड पायउतारे आले. कुण्ही मागाहून येतात. माणसाचे हाल मोठे जाले ! हत्ती, घोडे, पालख्या, डेरे, कुलसरंजाम अवघे लस्करचा गेला. तेथें आह्मी आपले निवडून काय ल्याहावें ? सारांश, श्री कृपेनें व वडिलांचे पुण्येंकरून जिवानिसी शाबूत आलों ! राजश्री मल्हारजी होळकर व आह्मी येके जागां आहों. मुलकांतील तमाम जमीदार बदलले आहेत. दुंदी जाली आहे. श्रीमंत राजश्री पंतप्रधान सिरोंजेवरी आले. आह्मांस पत्रें आलीं कीं, तुह्मी व राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री नाना पुरंदरे ऐसे मिळोन गोहदवाल्याचा बंदोबस्त करणें. त्यावरून मागती राजश्री मल्हारजी बावा व नाना पुरंदरे, आह्मी ऐसे कूच करून गोहदेकडे शह देऊन राहिलों आहों. अबदालीकडूनही सल्याचें राजकारण मागती आलें आहे. पाहावें. जें होईल तें वर्तमान मागाहून लेहून पाठऊन. पूर्वीही सल्याचें राजशरण हमेशा येतच होतें. राजश्री मल्हारजी होळकर आदिकरून अवघ्यांचे मतें होतें कीं सला करावा. परंतु राजश्री भाऊ कोण्हाचेंही ऐकेनात. मोठे दुराभिमानास प्रवर्तले. गिलज्या गनीम भारी. त्याणें रस्तबंद केली. घासलकडी बंद केली. आपल्या लस्करांत माहागाई जाली. रुपयाचा शेर अन दोन शेर. माणसें घोडीं खायाविण उठली. तेव्हां श्रीमंतांनी दुराभिमानेंकरून गिलज्यावरी चालोन घेतलें. त्याचा हा प्रकार जाला. तो पत्रीं कोठवरी ल्याहावा ? ईश्वरास ऐसेच करणें होतें ! आह्मांविसीं कांहीं चिंता न करणें. आह्मी सुखरूप आहें. आह्मीच सलामत असल्यानें सर्व गोष्टी मिळतील. चिंता नाही. या वर्तमानामुळें कदाचित् देशांत दक्षणचा मोगल उपद्वाप करील. तरी तुह्मीं आपले ठिकाणीं सावध राहाणें. वर्तमान कोण्हास प्रगट न करितां वाडीची सावधानी करणें. तुह्मांस इशारत मात्र लिहिली आहे. वरकड वर्तमान होईल तें मागाहून लेहून पाठऊन. * बहुत काय लिहिणें ? हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४०८ ]
श्रीसांबशिव शके १६८२ माघ वद्य १२.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री त्रिंबकराव नाना स्वामीचे सेवेसीः--
पो। काशीराजशिव कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम माघ बहुल १२ जाणून स्वकीयलेखनीं हर्षवीत जावें. विशेष. बहुता दिवसांत कृपा करून पत्र पाठविलें तें पाऊन लेखनाभिप्राय कळला. आनंद जाला. येथील वर्तमान तो आपणास क्लुप्तच आहे. श्रीमंत भाऊ साहेब व श्रीमंत रावजीचें साहित्य केलें ह्मणून लिहिलें. त्यास, त्यांहीं तो उभय लोक साधन केलें. खेरीज, पुण्य कीं ऐसा योग जाला असतां चंदनादि संस्कार ब्रामणहस्तें जाला ! आह्मी असतां न होय तर कोणे कार्यास यावें ? आणिक सेवा न घडली. ईश्वरें हाच वाटा आह्मास नेमिला होता ! भगवतइच्छेस उपाय काय ? ग्रहस्त मंडळीचे साहित्यास लिहिले. त्यास, आपणाकडील रा। सखोपंत व खंडोपंत वगैरे होते व आणीकही ग्रहस्त मंडळी पांच चार शत व पांच सात हजार मनुष्यें आपले सैन्याची होती. नवाबसा।स उत्तम प्रकारें विनंती करून जें साहित्य व आपलें दास्य ते करून फतुदाबादेपुढें जटवाड्याकडे मार्गस्त केलें. सुखरूप सेवेसी पावलियां सविस्तर सांगतील. नवाबखानास या प्रसंगामुळें बहुत खेदावह जालें. परंतु उपाय काय ? भगवतसत्ता खरी. श्रीमंताचा व नवाबसाहेबांचा स्नेह अविछिन्न अकृत्रिम आहे तोच आहे. या कलेवरास पोष्यवर्गांत जाणून सदैव कृपापत्रीं सांभाळ करीत जावा. बहुत काय लिहिणें ! कृपालोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४०७ ]
श्रीरामनाम शके १६८२ माघ वद्य २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नाना यांसिः-
प्रति राजा अनुपगीर जय सदाशिव उपरि येथील क्षेम जाणून, आपलें क्षेमं ता। छ १५ रजब पा। कुशलवृत्त लेखन करून, चित्त प्रमोदवीत गेलें पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाहाले, आपणाकडून पत्रार्थ अवगत होत न होत. तेणेंकरून फार चिंत्तावस्थ निर्माण जाहलें. तितक्यांत रा। गणेश वेदांतीचा पत्रावरून सर्व साकल्यें कळों आलें. युधप्रसंगीं, छ ८ जमादिलाखर, पुशे सुध ८, बुधवारी, माहायौवनासीं झुजांत रणमंडलांतून श्रीमंत रायासी दुरानी घेऊन आले. त्या समागमें रा। बापू हिंगणे होते. ते दुसरे दिवशीं तृतीय प्रहरीं नवाब सुजातदौलाकडे वर्तगान आले. त्यासि नवाब सुजातदौला समाचार ऐकोन रायीचे लोभ आपणाजवळ आणविले. तेव्हां आह्मांसी आज्ञा केलें की येथासांग याचें सार्थक करणें. रजा दिले. तेव्हां आपले डेर्यासी घेऊन आलों. रा। गणेश वेदांती, रा। गणेश शेंकर उज्जनकर, रा। कासीराज वकील, वेणीप्रसाद यासमागमें गेलो. तितक्यांत माहा यौवनाचें नशेकची येऊन लोथ परतोन नेलें. दुसरे दिवसीं महाप्रयत्न करावा लागलिया उपरांत माहायौवनाचें शैन्यांतच होते. तिसरे दिवसीं सुक्रवारीं वर्तमान ऐकिलें कीं, रणभूमींत स्वामिर्कायीनीमत्य थोरथोर सरदार कार्येसी आले आहे. ह्मणोन वर्तमान ऐकिलें. त्यासी, नवाब साहेबासी सांगून रणभूमिका शोध केलों. त्यामधें एका शरीरासी मस्तक न होते. तें शेरीरासी पाहोन, कोणाचें आहे ह्मणोन शोध केला. त्या शरीराखालीं सात मोतीं सांपडले. त्यांचे चिन्हें उजवे पायावर केश नव्हते. दुसरें कठारीचे जखम कमरेसी होतें. ते पाहोन, सरकारचे खिजमतगार रविवारी येथ आले होते, त्यांचे नांवें बलराम, वाघोजी नाईक, रा। गणेश वेदांती, वरकड आपले कारकून मंडळी, जे आले होते, सर्वांनी पाहिलें. तेव्हां संताजी वाघ या (णि) उभयतांसी हस्तीवर घालून आणलें. मग चेंदनादिक विधी करविलें. मग अस्ती ब्रामणद्वारेंकडून रा। गणेश वेदांतीनें भागीरथीसीं पाठविलें. याउपरि आपणासी शंदेह : निर्माण जाहलें असल्या तर आला जाठाकडे कांहीं फौजा गेले आहेत त्याची बातमी आणून वकिलाचे पत्रावरून विदित केला पाहिजे. विशेषः
सो।सी गणेश शेंकर उजनकर सां। नमस्कार विनंति उपरिः येथील वर्तमान सविस्तर पत्रीं लिहिलें आहे, त्याजवरून विदित होईल. बहुत काय लिहिणें ! हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४०६ ]
श्री शके १६८२ माघ शुद्ध १.
श्रियासह चिरंजीव राजश्री सुभानबा यासीः--
सटवोजीराव जाधवराव आशिर्वाद उपरि येथील वर्तमान ता। माघ शु॥ १ मुक्काम कुंभेर यथास्थित असे. विशेष. पाणिपतावरी अडिच महिने मोर्चेबंदी करून राहिलों होतों. गिलजाचा आमचा दोकोसाची तफावत होता. सध्या फौजा पुढें, मागें बुणगें, याप्रमाणें मोर्चे बांधून, तोफा पसरून, राहिलो होतो. एक लढाई कार्तिक शु॥ १५ मेस जाली. व दुसरी लढाई आमावाशेष जाली. दोन्ही लढायांत दोहीकडील फौजा कायेमच होत्या. गिलजा आमच्या लष्कराभोंवता फिरोन रस्तबंद केली. वैरण जाळली. यामुळे लष्करांत काळ पडला. दोन अडीच शेर दाणे जाले. लोकांस अन्न न मिळे, ऐसा प्रसंग जाला. घोडीं तो बहुत लोकांचीं मेलीच होती. राहिली तींही पोटामुळे तुटली होती. निदान प्रसंग जाणोन, पौषशु॥ अष्टमी बुधवारी हल्ला केली. पुढे फौजा, त्यापुढें तोफखाना, बुणगें पाठीवर समागमें घेऊन, निघोन, मोगलावर चालोन जाऊन, जुंज उत्तम प्रकारें केलें. अडीच तीन प्रहरपर्यंत कुंज चांगलेच जालें. राजश्री विश्वासराव यांस गोळी लागोन ठार जाले. इभ्रामखान गारदी यासे गोळ्या लागोन ठार जाले. वरकडही कितेक मातबर लोक कामास आले.
आपले फौजेनें शिकस्त खादली. ज्यास जिकडे सोय पडली तिकडे निघाले. कोणी कोणास मिळालें नाही. राजश्री मल्हारजी बाबा हजार दोन हजार फौजेनशीं निघाले. रा। नारोशंकर दिल्लींत होते. त्याजपाशीं फौज पांच सात हजार होती. तितक्यानिशी निघोन, सौभाग्यवती पार्वतीबाई दोन च्यारशें स्वारांनिशी निघाली होती त्यांची राजश्री मलारजीबावाची गांठ वाटेस पडली, त्यांजला ते संभाळून घेऊन चमेलीपार भदावरच्या मुलकांत गेले. वरकड फौज बाळोच्याच्या मुलकांतून ज्यास जिकडे वाट फुटली तिकडून निघाली. वाटेनें गांव मातबर. गांवोगांव रावतांचा भरणा. जाबीगार फार. दोन रोज रात्रंदिवस गवारांचे जुंज पुरवलें. घोडीं थकोन राहिली. कोणाचे घोडें निभावलें नाहीं. तमाम फौजा पायउतारा जाली. आमचींही घोडीं तमाम थकलीं. आह्मी मागाहून डोल्यांत व गाड्यांत बसून हळू हळू कुंभेरीस आलों. तेथून भरतपूरास जात होतों तों ठाकूर सुरजमल्ल यांनी सामोरे येऊन भेटले. फिरोन ते व आह्मी समागमें कुंभेरीस आलों. तेथून रा। मलारजी बाबाकडे पत्रें लिहून पाठविलीं आहेत. त्यांचे प्रतिउत्तराची मार्गप्रतीक्षा करीत असो. दो चौ रोजांनी त्यांचे उत्तर आलें ह्मणजे येथून स्वार होऊन आपल्या परगण्यांत सिपरी व कुलारसास जाऊं. तेथून सविस्तर वर्तमान तुह्मास लिहून पाठवूं. सिपरी येथून चौ रोजांची वाट आहे. लौकरीच जाऊं. सौ। पार्वतीबाई व रा। मल्हारजी होळकर जिवानिशीं मात्र गेलीं. रा। भाऊसाहेब कोणीकडे गेले त्याचे अद्यापि ठिकाण नाहीं. रा। जनकोजी शिंदे, त्यांचेही ठिकाण नाहीं. वरकड सरदार, कोणी पुढें गेले, कोणी अद्याप मागेंच आहेत. सारांश, आपले फौजेचा विध्वंस जाला, तो लिहितां पुरवत नाहीं. ईश्वरी सत्तेनें होणार तें जालें. सिपरीस गेलियावर सर्व सरंजाम नवा केला पाहिजे. ईश्वरी कृपेनें होऊन येईल. तुह्मी कोणेविशीं जाळकी न करणें. तुह्मी आपले ठाई सावध राहणें. आपलें वर्तमान लिहून पाठविणें. बहुत काय लिहिणें ? हे आशिर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४०४ ]
श्री शके १६८२ भाद्रपद शुद्ध ९.
राजश्री पंतप्रधान गोसावी यांसिः--
छ श्रीमत् सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य नेहांकित सटवोजी जाधवराऊ कृतानेक दंडवत विनंति येथील कुशल ........ भाद्रपदशुद्ध नवमी, मुकाम शाहाजानाबाद, जाणून स्वकीय लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. विशेष. बहुत दिवस जाहाले. पत्र येऊन .....भाळ होत नाही. त्यावरून चित्त सापेक्ष असे. तरी ऐसें नसावें. सदैव आलिया वार्तिकासमवेत पत्र पाठवून सांभाळ करणार आपण समर्थ आहेत. इकडील वर्तमान तरी, वरचेवरी श्रीमंत राजश्री भाऊसाहेब यांच्या पत्रावरून निवेदन होतच असेल. श्रीमंतांचा मुक्काम सालेमार ....गासन्निध आहे. गिलज्यांचा मुक्काम यमुनेपलीकडे आहे. गिलज्याचे श्रीमंतांकडे येतात; यांचेहि त्याजकडे जातात. जाबसाल लागले आहेत. आपला दबाव भारी. श्रीमंत जें करणें तें उत्तमच करतील. आणि श्रीकृपेनें व आपले पुण्यप्रतापें सर्व गोष्टींचे यशच येईल. यानंतर चिरंजीव सुभानबा याची पत्रें व अह्मांकडील परगाणियांतील कमाविसदारांची पत्रें आली. त्यांत रा। राजाराम बाबूराव यांचा मजकूर लिहिला आहे की, परगणियांत फार सख्ति,करितात ; वाजवी अंमलदार करीत नाहींत. वाजवीस कांहीं आह्मी दुसरी गोष्टी ह्मणतच नाहीं. फार बोभाट आला. तेव्हां सेवेसी पत्र लिहावें लागलें. तरी, त्यांस उत्तम प्रकारे ताकीद करून वाजवी वर्तणुक करून सुरळीत अंमल करीत, ते गोष्ट करणार आपण घणी आहेत. आमचें तरी रयतेवरी सर्व आहे. दुस..... राजश्री बाबूजीनाईक वोंकार आपले पदरीचे व राजश्री राघो मल्हार पाबळ....कर या दोघांतून एकास राजारामपंतांकडील मामला आमचा परगणियाचा आहे, तो सरकारांतून इजारा वाजवी ठहराऊन द्यावा. ते रयत लावितील. सरकारचा पैका इजारियाप्रमाणें सरकारांत देतील. आमचा ऐवज आह्मांस पावेल. राजारामपंतच अंमलदारी करितील, आणि दुसर्याचे वस्तु न होय ऐसें नाहीं. ते केवळ रयतेवरी सख्ति करितात. आपण कृपावंत होऊन हे गोष्टी केल्यास आह्मां लोकांचें कल्याण आहे. विशेष लिहावें तरी आपण धणी आहेत. कृपा लोभ असो दिल्हा पाहिजे. * हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४०३ ]
श्रीवरद शके १६८२ चैत्र वद्य
बंधुवर्यासिरोमण राजश्री लक्ष्मण भटजी व ता। घमंडीपंत स्वामी सेवेसीः---
पो। बाबूराव गोपाळ कृतानेक सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ १४ शाबान मंगळवार नजीक मलकापुर प्रो। वराड जाणे स्वक्षेम लेखन करावें. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊसाहेब मजल दरमजल हिंदुस्थान प्रांतांत जातात. तिकडील वृत्त: राजश्री मल्हारजी होळकरांनी जाऊन सिकंदरा मारून चौ कोसावरी राहिले होते तों अबदालीची फौज आली ह्मणोन अवाई आली. हे आपले ठिकाण खबरदार होऊन जमबंदी करून, पुढें रा। गंगाधरपंततात्या व आनंदरावर... व सेट्याजी खराडे यांस फौज देऊन पाठविलें. आपण एकीकडे दा....... स आले. याजकडील त्रिवर्ग सरदार गेले होते. त्यांतून एक गंगाधरपंत कांहीं फौज घेऊन निघाले. वरकड कामास आले. गंगाधरपंत यमुना ......तरोन आगरिया पासी, फतियाबाद आहे तेथें, राहिले. मागाहून खासा ......ल्हारबाही फत्याबादेस आले. अबदाली मथुरेवर आहे. आगरियास येणार. शिंद्यास व होळकरास तों तोलेसी गोष्टी दिसत नाहीं. श्रीमंतांचे प्राक्तन ....र ! यांसच ईश्वर येश येईल. आमचे यजमानाचे हत्तीस खर्चास ....ऊन पाठवणें. आमचे माणसास अगर मुलास न पाठवणें. प्रसंग विलक्षण दिसतो. आह्मीहि नर्मदेपासून स्वार घेऊन येतों. घराचा कारखाना चालूं देणें. कनिष्ट यजमान देशीं राहिले आहेत. सावध राहत जाणें. आह्मी आलियावर चिंता नाहीं, गढींत बिगरपरवानगी आणून जाऊ न देणे. बहुत काय लिहिणे ! हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४०२ ]
श्री शके १६८२ चैत्र शुद्ध १२
आज्ञापत्र राजश्री पंतप्रधान, ता।मोकदम, मौजे चांदोरी, ....... नाशीक, सु॥ सितैन मया अलफ.
राजश्री चिंतामण दीक्षित यांणी हजूर विदित केलें कीं, मौजे मजकूर हा गांव राजश्री बापूजी माहादेव यांणीं आपणांस गाहान कर्जाचे ऐवजी पेशजी दिल्हा आहे; त्यासी, हाली मा।रनिलेनी बाबूराव गोपाळ लक्षुमणभट नामजोशी यांजपासून कर्ज घेऊन मौजे मजकूरची कम.... विस सांगितली. ह्मणून त्याजवरून हें आज्ञापत्र सादर केलें असे. त.... बापूजी माहादेव याचा अथवा बाबूराव गोपाळ व लक्ष्मणभट नामजोसी यांचा कमाविसदार गांवोस येईल तरी अंमल न देणें. चिंतामण दीक्षिताकडील कमाविसदाराकडे अमल सुरळीत देणें. कदाचित् बापूजी माहादेव याचे कमाविसदारांणी तुह्मांसी मेळऊन घेऊन दीक्षिताचे अ..... लासी खलेल केलें तरी कार्यास येणार नाहीं. जाणिजे. छ ११ साबान. आज्ञाप्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४०१ ]
श्री शके १६८१ फाल्गुन वद्य ६.
राजश्री दामोधर महादेव व पुरुषोत्त महादेव गोसावी यांसिः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। मल्हारजी होळकर दंडवत नंति उपर येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. शेष. तुह्मीं पत्रें दोन चार पाठविली ते पाऊन वर्तमान कळूं आलें. बदालीकडील वगैरे मजकूर कितेक लि॥. ऐसियास, आह्मी याप्रतिं आलिचें वर्तमान तुह्मांस एक दोन वेळां लिहिले आहे. सांप्रत बलवडियास .....लों. येथील मंजावताचा मामलत फैसल जाला. एका दों रोजांत कुच करून दिल्लीच्या सुमारें जात असों. अमित्राचें उत्तम रीतीने पारपत्य होऊन बंदोबस्त होणें तो होईल. चिंता नाहीं. तुह्मी आपल्याकडील .....मान वरचेवर तपसिलें लिहीत जाणें. रवाना छ १९ रजब. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
मोर्तब
सूद.
पौ। छ १० माहे मा।र.
श्रीह्माळसाकांत
चरणीं तत्पर खंडोजी
सुत मल्हारजी
होळकर.