प्रस्तावना
अत्यंत महत्त्वाचा व उपयोगाचा पत्रव्यवहारच छापतां छापतां जेथें नाकींनव येत आहेत, तेथें क्षुल्लक व निरुपयोगी चिटोरी छापीत बसण्याचें साहस होणार कसें? ब्रह्मेंद्रस्वामीचीं तेलातुपाचीं पत्रें ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचीं वाटलीं म्हणूनच छापिलीं आहेत. ब्रह्मेंद्रस्वामी निरिच्छ होता, परमहंस होता, सूत्रधार होता, राजकार्यकुशल होता, वैगरे नानाप्रकारच्या कल्पना आजपर्यंत प्रचलित होत्या. त्या कितपत ख-या आहेत हें दाखवितांना ही तेलातुपाचीं पत्रें छापणें आवश्यक झालें. पत्रव्यवहारावरूनच जर मनुष्याच्या स्वभावाची व कर्तृत्वाची पारख करावयाची असेल- व ऐतिहासिक पुरुषांच्या स्वभावाची पारख इतर कोणत्याहि साधनानें इतकी चांगली करतां येणें अशक्य आहे- तर त्या पत्रव्यवहारांत कोणत्या गोष्टीला किंवा इच्छेला विशेष प्राधान्य दिलें आहे तें पाहिलें पाहिजे. ब्रह्मेंद्रस्वामीच्या आवक व जावक अशा सहाशें पत्रांत ज्यांत कांहीं जिनसांची मागणी केली नाहीं अशीं ५० हि पत्रें नाहींत. खरबुजें, कलंगडीं, द्राक्षें, नारळ, वस्त्रें, पात्रें, गांवे, भिक्षा, कर्जे, व्याजें ह्यांची मागणी ह्या सहाशें पत्रांतून केलेली आहे. निवळ राजकीय महत्त्वाचीं अशीं स्वामीला पाठविलेलीं पत्रें दहा विसांहून जास्त नाहींत. कित्येक राजकीय पत्रें इतर लोकांना आलेलीं स्वामीनें मागून आणविलेलीं आहेत. सारांश “जिनसांची मागणी” ही स्वामीच्या हृदयांतील मोठ्या हव्यास होता. मागणीचें जो समाधान करील तो प्रिय व न करील तो अप्रिय, असा स्वामीचा कायदा असे. स्वामीच्या दफ्तराप्रमाणें इतरहि पांच पन्नास दफ्तरें मीं पाहिलीं आहेत. फडणीस, पुरंधरे, हिंगणे, थोरात, पंत राजाज्ञा, फडके, रास्ते पटवर्धन, वगैरेचीं चिटणिशीं दफ्तरें पहावीं तर त्यांत राजकीय कारभाराचे शेंकडो कागद सांपडतात. नाना फडणिसाच्या दफ्तरांतींल ३०,००० पत्रांपैकीं एकहि पत्र राजकीय नाहीं असें नाहीं; व एकाहि पत्रांत राजकीय दृष्ट्या क्षुल्लक किंवा निरुपयोगी मजकूर लिहिलेला सांपडावयाचा नाहीं. परंतु स्वामीचीं पत्रे पहावीं तर त्यांत राजकारणेतर मजकूरच विशेष आढळतो. त्या राजकारणेतर मजकुराचें स्वरूप काय, स्वामीच्या हव्यासाची दिशा कोणती, वगैरे गोष्टींच्या सिद्धीस पुरावा असावा म्हणून हीं तेलातुपाचीं पत्रें छापिलीं आहेत. त्यांच्याकडे यथार्थ दृष्टीनें पहाण्याची संवय लावून घेतल्यास तक्रारीस जागा राहाणार नाहीं.
३६. हें ब्रह्मेंद्र प्रकरण आटोपल्यावर कायगांवकर दीक्षितांच्या पत्रांकडे वळावयाचें. परंतु १७४० पासून १७६१ पर्यंतचा आणखी कांहीं पत्रव्यवहार छापावयाचा आहे. त्यावेळीं त्या पत्रांची उपयुक्तता दाखविली जाईल. येथें इतकेंच नमूद करून ठेवितों कीं दीक्षितांचा पत्रव्यवहार फारच महत्वाचा आहे.