[ ४०९ ]
श्री शके १६८२ फाल्गुन शुद्ध ४
पौ। छ १६ रमजान चैत्र वद्य ३ सह चतोर्थी बा। कासीद जोडी धनसिंग प्रीतिराज यांजबा। आली. अजुर्दार रामचंद्र सामरान यांजकडील कासीद ते प्रांतीचे.
श्रियासह चिरंजीव राजश्री सुभानबा यांस सटवोजी जाधवराव कृतानिक आशिर्वाद उपरि येथील कुशल ता। फाल्गुण शुद्ध ४ चतुर्थी मुकाम ग्वालियेर यथास्थित असे. विशेष. आह्माकडील वर्तमान तरीः पूर्वी तुह्मांस भरतपुराहून पत्र पाठविलें आहे. का। पाणिपतावरीं अबदालीसी व आपल्या फौजांसी मुकाबला अडीच तीन महिने पडला होता. पौश शुध अष्टमीस श्रीमंत राजश्री भाऊसाहेब यांणी आपल्या फौजांनिसी अबदालीवरी चालोन घेतले. बुनगे पाठीवरी घेऊन, पुढें तोफखाना देऊन, मजबुदीनें चालोन गेले. गिलज्या गनीम भारी आणि कटा. तथापि आपले फौजांनी बरीच शर्त केली. निदान आपल्या फौजांनी सिकस्त खादली. मोड जाला. ज्यास जिकडे सोय फावली त्या मार्गे तो निघाला. बहुत लोक आपले फौजाचे मारले गेले. ज्यास सोय फावली ते निघाले. आपले लस्करचे पन्नास हजार घोडे गिलज्यांनी व गांववाले गंवारांनी घेतली. ऐसी कधींही जाली नव्हती. अतैव, ईस्वरी क्षोभ, हें खरें. देशींही दुःश्चिन्हें जाली होतीं, तीं तुह्मास ठाउकींच होती. व इकडेही तारा थोर पडला. व भूमिकंप दोनदां जाला. त्याचा फलादेश जाला. श्रीमंत राजश्री भाऊसाहेब व जनकोजी सिंदे हेहि कुण्हीकडे गेले त्याचे कांहीं ठिकाण ( रा। विश्वासराव श्रीमंत राजश्री नानासाहेबाचे पुत्र ठार जाले गोळी लागोन ) नाहीं. त्यांची काय गत आहे नकळे. वरकड लोक पायउतारा, आंगावरी पांघरूण नाहीं ऐसे, विपत्तीनें आले. रा। नारो शंकर व बाळोजी पलांडे दिल्लींत होते. दोन चार हजार फौज होती. ते पुढील पुढें निघाली. मागोन राजश्री मल्हारजी होळकर आले. हे लडाईंतून अगोधरीच निघाले होते. यांजवळी प्रस्तुत आठ दाहा हजार फौज आहे. आमचीं घोडी अवघीं दिल्लीच्या वरले सुमारे राहिलीं. तेव्हां कठीण प्रसंग येऊन पडला ! मग डोल्या करून, रातबिरात करून, श्रीपांडुरंगाच्या प्रतापें व वडिलांच्या पुण्येंकरून कुंभेर भरतपुरास आलों. तेथें सुरजमल्ल जाट यानीं फार संगोपन केलें. पंधरावीस रोज येथें राहिलों. सुरजमल्ल यांणीं आह्माजवळी येऊन खबर घ्यावी. बहुतच त्याणी आदर केला कीं, मी तुमचे घरचा, तुमचा चाकर, हें राज्य तुमचें. ऐसें प्रकारें हात जोडून बोलावें ! ऐसें प्रकारचे थोर माणूस ! त्यांणीं आपले राउत व मातबर सरदार बराबर देऊन लस्करास ग्वालेरीस पोहचाविले. आमचे खासा पथकांतील अवघे पागा सिलेदार मिळोन ( १०० ) शंभरेक राउत आले. वरकड पायउतारे आले. कुण्ही मागाहून येतात. माणसाचे हाल मोठे जाले ! हत्ती, घोडे, पालख्या, डेरे, कुलसरंजाम अवघे लस्करचा गेला. तेथें आह्मी आपले निवडून काय ल्याहावें ? सारांश, श्री कृपेनें व वडिलांचे पुण्येंकरून जिवानिसी शाबूत आलों ! राजश्री मल्हारजी होळकर व आह्मी येके जागां आहों. मुलकांतील तमाम जमीदार बदलले आहेत. दुंदी जाली आहे. श्रीमंत राजश्री पंतप्रधान सिरोंजेवरी आले. आह्मांस पत्रें आलीं कीं, तुह्मी व राजश्री मल्हारजी होळकर व राजश्री नाना पुरंदरे ऐसे मिळोन गोहदवाल्याचा बंदोबस्त करणें. त्यावरून मागती राजश्री मल्हारजी बावा व नाना पुरंदरे, आह्मी ऐसे कूच करून गोहदेकडे शह देऊन राहिलों आहों. अबदालीकडूनही सल्याचें राजकारण मागती आलें आहे. पाहावें. जें होईल तें वर्तमान मागाहून लेहून पाठऊन. पूर्वीही सल्याचें राजशरण हमेशा येतच होतें. राजश्री मल्हारजी होळकर आदिकरून अवघ्यांचे मतें होतें कीं सला करावा. परंतु राजश्री भाऊ कोण्हाचेंही ऐकेनात. मोठे दुराभिमानास प्रवर्तले. गिलज्या गनीम भारी. त्याणें रस्तबंद केली. घासलकडी बंद केली. आपल्या लस्करांत माहागाई जाली. रुपयाचा शेर अन दोन शेर. माणसें घोडीं खायाविण उठली. तेव्हां श्रीमंतांनी दुराभिमानेंकरून गिलज्यावरी चालोन घेतलें. त्याचा हा प्रकार जाला. तो पत्रीं कोठवरी ल्याहावा ? ईश्वरास ऐसेच करणें होतें ! आह्मांविसीं कांहीं चिंता न करणें. आह्मी सुखरूप आहें. आह्मीच सलामत असल्यानें सर्व गोष्टी मिळतील. चिंता नाही. या वर्तमानामुळें कदाचित् देशांत दक्षणचा मोगल उपद्वाप करील. तरी तुह्मीं आपले ठिकाणीं सावध राहाणें. वर्तमान कोण्हास प्रगट न करितां वाडीची सावधानी करणें. तुह्मांस इशारत मात्र लिहिली आहे. वरकड वर्तमान होईल तें मागाहून लेहून पाठऊन. * बहुत काय लिहिणें ? हे आसीर्वाद.