[ ४०६ ]
श्री शके १६८२ माघ शुद्ध १.
श्रियासह चिरंजीव राजश्री सुभानबा यासीः--
सटवोजीराव जाधवराव आशिर्वाद उपरि येथील वर्तमान ता। माघ शु॥ १ मुक्काम कुंभेर यथास्थित असे. विशेष. पाणिपतावरी अडिच महिने मोर्चेबंदी करून राहिलों होतों. गिलजाचा आमचा दोकोसाची तफावत होता. सध्या फौजा पुढें, मागें बुणगें, याप्रमाणें मोर्चे बांधून, तोफा पसरून, राहिलो होतो. एक लढाई कार्तिक शु॥ १५ मेस जाली. व दुसरी लढाई आमावाशेष जाली. दोन्ही लढायांत दोहीकडील फौजा कायेमच होत्या. गिलजा आमच्या लष्कराभोंवता फिरोन रस्तबंद केली. वैरण जाळली. यामुळे लष्करांत काळ पडला. दोन अडीच शेर दाणे जाले. लोकांस अन्न न मिळे, ऐसा प्रसंग जाला. घोडीं तो बहुत लोकांचीं मेलीच होती. राहिली तींही पोटामुळे तुटली होती. निदान प्रसंग जाणोन, पौषशु॥ अष्टमी बुधवारी हल्ला केली. पुढे फौजा, त्यापुढें तोफखाना, बुणगें पाठीवर समागमें घेऊन, निघोन, मोगलावर चालोन जाऊन, जुंज उत्तम प्रकारें केलें. अडीच तीन प्रहरपर्यंत कुंज चांगलेच जालें. राजश्री विश्वासराव यांस गोळी लागोन ठार जाले. इभ्रामखान गारदी यासे गोळ्या लागोन ठार जाले. वरकडही कितेक मातबर लोक कामास आले.
आपले फौजेनें शिकस्त खादली. ज्यास जिकडे सोय पडली तिकडे निघाले. कोणी कोणास मिळालें नाही. राजश्री मल्हारजी बाबा हजार दोन हजार फौजेनशीं निघाले. रा। नारोशंकर दिल्लींत होते. त्याजपाशीं फौज पांच सात हजार होती. तितक्यानिशी निघोन, सौभाग्यवती पार्वतीबाई दोन च्यारशें स्वारांनिशी निघाली होती त्यांची राजश्री मलारजीबावाची गांठ वाटेस पडली, त्यांजला ते संभाळून घेऊन चमेलीपार भदावरच्या मुलकांत गेले. वरकड फौज बाळोच्याच्या मुलकांतून ज्यास जिकडे वाट फुटली तिकडून निघाली. वाटेनें गांव मातबर. गांवोगांव रावतांचा भरणा. जाबीगार फार. दोन रोज रात्रंदिवस गवारांचे जुंज पुरवलें. घोडीं थकोन राहिली. कोणाचे घोडें निभावलें नाहीं. तमाम फौजा पायउतारा जाली. आमचींही घोडीं तमाम थकलीं. आह्मी मागाहून डोल्यांत व गाड्यांत बसून हळू हळू कुंभेरीस आलों. तेथून भरतपूरास जात होतों तों ठाकूर सुरजमल्ल यांनी सामोरे येऊन भेटले. फिरोन ते व आह्मी समागमें कुंभेरीस आलों. तेथून रा। मलारजी बाबाकडे पत्रें लिहून पाठविलीं आहेत. त्यांचे प्रतिउत्तराची मार्गप्रतीक्षा करीत असो. दो चौ रोजांनी त्यांचे उत्तर आलें ह्मणजे येथून स्वार होऊन आपल्या परगण्यांत सिपरी व कुलारसास जाऊं. तेथून सविस्तर वर्तमान तुह्मास लिहून पाठवूं. सिपरी येथून चौ रोजांची वाट आहे. लौकरीच जाऊं. सौ। पार्वतीबाई व रा। मल्हारजी होळकर जिवानिशीं मात्र गेलीं. रा। भाऊसाहेब कोणीकडे गेले त्याचे अद्यापि ठिकाण नाहीं. रा। जनकोजी शिंदे, त्यांचेही ठिकाण नाहीं. वरकड सरदार, कोणी पुढें गेले, कोणी अद्याप मागेंच आहेत. सारांश, आपले फौजेचा विध्वंस जाला, तो लिहितां पुरवत नाहीं. ईश्वरी सत्तेनें होणार तें जालें. सिपरीस गेलियावर सर्व सरंजाम नवा केला पाहिजे. ईश्वरी कृपेनें होऊन येईल. तुह्मी कोणेविशीं जाळकी न करणें. तुह्मी आपले ठाई सावध राहणें. आपलें वर्तमान लिहून पाठविणें. बहुत काय लिहिणें ? हे आशिर्वाद.