[ ४१० ]
श्री शके १६८२ फाल्गुन शुद्ध १४.
पैवस्तगी
छ २५ माहे साबान.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री पुरुषोत्तमपंत नाना स्वामीचे सेवेसीः--
पो। बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ ११ साबान पावेतों मु॥ बुकीसराई येथें श्रीमंत सौ। पार्वतीबाईचे लष्करांत असो. विशेष. तुह्मी पत्र छ ६ साबीनचें पाठविलें तें छ ९ मिनहूस पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर राजश्री नानास व मला कळलें. पूर्वी पत्रें तुमचीं आली होती त्याचें प्रतिउत्तरें सुभेदार व गंगोबा व नाना व मी पाठविलीं. तीं पावलीच असतील. तुह्मास आण घालूनच लिहिलें असलें तर जरूर असल्यास त्याचें लष्करांत जावें. व नानांचेंही मानस असेंच होतें. परंतु सुभेदारांचे मतें आपणाजळ यावें, मग काय सांगून पाठविणें तर पाठवावें. यास्तव नानांनीही त्याप्रमाणेंच तुह्मास लिहिलें. तुह्मी पत्रें मला पाठविली ती नानाचे व माझे मतें श्रीमंताकडे पाठवावींशीं जाहालीं ह्मणून पाठवून दिली. व तुह्मीं श्रीमंतांस पत्र पाठविलें तें पाठविलें. तुह्मीं पत्रे राजश्री देवराव यांचे नांवें श्रीमंतास लिहित गेलेत. ते तर नाशकास गेले. यामुळें श्रीमंतांचें उत्तर तुह्मास न आले. पत्रच त्यास न पावलें असेल ह्मणून उत्तर न आले. आतां दोन वेळां पत्रे मी पाठविली आहेत त्यांचे उत्तर येईल, मग पाठवूं. काल छ ९ साबानीं श्रीमंत सौ। पार्वतीबाई यांनी कूच करून दरमजल श्रीमंताकडे चालली. आह्मी व राजश्री नाना समागमेंच आहों. रा। सुभेदार व बाबुजी नाईक, सदाशिव रामचंद्र वगैरे ग्वालेरीस राहिले. श्रीमंतांनी भेळशाहून कूच करून शिरोजेस आलिकडे आले. भेट सत्वरच होईल. राजश्री मिसरजी समागमेंच आहेत. श्रीमंतांचे दर्शन जालियावर जें होणें तें होईल. परंतु सुरजमल्लाकडे त्यांचे चित्त फार दिसोन आलें, व जें करणें तें सुभेदाराचे अनुमतें करतात, यास्तव कठिण दिसतें. भगवत् इच्छा प्रमाण ! तुह्मीं सौ। पार्वतीबाईस पत्र पाठविलें तें पावतें केलें. बहुत संतोषी जाहाली. दादासाहेब पाठीमागून येत आहेत, नर्मदेवर आले, अशी बातमी आहे. त्यांजबरोबरही फौज भारी आहे. सारांश श्रीमंताचे दर्शन जालियावर जसा रंग दृष्टीस पडेल तसें करूं. अनमान करणार नाही. ही खातरजमा असो द्यावी. मग भगवंत् कर्तृत्व कळत नाहीं ! तुमचें येणें जाहलें तर आधीं सुभेदारांचे लष्करांत येऊन, मग काय कर्तव्य ते त्यांचें मतें करावें. तेणेंकरून प्रांत चांगला लागेल. वरचेवर बातमी लिहीत जावें. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.