प्रस्तावना
३४. रा. पारसनीसांनी छापलेल्या पत्रव्यवहारांपैकी ब-याच पत्रांना तारखा दिल्या नाहीत. कित्येक पत्रांच्या तारखा चुकलेल्या आहेत व कित्येक पत्रांवरील टीपा ऐतिहासिक माहितीला धरून नाहींत, असे मागें मीं म्हटले आहें. अर्थात् सदर पत्रव्यवहारांतील ख-या तारखा देणें व टीपा सुधारणें अत्यंत अवश्यक झालें आहे. ज्या पत्राला पारसनिसांनीं तारीख दिली नाहीं तेथें कोरी जागा सोडली आहे.
पत्रव्यवहार.
(तक्ता....)
३५. ब्रह्मेंद्रस्वामीच्या व कायगांवकर दीक्षितांच्या पत्रांवरून ऐतिहासिक माहिती काय मिळते ती दाखविण्याची प्रतिज्ञा ह्या प्रस्तावनेच्या आरंभी केली होती. त्या प्रतिज्ञेप्रमाणें ब्रह्मेंद्रस्वामीच्या पत्रव्यवहाराचा खल येथपर्यंत झाला. हा खल करतांना रा. पारसनीस यांनीं छापिलेल्या ब्रह्मेंद्राच्या पत्रांचाहि विचार केला. ब्रह्मेंद्रस्वामीचीं जीं आज सहाशें पत्रें उपलब्ध होऊन प्रसिद्ध झालीं आहेत, त्यांपैकीं निम्यांत, तेल, तूप, चंदन, केशर, किनखाप, घोंगडी, दुलई, घंटा, नगारा वगैरे जिनसांची मागणी स्वामीनें त्यावेळच्या मोठमोठ्या लोकांजवळ केलेली आहे. ह्या मागण्या स्वामींनें कधीं स्वतंत्र पत्रांतून केल्या आहेत व कधीं इतर मजकूर लिहितांना शेवटीं केल्या आहेत. क्षुल्लक मागण्यांचीं ही असलीं काहीं पत्रें छापिलेलीं पाहून अशी तक्रार निघाली कीं हीं असलीं पत्रें छापून काय ऐतिहासिक ज्ञान मिळणार? ऐतिहासिक पत्रव्यवहार छापणा-यानीं क्षुल्लक व निरुपयोगी चिटोरी छापूं नये, अशी इशारत करणारा कांहीं जागरुक वाचकसमूह महाराष्ट्रांत आहे हें पाहून मला बरेंच समाधान वाटलें. तक्रार खरी असो अगर खोटी असो. तक्रार तरी करण्याइतकी काळजी ऐतिहासिक पत्रव्यवहारासंबंधानें लोकांना वाटते ही कांहीं सामान्य गोष्ट नव्हे. आतां तक्रार करणा-यानीं एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे कीं, तक्रार करणा-या लोकांप्रमाणें मलाहि क्षुल्लक व निरुपयोगी चिटोरीं छापण्याचा तिटकाराच आहे. उगाच कांहीं तरी भारुडा छापून कोणाला भिवडवायाचें आहे, किंवा फसवावयाचें आहे, किंवा वेळ मारून न्यावयाची आहे, किंवा प्रौढी मिरवावयाची आहे, अशांतला प्रकार नाहीं. असा खेळ करण्याला वेळहि नाहीं, कारणहि नाहीं व फाजील पैसाहि नाहीं. अठराव्या शतकांतील मराठ्यांचा पत्रव्यवहार इतक्या प्रमाणानें उपलब्ध होत आहे कीं, क्षुल्लक व निरुपयोगी चिटोरीं छापण्याची काहीं जरूरच नाहीं.