[ ४०८ ]
श्रीसांबशिव शके १६८२ माघ वद्य १२.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री त्रिंबकराव नाना स्वामीचे सेवेसीः--
पो। काशीराजशिव कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम माघ बहुल १२ जाणून स्वकीयलेखनीं हर्षवीत जावें. विशेष. बहुता दिवसांत कृपा करून पत्र पाठविलें तें पाऊन लेखनाभिप्राय कळला. आनंद जाला. येथील वर्तमान तो आपणास क्लुप्तच आहे. श्रीमंत भाऊ साहेब व श्रीमंत रावजीचें साहित्य केलें ह्मणून लिहिलें. त्यास, त्यांहीं तो उभय लोक साधन केलें. खेरीज, पुण्य कीं ऐसा योग जाला असतां चंदनादि संस्कार ब्रामणहस्तें जाला ! आह्मी असतां न होय तर कोणे कार्यास यावें ? आणिक सेवा न घडली. ईश्वरें हाच वाटा आह्मास नेमिला होता ! भगवतइच्छेस उपाय काय ? ग्रहस्त मंडळीचे साहित्यास लिहिले. त्यास, आपणाकडील रा। सखोपंत व खंडोपंत वगैरे होते व आणीकही ग्रहस्त मंडळी पांच चार शत व पांच सात हजार मनुष्यें आपले सैन्याची होती. नवाबसा।स उत्तम प्रकारें विनंती करून जें साहित्य व आपलें दास्य ते करून फतुदाबादेपुढें जटवाड्याकडे मार्गस्त केलें. सुखरूप सेवेसी पावलियां सविस्तर सांगतील. नवाबखानास या प्रसंगामुळें बहुत खेदावह जालें. परंतु उपाय काय ? भगवतसत्ता खरी. श्रीमंताचा व नवाबसाहेबांचा स्नेह अविछिन्न अकृत्रिम आहे तोच आहे. या कलेवरास पोष्यवर्गांत जाणून सदैव कृपापत्रीं सांभाळ करीत जावा. बहुत काय लिहिणें ! कृपालोभ असो दीजे. हे विनंति.