प्रस्तावना
३२. ब्रह्मेंद्रस्वामीचें खरे स्वरूप रा. पारसनीसांस ओळखतां न आल्यामुळे किंवा त्यांनी ते ओळखण्याचा प्रयत्न न केल्यामुळे ब्रह्मेंद्रस्वामी व रामदासस्वामी हे दोघेहि त्यांना सारख्याच योग्यतेचे भासले. हा भास खरोखर आभासच आहे हे ह्या दोघा पुरुषांची तुलना करून स्पष्ट करून दाखवितों. (१) राष्ट्रीय व वैयंक्तिक ह्या दोन्ही नीतींच्या दृष्टीनें ब्रह्मेंद्राचें आंग्र्यांशीं वर्तन अत्यंत निंद्य होतें. रामदासस्वामींनीं असें निद्य वर्तन कोणाहि सरदाराशीं केलें नाहीं. (२) पाटील, महार, कारकून वगैरे लहानसहान माणसांशी ब्रह्मेंद्र क्षुल्लक कारणावरून भांडत असे. रामदासस्वामींना भांडण हा पदार्थ माहीतच नव्हता. (३) महत्वाकांक्षा हा ब्रह्मेंद्राचा मुख्य हेतु होता. निजामुन्मुलुखाला भेटावें, इंग्रजांशीं मैत्री करावी, शाहूनें पालखी आणावी, वगैरे मानाची हाव भार्गवरामास अतिशय होती. रामदासस्वामींस ही हाव बिलकूल नव्हती. (४) इस्टेट करण्याचा ब्रह्मेंद्राला नाद होता रामदासांना इस्टेटीची वार्ताहि नव्हती. (५) ब्रह्मेंद्राला, पुण्यांतील काळबोवासारखी अचकटविचकट शिव्या देण्याची संवय होतीं. रामदासांना तो प्रकार माहित नव्हता. (६) ब्रह्मेंद्राला हठयोग व समाधि ह्यांची आवड असे रामदासांनीं ही तालीम केली नाहीं. (७) पाऊस पाडणें, शाप देणें, संतानार्थ वोशध देणें, भुते काढणे वगैरे बीरविद्या ब्रह्मेंद्राजवळ असे. ह्या ढोंगाची उपासना रामदास तुच्छ मानीत असत. (८) ब्रह्मेंद्र खुनशी व तिरसट स्वभावाचा असे. रामदास केवळ शांतीची मूर्ति असे. (९) सुवासिक तैलें, उत्तम प्रावरणें व चमचमीत भोजन यांचा ब्रह्मेंद्र भोक्ता होता. रामदासस्वामींना ही देहसंतर्पणाची चाड नव्हतीं. (१०) ब्रह्मेंद्र, व्होलटेयराप्रमाणें, व्याजबट्टा व सावकारी करी. रामदासांना हा व्यवसाय करण्यास वेळ नव्हता. (११) ब्रह्मेंद्र इतर साधूंचा मत्सर करी. रामदास सर्व स्वामींचा स्नेही असे. (१२) ब्रह्मेंद्र छत्रपतीपाशीं इनाम गांवे मागे. रामदासांनीं शिवाजीनें समर्पिलेलें राज्य परत केलें. (१३) ब्रह्मेंद्र लहान सहान शिफारसी करी. रामदासांना ह्या क्षुल्लक गोष्टींत पडणे आवडत नसे. (१४) ब्रह्मेंद्राला एक वाक्य सरळ व शुद्ध लिहितां येत नसे. रामदास मराठी सारस्वताचे उस्ताद आहेत. (१५) समर्थानीं रामदाशी पथ काढून भरतखंडांत बाराशे मठ स्थापिले. ब्रह्मेंद्राचा पथहि नाहीं व शिष्यहि नाहीं. (१६) रामदासस्वामी उत्तम कवि, स्पष्टवक्ता, व नेमस्तकार्यकर्ता होता. ब्रह्मेंद्र ह्यांपैकी एकहि नव्हता. (१७) रामदास सृष्टिसौंदर्याचा भोक्ता होता. चाफळाइतकी धावडशी सुंदर नाहीं. (१८) रामदासाच्या शिवाजीनें सुंदर यवनी, मातु:श्री म्हणून परत पाठविलेली आहे. यवनी ठेवणारा बाजीराव ब्रह्मेंद्राचा आवडता शिष्य होता. (१९) रामदास भगवी वस्त्रें लेई, ब्रह्मेंद्र पुरभय्यी टोपी व मलमली झगा वापरी. असे आणीकहि कित्येक भेद दाखवितां येतील. परंतु सर्वांत मोठा भेद म्हटला म्हणजे राष्ट्रीय नीतिमत्ता वाढविण्याचा बाणा रामदासांच्या सर्व संस्थांत, लेखांत, भाषणांत व वृत्तींत दिसतो व ब्रह्मेंद्राच्या दिसत नाहीं. रामदासांच्या सर्व व्यवसायांचें मुख्य धोरण म्हटलें म्हणजे महाराष्ट्रधर्म होय. ह्या महाराष्ट्रधर्माचें नांवदेखील ब्रह्मेंद्राला माहीत नव्हतें. ब्रह्मेंद्राच्या वेळीं हें नांव लोपत चाललें होतें असा कदाचित संशय येईल. परंतु तसा प्रकार नाहीं. रा. करंदीकर आणि सहस्रबुद्धे यांनीं छापिलेल्या शाहूराजाच्या रोजनिशींतील शाहूच्या एका पत्रांत महाराष्ट्रधर्म हा शब्द आलेला आहे. सदर ठिकाणी इंग्रजी भाषांतरकारानें महाराष्ट्रधर्म म्हणजे Religion of महारांष्ट्र असें भाषांतर केलें आहे. परंतु तें बराबर नाहीं. त्या स्थलीं महाराष्ट्रधर्म या शब्दाचा अर्थ मराठ्यांचें कर्तव्य असा स्पष्ट आहे. शाहू छत्रपतीला महाराष्ट्रधर्म माहीत असावा व ब्रह्मेंद्राला नसावा ह्यावरून ब्रह्मेंद्राच्या राजकीय ज्ञानाचा अंदाज करतां येतो.