उपोध्दात
''पुढील दहा-वीस वर्षांतील इतिहासजिज्ञासूंचें पहिलें काम ह्मटलें ह्मणजे अस्सल कागदपत्रें शोधून काढून ती छापण्याचें आहे'', असें विधान ''मराठयांच्या इतिहासाची साधनें '' ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेंत दहा-पांच महिन्यांपूर्वी मी केलें होतें. त्याच्या अनुरोधानें ग्रंथमालेच्या ह्या महिन्याच्या अंकापासून मजजवळ जमा झालेले कांही ऐतिहासिक लेख छापून काढण्याचा उपक्रम मी आज करीत आहे. कोणताहि ऐतिहासिक लेख छापून काढण्यांत, माझ्या मतें, खालील दोन मुद्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक लेख पूर्णपणें शुध्द असा छापून निघाला पाहिजे हा पहिला मुद्दा आहे व प्रत्येक लेखातून जेवढी ह्मणून ऐतिहासिक माहिती, साक्षात् व परंपरेने, निघण्यासारखी असेल तेवढी चोपून काढून घेतली पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे. हे दोन मुद्दे इतके महत्त्वाचे आहेत की, जो कोणी त्याकडे दुर्लक्ष्य करून आपलें काम चालवील त्याला, इतिहासक्षेत्रात प्रवेश करण्याचादेखील परवाना देतां कामा नये. पहिल्या मुद्दयाविरुध्द जो काम करितो, तो स्वत:चा हलगर्जीपणा लोकांना दाखवितो, इतकेंच नव्हे; तर त्यांना संशयात पाडून एका प्रकारें फसविण्याचेही महापातक करितो. दुसरा मुद्दा तर, ऐतिहासिक लेख छापून काढण्याचा प्रधान हेतु आहे. हे दोन मुद्दे ध्यानांत धरून मी आपलें काम चालविणार आहे. ह्या अंकात पेशव्यांच्या एका शकावलीस प्रारंभ केला आहे.
काव्येतिहाससंग्रहांत तीन व भारतवर्षांत एक मिळून आजपर्यंत पेशव्यांच्या एकंदर चार लहान मोठया शकावली प्रसिध्द झाल्या आहेत. ह्या चारींपैकीं पूर्णपणें विश्वसनीय अशी एकही नाहीं. ह्मणून ही पांचवी शकावली प्रसिध्द करण्याची विशेष जरूर भासली. ही शकावली काव्येतिहाससंग्रहकारांच्या दफ्तरांतील असून, तपशीलवार व विश्वसनीय अशी आहे. शकावलीतील प्रत्येक तिथीची व तारखेची इंग्रजी तारीख दिली असून, ग्रांट डफच्या ग्रंथाहून जास्त किंवा निराळी माहिती जेथे दिलेली असेल, तेथे खुलासेवार टिपा दिल्या आहेत. प्रस्तुत शकावली पेशव्यांच्या बारनिशींतून व दफात्यांतून जुळवलेली असून, जुळवणारा मोठा प्रामाणिक लेखक असावा असें वाटतें. शकावली रचणाऱ्यानें अव्वल इंग्रजीत आपले काम केलें, असे डफच्या इतिहासाचा पाच-चार वेळा त्याने उल्लेख केला आहे, त्यावरून दिसतें. पेशव्यांच्या दफ्तरांची बरीच माहिती असणारे प्रसिध्द पेणसे हे ह्या शकावलीचे कर्ते असावेत, असा माझा तर्क आहे. पेशव्यांच्या दफ्तराची बरीच माहिती असणारे दुसरे वृध्द गृहस्थ जे. रा. हडपसरकर त्यांच्या येथें ह्याच शकावलीची मी एक प्रत पाहिली होती. दहा वीस वर्षांपूर्वी नगरास असताना काव्येतिहाससंग्रहकारांनी ही शकावली उतरून घेतली. ती माझ्या हाती चार सहा महिन्यांपूर्वी आली. बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीच्या प्रारंभापासून बाळाजी बाजीरावाच्या अखेरीपर्यंत हींत तारखा दिल्या आहेत. टिपा देताना पुराव्याच्या उणिवा कोणत्या असतात तेंही सांगितले आहे.