Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३८३ ]
श्री
शक १६८० चैत्र वद्य २.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दामोदर माहादेव गोसावी यासीः--
सेवक सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मी विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. कारभारीयांनीं पेचपाच केल्यावरून श्रीमंत राजश्री दादासाहेबी इतराजी केली; दबऊन मागती करार केल्याचा विस्तार विस्तारें लिहिला तो कळला. ऐशास, येविशीचें उत्तर तीर्थरूपांनी लिहिलें आहे, त्यावरून कळेल. सारांश तुह्मांकडे अंतरे आहेत, ऐसें सरदारांनी व बहुतांनी सांगितलें तथापि, तितकीहि क्षमाच जाहाली. तुह्मी आपलेकडे दाहा हजार रु॥ आहेत, ह्मणून कतबा लिहून दिल्हा असतां, अलीकडे तों रा॥ बापूजी माहादेवांनी पेचपाच वकिली रीतीनें बहुत बहुत केले. आह्मी दूर आहों ! लिहिणार आपलाले मतलबानरूप लिहितात ह्मणावें, तर प्रत्यक्ष चिरंजीव राजश्री दादा खावंद तिकडे गेले, त्यांचे प्रत्ययास आलें. त्यांनी लिहिलें व बहुतांनी लिहिलें असतां तुह्मी आपलेकडे अंतर नाहीं ह्मणोन विस्तार लिहिल्यास, प्रमाणांत येईल न ये, हे तुह्मांस न कळेसें काय आहे ? थोरथोरांनी खावंदासी पेचपाच केले, त्याचा परिणाम कधीच लागला नाहीं. तेथें, तुमचा विषय बुनियाद किती ? तुमच्या बापांनीं निष्ठापूर्वक चाकरी केली; यास्तव तुह्मांस, तुमच्या बंधूस वकालत सोपिली असतां बापूजी माहादेव यांनी पाया सोडून बेपायाच वर्तणूक केली ! यांत तुमचें कल्याण नाहीं ! अतःपर तीर्थरूपांचे आज्ञेप्रों। व चिरंजीवांचे मर्जीनरूप वर्तलियास कल्याण असे. अन्यथा तुह्मांस न कळेसें काय ? एतद्विषयीं बापूजी माहादेव यास उत्तम प्रकारें सांगून ज्यांत खावंदाची सेवा घडे, तुमच्या सेवेचा मजुरा होय, चिरंजीव तुह्मां उभयतांची तारीफ करीत, तें केल्यास, सर्वहि गोष्टीनें तुमचें बरें येथून व परमेश्वरापासून आहे ! हें पुर्ते समजोन पाया धरून निष्ठापूर्वक वर्तणुक करणें. जाणिजे. * चिरंजीवांनीं बोलाविलें असून बापूजी मनास येईल ते वलगना करून न आले. असो ! पुढें आज्ञेप्रों। सेवा करून दाखविणें; यांतच तुमचें कल्याण आहे. रा॥ छ १६ साबान. बहुत काय लिहिणें ?
( लेखनसीमा ).
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३८२ ]
श्री शक १६८० चैत्र शुद्ध १२.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नाना स्वामीचे सेवेसोः--
सेवक बापूजी माहादेव व पुरुषोत्तम माहादेव कृतानेक सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ ११ माहे शाबान मुकाम सिरहंद जाणोन स्वकीय कुशललेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. आपणांस वरचेवर पत्रें पाठवितों, परंतु प्रत्योत्तर एकही येत नाही. त्यास ऐसें नकरितां सदैव पत्रीं कुशलार्थ लिहीत गेलें पाहिजे. हालीं शाहा अबदाली लाहोरीहुन कूच करून सडे खारीनशी येऊन सिरहंदेनजीक सिखांची लढाई मारून, मग अल्ला जाठाचे मुलकांत स्वारी करून, जाठ मजकुरास धरून मुलकास मारिलें. जाठास समागमें माघारा लाहोरास घेऊन जाऊन कंधारेस पठविलें, ह्मणोन वृत्त आलें. नजिबखानानें सडे खारीनशीं शतद्रूचे मुकामीं जाऊन मुलाजमत करून माघारा दिल्लीस आला. दुसरे : शाहानशाहाचे आह्मास बोलावयाचे तीनचार तालिकचे आले. याजकरितां तिकडे चाललों आहों. तेथें गेलिया वृत्त होईल तें लिहून पाठवू. वरकड वर्तमान चिरंजीवाचे पत्रावरून कळों येईल. सदैव कृपा केली पाहिजे. भेट होय तो सुदीन ! हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३८० ]
श्री
शके १६७९.
याद कलमे स्मरणार्थ.
वजिराकडे करार श्रीमंत दादासाहेबांनी दरसाल
१२,५०,००० सरकार
५०,००० सखारामपंत
---------------
१३,०,०००
येणेंप्रा। तेरा लक्ष रुपये केले. त्यास, पांच हजार फौजेनसी वजिराजवळ अंताजी माणकेश्वर यांनी चाकरी करावी. त्यास, ऐवज वजिरापासून अंताजीपंतांनीं मरेट वगैरे माहाल लाऊन घेतले आहेत. त्यास, पहिले स्वारी श्रीमंत दिल्लीस आले. त्यासमई खंडणीचा करार जाला. त्यापैकी चाळीस लक्ष रुपये त्याचा हवाला सरकारचा आह्मी घेऊन भरणा केला. त्यास, वजिरानें आमच्या ऐवजास मरेट वगैरे माहाल लाऊन दिल्हे. त्यास, वजार बेखर्च. यास्तव, त्यास खर्चास आह्मी पैका दिल्हा. त्यास, आमचा ऐवज व्याजसुद्धां फिरे तो वजिरानें आह्माकडे माहाल चालवावे. याप्रा। करार होता. त्यास, अलीकडे खाविंदांनी घालमेल केली. यामुळें आह्माकडील माहोल गेले. वजिराकडे पैक मागावा. त्यास वजीर कड्याकुर्याची कलमें गाऊन आमचा पैका देत नाहीं कड्याकुर्याचा पैका सरकारांत आला. आह्मी मधेंच मारले जातो. त्यास, हाली माहाराज कृपावंत होऊन पूर्ववत् स्थापना करितात. त्यास, येणेंप्रा। करार करून घ्यावा कीं, तेरी लक्ष रुपये दरसाल वजिराकडे येणें. त्याचे ऐवजी मरेट वगैरे महाल अंताजीपंताकडे आहेत ते आह्माकडे घ्यावे. पाचा हाजार फौजेनसी वनिराजवळ चाकरी करून अंताजीपंत होते. त्यास आह्मी दोन हजार फौजेनसी वजिराजवळ चाकरी करूं. कार्यप्रयोजन लागलियास अधिक लागतील ते ठेऊन चाकरी करूं. तेरा लाखास सरदाराची वाटणी नाही. याच माहालावर आह्मीं कर्जदार जालों. यास्तव स्वामींनी कृपा करून दरोबस्त माहाल आह्माकडे देववावे. खंडणीचे ऐवजी आह्मी वजिराजवळ चाकरी करावी. फौजेचा व सरकारी खर्च फिटोन कांही बाकी कसर राहत जाईल ते आपले मागील कर्जांत घेत जावी. समसा मुद्दौला याजबा। चाळीसा लक्षांत मरणा केली आहे. त्यांचे माहालयाच माहालांत आहेत. त्यास, तोही ऐवज एकंदर उगवावा. दरसाल तेरा लाख रुपये वजिराकडील येणें. त्याचे ऐवजी चाकरी राउतांची व कर्जाची उगवणी करून घेत जावी. कड्याकुर्याचें लिगाड आह्माकडे नाही. याप्रों। वजिरासही ताकीद असावी. सारांश, सदरहू कराराप्रा। महाल खाऊन चाकरी वजिराची करावी व कर्ज फेडून घ्यावें. या माहाल समंधें व खंडणीसमंधें तुह्मांपासून सरकारांत कांहीं घेऊन येणें व तोटा रोटा व खर्चवेच वगैरे कलमें समजाऊन सरकारांतून तुह्मी पैका मागूं नये येणेप्रों। करार करून बापूजी माहादेव यांस अभयपत्र द्यावयासी खावंद समर्थ आहेत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३७९ ]
२
शके १६७९ फाल्गुन
पा। छ १३ शाबान.
न दिल्हे. त्यासी, जोरावरसिंग यासी फार सीण गेला आहे. त्याची रयत आपल्या अमलास राजी फार आहे. वस्ती आपण आलियावर होत चालली आहे. परंतु रयतीच्या चित्तांस वसवस एक आहे कीं, जोरा वरसिंग जमीदार आपल्यापासी हजुर येत आहे की, आपल्यापासी अर्ज करून नजर देऊन प्रा। आपले तालुके करून घ्यावा. ऐसी वार्ता उडाली आहे. जोरावरसिंग याची तयारी होत आहे; आपल्याकडे येत आहे. याकरतां रयतीस चैन पडत नाहीं जें, आपण येऊन तस्ती करावी, आणि रायाकडे मामलत दखल जालियाणें मारले जाऊं. तर श्वामींणी ( स्वामींनी ) ये गोष्टी आश्वासन निछयपूर्वक अभयपत्रें-आपल्यास एक व, रयतीस एक,- ऐसीं लि। पा।, ह्मणीजे खातरजमा होईल दुसरेः- जोरावरसिंग याजकडे वसूलप्र॥ मा।चा सर्व, व मौजे सोरो येथील,- ऐसा लागला आहे. त्यासी, ताकीदपत्रें-सरकारचीं व आपली-द्यावीं कीं वसूल घेतला आहे. हा देखतपत्र आपल्या कमावि-( स ) दारापासी देणें; जर कमाविसदारानें नालेस लि॥ तर इतराजी होऊन मारला जासील ऐसी ताकीदपत्रें ल्याहावी ह्मणजे बंदोबस्त होतो. त्याचा वसूलबाकीच कागद होतो; आणि तहसील चालीं लागेल; चिंता नाहीं. परंतु अभयपत्रें आलियाणें खातरजमा-आपली व रयतीची-होते; न आलि याणें रयतीची व आपली खराबी आहे. आपण तर एकनिष्ठ सेवक आहों. अंतराय नाहीं. मी कुटुंबचा आहे. रु॥ पांचसे बाळाजी शामराज यांणी नेले; बाकी पांचसे वसूल चौरोजांनीं येईल, व आणीक तहसीलही चाली लागेल. गुदस्ताचें हें वर्तमान. सालमारीं उत्तर प्रकारे लावणी होऊन येईल. पुढें अमल उत्तमप्रा।रें चालेल. परंतु रयतेच्या चित्तांत हा वसवस जे, राव जोरावरसिंग आपल्याकडे करून अमल घेतो, याकरतां बेदील आहेत. तर, विनंति लि॥ आहे त्याप्रो। ताकीदपत्रें व अभयपत्रें आपली ऐसीं आली पा।. सर्व उत्तम आहे *** पांचसे व आणीक अमदानी आलियावर बाळाजीपंताकडे रवाना करावी की आपल्याकडे पा। हें आज्ञा लि॥ पा।, त्याप्रमाणें वर्तणूक सेवक करील. रा। बाळाजीपतांनी, सरकारचे आणि सनदा सरकारच्या ***तंत्र आणिल्या आहेत ह्मणोन आपल्यासी कितेक बर्या वाईट गोष्टी बोलले, त्या पत्र लिहितां पुरवत नाही. त्यांणी एक सला दिली, याचा श्वा-(स्वा) मीचें अभय आलियावर आपण अनरूप होऊं. त्याची चिंता फारसी नाही. मागाहून कागद वसूलबाकीचे तयार करून पाठवून देऊं. दुसरें:– आपण एकले आहों. तर, सरकारांतून ब्राह्मण एक पा। कीं चरुचे विपत्ति फार आहे; यावर धणी आहेत. विनंति सेवेसी लि॥ आहे, त्याप्रमाणें अभयपत्रें व ताकीदपत्रें व आज्ञा लि॥ पाठवावी कीं, चित्ताचें समाधान आणि आज्ञापों। वर्तणुक करून कृपा निरंतर असो दिजे. हे विज्ञप्ति. श्रीमंत रा॥ दादासाहेबाचें वर्तमान कळत नाहीं; चिंता वाटते; तर सविस्तर लि॥ पा।. श्रीमंताचें हस्ताक्षर आलियाणें समाधान आहे. हे विज्ञाप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३७८ ]
श्री शके १६७९ माघ.
विनंती ऐसीजे : दिल्लीहून वर्तमान श्रीमंत स्वामीचे मौलारामाचे पत्रजम्मूचे बातमीचें आलें कीं, अबदाली काबुलेस आहे. त्याचा बक्षी ज्याहानखां बालखचे पातशाहावर गेला होता. तो सिकस्त खाऊन आला. कांहीं फौजही किलमाचची बारा चौदा हजार अबदाल्यानें ठेऊन आणली होती. यांसी करार कीं, माहबमाह दरमाह देत जावा. दोन च्यार महिने चढले. यांनी तमाजा केला. त्यांनी देऊ दिलाऊं जाबसाल केला. ते उठून जाऊ लागले. त्याचे समजाविशीस शाहालीखान गेला. तेसमयीं वजिरास सांगितले कीं लुटून घेणें. त्यासी यांसी लढाई जाली. वजीर सिकस्त खाऊन आले. *** चालले, गेले. कांहींक फौज अटक उतरोन या तीरास आली होती. सिखासी लढाई जाली. सिखांनी मारून वाटेस लाविलें. लठ्ठीस अबदाल्याच्या मालिकचा आला की, बाराहजार फौजनसीं येऊन शामील होणें. लठ्ठीनें जाब लिहिला की अटकेवर खासी स्वारी आलियावर येऊन मुलाजमत करून. याप्रमाणें वर्तमान जंमूस आलें, ह्मणून दिल्लीचे बातमीवाल्यानें श्रीमंत स्वामीस लिहिलें. बल्की दिलीहून एका उमद्याचेही लिहिलें याप्रमाणेंच आलें. सेवेसी कळावें. हे विज्ञाप्ति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३७७ ]
श्री शके १६७९ माघ वद्य ७.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री मोरो विनायक व त्रंबक सदाशिव का।दार प्रा। नाशीक गोः--
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सुहुरसन समान खमसैन मया व अलफ. राजश्री बाळाजी माहादेव वोक वगैरे राजश्री बापूजी माहादेव याचे घरीं गुजराथचे रसदेच्या ऐवजासाठीं कटकट करितात ह्मणून वेदित झालें. त्यास, याचा हिसेब सरकारांतून होणें आहे. त्यास, पुण्यास जाऊन हिसेब मारनिले वारीत तोंपावेतों तगादा न करीत तें करणें. हेही लौकरीच जातील. बाळाजी महादेवास वगैरे यांसी ***विसीचा निक्षूण ताकीद करणे. जाणिजे. छ २१ जमादिलाखर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३७६ ]
श्री शके १६७९ पौष वद्य ६.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री बाबूराव दादाजी गोसांवी यांसिः---
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ समान खमसैन मया व अलफ. राजश्री बापूजी महादेव यांची जप्ती पेशजी केली होती. यास कांहीं करारमदार मशारनिल्हेवर करून मोकळीक केली. ती पत्रें अलाहिदा सादर आहेत. त्यास, सदरहू ऐवजपैकी पांचालाखाची निशा राजश्री चिंतामण दीक्षित यांहीं केली. त्या ऐवजी झांशीस जप्तीची वस्तभाव मशारनिलेची होती ते गहाण दीक्षितांहीं घेतली आहे. तरी तुह्मी वकिलाची वस्तभाव वगैरे जें जप्तींत आणिलें असेल तें दीक्षिताचे हवाला करणें. जाणिजे. छ १९ जमादिलावल. आज्ञाप्रमाण.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३७५ ]
श्री शक १६७९ पौष.
राजश्री दामोधरपंत गोसांवी यांसिः--
स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि. तुह्मास जाऊन आज पाच रोज जाले. आदियाप निर्गमाची गोष्ट करून आले नाहीत. पातशाहास आर्जी आणविली. त्यास तुह्मी गेलेस तेव्हां आर्जीचा मजकुरही नवता. खिलत बहुमान देखील आणावया कांहीं विलंबाची गोष्ट नवती. हालीं तुमची चिट्ठी विलंबाचीसी दिसोन येती. तर हे गोष्ट कार्याची नाही. याउपरि आह्मांस दिरंगाखालें आणि दिसगतीवर टाकावयासी अनकूळ पडत नाही. याजकरितां श्रीमंताचीही चिट्टी आली आहे. आणि याउपर विलंब न लावितां यादीप्रों। कामकाजाचा गुंता उरकून जल्दं येणें. जर दिसगतीचीच गोष्ट असली तर साफ जाब घेऊन येणें. परंतु याउपरि एक दिवस दिरिंग कार्याचा नाही. जे याद ठराऊन मोकरर करून दिल्ही त्यापैकी एक गोष्ट उणीअधीक केली कार्यास येणार नाही. तसेच असेल तर तुह्मी साफ उठोन येणे. विलंबाखाले घालून न राहणें. बहुत काय लिहिणें ! हे विनंति.
मोर्तब
सूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ३७४ ]
श्री रामोजति
( पैवस्ती ) शके १६७९ कार्तिक शुद्ध १३.
राजश्री दामोधरपंत स्वामी गोसावी यांसीः--
विनंति उपर. तुह्मीं श्रीमंतांस लिहिलें होते की, खानखानास लाहुरास घेऊन जावें. ह्मणून सुभेदारांनी आण वाहून घेतली आहे. आणि स्वामीची तो आज्ञा समागमें यावयासी जाली. येविसींचा विचार काय ? तो ल्याहावा. त्यास, लाहुरास खानखानास पोहंचवावयास हे आहेत. त्यास, तुह्मांस श्रीमंतांच्या समागमें जरूर येणें लागतें. याजकरितां तुह्मीं येणें. लाहुरास राजश्री बापूंनीं खानखानास बा। घेऊन जाण्याचा निश्चय करून तयारीस प्रारंभ करावा. येणेप्रों। करावें. ह्मणून श्रीमतांनी आज्ञा केली आहे. त्यावरून तुह्मांस लिहिलें असे. खानखानास बाहेर येऊं न द्यावा. वजिराच्या चौक्या खबरदारीनें वाटेस बसवाव्या. हे विनंति.
पो। छ १० रा।वल.