Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

सुलतान माजूम पातशहा इ. स. १७१२त मयत झाला. त्याचे पुत्र तक्ताविषयी भांडू लागले. त्या समयीं पातशाही दरबारांत शेख अबदुलखान व हुसेनखान हे दोघे सय्यद प्रमुख होते. त्यांनी सुलतान माजुमाचे पुत्राचा पुत्र फरोजसर यास पातशाही तक्तावर इ. स. १७१३त कायम केले. दक्षणचा अधिकारी दाऊदखान पन्नी याचे जागेवर चिनकुलिचखान यास नेमिले. चिनकुलिचखानाचें पूर्वीचें नांव कमरुद्दीन असे होतें. त्यास निजामुन्मुलुख असा किताब देऊन १७१३त दक्षिणेत पाठविलें. रामचंद्रपंत अमात्य याचे पदरचा दमाजी थोरात हिंगणगावचे गढीत राहून आसपास वीस कोस मुलूख लुटीत असे. त्याचे पारपत्यास बाळाजी विश्वनाथ यास महाराजांनी नेमिले. त्यावरून फौज बरोबर घेऊन अंबाजी त्रिंबक व स्त्री राधाबाई व उभयता पुत्र बाजीराव व चिमाजी अप्पा असे बरोबर घेऊन हिंगणगावास आले. ती फौज पाहून दमाजी थोरात यानें बाह्यात्कारी गरीबी दाखवून, तहाचे बोलणें लावून भेटीकरिता बाळाजी विश्वनाथ वगैरे मंडळीस बेलभंडाराचे इमानशफत देऊन विश्वासानें बोलावून गढीत येण्याबरोबर त्यांस कैद केले. तेव्हा त्यास बेलभंडार इमान दिल्याची ओळख देतां, त्यानें उत्तर दिलें की, बेल ह्मणजे झाडपाला व भंडार आह्मी नित्य पदार्थांत खातच असतो. असे सांगून त्यांजपुढें ऊनऊन राखेचे तोबरे ठेवून मनस्वी खंडणी मागू लागला. खंडणी आल्याशिवाय सोडणार नाहीं असा त्याचा निग्रह पाहून, त्याजपाशी ओलीकरितां राधाबाई स्त्री व बाजीराव व चिमाजी आप्पा पुत्र असे ठेवून पुरंदरे व आपण परत येऊन महाराजास झालेला मजकूर कळविला. त्यानंतर महाराजांनी त्याचे कराराप्रमाणें भुर्दंड भरून बाळाजी विश्वनाथ यांची मुलेमाणसें सोडवून आणिली. नंतर आणखी थोरातावर पंतसचिव यास जावयाविषयी आज्ञा झाली. त्याप्रमाणें ते गेले असता त्यासहि कैद केलें. कान्होजी आंग्रे बिन तुकाजी आंग्रे यांनी संभाजीचा पक्ष धरून महाराजाकडील सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग वगैरे कोंकणप्रांतीचे किल्ले घेऊन पेशवे पिंगळे यांचा कल्याण प्रांतहि घेतला, त्याचे पारपत्यास प्रथम बहिरोपंत पिंगळे पेशवे गेले असतां त्यास आंग्रे यांनी कैद केल्याचें वर्तमान समजताच बाळाजी विश्वनाथ यांस आंग्र्यावर स्वारीस पाठविले. त्यांनी आंग्रे यांचा पराक्रम जाणून युध्दापेक्षां तह करावा, असे मनांत आणून महाराजांकडील अवघड किल्ले १ खांदेरी, २ कुलाबा, ३ सुवर्णदुर्ग, ४ विजयदुर्ग, ५ जयगड, ६ देवदुर्ग, ७ कनकदुर्ग, ८ फत्तेगड, ९ उचितगड, १० यशवंतगड असे दहा किल्ले व सागरगड व त्या खालील मुलुख सरंजामी गांव वगैरे होते, त्यासुध्दा आंग्रे याजकडे ठेविले.

४+

४+१

४+२

४+३

४+४

सुलतान माजूम पातशाहा औरंगझेबाचे जागी स्थापन झाल्यावर झुलफिकरखानास हैदराबादेकडे लढाईस पाठविलें. तेव्हां शाहूमहाराजांनी त्यास मदत केली. तेव्हा त्यानें पातशाहास सांगितलें कीं तुह्मी शाहूस अनुकूळ करून घेतल्यास तुमचें हित होईल. त्यावरून शाहूस दक्षिणेतील सरदेशमुखीची सनद देण्यास सिध्द झाला. परंतु तेव्हां ताराबाईचे वकीलांनीं तक्रार केल्यावरून, राज्याचा मालक वास्तविक कोण हे ठरेपर्यंत सनद देण्याचें तहकूब ठेविलें. सनदा ताराबाईचे पुत्र शिवाजी यांच्या नांवें तयार झाल्या होत्या. इकडे शाहूमहाराज दिल्लीहून येतांना त्यांणीं वऱ्हाड व खानदेशातील दोन सरदार वश केले व हैबतराव निंबाळकर व नेमाजी शिंदा वगैरे सरदार अनुकूळ करून एकंदर १५००० फौज जमवून साताऱ्यास येत असतां ताराबाईकडील धनाजी जाधवराव व प्रतिनिधि फौजसुध्दां शाहूमहाराजावर चालून आले. त्यांशी लढाई पुण्यानजीक कसबें खेड येथे होतानाना धनाजी जाधवराव शाहूमहाराजास मिळाला. प्रतिनिधि पळून गेले. पुढें त्यास कैद केले. शाहूमहाराज साताऱ्यास आले. गादीवर बसल्यावर परशराम त्रिंबक प्रतिनिधि यास कैद करून गदाधर प्रल्हाद प्रतिनिधी केला, व बहिरोपंत पिंगळे यास कायम पूर्वीप्रमाणें केले. सेनापती धनाजी जाधवराव पूर्वीचें यांजकडे असलेले प्रांताचे वसुलाचें काम सांगितलें. त्या कामावर धनाजीनें दोन कारकून ठेविले. एक अंबाजी त्र्यंबक पुरंधरे व बाळाजी विश्वनाथ; व त्यांची व महाराजांची भेट करविली. पुढे कांही दिवसांनी इ. स. १७१० साली धनाजी जाधवराव यांस पायावर जखम झाली होती त्यायोगें वारणातीरी वारले. त्यांजबरोबर बाळाजी विश्वनाथ होते. धनाजी जाधव विद्यमान अजारी असतांच त्यांचा सर्व कारभार बाळाजी विश्वनाथच चालवीत असत. ह्मणून महाराज यांचीहि प्रीति त्यांजवर बसली होती. धनाजीराव वारल्यावर बाळाजी विश्वनाथ यास सेनाकर्ते असा किताब महाराजांनी दिला. याजमुळे धनाजीराव यांचे पुत्र चंद्रसेन जाधव याणीं बाळाजी विश्वनाथाविषयी द्वेष करण्यास आरंभ केला. सेनाकर्ते हे पद बाळाजी विश्वनाथास इसन्ने अशर मया व अलफ छ १७ रजब रोजी मिळाले.  

३+  

३+१ 

३+२ 

३+३ 

३+४ 

३+५ 

दिल्लीचा पातशाहा औरंगझेब याणें संभाजी महाराजांस तुळापुरी ठार करून, त्यांची बायको येसूबाई व मुलगा ह्यांस इ. स. १६९०त धरिले. त्यावेळेस शिवाजीचे वय ६ वर्षांचे होते. औरंगझेबाची मुलगी बेगम इणें शिवाजीस आपला मुलगा समजून त्याचे व
येसूबाईचें पालण उत्तम प्रकारे केलें. संभाजी आपल्याकरितां मेला, सबब लग्न करणे नाहीं, असा निश्चय बेगमेनें केला होता. औरंगझेबाचा मृत्युकाल समीप आल्यावेळी बेगमेनें विनंति शाहूस मुक्त करण्याविषयी केली. तेव्हा पातशाहानें उत्तर दिल्हें की मजला हल्ली तीन पुत्र आहेत व एक कन्या तूं आहेस. तुझा चौथा वाटा तुझे पुत्रास ह्मणजे शाहूस दिला व याशिवाय सहा सुभे दक्षणची सरदेशमुखी वतन दिल्हे. असे सांगून सनदा तयार करून मुदबखांतून एक भाकर आणून त्यातून अर्धी भाकर व सनदा शाहूचे ओट्यांत घातल्या आणि मस्तकीं हात ठेवून बहुत दिवस राज्य करशील असा आशीर्वाद दिल्हा आणि आह्मीं असतां यास सोडिले असता आमचे नेमांत अंतर पडेल याजकरितां आमचे पश्चात् यास सोडावे असे बेगमेस बोलून शके १६२८ मार्गशीर्ष  व. ३० शनिवारी निवर्तले, नगर मुकामीं त्यांची कबर रोज्यास नेऊन केली. ती मोकळी आहे. तिजवर घुमट नाहीं. त्या कबरीवर बेगमेंने आपल्या हातें जाईचा वेल लाविला तो अद्याप कायम असून, बारमाहीं फुले येऊन कबरीवर पडत असतात. ग्रांट डफचे बखरीत ता. २१ फेब्रुवारी सन १७०७ इसवीत मयत झाल्याची तारीख लिहिली आहे तींत व वरील मित्तींत अजमासें दोन महिन्यांचे अंतर आहे. 

औरंगझेबास तीन पुत्र होते, वडील सुलतान माजूम, दुसरा अजीमशा व तिसरा कामबक्ष. त्यांमध्यें तक्ताविषयीं भांडण लागलें. सुलतान माजूम व अजीमशा यांची लढाई झाली. तींत अजीमशा पुत्रासहित मरण पावला. कामबक्ष याजवर सुलतान माजूम याणें झुलफिकरखानास पाठविलें. त्या लढाईत कामबक्ष मरण पावला. मग माजूम तक्ताधीश झाला. सुलतान माजूम याने झुलफिकरखानास दक्षिण प्रांतांचा अधिकार दिला. औरंगझेब मरतेसमयी जवळ एक पुत्र अजीमशा होता. त्यानें मराठ्यांचे उपद्रवामुळें शाहूची आई व भाऊ व बायको ओलीस ठेऊन शाहूस मुक्त केलें. तेव्हां शाहूमहाराजांनी त्यांशी करार केला होता कीं मला राज्यपद मिळाल्यास मी तुमचे आज्ञेंत वागेन. त्याजवर अजीमशानें उत्तर केले की, जर तूं नीट वागलास तर तुझे बापानें घेतलेला मुलूख व भीमा आणि गोदा या दरम्यानच्या मुलूखांपैकी कांहीं देऊं.

 

पेशव्यांची शकावली
इ. स. १७६१ पर्यंत.

बाळाजी विश्वनाथाची हकीकत.

१ बाळाजी विश्वनाथ व जानो विश्वनाथ हे दोघे सख्खे बंधु, कोकणस्थ ब्राह्मण, उपनांव भट. राजपुरी प्रांतात जंजीरकर हपशीं यांचे मुलखांत श्रीवर्धन परगण्याचे हे वतनदार देशमुख. जानोजी विश्वनाथ यांस कोणे एके दिवशी हिशेबाकरितां जंजि-यांत हपशी अधिकारी यांनीं बोलावून नेऊन एकाएकी गोणत्यांत घालून समुद्रांत बुडविलें. हे वर्तमान बाळाजी विश्वनाथ यांस श्रीवर्धन गांवी कळतांच त्या दहशतीनें एकदम सहकुटुंब, दोघे पुत्र,वडील बाजीराव व धाकटे चिमाजी अप्पा, यासुध्दां सर्व घरादाराचा त्याग करून, श्रीवर्धननजीक वेळास येथे रामाजीपंत व बाळाजीपंत भानु यांच्या येथें पूर्वीच्या ओळखीनें मुक्कामास येऊन राहिले. झालेली हकीकत सांगितली. रोजगारास सातारे प्रांती जावयाचें आहे ह्मणून सांगितलें. भानूही बरोबर रोजगारास निघतो ह्मणून ह्मणाले. ईश्वरकृपेनें जी भाजीभाकर मिळेल, त्यांतील चतकोर भानूंस देण्याचें अभिवचन देऊन, बाळाजी विश्वनाथ भट साता-यास जाण्याकरितां निघून पुरंदर किल्ल्यानजीक सासवडास आले. त्या गांवचे कुळकर्णी व देशपांडे अंबाजीपंत पुरंधरे प्रसिध्द होते. त्यांचें घरी मुक्कामास उतरले. त्यांस पुरंदरे यांनी आपले घरी कांही दिवस ठेवून घेऊन काय निमित्त आला ह्मणून विचारलें. रोजगारास निघालों वगैरे हकीकत कळविली. सातारा राजधानीत धनाजी जाधवराव वगैरे मोठमोठे नामांकित सरदारांच्या आश्रयानें रोजगार लागेल असें मनांत आणून, भटांच्या बरोबर पुरंधरेही साता-यास दाखल झाले. रामाजीपंत भानु व बाळाजीपंत भानु या उभयतांची ओळख साता-यास राहणा-या महादाजी कृष्ण जोशी यांशी होती. त्यांस ते भेटले. ते व जोशी शंकराजी नारायण पंतसचिव यांजकडे कारकुनीवर राहिले. सचिव हे ताराबाईचे कारभारांत प्रमुख होते. बाळाजी विश्वनाथ व अंबाजीपंत पुरंधरे यांची विशेष ओळख कोणाची नव्हती. धनाजी जाधवराव सेनापति मोठे सरदार, यांची त्या राजधानींत मान्यता मोठी असा लौकिक ऐकिवात होता. सबब त्यांची भेट घेऊन आपली सर्व हकीकत त्यांस कळविली. त्यावरून त्यांणी यांची बोलण्याची वगैरे हुशारी पाहून आपले पदरी दौलतसंबंधी लिहिण्याचे कामावर उभयतांस ठेविले व तेहि हुशारीनें कामकाज बघत आले. यामुळे जाधवराव यांचाहि विश्वास व लोभ विशेष झाला. ही सर्व हकीकत १७०७ इसवीच्या अगोदर झाली. १+ १++

 

उपोध्दात

''पुढील दहा-वीस वर्षांतील इतिहासजिज्ञासूंचें पहिलें काम ह्मटलें ह्मणजे अस्सल कागदपत्रें शोधून काढून ती छापण्याचें आहे'', असें विधान ''मराठयांच्या इतिहासाची साधनें '' ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेंत दहा-पांच महिन्यांपूर्वी मी केलें होतें. त्याच्या अनुरोधानें ग्रंथमालेच्या ह्या महिन्याच्या अंकापासून मजजवळ जमा झालेले कांही ऐतिहासिक लेख छापून काढण्याचा उपक्रम मी आज करीत आहे. कोणताहि ऐतिहासिक लेख छापून काढण्यांत, माझ्या मतें, खालील दोन मुद्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक लेख पूर्णपणें शुध्द असा छापून निघाला पाहिजे हा पहिला मुद्दा आहे व प्रत्येक लेखातून जेवढी ह्मणून ऐतिहासिक माहिती, साक्षात् व परंपरेने, निघण्यासारखी असेल तेवढी चोपून काढून घेतली पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे. हे दोन मुद्दे इतके महत्त्वाचे आहेत की, जो कोणी त्याकडे दुर्लक्ष्य करून आपलें काम चालवील त्याला, इतिहासक्षेत्रात प्रवेश करण्याचादेखील परवाना देतां कामा नये. पहिल्या मुद्दयाविरुध्द जो काम करितो, तो स्वत:चा हलगर्जीपणा लोकांना दाखवितो, इतकेंच नव्हे; तर त्यांना संशयात पाडून एका प्रकारें फसविण्याचेही महापातक करितो. दुसरा मुद्दा तर, ऐतिहासिक लेख छापून काढण्याचा प्रधान हेतु आहे. हे दोन मुद्दे ध्यानांत धरून मी आपलें काम चालविणार आहे. ह्या अंकात पेशव्यांच्या एका शकावलीस प्रारंभ केला आहे.
 
काव्येतिहाससंग्रहांत तीन व भारतवर्षांत एक मिळून आजपर्यंत पेशव्यांच्या एकंदर चार लहान मोठया शकावली प्रसिध्द झाल्या आहेत. ह्या चारींपैकीं पूर्णपणें विश्वसनीय अशी एकही नाहीं. ह्मणून ही पांचवी शकावली प्रसिध्द करण्याची विशेष जरूर भासली. ही शकावली काव्येतिहाससंग्रहकारांच्या दफ्तरांतील असून, तपशीलवार व विश्वसनीय अशी आहे. शकावलीतील प्रत्येक तिथीची व तारखेची इंग्रजी तारीख दिली असून, ग्रांट डफच्या ग्रंथाहून जास्त किंवा निराळी माहिती जेथे दिलेली असेल, तेथे खुलासेवार टिपा दिल्या आहेत. प्रस्तुत शकावली पेशव्यांच्या बारनिशींतून व दफात्यांतून जुळवलेली असून, जुळवणारा मोठा प्रामाणिक लेखक असावा असें वाटतें. शकावली रचणाऱ्यानें अव्वल इंग्रजीत आपले काम केलें, असे डफच्या इतिहासाचा पाच-चार वेळा त्याने उल्लेख केला आहे, त्यावरून दिसतें. पेशव्यांच्या दफ्तरांची बरीच माहिती असणारे प्रसिध्द पेणसे हे ह्या शकावलीचे कर्ते असावेत, असा माझा तर्क आहे. पेशव्यांच्या दफ्तराची बरीच माहिती असणारे दुसरे वृध्द गृहस्थ जे. रा. हडपसरकर त्यांच्या येथें ह्याच शकावलीची मी एक प्रत पाहिली होती. दहा वीस वर्षांपूर्वी नगरास असताना काव्येतिहाससंग्रहकारांनी ही शकावली उतरून घेतली. ती माझ्या हाती चार सहा महिन्यांपूर्वी आली. बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीच्या प्रारंभापासून बाळाजी बाजीरावाच्या अखेरीपर्यंत हींत तारखा दिल्या आहेत. टिपा देताना पुराव्याच्या उणिवा कोणत्या असतात तेंही सांगितले आहे. 

समग्र राजवाडे साहित्याचे संकेतस्थळ म्हंटले की इतिहासाचार्य राजवाड्यांचे जे जे म्हणून लिखाण झाले ते सर्व त्यावर येणार हे स्पष्टच आहे. राजवाड्यांचे साहित्य बहुआयामी आहे. त्यांचे लेखन आणि संशोधन कर्तृत्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही. राजवाड्यांच्या लेखनाची समग्रता समजून घेताना त्या समग्रतेत येणारे खालील विविध विषय आणि प्रकार यावर कटाक्ष टाकायला हवा.

राजवाड्यांच्या लेखनाचा परीघ

 १) आत्मचरित्रविषयक लेखन
राजवाड्यांचे स्वतःचे एक सलग असे आत्मचरित्र प्रकाशित झालेले नाही. मात्र, त्यांनी वेळोवेळी आपले अनुभव आणि आठवणी वेगवेगळ्या वेळी लहानमोठ्या लेखांच्या किंवा टिपणांच्या स्वरूपात लिहील्या आहेत. त्या खेरीज राजवाड्यांनी लिहीलेली पत्रे देखील त्यांच्या आत्मकथनाची भूमिका काही प्रमाणात बजावताना दिसतात. राजवाड्यांच्या आठवणींचा काळ अगदी त्यांच्या बालवयापासून सुरू होतो, तो अगदी त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत त्याचा अवधी पसरलेला आहे.

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने
‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या शीर्षकाचे एकूण २१ खंड राजवाड्यांनी लिहीले. पहिला खंड १८९९ मध्ये प्रकाशित झाला आणि त्यानंतर सरासरी दीड वर्षांच्या अंतराने पुढले खंड येत गेले. शेवटचा २१ वा खंड यायला १९१८ साल उजाडावे लागले. म्हणजेच १८९९ ते १९१८ ही सुमारे वीस वर्षे राजवाडे मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित खंडांच्या प्रकाशनावर काम करीत होते. एकीकडे पुरावे, कागदपत्रे गोळा करण्यासाठी संपर्क, गाठीभेटी, प्रवास चालला होता, तर दुसरीकडे खंडाची पाने उभी रहात छपाई होत होती. १८९९ मध्ये राजवाड्यांचे वय ३५ वर्षांचे होते. त्या अगोदर किमान दहा वर्षे म्हणजे वयाच्या पंचविशीपासून ते मराठ्यांच्या इतिहासाला भिडले होते.

इतिहास लिहीण्यापूर्वी तो लिहीण्यासाठीचे कागदोपत्री व इतर साधनांचे (शिलालेख, ताम्रपत्रे वगैरे) पुरावे गोळा करायला हवेत, व त्या आधारेच इतिहास लिहीणं शक्य आहे, अन्यथा नाही असा राजवाड्यांचा ठाम विश्वास होता. अगदी सुरूवातीचा अपवादा‍त्मक नगण्य काळ सोडला तर राजवाड्यांनी आयुष्यभर कोणताही व्यवसाय किंवा नोकरी केली नाही. त्यांच्या मागे कोणत्याही आर्थिक बळाची पार्श्वभूमी नव्हती. अशा चणचणीच्या आर्थिक स्थितीला तोंड देत राजवाड्यांनी भारतभर भ्रमंती केली. ती भ्रमंती मुख्यत्वे ऐतिहासिक व संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी होती. त्यासाठी त्यांना बराच खर्च येत असे. त्या व्यतिरिक्त जी कागदपत्रे, पोथ्या, ग्रंथ वगैरे ज्यांच्याकडे असत ते राजवाड्यांकडे त्याची किंमत मागत. त्यासाठीही त्यांना पैसा लागत असे. त्यांची ती आर्थिक गरज आणि त्यांचे उत्पन्न यांचे व्यस्त प्रमाण राजवाड्यांनी आयुष्यभर सोसले. त्यांनी जे लेख लिहीले, वा प्रदीर्घ लेखन केले त्यातून मिळणारा पैसा, आणि दानशूर व्यक्ती वा स्नेही किंवा परिचितांकडून मिळणारी देणगीवजा मदत त्यांची आर्थिक गरज पुरविण्यासाठी पुरेशी नसे. असं असतानाही राजवाड्यांनी सुमारे ५ लाख कागदपत्रे जमा केली. ती आज धुळे येथील राजवाडे संशोधन मंदिर ह्या संस्थेत जतन करण्यांत आली आहेत.

राजवाड्यांनी जमविलेल्या मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित कागदपत्रांवर आधारित त्यांनी लिहीलेल्या टिपणांमधून ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ चे एकवीस खंड त्यातून प्रकाशित झाले. शिवाजी महाराजांचा काळ, पेशव्यांचा काळ व त्या काळातील विविध राजघराण्यांच्या वा कुटुंबांच्या बखरी, पत्रव्यवहार वगैरे ऐतिहासिक खजिना ज्यात आहे असे हे एकवीस खंड ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आले आहेत.

३) संस्कृत भाषेविषयीचे लिखाण
‘संस्कृत भाषेचा उलगडा’ हे एका ग्रंथाचा ऐवज होईल इतके सलग लिखाण राजवाड्यांनी केले आहे. राजवाड्यांनी काही पत्रे म.म.दत्तो वामन पोतदार यांना संस्कृत मधून लिहीलेली आढळतात. अभ्यासकांसाठी ‘संस्कृत भाषेचा उलगडा’ हा ग्रंथ व उपलब्ध झालेल्या संस्कृत पत्रांचा समावेश ह्या संकेतस्थळात करण्यांत आला आहे.

४) मराठी भाषेविषयीचे लिखाण
मराठी भाषेतील धातूंचा कोश, विविध व्युत्पत्तिंचे कोश, आणि व्याकरणाच्या विविध अंगांविषयीचे राजवाड्यांचे अक्षरशः शेकडो पाने भरतील इतक्या लेखांचे संकलन आजपर्यंत विविध व्यक्ती व संस्थांनी केले आहे. उपलब्ध झालेले मराठी भाषा विषयक हे सर्व कोश व लेख ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आले आहेत.

५) समाजशास्त्रीय राजकीय विषयांसंबंधीचे लेखन
‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ ह्या राजवाड्यांच्या पुस्तकात इतिहासाच्या बरोबरीने समाजशास्त्रीय विश्लेषण आढळते. राजवाड्यांनी तात्कालिक राजकारणावर टीकात्मक लेखन केले आहे. उदाहरणार्थ, नामदार गोपाळ कृष्ण गोखले ब्रिटिशांशी चर्चा करण्यासाठी इंग्लंडला गेल्यानंतर राजवाड्यांनी ‘गोखल्यांची इंग्लंडांतील कामगिरी’ नावाचा लेख ‘विश्ववृत्त’ मासिकात लिहिला. राजवाडे लिहितात, ‘कित्येक लोक तर असेही बोलतात की, सयाजीराव गायकवाडाप्रमाणे विलायतेस जाण्याची गोखल्यांना चटक लागली इतकेच. बाकी त्यांच्या जाण्यांत काही विशेष मतलब नाही, आणि यदाकदाचित काही मतलब असला तरी विशेष हांशील नाही, निदान फलप्राप्ति तरी काही एक होणार नाही. आणि काही झालीच तर ती कटुफळाची होईल, गोडाची होणार नाही.’
राजवाड्यांनी गोखल्यांवर केलेली वरील टीका म्हणजे अतिशय सडेतोड व परखड भाष्य आहे. खरं तर तो लेख एखाद्या अग्रलेखासारखा आहे. याचाच दुसरा अर्थ हा की राजवाडे यांनी प्रासंगिक लेखांतून अप्रत्यक्षपणे पत्रकारिता केली आहे. त्यांचे असे लेखही ह्या संकेतस्थळावर येत आहेत. राजवाड्यांनी त्यांचे लेख निरनिराळ्या नियतकालिकांमध्ये लिहिले. ते लेख एकत्र करून लेखसंग्रह प्रकाशित करण्याचे वेगवेगळे प्रयत्न पूर्वी झाले आहेत. असे लेखसंग्रहातून आलेले, व न आलेले लेख एकत्र करून विषयानुरूप वर्गीकरण करून ते ह्या संकेतस्थळावर देण्याचा प्रयत्न आहे. आजमितीस ते काम प्रगतीपथावर आहे.

६) राजवाड्यांचे साने गुरूजी लिखित चरित्र
राजवाड्यांच्या विद्वत्तेविषयी सानेगुरूजींच्या मनात एवढा आदर होता की राजवाड्यांचे संपूर्ण चरित्र त्यांनी पुस्तकरूपाने लिहिले. ते संपूर्ण चरित्र ह्या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे. वाचकांना ते उद्बोधक वाटेल असा विश्वास वाटतो.

सर्च किंवा शोधाच्या सोयीचे महत्व
राजवाड्यांचे लेखन हे मूळात संशोधनात्मक आहे. इतिहासासारखा विषय त्यामागे असल्याने आजच्या संशोधकांना त्यांच्या कामासाठी असंख्य संदर्भ त्यात मिळतील. त्यासाठी संकेतस्थळावरील सर्चची सोय म्हणजे पर्वणी आहे. राजवाड्यांचे मौलिक लेखन आणि आजच्या तंत्रज्ञानाने दिलेली संदर्भ शोधण्याची सोय असा संगम ह्या संकेतस्थळावरच आढळेल.
राजवाड्यांचे लेखन प्रकाशित झाले याला आता १०० वर्षे होत आहेत. त्यावेळची पुस्तके, लेख आता शोधणे यासारखे अवघड आव्हान दुसरे नसेल. कित्येक ग्रंथालयांमध्ये वाळवी किंवा २६ जुलैचा पाऊस वगैरे कारणांमुळे मूळात पिवळी पडलेली पाने नष्ट झाली आहेत. त्यामुळे छापिल पानांचा शोध लागून ते साहित्य जसजसे उपलब्ध होत जाईल तसतशी त्याची भर संकेतस्थळावर पडत राहील. राजवाड्यांचे हे सारे लेखन युनिकोड स्वरूपात टाईप करून, व त्याचे मुद्रितशोधन करून उपलब्ध करताना त्रुटी राहिल्या आहेत. त्यांचे शुद्धिकरणही केले जात आहे. आपल्या निदर्शनास काही त्रुटी आल्यास, अथवा आपल्या काही सूचना असल्यास, कृपया संपर्कासाठी जो फॉर्म ह्या संकेतस्थळावर दिला आहे त्या माध्यमातून कळवावे अशी विनंती आहे.
धन्यवाद.

प्रस्तावना 

अत्यंत महत्त्वाचा व उपयोगाचा पत्रव्यवहारच छापतां छापतां जेथें नाकींनव येत आहेत, तेथें क्षुल्लक व निरुपयोगी चिटोरी छापीत बसण्याचें साहस होणार कसें? ब्रह्मेंद्रस्वामीचीं तेलातुपाचीं पत्रें ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचीं वाटलीं म्हणूनच छापिलीं आहेत. ब्रह्मेंद्रस्वामी निरिच्छ होता, परमहंस होता, सूत्रधार होता, राजकार्यकुशल होता, वैगरे नानाप्रकारच्या कल्पना आजपर्यंत प्रचलित होत्या. त्या कितपत ख-या आहेत हें दाखवितांना ही तेलातुपाचीं पत्रें छापणें आवश्यक झालें. पत्रव्यवहारावरूनच जर मनुष्याच्या स्वभावाची व कर्तृत्वाची पारख करावयाची असेल- व ऐतिहासिक पुरुषांच्या स्वभावाची पारख इतर कोणत्याहि साधनानें इतकी चांगली करतां येणें अशक्य आहे- तर त्या पत्रव्यवहारांत कोणत्या गोष्टीला किंवा इच्छेला विशेष प्राधान्य दिलें आहे तें पाहिलें पाहिजे. ब्रह्मेंद्रस्वामीच्या आवक व जावक अशा सहाशें पत्रांत ज्यांत कांहीं जिनसांची मागणी केली नाहीं अशीं ५० हि पत्रें नाहींत. खरबुजें, कलंगडीं, द्राक्षें, नारळ, वस्त्रें, पात्रें, गांवे, भिक्षा, कर्जे, व्याजें ह्यांची मागणी ह्या सहाशें पत्रांतून केलेली आहे. निवळ राजकीय महत्त्वाचीं अशीं स्वामीला पाठविलेलीं पत्रें दहा विसांहून जास्त नाहींत. कित्येक राजकीय पत्रें इतर लोकांना आलेलीं स्वामीनें मागून आणविलेलीं आहेत. सारांश “जिनसांची मागणी” ही स्वामीच्या हृदयांतील मोठ्या हव्यास होता. मागणीचें जो समाधान करील तो प्रिय व न करील तो अप्रिय, असा स्वामीचा कायदा असे. स्वामीच्या दफ्तराप्रमाणें इतरहि पांच पन्नास दफ्तरें मीं पाहिलीं आहेत. फडणीस, पुरंधरे, हिंगणे, थोरात, पंत राजाज्ञा, फडके, रास्ते पटवर्धन, वगैरेचीं चिटणिशीं दफ्तरें पहावीं तर त्यांत राजकीय कारभाराचे शेंकडो कागद सांपडतात. नाना फडणिसाच्या दफ्तरांतींल ३०,००० पत्रांपैकीं एकहि पत्र राजकीय नाहीं असें नाहीं; व एकाहि पत्रांत राजकीय दृष्ट्या क्षुल्लक किंवा निरुपयोगी मजकूर लिहिलेला सांपडावयाचा नाहीं. परंतु स्वामीचीं पत्रे पहावीं तर त्यांत राजकारणेतर मजकूरच विशेष आढळतो. त्या राजकारणेतर मजकुराचें स्वरूप काय, स्वामीच्या हव्यासाची दिशा कोणती, वगैरे गोष्टींच्या सिद्धीस पुरावा असावा म्हणून हीं तेलातुपाचीं पत्रें छापिलीं आहेत. त्यांच्याकडे यथार्थ दृष्टीनें पहाण्याची संवय लावून घेतल्यास तक्रारीस जागा राहाणार नाहीं.

३६. हें ब्रह्मेंद्र प्रकरण आटोपल्यावर कायगांवकर दीक्षितांच्या पत्रांकडे वळावयाचें. परंतु १७४० पासून १७६१ पर्यंतचा आणखी कांहीं पत्रव्यवहार छापावयाचा आहे. त्यावेळीं त्या पत्रांची उपयुक्तता दाखविली जाईल. येथें इतकेंच नमूद करून ठेवितों कीं दीक्षितांचा पत्रव्यवहार फारच महत्वाचा आहे.

प्रस्तावना 

३४. रा. पारसनीसांनी छापलेल्या पत्रव्यवहारांपैकी ब-याच पत्रांना तारखा दिल्या नाहीत. कित्येक पत्रांच्या तारखा चुकलेल्या आहेत व कित्येक पत्रांवरील टीपा ऐतिहासिक माहितीला धरून नाहींत, असे मागें मीं म्हटले आहें. अर्थात् सदर पत्रव्यवहारांतील ख-या तारखा देणें व टीपा सुधारणें अत्यंत अवश्यक झालें आहे. ज्या पत्राला पारसनिसांनीं तारीख दिली नाहीं तेथें कोरी जागा सोडली आहे.
पत्रव्यवहार.
(तक्ता....)

३५. ब्रह्मेंद्रस्वामीच्या व कायगांवकर दीक्षितांच्या पत्रांवरून ऐतिहासिक माहिती काय मिळते ती दाखविण्याची प्रतिज्ञा ह्या प्रस्तावनेच्या आरंभी केली होती. त्या प्रतिज्ञेप्रमाणें ब्रह्मेंद्रस्वामीच्या पत्रव्यवहाराचा खल येथपर्यंत झाला. हा खल करतांना रा. पारसनीस यांनीं छापिलेल्या ब्रह्मेंद्राच्या पत्रांचाहि विचार केला. ब्रह्मेंद्रस्वामीचीं जीं आज सहाशें पत्रें उपलब्ध होऊन प्रसिद्ध झालीं आहेत, त्यांपैकीं निम्यांत, तेल, तूप, चंदन, केशर, किनखाप, घोंगडी, दुलई, घंटा, नगारा वगैरे जिनसांची मागणी स्वामीनें त्यावेळच्या मोठमोठ्या लोकांजवळ केलेली आहे. ह्या मागण्या स्वामींनें कधीं स्वतंत्र पत्रांतून केल्या आहेत व कधीं इतर मजकूर लिहितांना शेवटीं केल्या आहेत. क्षुल्लक मागण्यांचीं ही असलीं काहीं पत्रें छापिलेलीं पाहून अशी तक्रार निघाली कीं हीं असलीं पत्रें छापून काय ऐतिहासिक ज्ञान मिळणार? ऐतिहासिक पत्रव्यवहार छापणा-यानीं क्षुल्लक व निरुपयोगी चिटोरी छापूं नये, अशी इशारत करणारा कांहीं जागरुक वाचकसमूह महाराष्ट्रांत आहे हें पाहून मला बरेंच समाधान वाटलें. तक्रार खरी असो अगर खोटी असो. तक्रार तरी करण्याइतकी काळजी ऐतिहासिक पत्रव्यवहारासंबंधानें लोकांना वाटते ही कांहीं सामान्य गोष्ट नव्हे. आतां तक्रार करणा-यानीं एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे कीं, तक्रार करणा-या लोकांप्रमाणें मलाहि क्षुल्लक व निरुपयोगी चिटोरीं छापण्याचा तिटकाराच आहे. उगाच कांहीं तरी भारुडा छापून कोणाला भिवडवायाचें आहे, किंवा फसवावयाचें आहे, किंवा वेळ मारून न्यावयाची आहे, किंवा प्रौढी मिरवावयाची आहे, अशांतला प्रकार नाहीं. असा खेळ करण्याला वेळहि नाहीं, कारणहि नाहीं व फाजील पैसाहि नाहीं. अठराव्या शतकांतील मराठ्यांचा पत्रव्यवहार इतक्या प्रमाणानें उपलब्ध होत आहे कीं, क्षुल्लक व निरुपयोगी चिटोरीं छापण्याची काहीं जरूरच नाहीं.

प्रस्तावना 

३३. ब्रह्मेंद्रस्वामीच्या ख-या स्वरूपाचें आविष्करण येथपर्यंत झालें. रा. पारसनीस यांनीं हें आविष्करण केलें असतें म्हणजे मला हा खटाटोप करण्याची जरूरच पडली नसतीं. पंरतु मराठ्यांच्या इतिहासांतील एका भागाचा विपर्यास होत आहे हें पाहून हा खटाटोप करणें अवश्य झालें. खरें म्हटलें असतां, हें काम महाराष्ट्रांतील टीकाकारांचें होतें. परंतु रा. पारसनीस यांचें हें काल्पनिक चरित्र बाहेर पडून चार पांच महिने लोटले असतांहि कोणी टीकाकार खरा प्रकार उघडकीस आणण्यास पुढें आला नाहीं. ह्यावरून असें म्हणावें लागतें कीं, महाराष्ट्रांत सध्यां जी इतिहासासंबंधीं जागृति होत असलेंली दिसत आहे ती केवळ वरकरणी आहे. वाटेल त्यानें वार्टेल तें लिहिलें तरी तें चटसारें खपून जातें. खरें कोणते, खोटें कोणतें, हे निवडण्याची ताकत महाराष्ट्रसमाजांत नाहीं; किंवा सत्यासत्य निवडण्याची ताकत असून केवळ औदासीन्यानें व दुर्लक्षानें हा प्रकार होतो; अथवा इतिहासाच्या पुनरुज्जीवनाची बाल्यावस्था आहे अशी समजूत करून घेऊन कोणतेंहि ऐतिहासिक पुस्तक जसें पुढें येईल तसें केवळ प्रोत्साहनबुद्धीनें गोड मानून घेण्याची थोरपणाची संवय उत्कृष्ट वाटते; ह्या तिहींपैकीं कोणता प्रकार खरा असेल तो असो. इतकें मात्र निश्चयानें म्हणण्यास हरकत नाही कीं, हे तिन्ही प्रकार ऐतिहासिक ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाला हानिकारक आहेत व परंपरेनें राष्ट्राच्या प्रगतीला प्रतिबंधक आहेत. अनधीत व अनधिकारी लेखकांनीं वाटेल त्या गप्पा माराव्या आणि त्या महाराष्ट्रांतील प्रमुख वर्तमानपत्रकारांनीं ख-या मानून त्यांचा जयजयकार करावा, ही महाराष्ट्रांतील टीकाकारांच्या विवेचनशातीला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. कोणत्याहि राष्ट्राला अत्यंत प्राणभूत विषय म्हटला म्हणजे त्या राष्ट्राचा इतिहास होय. त्या प्राणभूत इतिहासाची हेळसांड होऊं देणें व ती होत असतांना तिचा जयजयकार करणें म्हणजे आपल्याच हातानें आपल्याच पायावर धोंडा घालून घेण्यासारखें आहे. ब्रह्मेंद्रस्वामीच्या पत्रव्यवहाराला रा. पारसनीस यांनी जोडलेलें चरित्र, दिलेल्या टीपा व लावलेल्या मित्या पाहून प्रस्तुतस्थलीं इतिहासाच्या साधनांच्या संशोधनाचें काम अत्यंत नालायक हातात पडलें आहे अशी माझी खात्री झाली. नंतर थोड्याच दिवसांनीं ह्या पत्रव्यवहारावर निर्भीड व सणसणीत टीकेमुळें महाराष्ट्रांत अग्रगण्यत्व पावलेलें जें केसरीपत्र त्यांत आलेली टीका वाचली. ती टीका वाचून ऐतिहासिक विषयावर टीका करण्याचेंहि काम प्रस्तुतप्रसंगी तितक्याच नालायक हातांत पडलें आहे असें म्हणण्याची पाळी आली. ब्रह्मेंद्रस्वामीचें मराठ्यांच्या राजकारणाचें सूत्रधारित्च, त्याचा Moral force, (नैतिक प्रेरणा) त्याची नीतिमत्ता वगैरे वस्तुविपर्यस्त प्रकरणाचा ऊहापोह सदर वर्तमानपत्रात केलेला पाहून परीक्षणार्थ पुस्तकांतील एक अक्षरहि न वाचतां त्यावर मत ठोकून देणें व त्यासंबंधी चार नवे सिद्धान्तहि सांगणे किती सोपें काम आहे हें माझ्या प्रत्ययास आलें! असत्यरूपी गुरूतरशिलांचा भेद करून त्यांच्या ठिक-या उडविण्याचें ज्याचें कुलव्रत, तोच जर त्या शिलांना कवटाळूं लागला, तर भ्रांतचित्तत्वाचा त्याजवर आरोप केल्यास नवल कसचें! वस्तुतः इतिहासाच्या कामात निर्भीड व स्पष्टवक्तेपणाच्या टीकेची अत्यंत जरूर आहे. तसेंच अशा प्रकरणांत निर्भीड व स्पष्टवक्तेपणाच्या टीकेची जितकी जरूर आहे त्याहिपेक्षां अधिकारी टीकेची विशेष जरूर आहे. निर्भीड, स्पष्टपणाची व अधिकाराची टीका जर ह्या विषयासंबंधानें झाली नाहीं, तर वर्तमान व भावी पिढ्यांची दिशाभूल होईल आणि सद्गुणांचा वाईट परिणाम होतो, दुर्गुणांचा विजय होतो, सद्गुणांपासून दुर्गुणांची उत्पत्ति होते, असले विपर्यस्त विचार समाजांत पसरूं लागतील. अवास्तव इतिहासाच्या वाचनापासून वाईट परिणाम कसे होतात ह्याचें एक उदाहरण देतों. शिवाजी लहानपणीं दरवडे घालीत असे व पुढें दरवडे घालतां घालतां तो राज्यपद पावला असे अवास्तव व विपर्यस्त वर्णन ग्रांट डफनें आपल्या इतिहासांत लिहून ठेविलें आहे. हेंच वर्णन शाळांतून चालणा-या कित्येक इंग्रजी व मराठी शालोपयोगी पुस्तकांत नमूद केलेले सर्वत्र प्रसिद्धच आहे. तेव्हां ह्या असल्या लिहिण्याला जितका खो घालतां येईल तितका घातला पाहिजे. ऐतिहासिक पत्रव्यवहार शुद्ध व अस्सल बरहुकुम छापून व त्यांतील पुराव्याला धरून जर रा. पारसनीस लिहितील तर त्यांचे लिहिणे उपयोगाचें होईल. ऐतिहासिक पत्रव्यवहार नुसता अस्सलबरहुकूम जरी त्यांनीं छापिला व चरित्रें, प्रस्तावना, टीपा वगैरे भानगडींत ते पडले नाहींत, तरी देखील त्यांच्या हातून मोठेंच काम साधल्यासारखें होईल. परंतु हा सुविचार पसंत न पडून ते जर आपला उद्योग सध्यां चालवीत आहेत त्याच धर्तीवर पुढें चालवितील व महाराष्ट्रांतील टीकाकार त्यांच्या लिहिण्याचा, इतिहासाच्या प्रेमानें जयजयकार करतील, तर वर्तमान व भावी पिढ्यांची दिशाभूल केल्याच्या श्रेयाल ते धनी होतील.

प्रस्तावना 

३२. ब्रह्मेंद्रस्वामीचें खरे स्वरूप रा. पारसनीसांस ओळखतां न आल्यामुळे किंवा त्यांनी ते ओळखण्याचा प्रयत्न न केल्यामुळे ब्रह्मेंद्रस्वामी व रामदासस्वामी हे दोघेहि त्यांना सारख्याच योग्यतेचे भासले. हा भास खरोखर आभासच आहे हे ह्या दोघा पुरुषांची तुलना करून स्पष्ट करून दाखवितों. (१) राष्ट्रीय व वैयंक्तिक ह्या दोन्ही नीतींच्या दृष्टीनें ब्रह्मेंद्राचें आंग्र्यांशीं वर्तन अत्यंत निंद्य होतें. रामदासस्वामींनीं असें निद्य वर्तन कोणाहि सरदाराशीं केलें नाहीं. (२) पाटील, महार, कारकून वगैरे लहानसहान माणसांशी ब्रह्मेंद्र क्षुल्लक कारणावरून भांडत असे. रामदासस्वामींना भांडण हा पदार्थ माहीतच नव्हता. (३) महत्वाकांक्षा हा ब्रह्मेंद्राचा मुख्य हेतु होता. निजामुन्मुलुखाला भेटावें, इंग्रजांशीं मैत्री करावी, शाहूनें पालखी आणावी, वगैरे मानाची हाव भार्गवरामास अतिशय होती. रामदासस्वामींस ही हाव बिलकूल नव्हती. (४) इस्टेट करण्याचा ब्रह्मेंद्राला नाद होता रामदासांना इस्टेटीची वार्ताहि नव्हती. (५) ब्रह्मेंद्राला, पुण्यांतील काळबोवासारखी अचकटविचकट शिव्या देण्याची संवय होतीं. रामदासांना तो प्रकार माहित नव्हता. (६) ब्रह्मेंद्राला हठयोग व समाधि ह्यांची आवड असे रामदासांनीं ही तालीम केली नाहीं. (७) पाऊस पाडणें, शाप देणें, संतानार्थ वोशध देणें, भुते काढणे वगैरे बीरविद्या ब्रह्मेंद्राजवळ असे. ह्या ढोंगाची उपासना रामदास तुच्छ मानीत असत. (८) ब्रह्मेंद्र खुनशी व तिरसट स्वभावाचा असे. रामदास केवळ शांतीची मूर्ति असे. (९) सुवासिक तैलें, उत्तम प्रावरणें व चमचमीत भोजन यांचा ब्रह्मेंद्र भोक्ता होता. रामदासस्वामींना ही देहसंतर्पणाची चाड नव्हतीं. (१०) ब्रह्मेंद्र, व्होलटेयराप्रमाणें, व्याजबट्टा व सावकारी करी. रामदासांना हा व्यवसाय करण्यास वेळ नव्हता. (११) ब्रह्मेंद्र इतर साधूंचा मत्सर करी. रामदास सर्व स्वामींचा स्नेही असे. (१२) ब्रह्मेंद्र छत्रपतीपाशीं इनाम गांवे मागे. रामदासांनीं शिवाजीनें समर्पिलेलें राज्य परत केलें. (१३) ब्रह्मेंद्र लहान सहान शिफारसी करी. रामदासांना ह्या क्षुल्लक गोष्टींत पडणे आवडत नसे. (१४) ब्रह्मेंद्राला एक वाक्य सरळ व शुद्ध लिहितां येत नसे. रामदास मराठी सारस्वताचे उस्ताद आहेत. (१५) समर्थानीं रामदाशी पथ काढून भरतखंडांत बाराशे मठ स्थापिले. ब्रह्मेंद्राचा पथहि नाहीं व शिष्यहि नाहीं. (१६) रामदासस्वामी उत्तम कवि, स्पष्टवक्ता, व नेमस्तकार्यकर्ता होता. ब्रह्मेंद्र ह्यांपैकी एकहि नव्हता. (१७) रामदास सृष्टिसौंदर्याचा भोक्ता होता. चाफळाइतकी धावडशी सुंदर नाहीं. (१८) रामदासाच्या शिवाजीनें सुंदर यवनी, मातु:श्री म्हणून परत पाठविलेली आहे. यवनी ठेवणारा बाजीराव ब्रह्मेंद्राचा आवडता शिष्य होता. (१९) रामदास भगवी वस्त्रें लेई, ब्रह्मेंद्र पुरभय्यी टोपी व मलमली झगा वापरी. असे आणीकहि कित्येक भेद दाखवितां येतील. परंतु सर्वांत मोठा भेद म्हटला म्हणजे राष्ट्रीय नीतिमत्ता वाढविण्याचा बाणा रामदासांच्या सर्व संस्थांत, लेखांत, भाषणांत व वृत्तींत दिसतो व ब्रह्मेंद्राच्या दिसत नाहीं. रामदासांच्या सर्व व्यवसायांचें मुख्य धोरण म्हटलें म्हणजे महाराष्ट्रधर्म होय. ह्या महाराष्ट्रधर्माचें नांवदेखील ब्रह्मेंद्राला माहीत नव्हतें. ब्रह्मेंद्राच्या वेळीं हें नांव लोपत चाललें होतें असा कदाचित संशय येईल. परंतु तसा प्रकार नाहीं. रा. करंदीकर आणि सहस्रबुद्धे यांनीं छापिलेल्या शाहूराजाच्या रोजनिशींतील शाहूच्या एका पत्रांत महाराष्ट्रधर्म हा शब्द आलेला आहे. सदर ठिकाणी इंग्रजी भाषांतरकारानें महाराष्ट्रधर्म म्हणजे Religion of महारांष्ट्र असें भाषांतर केलें आहे. परंतु तें बराबर नाहीं. त्या स्थलीं महाराष्ट्रधर्म या शब्दाचा अर्थ मराठ्यांचें कर्तव्य असा स्पष्ट आहे. शाहू छत्रपतीला महाराष्ट्रधर्म माहीत असावा व ब्रह्मेंद्राला नसावा ह्यावरून ब्रह्मेंद्राच्या राजकीय ज्ञानाचा अंदाज करतां येतो.