प्रस्तावना
३३. ब्रह्मेंद्रस्वामीच्या ख-या स्वरूपाचें आविष्करण येथपर्यंत झालें. रा. पारसनीस यांनीं हें आविष्करण केलें असतें म्हणजे मला हा खटाटोप करण्याची जरूरच पडली नसतीं. पंरतु मराठ्यांच्या इतिहासांतील एका भागाचा विपर्यास होत आहे हें पाहून हा खटाटोप करणें अवश्य झालें. खरें म्हटलें असतां, हें काम महाराष्ट्रांतील टीकाकारांचें होतें. परंतु रा. पारसनीस यांचें हें काल्पनिक चरित्र बाहेर पडून चार पांच महिने लोटले असतांहि कोणी टीकाकार खरा प्रकार उघडकीस आणण्यास पुढें आला नाहीं. ह्यावरून असें म्हणावें लागतें कीं, महाराष्ट्रांत सध्यां जी इतिहासासंबंधीं जागृति होत असलेंली दिसत आहे ती केवळ वरकरणी आहे. वाटेल त्यानें वार्टेल तें लिहिलें तरी तें चटसारें खपून जातें. खरें कोणते, खोटें कोणतें, हे निवडण्याची ताकत महाराष्ट्रसमाजांत नाहीं; किंवा सत्यासत्य निवडण्याची ताकत असून केवळ औदासीन्यानें व दुर्लक्षानें हा प्रकार होतो; अथवा इतिहासाच्या पुनरुज्जीवनाची बाल्यावस्था आहे अशी समजूत करून घेऊन कोणतेंहि ऐतिहासिक पुस्तक जसें पुढें येईल तसें केवळ प्रोत्साहनबुद्धीनें गोड मानून घेण्याची थोरपणाची संवय उत्कृष्ट वाटते; ह्या तिहींपैकीं कोणता प्रकार खरा असेल तो असो. इतकें मात्र निश्चयानें म्हणण्यास हरकत नाही कीं, हे तिन्ही प्रकार ऐतिहासिक ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाला हानिकारक आहेत व परंपरेनें राष्ट्राच्या प्रगतीला प्रतिबंधक आहेत. अनधीत व अनधिकारी लेखकांनीं वाटेल त्या गप्पा माराव्या आणि त्या महाराष्ट्रांतील प्रमुख वर्तमानपत्रकारांनीं ख-या मानून त्यांचा जयजयकार करावा, ही महाराष्ट्रांतील टीकाकारांच्या विवेचनशातीला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. कोणत्याहि राष्ट्राला अत्यंत प्राणभूत विषय म्हटला म्हणजे त्या राष्ट्राचा इतिहास होय. त्या प्राणभूत इतिहासाची हेळसांड होऊं देणें व ती होत असतांना तिचा जयजयकार करणें म्हणजे आपल्याच हातानें आपल्याच पायावर धोंडा घालून घेण्यासारखें आहे. ब्रह्मेंद्रस्वामीच्या पत्रव्यवहाराला रा. पारसनीस यांनी जोडलेलें चरित्र, दिलेल्या टीपा व लावलेल्या मित्या पाहून प्रस्तुतस्थलीं इतिहासाच्या साधनांच्या संशोधनाचें काम अत्यंत नालायक हातात पडलें आहे अशी माझी खात्री झाली. नंतर थोड्याच दिवसांनीं ह्या पत्रव्यवहारावर निर्भीड व सणसणीत टीकेमुळें महाराष्ट्रांत अग्रगण्यत्व पावलेलें जें केसरीपत्र त्यांत आलेली टीका वाचली. ती टीका वाचून ऐतिहासिक विषयावर टीका करण्याचेंहि काम प्रस्तुतप्रसंगी तितक्याच नालायक हातांत पडलें आहे असें म्हणण्याची पाळी आली. ब्रह्मेंद्रस्वामीचें मराठ्यांच्या राजकारणाचें सूत्रधारित्च, त्याचा Moral force, (नैतिक प्रेरणा) त्याची नीतिमत्ता वगैरे वस्तुविपर्यस्त प्रकरणाचा ऊहापोह सदर वर्तमानपत्रात केलेला पाहून परीक्षणार्थ पुस्तकांतील एक अक्षरहि न वाचतां त्यावर मत ठोकून देणें व त्यासंबंधी चार नवे सिद्धान्तहि सांगणे किती सोपें काम आहे हें माझ्या प्रत्ययास आलें! असत्यरूपी गुरूतरशिलांचा भेद करून त्यांच्या ठिक-या उडविण्याचें ज्याचें कुलव्रत, तोच जर त्या शिलांना कवटाळूं लागला, तर भ्रांतचित्तत्वाचा त्याजवर आरोप केल्यास नवल कसचें! वस्तुतः इतिहासाच्या कामात निर्भीड व स्पष्टवक्तेपणाच्या टीकेची अत्यंत जरूर आहे. तसेंच अशा प्रकरणांत निर्भीड व स्पष्टवक्तेपणाच्या टीकेची जितकी जरूर आहे त्याहिपेक्षां अधिकारी टीकेची विशेष जरूर आहे. निर्भीड, स्पष्टपणाची व अधिकाराची टीका जर ह्या विषयासंबंधानें झाली नाहीं, तर वर्तमान व भावी पिढ्यांची दिशाभूल होईल आणि सद्गुणांचा वाईट परिणाम होतो, दुर्गुणांचा विजय होतो, सद्गुणांपासून दुर्गुणांची उत्पत्ति होते, असले विपर्यस्त विचार समाजांत पसरूं लागतील. अवास्तव इतिहासाच्या वाचनापासून वाईट परिणाम कसे होतात ह्याचें एक उदाहरण देतों. शिवाजी लहानपणीं दरवडे घालीत असे व पुढें दरवडे घालतां घालतां तो राज्यपद पावला असे अवास्तव व विपर्यस्त वर्णन ग्रांट डफनें आपल्या इतिहासांत लिहून ठेविलें आहे. हेंच वर्णन शाळांतून चालणा-या कित्येक इंग्रजी व मराठी शालोपयोगी पुस्तकांत नमूद केलेले सर्वत्र प्रसिद्धच आहे. तेव्हां ह्या असल्या लिहिण्याला जितका खो घालतां येईल तितका घातला पाहिजे. ऐतिहासिक पत्रव्यवहार शुद्ध व अस्सल बरहुकुम छापून व त्यांतील पुराव्याला धरून जर रा. पारसनीस लिहितील तर त्यांचे लिहिणे उपयोगाचें होईल. ऐतिहासिक पत्रव्यवहार नुसता अस्सलबरहुकूम जरी त्यांनीं छापिला व चरित्रें, प्रस्तावना, टीपा वगैरे भानगडींत ते पडले नाहींत, तरी देखील त्यांच्या हातून मोठेंच काम साधल्यासारखें होईल. परंतु हा सुविचार पसंत न पडून ते जर आपला उद्योग सध्यां चालवीत आहेत त्याच धर्तीवर पुढें चालवितील व महाराष्ट्रांतील टीकाकार त्यांच्या लिहिण्याचा, इतिहासाच्या प्रेमानें जयजयकार करतील, तर वर्तमान व भावी पिढ्यांची दिशाभूल केल्याच्या श्रेयाल ते धनी होतील.